Monday, May 27, 2019

मराठी 'कालिदासा'ची हिंदीत चोरी !



विवेक, उरूस, मे 2019

महाकवी कालिदास याला आषाढाच्या पहिल्या दिवशी ‘मेघदूत’ हे काव्य स्फुरले. हा दिवस त्याच्या आठवणीत ‘कालिदास दिन’ नावाने साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस  बुधवार 3 जूलै रोजी येतो आहे. या दिवशी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ नावाच्या सुंदर निसर्गवर्णनपर काव्यावर एका कार्यक्रमाचे नियोजन आम्ही करणार आहोत. त्यासाठी कालिदासावरील ग्रंथांचा शोध घेत होतो. ‘कालजयी कालिदास’ हे डॉ. बी.के. शुक्ल यांचे हिंदी पुस्तक समोर आले. पुस्तक अतिशय चांगले असल्याचे लक्षात आले. कालिदासाचा काळ, त्याच्या चरित्राबद्दल माहिती, त्याच्या एकूण साहित्यकृती, त्यावरील वाद, कालिदासच्या काळातील इतर लेखक अशी सर्व सविस्तर माहिती या ग्रंथात आहे. 


हा ग्रंथ चाळत असतानाच अचानक डो़क्यात किडा आला की मराठीत वा. वि. मिराशी यांचे ‘कालिदास’ या नावाचे एक चांगले पुस्तक आहे. ते कधीतरी चाळले होते. हिंदीत वाचण्यापेक्षा मराठीतील पुस्तक वाचावे म्हणून परभणीच्या गणेश वाचनालयाचे ग्रंथपाल आमचे मित्र संदीप पेडगांवकर यांच्याकडे मागणी केली. अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची सगळ्यात जूनी पहिली आवृत्ती आमच्या या ग्रंथालयात सापडली. दूर्मिळ पुस्तकांच्या कपाटात हा अनमोल खजिना होता. हातात असलेले  डॉ. शुक्ल यांचे हिंदी पुस्तक बाजूला ठेवून मिराशी यांचे जूने पुस्तक हाती घेतले. त्यावरची तारीख पाहूनच हरखून गेलो. मिराशी यांचे हे पुस्तक आहे इ.स.1934 चे.

नागपुरच्या ‘सुविचार प्रकाशन मंडळाने’ हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. या पुस्तकाची आता नविन आवृत्तीही प्रकाशीत झाली आहे. मिराशी हे ‘कालिदास’ विषयातील भारतातील एक फार मोठे तज्ज्ञ मानले जातात. आत्तापर्यंत त्यांच्या मांडणीला प्रमाण मानल्या गेले आहे. मिराशींचे पुस्तक वाचत असताना अचानक मला ही सगळी वाक्यरचना ओळखीची वाटायला लागली. मी तर पुस्तक पूर्वी वाचले नव्हते. फक्त चाळले होते. मग हे  वाक्यं मला का आळखीचे वाटत आहेत? मी समोरचे दुसरे पुस्तक बघितले. आणि अक्षरश: उडालोच. शुक्ल यांनी मिराशींच्या पुस्तकातील ओळ न ओळ भाषांतरीत केलेली आढळून आली. 

मी जो संदर्भ शोधत होतो तो ‘ऋतुसंहार’ चा. तेंव्हा त्याच्यापुरती ही चोरी असेल असे वाटले. मग पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली. ती सुद्धा शब्दश: चोरी केलेली. मिराशींच्या पुस्तकात 1. कालिनिर्णय 2. कालिदासकालीन परिस्थिती 3. जन्मस्थानाचा वाद 4. चरित्रविषयक अनुमाने 5. कालिदासची काव्यें 6. कालिदासाची नाटके 7. कालिदासीय ग्रंथांचे विशेष 8. कालिदासीय विचार 9. कालिदास व उत्तर कालीन ग्रंथकार अशी एकूण 9 प्रकरणे आहेत. 

आता ‘कालजयी कालिदास’ या डॉ. शुक्ल यांच्या हिंदी पुस्तकाची अनुक्रमणिका बघा- 1. काल-निर्णय 2. कालिदासकालीन परिस्थिती 3. जन्मस्थान की समस्या 4. चरित्रविषयक अनुमान 5. कालिदास के काव्य 6. कालिदास के नाटक 7. कालिदास के ग्रंथों की विशेषताएँ 8. कालिदास के विचार 9. कालिदास और उत्तरकालीन ग्रंथकार. 

पहिल्या प्रकरणातील पहिलीच ओळ मूळ पुस्तकातील अशी आहे- ‘आपले संस्कृत वाङ्मय अनेक विषयांत अत्यंत समृद्ध आहे.’ हिंदी कालिदास पुस्तकातील पहिलीच ओळ बघा- ‘हमारा संस्कृत साहित्य अत्यन्त संपन्न और अगाध है.’ 

निव्वळ शब्दश: भाषांतर करण्याच्या नादात आपण मुळ मराठी पुस्तकांचे संदर्भ या पुस्तकात जसे घेतले आहेत तसेच ते हिंदीतही घेत आहोत हे डॉ. शुक्ल विसरून गेले. कारण ते हे भाषांतर बुद्धी बाजूला ठेवून ठोकळेबाजपणे करत होते. आपल्या मुर्खपणाचे कित्येक पुरावे डॉ. शुक्ल यांनी पुस्तकात जागोजागी सोडले आहेत. जन्मस्थानाचा वाद या  तिसर्‍या प्रकरणात मूळ पुस्तकात मिराशी यांनी शि. म. परांजपे यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘साहित्यसंग्रह भाग 1’. या पुस्तकातील 96 व्या पानावरील एक परिच्छेद मिराशी यांनी आपल्या पुस्तकात वापरला. डॉ. शुक्ल यांचे हे काम होते की त्यांनी हे मूळ पुस्तक कोणते त्याचा पहिले शोध घ्यायचा. पण त्यांनी ते कष्ट घेतले नाहीत. त्यांनी हे आपल्या आपल्या पुस्तकात हा  परिच्छेद जशाला तसा घेतला.  शिवाय कंसात पुस्तकाचे नाव आणि पृष्ठ क्रमांक देताना (साहित्य संग्रह भाग 1, पृ. 16) असे करून लिहीले. वस्तुत: मूळ मराठी पुस्तकाचा पृ. क्र. 96 असताना केवळ हा 9 आकडा न समजल्याने त्यांनी तो 1 करून टाकला. कारण यात कुठेच कसलाच विचार डॉ. शुक्ल करत नाहीत. 

आपण कुठल्या पुस्तकांचे संदर्भ वापरले आहेत ते शेवटी परिशिष्टात नोंदविण्याची पद्धत असते. मिराशी यांनी आपल्या पुस्तकात ‘कांही संदर्भ ग्रंथ व लेख’ या नावाने सविस्तर परिशिष्ट दिले आहे. त्यात कालिदासाचे ग्रंथ, मराठी भाषांतरे, मराठी चर्चात्मक ग्रंथ, संस्कृत ग्रंथ, इतर भाषांतील ग्रंथ, शिवाय खालील नियतकालिकांतील कोरीव व चर्चात्मक लेख असे सगळे सविस्तर नोंदवले आहे. म्हणजे मुळात मिराशी यांनी किती कष्ट उचलले हे लक्षात येते. 

