उरूस, मंगळवार 7 डिसेंबर 2020
लॉकडाउनच्या काळात अजिंठा डोंगरांत फिरत असताना एक सुंदर अनुभूती आली. ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ ही बालकवींची कविता ओठावर घोळत होती. सर्वत पसरलेली मखमालीची हिरवी चादर. आभाळाची निळाई, मधूनच दाटून आलेले ढग आणि कोसळत चाललेल्या पाउस धारा. परत पडणारं ऊन.
वेताळवाडीच्या किल्ल्याला वळसा घालून पलिकडच्या डोंगर कपारीत रूद्रेश्वर लेणी आहे. तिथे आम्ही भटकत होतो. उंचावरून कोसळणारा धबधबा, त्याचा नाद, त्या कातळात कोरलेली लेणी. दोन एक हजार वर्षांपूर्वी जो कुणी इथे पहिल्यांदा लेणी खोदण्यासाठी येवून राहिला असेल त्याची अनुभूती काय असेल? त्याला काय म्हणून इथेच लेणी खोदावी वाटली?
हे सगळं पहात असताना माझ्या मनात आपोआपच कविता सुचत गेली. शब्दांचा एक नादच डोक्यात घुमायला लागला. या परिसरांत या आधीही आलेलो होतो. पण ही अनुभूती पहिल्यांदाच येत होती.
नुसतीच कविता लिहीली आणि संपलं असंही होत नव्हतं. या शब्दांना एक लय होती. कविता लिहीणं झाल्यावर लक्षात आलं की यातील शब्द वेगळे करता येत नाहीत. त्यांची रचनाही बदलता येत नाही. बालकवी, बोरकर, महानोर, पाडगांवकर यांच्या निसर्गविषयक कवितांची एक मोहिनी मनावर आधीपासून होतीच. त्याच धर्तीवर हे शब्द आलेले आहेत हे पण जाणवत होते. एके ठिकाणी ‘कभिन्न काळा’ असा शब्द आला. शशांक जेवळीकर या मित्राने लक्षात आणून दिले की हा शब्द मर्ढेकरांच्या प्रभावातून आलेला आहे. कारण एरव्ही ‘काळा कभिन्न’ असं म्हणतो. पण उलट कभिन्न काळा असं म्हणत नाही. पुढे दुसर्या एका कवितेतही असाच धम्मक पिवळा शब्द आलेला आहे.
पहिली ओळ सुचली ती पाऊस आणि सर्वत्र पसरलेली हिरवाई यांचा शाब्दिक अविष्कार बनून
डोंगर माथा । सचैल न्हातो
पाऊस रिमझिम । जवळ नी दूर
पोपट रंगी । मखमालीचा
हिरवा हिरवा । दाटे पूर ॥धृ० ॥
ही ओळ धृवपदासारखी घोळत राहिली. धबधब्याचा नाद मंत्रघोषासारखा वाटायला लागला. पूजा करताना भोवताली पाणी शिंपडतात. मंत्र म्हणतात तसेच काहीतरी वाटायला लागले. आधी कातळ फोडूनी असा शब्द मी लिहीला होता. नंतर लक्षात आले की फोडूनी पेक्षा भेदूनी असा शब्द जास्त योग्य वाटतो. वार्याचा नाद, पाणी कोसळतानाचा नाद, पाणी खळखळा वाहतानाचा नाद असे सगळे सूर एकमेकांत मिसळून गेले आहेत..
कभिन्न काळा । कातळ भेदूनी
पाणी उसळे । झरा होवूनी
मंत्रघोष हो । चैतन्याचा
सभोवताली । तुषार सिंचूनी
वार्यामधूनी । नाद लहरतो
सुरात मिसळूनी । जातो सूर ॥१॥
या परिसरांत मोर आहेत. जळकी नावाच्या गावात एका शेतकर्याने तर कोंबडीच्या अंड्यासोबत मोराचे अंडे उबवले. तो मोर कोंबडीच्या पिलांसोबतच वाढला. आज तो कोंबडीसारखाच घराच्या सभोवताली फिरत असतो. मोरांच्या केका परिसरांत नेहमी ऐकू येतात. केवळ मोरच पिसे फुलवून नाचत आहेत असे नाही तर झाडांनीही पानांचा पिसारा फुलवला आहे.
वनात कोणी । मनात कोणी
सुखे नाचतो । पिसे फुलवूनी
कानी पडती । मयुर केका
पानांमधूनी । वाजे ठेका
नादावूनी मग । खुळे पाखरू
हवेत सुर्रकन । मारी सूर ॥ २॥
या परिसरांत पळसाची झाडं भरपूर आहेत (महानोरांचे गाव पळसखेडे याच भागातले). तळ्याकाठी पाण्यात वाकुन पाहणारी पळसाची फांदी, काठावरची दगडी शिळा, चरणारी गाय हे सगळं आपोआपच कवितेत आलं. याच पसिरांत अजिंठा सारखी अप्रतिम शिल्पे घडली. तेंव्हा ही दगडी शिळा शिल्पासाठी झुरते आहे अशी ओळ सहजच कवितेत आली. आता पावसाळा चालू होतो. पळसांच्या लाल फुलांचा वसंत ऋतू ही खूप दूरची गोष्ट.
तळ्यात वाकून । पळस शोधतो
लाल फुलांचे । हसरे क्षण क्षण
काठावरची । शिळा एकटी
शिल्पासाठी । झुरते कण कण
चरता चरता । गाईचे मग
तिथेच अडूनी । राहते खूर ॥३॥
त्या डोंगर कपारीत भव्य कातळकडा भोवती उभा असताना आपल्या खुजेपणाची जाणीव खुपच तीव्र होत गेली. हे भव्य असे जलरंगांतील चित्र कुणी रंगवलं? त्यात आपलं स्थान काय? मग यातून कवितेचा शेवट जो सुचला तो असा होता
डोंगर झाडी । अभाळ पाणी
‘जलरंगी’ या । ठिपका आपण
भव्य रूप हे । पाहून विरते
ताठर मनीचे । आपुले ‘मी’पण
चैतन्याच्या । अनुभूतीने
भरून येतो । इवला ऊर ॥४॥
पावसाळ्यात या परिसरांत जरूर जा. कवितेत वर्णन केले आहे त्या निसर्गाचा अनुभव जरूर घ्या.
(छाया चित्र सौजन्य व्हिन्सेंट पास्कीलिनी. आम्ही प्रत्यक्ष सप्टेंबर २०२० मध्ये गेलो तेंव्हाची छायाचित्रे)
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575
मस्त !!!
ReplyDelete