डॉ. शुक्ल यांनी मात्र उचला उचली करताना हे सगळं विसरून केवळ ‘इतर भाषांतील ग्रंथ’ इतकीच यादी आपल्या पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट म्हणून जोडली आहे. आणि नेमकी इथे त्यांची चोरी अजूनच उघडी पडली आहे. इतर भाषांतील ग्रंथांची यादी देताना 1 ते 17 असे क्रमांक वा. वि.मिराशी यांनी दिले आहेत. चोट्टेपणा करताना शुक्ल यांनी ‘संदर्भ ग्रंथावलि’ असे नाव देत पृ. क्र. 255 वर एक चारच पुस्तकांची यादी दिली आहे. स्वाभाविकच कोणीही हे क्रमांक 1 ते 4 असेच देईल ना. पण हा माणूस मुळातच निर्बुद्ध चोर असल्याने त्याला ही चोरी पण नीट जमली नाही. त्याने 12 पासून 15 क्रमांकांची जी चार इंग्रजी पुस्तकांची नावे जशाला तशी कॉपी करत त्यांना क्रमांकही मुळ पुस्तकातीलच 12 ते 15 दिले आहेत. आता काय म्हणावं अशा वृत्तीला? 

संपूर्ण पुस्तकात मिराशी यांच्या पुस्तकाचा कुठेही काहीही संदर्भ नाही. मिराशीच कशाला पण कुठल्याच मराठी लेखकाचा काहीही संदर्भ नाही. मिराशी यांनी जागोजागी आपल्या पुस्तकात ज्या मराठी पुस्तकांचे संदर्भ घेतले आहेत ते जशाला तसे हिंदीत शुक्ल देतात. पण या पुस्तकांची यादी परिशिष्टात देण्याचे मात्र सोयीस्कररित्या विसरून जातात. अगदी एक ना एक शब्द एक ना एक ओळ भाषांतरीत करून घेतली आहे. पण कुठेही मुळ लेखकाला जराही श्रेय दिले नाही. 

यापुस्तकावरचा जास्त मोठा आरोप पुढचा आहे. शासनाच्या सार्वजनिक ग्रंथालयासाठीच्या राजा राम मोहनराय ग्रंथ खरेदी योजनेत या पुस्तकाचा समावेश झालेला आहे. हे पुस्तक सदर प्रकाशकाकडून खरेदी करून महाराष्ट्रातील ग्रंथालयांना भेट म्हणून पाठविण्यात आले आहे. ही तर जास्त गंभीर बाब आहे. 2016 साली या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. निदान पुस्तकावर तरी तशी तारीख छापली गेली आहे. 

वासुदेव विष्णु मिराशी हे अतिशय विद्वान असे संस्कृत पंडित. नागपुरच्या मॉरिस कॉलेजमध्ये ते प्राध्यापक राहिलेले आहेत. नागपुरपासून जवळच असलेले रामटेक हे कालिदासाच्या मेघदुतचे जन्मस्थान. तेथे कालिदास विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील या ठिकाणाचा अभिमान बाळगत एक मराठी माणूस कालिदासावर अतिशय मोलाचा असा ग्रंथ 85 वर्षांपूर्वी लिहीतो. या ग्रंथाची इंग्रजीत आणि इतरही भाषांत लेखकाला पुरेसा सन्मान देवून भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. आणि असं असताना डॉ. बी.के.शुक्ल नावाचा एक कुणी उपटसुंभ हिंदी लेखक या पुस्तकाचे शब्दश: हिंदीत भाषांतर करून आपल्याच नवाने छापतो. आणि हा ग्रंंथ एका शासकीय योजनेद्वारे सार्वजनिक ग्रंथालयांसाठी खरेदी करून भेट म्हणून पाठवला जातो हा प्रकार आपल्या ग्रंथालय संस्कृतीला लांच्छन आहे. भारतातील इतर प्रदेशांत हाच ग्रंथ गेला असेल तर ते याच माणसाला कालिदासाचा अभ्यासक मानून याचेच संदर्भ देत बसतील. मुळ संशोधन करणार्‍या वा. वि.मिराशींचे श्रेय नाकारले जाईल. 

याची तमाम मराठी माणसांनी संबंधीतांनी गंभीर दखल घेवून या पुस्तकावर योग्य ती कार्रवाई केली पाहिजे.

(मुळ पुस्तक :  कालिदास, लेखक- वासुदेव विष्णु मिराशी, प्रकाशक-सुविचार प्रकाशन मंडळ, लिमिटेड, नागपूर, 1934,
हिंदी पुस्तक : काजजयी कालिदास, लेखक : डॉ. बी.के.शुक्ल, प्रकाशन- राष्ट्रीय साहित्य सदन, यमुना विहार, दिल्ली 110053. प्रकाशन वर्ष 2016.
लेखकाचा पत्ता. डॉ. बी.के. शुक्ल, देवभूमि, राजनगर, पालमपुर-176062 हिमाचल प्रदेश.)  
             
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Saturday, May 18, 2019

गिरीश कुबेर : एक अर्टिकल तो तबियत से लिखो यारो !



गिरीश कुबेर यांचे लोकसत्तातील ‘अन्यथा’ हे सदर माझ्या आवडीचे आहे. मी ते आवर्जून वाचतो. परदेशातील असे संदर्भ ते नेमके हूडकून काढतात ज्यातून मोदी-अंबानी-भाजप-संघ यांच्यावर नेमका निशाणा साधला जावा.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे ट्रंप यांच्याशी साम्य कसे आहे हे कुबेरांना आडून आडून सुचवायचे असते. खरं तर त्यांनी ते सरळच लिहावे. पण कुबेर तसे करत नाहीत. त्यांनी टीका जरूर करावी. पण ती करताना ते कधी कधी असं काही लिहून जात आहेत की त्यातून त्यांच्या हेतूबद्दलच शंका यावी.

आज शनिवार 18 मे 2019 रोजी त्यांनी ‘एक पत्थर तो तबियत से उछालो यारों...’ या नावाचा लेख लिहीला आहे. अमेरिकेत व्हर्जिनिया राज्यात लेक्सिग्टन शहरातील रेड हेन नावाचे रेस्तरॉं आहे. येथे ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख सारा हकबी सँडर्स आपल्या कुटूंबियांसमवेत गेल्या होत्या. रेस्तरॉंच्या मालकाने त्यांना खाद्यपदार्थ देण्यास नकार दिला. हकबी यांना अपमानित होवून बाहेर पडावं लागलं. अशी ही कथा आहे. पुढे या रेस्तरॉंच्या मालकावर लोकांनी कसा बहिष्कार टाकला, पत्रं पाठवली, धमक्या दिल्या असं एक ट्रंप यांना खलनायक बनविणारे चित्र कुबेर यांनी रंगविले आहे. शेवटी हे रेस्तरॉं बंद ठेवावे लागले. आणि काही दिवसांनी ते उघडणार त्या दिवशी लोकांच्या रांगा लागल्या होत्या, मालकाला वाटले की परत निषेध वगैरे की काय? पण तसे नव्हते लोकांनी धन्यवाद देण्यासाठी फुले देवून स्वागत करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. शिवाय पाकिटात घालून पैसे या मालकाला देवू केले होते वगैरे वगैरे...

कुबेरांचा लाडका सिद्धांत लोक हुकूमशाहीच्या विरोधात कसे रस्त्यावर आले, आणि त्यांनी कशी ट्रंप यांची दादागिरी एका रेस्तरॉं पुरती संपवली तो त्यांनी रंगवला आहे.

मला लेख आवडला. पण काहीतरी खटकत होते. परत वाचताना पहिल्या परिच्छेदातील एका गोष्टीचा अर्थच लागेना. ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख हकबी यांचा नेमका गुन्हा काय? केवळ त्या ट्रंप यांच्या प्रसिद्धी प्रमुख आहेत हा त्यांचा अपराध कसा काय होवू शकतो? अमेरिके सारख्या लोकशाही असलेल्या देशात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रेस्तरॉं मध्ये कुणाही ग्राहकाने खाद्य पदार्थ मागितल्यावर त्याला नकार देण्याचे कारण काय? किंवा काही कारणाने आम्ही सेवा देवू शकत नाहीत म्हणून नम्रपणे नकारही देता येतो. ते स्वातंत्र्य रेस्तरॉं मालकाला आहेच. पण अपमानित करण्याचे कारण काय?

आणि याचे नेमके कुठले समर्थन कुबेर करत आहेत? कुबेरांना हे सगळे संदर्भ भारताशी जोडायचा छंद आहे. आपण भरतातील परिस्थितीचा विचार करू. समजा उद्या कॉंग्रेसचा विजय झाला (हे वाचूनच कुबेरांना केतकरांना गुदगुल्या होतील). कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे प्रसिद्धी प्रमुख दिल्लीतील एखाद्या भाजप समर्थक व्यक्तीच्या उपहारगृहात गेले. त्या मालकाने राहूल गांधी यांच्या प्रसिद्धी प्रमुखाला मला तूझ्या मालकाबद्दल राग आहे म्हणून अपमानित करून हाकलून लावले तर कुबेर कुणाची बाजू घेतील?

ट्रंप यांच्या प्रसिद्धी अधिकारी हकबी यांनी काही गैर वर्तन केले का? कुणाला शिवीगाळ केली का? मद्यमान करून अनैतिकतेचे काही प्रदर्शन केले का? त्यांनी मागितलेले अन्न नाकारण्याचे कारण काय?

या सगळ्या प्रकरणाचे कुबेर नेमक्या कोणत्या बाजूचे आणि का उदात्तीकरण करत आहेत? खरं तर या प्रकरणाला अजून काही पैलू असू शकतील जे की आपल्याला माहित नाही. त्याच्याशी आपल्याला सध्या फारसे कर्तव्य नाही. एखाद्या लोकशाही देशातील व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जाते. तिथे वैध मार्गाने आपल्याला हवे त्याची ऑर्डर देते. आणि तो मालक काहीच सबळ कारण नसताना केवळ ट्रंप यांच्या कार्यालयातील अधिकारी म्हणून अपमान करतो? आणि कुबेर सारखा लोकशाही देशातील संपादक त्याचे समर्थन करतो. हा तर मोठा अजब प्रकार झाला.

भारतात मंदिरांमधून सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून ओरडणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने बोंब करणारे हेच लोक आहेत ना? मग सार्वजनिक उपहारगृहात सर्वांना प्रवेश असावा. प्रत्येकाला त्याने मागितलेले आणि उपलब्ध असलेले अन्न मिळावे असं यांना वाटत नाही?

गिरीश कुबरे ‘एक अर्टिकल तो तबियत से लिखो यारो‘. मोदीभक्त अंधळे आहेत म्हणून टीका करताना मोदी विरोधकही आंधळे होत चालले आहेत की काय? 
                 
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

Friday, May 17, 2019

पाकिस्तानी सुफी दर्ग्यांत का होतात बॉंबस्फोट ?



विवेक, उरूस, मे 2019

बुधवार दिनांक 8 मे रोजी पाकिस्तानातील लाहोरच्या सुप्रसिद्ध दाता दरबार सुफी दर्ग्यात कट्टरपंथियांनी बॉंबस्फोट केले. त्यात दहा जण मृत्यूमुखी पडले असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला तालिबान्यांनी केला आहे. तशी त्यांनी कबुलीही दिली आहे. हे तेच तालिबानी आहेत ज्यांनी अफगाणिस्तानातील बामियानातील सर्वात मोठ्या प्राचिन बुद्ध मुर्ती मिसाईल्स लावून उडवल्या होत्या. हेच कट्टरपंथी तालिबान आता पाकिस्तानातील सुफी संप्रदायाच्या विविध श्रद्धा स्थानांवर हल्ले करत आहेत. 

याच ठिकाणी यापूर्वीही आयसिस या कट्टरपंथीय गटाने 2010 मध्ये आत्मघाती हल्ला केला होता. त्यात50 जण ठार झाले होते.

11 व्या शतकातील सुफी संत अबुल हसन अली हुजविरी जे दाता गंज बक्ष या नावाने ओळखले जातात यांचा हा दर्गा आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठा दर्गा म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. ‘दाता दरबार’ या लोकप्रिय नावाने हा दर्गा ओळखला जातो. भारतातील सर्वात प्रसिद्ध अजमेरचे सूफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांनी पण या दाता दरबार मध्ये दाता गंज बक्ष यांच्या कबरीपुढे माथा टेकवला होता. त्यांचे आशिर्वाद घेतले होते. अगदी आत्ता आत्तापर्यंत नवाज शरीफ, इमरान खान पर्यंतचे पंतप्रधान इथे माथा टेकवत आले आहेत.   

या दर्ग्यात कव्वाल्ली महोत्सव भरवला जातो. जगभरातील कव्वाल इथे आपली हजेरी लावणे प्रतिष्ठेचे समजतात. इथे संगीत परंपरा मोठ्या निष्ठेने जतन केली जाते. या परिसरातील कव्वाली गायनाची एक वेगळी शैली आहे. शास्त्रीय संगीताचा पाया असलेली ही कव्वाली आज फारच थोड्या गायकांनी आत्मसात केली आहे. भारतातील हैदराबादचे कव्वाल या शास्त्रीय परंपरेत गातात.   

या सुफी संतांबाबत अजून एक मुद्दा इतरांपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. दाता गंज बक्ष यांनी ‘कश्फुल महजूब’ या नावाचा  लिहीला. सूफी प्राचीन तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ अरबी भाषेत उपलब्ध होते.  हा फारसी भाषेतील सूफी तत्त्वज्ञानाचा पहिलाच ग्रंथ होय. म्हणून याला अतोनात महत्त्व आहे. मोगल दरबाराची अधिकृत राजभाषा फारसी होती. मोठ-मोठ्या विद्वानांना चर्चा करण्यासाठी सगळ्यात जूना फारसी ग्रंथ म्हणून हाच उपयोगी पडत आला आहे. सम्राट अकबराने तर केवळ तत्त्वचर्चा करण्यासाठी वेगळी इमारत बांधली होती.  तिथे हा ग्रंथ सन्मानाने प्रतिस्थापीत करण्यात आला होता. पाश्चात्य विद्वान निकलसन यांनी 1914 मध्ये या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद प्रसिद्ध केला. पुढे रशियन अभ्यासक झोकोसिस्की यांनी 1920 मध्ये याची रशियन आवृत्ती सिद्ध केली. या ग्रंथात सूफी साधनेच्या श्रद्धा, तत्त्वे, पहिल्या युगापासून ते समकालीन सूफींची संक्षिप्त चरित्रे यांचा समावेश आहे. विभिन्न सुफी संप्रदाय आणि त्यांच्याशी संबंधीत साधकांची परिस्थिती, सूफींचे नियम, त्यांची प्रगतिस्थळे आणि पारिभाषिक शब्दावलींचे विवेचन या ग्रंथात समाविष्ट आहे. (सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन, लेखक-डॉ. मुहम्मद आजम, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. पृ. 346)

इथले संगीत व सूफी तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ हा कट्टरपंथी इस्लामी अतिरेक्यांना सगळ्यात खटकणारा मुद्दा आहे. त्यामुळेच या दर्ग्यावर हल्ले केले जातात. या दर्ग्यात ज्या प्रमाणे कव्वाल्यांमधून संगीताचे जतन केले जाते तसेच इथे मोठे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात विविध तत्त्वज्ञान विषयक जूने-पुराणे ग्रंथ सांभाळून ठेवले आहेत.

धार्मिक श्रद्धांसोबतच संगीत कला तत्त्वज्ञानाचे केंद्र म्हणून हा दर्गा प्रसिद्ध आहे. ही सगळी समृद्ध अशी ज्ञानाची- कलेची परंपरा नष्ट करणे हे कट्टरपंथीय इस्लामचे पहिले उद्दीष्ट आहे. भारतात शेकडो वर्षे मंदिरे शिल्पकला ग्रंथ यांच्यावर हल्ले होत गेले. इस्लामधील सुफी हे सुद्धा कट्टरपंथियांच्या रडारवर आलेले आहेत. त्यांच्यावर कठोर हल्ले केले जात आहेत. आणि नेमकी हीच जागतिक चिंतेची बाब आहे. 

जगभरात विविध देशांतील तत्त्वज्ञान, कला, शिल्प, संगीत याबाबत एक मोठ्या प्रमाणावर जनजागृती होताना दिसत आहे. जगभरचे संशोधक अभ्यासक आपल्या आपल्या देशाच्या सीमा ओलांडून इतर देशांतील अशा बाबींचा अभ्यास करताना दिसून येत आहेत. अभ्यासकां सोबतच जगभरचे पर्यटक अशा धार्मिक श्रद्धा ठिकाणांना आवर्जून भेट देतात. तेथील परंपरा श्रद्धा समजून घेतात. तत्त्वज्ञानाची तोंड ओळख करून घेतात. युरोपमध्ये अशा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात सामान्य लोक उत्सूक आहेत. 

जेंव्हा दाता दरबार दर्ग्यावर हल्ला होतो तेंव्हा त्याची वेदना जगभर उमटते त्याचे कारण हेच आहे. जगभरच्या सामान्य श्रद्धाळू रसिक कलावंत वर्गाला अशा ठिक़ाणांबाबत आस्था वाटत असते. भौतिक प्रगती साधलेला एक बर्‍यापैकी मध्यमवर्ग आता अशा बाबींकडे वळला आहे. त्यासाठी तो जगभर पर्यटक म्हणून फिरतो आहे. त्याला जगभरातील कला संस्कृती धार्मिक समजूती यांना डोळसपणे समजून घेण्यात रस आहे. त्याचा नव्याने अन्वयार्थ लावण्यात आपली बुद्धी तो खर्च करू पाहतो. 

कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या या पूर्वी पाकिस्तानात करण्यात आली, शाहबाज कलंदर दर्ग्यात बॉंबस्फोट करण्यात आले आणि आता दाता दरबार दर्ग्यात बॉंब स्फोट झाले. याचा आपण कडाडून निषेध केला पाहिजे. ही जी तालिबानी वृत्ती आहे तीचा नायनाट केला गेला पाहिजे. 

पाकिस्तानात संगीतावर मोठे हल्ले होत आहेत. यामूळे संगीतकार, गायक, रसिक, वादक कलाकार हे भयभीत चिंताग्रस्त झाले आहेत. पाकिस्तानातील संगीतावरील हल्ल्यांचा विषय घेवून जवाद शरीफ नावाच्या तरूणाने एक सुंदर माहितीपट ‘इंडस ब्लूज’ नावाने तयार केला. सध्या विविध जागतिक चित्रपट महोत्सवात तो दाखवला जात आहे. त्याला कैक पुरस्कारही मिळाले आहेत. जूनी पुराणी वाद्ये सिंधू नदीच्या खोर्‍यात कशी संपूष्टात येत चालली आहेत. वादकांना किमान प्रतिष्ठा तर सोडाच खायला पण भेटायची मारामार आहे. शिवाय त्यांच्यावर हल्ले होत आहेत. वाद्य जाळून टाकली जात आहेत. सध्या आख्ख्या पाकिस्तानात एकच सारंगी वादक जिवंत शिल्लक राहिला आहे. अशा 24 दूर्मिळ वाद्यांपैकी 9 वाद्यांचा वेध या माहितीपटात घेतला आहे. 

दाता दरबार दर्ग्यावरील हल्ला हा भारतीयांसाठी चिंतेचा विषय यामुळे आहे की सूफी तत्त्वज्ञान, संगीत, मोगल स्थापत्य या सगळ्या गोष्टी ज्यावर हे हल्ले होत अहोत हे सगळं आपल्याशी निगडीत आहे. नव्हे आपल्यात पूर्णपणे मिसळून गेले आहे. इतकंच नव्हे तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा ते एक अभिन्न असे अंग बनून आहे. त्यामुळे हा हल्ला स्वाभाविकच आपल्यावरचाच हल्ला असतो. 

कराची मधील सिंधी संस्कृती, पंजाबातील संस्कृती या भारतापासून वेगळ्या काढताच येत नाहीत हे कट्टरपंथीय इस्लामचे खरे दुखणे आहे. ज्या भारतीयांबद्दल ते द्वेष करतात त्या भारतीय परंपरेची पाळेमुळे या प्रदेशातील इस्लाममध्ये खोल रूजलेली आहेत. ती उपटून कशी काढणार? 

जगाला असे वाटत होते की इस्लामने भारतावर आक्रमण केले आणि येथील कित्येक लोकांना धर्मांतर करायला लावून मुसलमान केले. वरवर हे खरेही आहे. जगात इंडोनेशियाच्या खालोखाल मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. इतके तर लोक बाहेरून येणे शक्यच नाही. तेंव्हा भारतातील मुसलमान हे मूळचे इथलेच आहेत. आता हळू हळू काळावर मात करून या प्रदेशातील इस्लामवरच येथील समृद्ध संस्कृती परंपरा यांचा प्रभाव पडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. त्यांना नष्ट करता येणं शक्य नाही हे कट्टरंपंथियांनी ओळखले पाहिजे. भारत आता सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही देश आहे. आधुनिक देश आहे. येथे आता मध्ययुगीन कालखंडातील धर्मांधपणा शक्य नाही. पण पाकिस्तानसारखा देश जो गेली 7 दशके चाचपडतच आहे तेथे हे हल्ले अजून चालूच आहेत. हड्डप्पा मोहेंजदरो सारख्या प्रचीन संस्कृतीची ओळख सांगणारी शहरे या भागात सापडली. सिंधू नदीचा समृद्ध संस्कृतीचा हा प्रदेश. कट्टरपंथीयांना येथील खाणाखुणा नष्ट करण्याची दुष्टबुद्धी होते आहे.

केवळ भारतच नव्हे तर जगभरच्या पत्रकार, लेखकांनी या हल्ल्यांचा कडक निषेध केला आहे.  
                
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Sunday, May 12, 2019

केतकरांची अभद्रवाणी : 23 मे ला दंगे होणार !



मॅक्स महाराष्ट्र या न्यूज पोर्टलच्या रवी अंबेकरांना मुलाखत देताना केतकरांनी जे तारे तोडले आहेत त्याला खरोखरच तोड नाही.

महाभारतात युद्ध संपल्यावरचा एक प्रसंग आहे. सरोवराच्या पाण्यात दुर्योधन शेवटच्या घटका मोजत निपचीत पडून आहे. त्याला शोधत अश्वत्थामा तिथे जातो. शेवटच्या क्षणी दुर्योधन त्याला सेनापतीपदाचा अभिषेक करतो आणि सूड घ्यायला सांगतो. त्या प्रमाणे अश्वत्थामा पांडवाच्या शिबीरात मध्यरात्री शिरतो. पांडवांचा सेनापती धृष्ट्यद्युम्न (हे नांव राहूल गांधींच्या तोंडून केतकरांनी वदवून दाखवावे.) द्रौपदीच्या पाच मुलांना (पाच पांडवांपासून झालेली पाच मुले. या शिवाय प्रत्येक पांडवाला इतर पत्नीपासून झालेली अपत्ये होतीच.) जवळ घेवून झोपलेला असतो. झोपेत त्या सर्वांची हत्या करून अभिमन्यूची पत्नी उत्तरा हीच्या गर्भावर तो ब्रह्मास्त्र सोडतो. या सगळ्या पापासाठी त्याला शाप मिळतो. त्याच्या कपाळावरचा तेजस्वी मणी देव काढून घेतो. आणि ती भळभळती जखम घेवून अश्वत्थामा फिरत राहतो. अशी ती  कथा आहे.

केतकरांना निकालाचा आधीच अंदाज आलेला असावा. कॉंग्रेसचे सगळे बौद्धिक सेनापती एका पाठोपाठ एक अपयशी ठरल्यावर आता शेवटचा बौद्धिक सेनापती म्हणून केतकरांना नेमल्या गेले असावे. त्यांनी भाजपवर सूड उगवायचा म्हणून अश्वत्थाम्या कृतीसारखी दळभद्री भाषा आत्तापासूनच करायला सुरवात केली आहे. 23 मे नंतर केतकरांना हरलेल्या कॉंग्रेसच्या राज्यसभेतील खासदारकीची भळभळती जखम कपाळावर घेवून जगत राहावं लागणार असं दिसतं आहे.

केतकर असं म्हणाले की मोदी काहीही झाले तरी सत्ता सोडणारच नाहीत. 23 मे ला दंगल होईल. विजय मिळाला तर भाजपवाले विजयाच्या उन्मादात माज आल्याने दंगा करतील. पराभव झाला तर निराशेत दु:खात दंगल करतील. पण दंगल करतील हे निश्‍चित.

केतकरांना असे विचारायला पाहिजे की तूम्ही हे भाकित कशाच्या आधारावर करत आहात? भारतीय लोकशाहीसाठी इतकी दळभद्री भाषा तूमच्या तोंडून कशी काय निघत आहे?

आत्तापर्यंत निवडणूक निकालावर भारतात कधी दंगल झाली आहे का? लोकसभेची 17 वी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. केवळ पन्नास जागांची निवडणूक राहिली आहे. जवळपास शांततेत मतदान झाले आहे. आधीपेक्षा एखाद दोन टक्के जास्तच मतदान होण्याची शक्यता आहे.  जो काही हिंसाचार मतदानाच्या वेळी झाला तोही पश्चिम बंगाल मध्ये जिथे की भाजपची सत्ता नाही. मग केतकर हा आरोप कोणत्या आधारावर करत आहेत?

2014 ते आजतागायत ज्या ज्या राज्यांत विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्या त्या ठिकाणी सत्ताबदल सहज झाला. भाजपचा पराभव झालेल्या राज्यांमध्ये भाजप मुख्यमंत्र्याने सत्ता सोडण्यास नकार दिला असे एक तरी उदाहरण आहे का? मोदी 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कालखंडात गुजरात राज्यात ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या त्यात ज्या ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला तिथे इतर पक्षांना सत्तेत येण्यापासून रोकल्या गेले आहे का?

केतकर इतका बौद्धिक थयथयाट का करत आहेत?

याआधी ते असे म्हणत होते की मोदी परत पंतप्रधान होणारच नाहीत. मग आता असं म्हणत आहेत की ते सत्ता सोडणारच नाहीत. मोदीचे पंतप्रधानपद एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे.

केतकर कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. केतकरांनी कॉंग्रेस पक्षाला निवडणुकाच लढवू नका असा सल्ला का नाही दिला? केवळ कॉंग्रेसच कशाला सगळ्या विरोधी पक्षांना त्यांनी असे का नाही सांगितले की मोदी सत्ता सोडणार नाहीतच. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमुक अमुक इतक्या वर्षांंसाठी मोदींचे पंतप्रधानपद पक्के आहे. मग निवडणुका लढवताच कशाला? सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकूत. जगाला एक मोठा संदेश जाईल की मोदींच्या हुकूमाहीच्या विरोधात विरोधी पक्षांनी अतिशय कडक पाऊल चलले आहे.

भाजपला 281 जागा मिळाल्या तरी आपला नैतिक पराभव समजून मोदींनी राजीनामा दिला पाहिजे असे एक विधान केतकरांनी या मुलाखतीत केले आहे. मोदी-भाजप आणि जनता काय करायचे त्यांचे ते पाहून घेतील. जर भाजपला आधीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर केतकर काय करतील? किंवा राहूल गांधी काय करतील? केतकरांमध्ये ही हिंमत आहे का की कॉंग्रेसचा पराभव झाल्यास राहूल गांधींचा राजीनामा मागायची?

न्यायालयाचा निकाला विरोधात गेल्यानंतर सत्ता न सोडण्याची खेळी केतकरांच्या प्रिय नेत्या इंदिरा गांधींनी केली होती. ते कदाचित केतकरांच्या इतके डोक्यात घुसून बसले असावे की त्यांना आता वाटते आहे की मोदीही त्यांच्या प्रिय नेत्यांप्रमाणेच पदाला चिकटून राहतील.

कॉंग्रेसचे सगळे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, शल्य (हे सगळे कौरवांचे सेनापती होते) एकट्या दुर्याधनाच्या (राहूल गांधींच्या) अहंकारापोटी धारातीर्थी पडले आहेत. शेवटचा  बौद्धिक सेनापती कुमार केतकर अश्वत्थाम्या सारखी सुडाची भाषा बोलतो आहे. 23 मे ला दंगे होण्याची ग्वाही देतो आहे.

निकाल काहीही लागो पण लोकशाहीवर असले दळभद्री आरोप करणार्‍या केतकरांना त्यांच्या वयाच्या किंवा त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ एका तरी विचारवंतांने खडसावून विचारले पाहिजे ‘केतकर तूमचे डोके ठिकाणावर आहे काय?’ 
                 
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

Thursday, May 9, 2019

मनमोहनांचा असममधून राज्यसभेचा मार्ग बंद !



माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेंव्हा ते नेमक्या कोणत्या मतदार संघातून निवडून आले होते? कुणालाच फारसे माहित नाही. किंवा त्या आधीही ते नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात वित्तमंत्री होते तेंव्हा त्यांचा मतदार संघ कोणता होता? मनमोहन सिंग कोणत्याही मतदार संघातून लोकांमधून सरळ निवडून आलेले नाहीत. मनमोहन राज्यसभेवर निवडून आले होते.

2004 मध्ये त्यांना राज्यसभेवर निवडून येण्यासाठी कॉंग्रेसने सोयीचे राज्य म्हणून असमची निवड केली. तरूण गोगाई तेंव्हा असमचे मुख्यमंत्री होते. आणि कॉंग्रेसेच तिथे निर्विवाद बहुमत होते. गोगाईंना कुठलेच राजकीय आव्हान त्या राज्यात नव्हते. मग मुळचे पंजाबी असलेले मनमोहन सिंग अचानक असमचे रहिवाशी झाले. त्यांचा पत्ता असमचा दाखविण्यात आला. आणि असम कोट्यातून त्यांना राज्यसभेवर आणण्यात आले. लोकशाहीची उठता बसता आरती करणारे सगळे पुरोगामी तेंव्हा सगळे या मुद्द्यावर चुप राहिले.

देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीनं खोटेपणा करून दुसर्‍या राज्याचा रहिवाशी दाखविण्यात येतो. शिवाय लोकांमधून निवडून न जाता त्याला मागच्या दाराने संसदेत पोचविले जाते. यावर या लोकशाहीच्या कथित रक्षकांनी आक्षेप का नाही घेतला?

याच कॉंग्रेसचे दुसरे पंतप्रधान नरसिंहराव  पंतप्रधान बनले तेंव्हा खासदार नव्हते. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी तेलंगणातल्या नंदयाल लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. आणि लोकांमधून निवडून आले. मग हेच मनमोहन यांच्या बाबतीत का नाही करण्यात आले? सोनियांचे आशिर्वाद मनमोहन यांच्या पाठीशी होते आणि नरसिंह रावांच्या नव्हते हा तो फरक आहे काय? पण असे प्रश्‍न पुरोगाम्यांना विचारायचे नसतात.

आज हा सगळा प्रश्‍न परत उपस्थित होण्याचे कारण म्हणजे असममधून राज्यसभेची निवडणूक होऊ घातली आहे. सध्या मनमोहन असम मधून खासदार आहेत. त्यांची खासदारपदाची मुदत 14 जूनला संपत आहे. कुणालाही वाटेल मग यात चर्चा करण्यासारखे काय आहे. मनमोहन यांना परत कॉंग्रेस खासदारपदी निवडून आणेन. पण इथेच नेमकी गोम आहे. मधल्या काळात ब्रह्मपुत्रा नदामधून (या नदीला नदी न म्हणता नद म्हणतात.) प्रचंड पाणी वाहून गेले आहे. असममधून कॉंग्रेसची केवळ सत्ताच गेली असे नाही तर किमान एक खासदार निवडून येण्यासाठी आवश्यक तेवढेही आमदार त्यांच्यापाशी आता शिल्लक नाही. पहिल्या पसंतीची किमान 43 मते खासदार होण्यासाठी आवश्यक आहे. पण कॉंग्रेसपाशी केवळ 25 आमदार आहेत. कॉंग्रेसला साथ देवू शकणार्‍या बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षापाशी 13 आमदार आहेत. सगळी मिळून बेरीज 38 पर्यंतच पोचत आहेत. याच्या उलट सत्ताधारी भाजप कडे स्वत:चे 61 आणि मित्रपक्षांचे 26 आमदार आहेत. शिवाय इतर अपक्षांचाही पाठिंबा आहे. तेंव्हा त्यांचे एक काय पण दोनही खासदार निवडून येवू शकतात.

कॉंग्रेसपाशी आपल्या माजी पंतप्रधानाची खासदारकी वाचविण्याइतकेही आमदार शिल्लक नाहीत.
एकेकाळी कॉंग्रेस पक्षात राज्या राज्यात कधीही नेतृत्व बदल केला जायचा. केंद्रातला मंत्री राज्यात मुख्यमंत्री म्हणून यायचा. मग त्याच्यासाठी तातडीने विधान परिषदेत जागा तयार असायची. तसेच उलट राज्यातला हटविल्या गेलेला मुख्यमंत्री केंद्रात तडजोड म्हणून घेतला जायचा. त्याच्यासाठी राज्यसभेत लाल गालिचे पसरलेलेच असायचे. लोकशाहीचा असा सर्रास खेळखंडोबा कॉंग्रेसने चालविला होता. राज्यातल्या आमदारांना मुख्यमंत्री निवडण्याची संधी क्वचितच दिली जायची. सत्तेच्या मोहापायी कॉंग्रेसचे राज्याराज्यातील नेते केंद्रीय नेतृत्वाला वचकून दबून असायचे. या सगळ्या लोकशाहीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणार्‍या एकाधिकारशाहीकडे सगळे काणाडोळा करायचे. 

1989 पासून हे चित्र बदलण्यास सुरवात झाली. हळू हळू राज्यां राज्यांतून कॉंग्रेसची दादागिरी संपूष्टात आली. आज ज्या राज्यांत कॉंग्रेस सत्तेत आहे तिथेही एकाधिकारशाही करावी इतके बहुमत त्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे राज्यसभेतील वर्चस्वही आता संपूष्टात आले आहे.

मनमोहनसिंग यांच्या विद्वतेबद्दल कुणालाही आदरच आहे. पण त्यांना आपण लोकनेता म्हणून शकत नाहीत. दहा वर्षे पंतप्रधान राहिलेला माणूस त्याला निवडून देण्यासाठी एक मतदार संघ कॉंग्रेसला बांधता येवू नये हे त्या पक्षाचे अपयश आहे. मनमोहनसिंग कदाचित पंजाबातून राज्यसभेवर निवडले जातील. पण असम मधून पक्षाची इज्जत गेली ती भरून कशी येणार?
 
               
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

Tuesday, May 7, 2019

मतदानाचा टक्का । कुणाला धक्का ?


विवेक, उरूस, मे 2019

महाराष्ट्रातील सर्व चारही टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडले. निवडणुक आयोगाने जी अंतिम आकडेवारी जाहिर केली त्यानुसार गतवेळे इतकेच मतदान या वेळेसही झालेले दिसून येते आहे (60 टक्के). (देशभरात ही फारसा बदल नाही. जवळपास तेवढेच मतदान झाले आहे)

मतदानाचा हा टक्का तितकाच राहणे यात एक दूसरा छूपा अर्थ आहे. जवळपास 7 टक्के इतकी वाढ मतदारांमध्ये झालेली होती. म्हणजे आधीपेक्षा यावेळेस नविन मतदार नोंदवले गेले ती वाढ महत्त्वाची आहे. टक्का तितकाच राहिला याचा ढोबळ अर्थ असा होतो की नविन मतदारांनी मोठ्या जोमाने मतदान केले.
महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्येने सभा भाजप-शिवसेना यांच्याच झाल्या. एकूण संख्येची बेरीज केल्यास ती युतीच्या बाजूची दिसते. याचा साधा अर्थ परत असा निघतो की सकृत दर्शनी लोकांचा कल परत सत्ताधार्‍यांकडेच आहे.

या आकडेवारीकडे एक वेगळ्या दृष्टीने पहायला पाहिजे. विरोधी पक्षांनी सरकार विरोधी असंतोष आहे असे वारंवार सांगितले होते. मग याचे प्रतिबिंब मतदानात पडायला हवे होते. जर सरकार वर लोकांचा राग आहे तर तो दोन पद्धतीनं दिसतो. एक तर लोक मतदानाला बाहेरच पडत नाहीत. तसे असेल तर त्याचा फायदा सत्ताधार्‍यांनाच होतो. कारण बदल होत नाही. मतदान जेवढ्याला तेवढे झाले तर त्याचा अर्थ लोकांना फारसा बदल अपेक्षीत नाही.  अशावेळी थोड्याफार जागा कमी जास्त होवून तेच सरकार सत्तेवर राहते. तिसरा प्रकार म्हणजे मतदानात प्रचंड वाढ होणे. यामुळे मात्र सत्ताधारी गोत्यात येतात. विरोधी पक्षांनी तयार केलेल्या वातावरणाचा फायदा त्यांनाच मिळतो. जनमत विरोधात गेल्याचे दिसते. सत्ता पालट होवू शकतो.
महाराष्ट्रात मतदानात काहीच बदल झाला नाही यावरून सत्ताधारी युती 35 जागांपर्यंत सहज पोचू शकते. पाच सात जागांचे नुकसान होवू शकते. विरोधकांना मागच्यावेळी 6 जागा मिळाल्या होत्या. या वेळीस त्या 12-13 पर्यंत पाचू शकतात. 

दोन ठळक मुद्दे या मतदानातून समोर येतात. एक तर कॉंग्रेस राष्ट्रवादी हे प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते. त्यांना राज्यभर प्रचाराची राळ उडवून देत वातावरण निर्मिती करण्यात अपयश आले. याचाच परिणाम म्हणजे आपल्या आपल्या प्रभावाखालील प्रदेशात त्यांना जास्त मतदान करून घेता आले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि विदर्भात कॉंग्रेस यांनी असे मतदान करून घेणे अपेक्षीत होते. कारण हे प्रदेश त्यांचे कधीकाळी गढ राहिले होते.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते आपआपले मतदार संघ सांभाळण्यातच गुंतून गेले. उर्वरीत महाराष्ट्रात फिरणे त्यांना जमले नाही. हे चित्र चांगले नाही. विधान सभा निवडणुका तोंडावर आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे बीडमध्येच अडकून पडलेले आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या दरवाज्यावर खुर्ची टाकून बसलेले. एकटे शरद पवार उतरत्या वयात सभा घेत फिरले. कॉंग्रेस अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या मतदार संघातील मतदान होईपर्यंत बाहेर पडलेच नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याही प्रभावी सभा कुठे झाल्याची नोंद नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादीला आपल्या आपल्या प्रभाव क्षेत्रात मतदानांत उत्साह निर्माण करता आला नाही.

दुसरा मुद्दा राज ठाकरेंच्या निमित्ताने समोर आला होता. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 9 सभा घेतल्या. मग या 9 मतदार संघांत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी काही केले का? राज ठाकरेंचा राजकीय प्रभाव मुंबई-पुणे-नाशिक असा राहिला आहे. इथे त्यांच्या सभा झाल्या. मग मतदानाचा टक्का या ठिकाणी का नाही वाढला? कल्याण आणि पुण्यात तर मतदान लक्ष्यणीय घटल्याचे आकडे आहेत. मुंबईत ते चांगले साडेतीन टक्के वाढल्याचे दिसते आहे. पण इथेही मनसेचे कार्यकर्ते रस्त्याव उतरून मतदान करून घेताना दिसले नाहीत.

‘मोदी-शहांना पाडा’ असा प्रचार राज ठाकरेंनी केला होता. त्याचा अर्थ मोदी शहा विरोधी मतदारांनी घरात बसून राहणे असा काढला का? आणि जर तसे असेल तर त्याचा मोठा फायदा भाजप-सेनेलाच होणार.जेंव्हा प्रत्यक्ष मत मोजणी होईल आणि पक्षनिहाय आकडे बाहेर येतील तेंव्हा राज ठाकरेंना हा प्रश्‍न विचारला गेला पाहिजे.
तिसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे वंचित बहुजन आघाडी. दलित मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. या आघाडीचे कार्यकर्ते हिरवे निळे झेंडे घेत मोठ्या संख्येने प्रचारात उतरले होते. प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांच्या सभाही प्रचंड उत्साहात आणि चांगल्या गर्दीत पार पडल्या.  मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दलित मुस्लिम वस्त्यांमधून मतदान झालेले आढळून आले. लोकं रागां लावून मतदान करत होते. कुणी कितीही कशीही टीका करो प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांनी वातावरण निर्मिती करण्यापासून ते प्रत्यक्ष मोठ-मोठ्या सभा घेण्यापर्यंत आणि मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यापर्यंत यश मिळवले. लोकसभेचे मतदारसंघ प्रचंड मोठे (सरासरी 18 लाखाचे मतदान) असल्याने त्यांचा प्रभाव निवडून येण्याइतपत  नाही पडणार. पण येत्या विधानसभेत ही आघाडी अशीच राहिली तर चांगले यश मिळवू शकते. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष, मुस्लिम लीग ही सगळी मते या वेळेसे वंचित बहुजन आघाडीकडे एकवटलेली दिसतील.

सत्ताधारी भाजप शिवसेना युतीला गेली 5 वर्षे सतत निवडणुका लढविण्याचा मोठा अनुभव आहे. विधानसभा, मनपा, नपा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या निवडणुकांत कार्यकर्ते चांगले तयार झाले होते. प्रत्येक बुथवर काम करणारी एक यंत्रणा विकसित केली गेली. अशा बुथ प्रमुखांच्या सभा प्रत्येक मतदार संघानुसार वेगळ्या पार पडल्या. याचा एक मोठा फायदा यावेळेस झाला. भाजप-सेनेने आपल्या मतदाराला घरातून काढून त्याचे मतदान करून घेत आपल्या यशाची निश्‍चिती केल्याचे मतदानातून जाणवते. (यातही परत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपसाठी आणि भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेसाठी किती फिरले याचा शोध घ्यावा लागेल.)

विरोधक नेहमीप्रमाणे केवळ माध्यमांमधूनच आरडा ओरड करत राहिले. विधानसभा डोळ्या समोर ठेवून त्या त्या  मतदार संघात संभाव्य आमदारकीच्या उमेदवाराला योग्य ती रसद पुरवली असती तर त्याने मतदान करवून घेतले असते. तसेच तो उमेदवार पुढे नगर पालिका किंवा महानगर पालिका डोळ्या समोर ठेवत संभाव्य उमेदवाराला कामाला लावू शकत होता. जे की भाजप-सेनेने केले. पण कॉंग्रेस राष्ट्रवादीत हे घडले नाही.
कॉंग्रेस राष्ट्रवादीने राज ठाकरेंना सुपारी दिल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तो खरा असो की खोटा पण किमान राज ठाकरेंनी या निमित्ताने का होईना पण महाराष्ट्र पिंजून टाकायचा होता. पण त्यांनी केवळ 9 सभा घेतल्या. मोदी देशभर प्रचार करत असताना महाराष्ट्रात जास्त सभा आणि गर्दी जमा करून गेले. राज ठाकरेंसारखे सभा संध्याकाळी 7 वा. घ्यायची, अंतरांवर खुर्च्या पसरवून घ्यायची असे त्यांनी केले नाही. विदर्भात उत्तर महाराष्ट्रात राज ठाकरे गेलेच नाहीत. राज ठाकरेंपेक्षा पंतप्रधान असूनही देशभर सभां घेत महाराष्ट्रात जास्त सभा मोदींनी घेतल्या. आणि त्याही जास्त संख्येने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर महाराष्ट्रात आणि लगतच्या गुजरात मध्यप्रदेशात सभांची सेंच्युरी ठोकली. असा प्रचंड उत्साह विरोधी कुणा नेत्याने दाखवला?

मतदानाचा जेवढ्यास तेवढा टक्का हा विरोधकांना एक धक्का आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात प्रचंड असंतोष जनतेत आहे असा जर यांचा दावा होता, मोदी-शहा यांना पाडा असा जर राज ठाकरेंचा आग्रह होता तर वंचित बहुजन आघाडीने जे अल्प प्रमाणात करून दाखवले ते यांनी मोठ्या प्रमाणात करायला हवे होते. आपल्या मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान करून घ्यायला हवे होते. मतदानाची टक्केवारी लक्ष्यणीय अशी वाढवून दाखवायला हवी होती. पण ही संधी विरोधकांनी घालवली. आताही ज्या जागा विरोधकांच्या निवडून येतील त्या जनमताचा रेटा असेल. विरोधकांची किमया नसतील.
               
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

Friday, May 3, 2019

प्रियंका आणि वाराणशी । माध्यमे तोंडघशी ॥



2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये काय असेल तर माध्यमे, पुरोगामी विचारवंत पत्रकार यांची पतंगबाजी. वारंवार माध्यमे काहीतरी बातमी लावून धरतात. आणि काही दिवसांतच त्या पतंगबाजीचे चिंधड्या उडालेल्या समोर येतात. गेली काही दिवस प्रियंका गांधी वाराणशीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडूका लढविण्याची बातमी मोठ्या प्रमाणात चालविली गेली. प्रियंका यांनीही कधी याचा स्पष्ट शब्दांत नकार दिला नाही.  यावर किमान चर्चा करून विचार करून काहीतरी मांडले जायला हवे होते. पण तो आणि तितका विचारच कुणाला करायचा नाही असे आता सिद्ध होते आहे. 25 एप्रिल रोजी मोदींनी मोठा रोड शो करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसच्या वतीने 2014 मध्ये पराभूत उमेदवार अजेय राय यांनाच परत उमेदवारी घोषित झाली. प्रियंकांच्या उमेदवारीच्या ‘पतंगबाजी’वर पडदा पडला.

हे असं वारंवार का होते आहे? ‘महागठबंधन’ चा पतंग उडवून झाला. त्याच्या चिंधड्या झाल्या. आप आणि कॉंग्रेसची दिल्लीतील आघाडी तर इतकी ताणल्या गेली की शेवटी ती तुटली तरी त्याची कुणाला बातमीही करावी वाटली नाही. झाली असती तरी कुणी त्याकडे लक्ष दिले नसते इतकी त्याची रया निघून गेली.

गुजरात विधानसभा निवडणुकांपासून अल्पेश ठाकोर-जिग्नेश मेवाणी- हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाचे पतंग हवेत उडवल्या गेले. अल्पेश यांनी कॉंग्रेस पक्षच सोडला, हार्दिक पटेल यांना त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे निवडणुक लढविण्यास बंदी घालण्यात आली, जिग्नेश मेवाणी गुजरात सोडून बिहारात निघून गेले. याही पतंगाच्या चिंधड्या उडाल्या.

पत्रकारांची खरी गोची राहूल गांधींनी केली केरळमधील वायनाड मधून उमेदवारी घोषित करून. केरळात भाजपची राजकीय ताकद अतिशय कमी आहे. केरळात कॉंग्रेसचा मुख्य विरोधक म्हणजे डावी आघाडी. त्यांच्या विरोधात लढून राहूल काय मिळवणार? यात परत माध्यमे फसली. वायनाड मधील निवडणूकही पार पडली. पण तिथल्या बातम्या काही  माध्यमांना देता आल्या नाहीत किंवा द्याव्या वाटल्या नाहीत.

बिहारमध्ये बेगुसराय मध्ये कन्हैय्या कुमार यांच्या विरोधात लालूंच्या राजदचा उमेदवार उभा आहे. याही लढाईवर काय बोलावे ते माध्यमांना कळत नाहीये. कारण यांनीच अशी पतंगबाजी केली होती कन्हैय्या कुमार हे सगळ्या विरोधी पक्षांचे मिळून उमेदवार असतील भाजप विरोधात. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये मराठवाड्यात कन्हैय्या कुमार यांच्या सभा आयोजीत केल्या होत्या. त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसने कम्युनिस्टांना आपल्या सोबत निवडणुकीत घेतले नाही. परभणीला राष्ट्रवादीच्या विरोधात कन्हैय्याच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. आणि आता हेच राष्ट्रवादीचे आमदार बाबा जानी बेगुसराय मध्ये कन्हैय्या कुमार यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. मग या सगळ्यात भाजप विरोधी ‘महागठबंधन’ च्या पतंगबाजीचे काय झाले? 

या सगळ्या घटना पाहिल्यावर लक्षात येते आहे की पत्रकार माध्यमे पुरोगामी विचारवंत यांना भाजप-मोदी-अमित शहा-संघ विरोधाची कावीळ झाली आहे. त्या दृष्टीने हे कुठल्याही छोट्या मोठ्या घटनेकडे पहात आहे. वाळलेलं पान जरी पाठीवर पडलं तरी आभाळ कोसळले म्हणणार्‍या सश्यासारखी यांची अवस्था झाली आहे.

यामुळे एक मोठा तोटा संभावतो आहे. उद्या या सगळ्यांनी मिळून भाजप सरकारच्या काही चुक निर्णयांवर, गैरव्यवहारावर, लोकशाही विरोधी धोरणांवर टीका केली तर वाचणार्‍याला त्यावर विश्वास बसणार नाही. लांडगा आला रे आला सारखे होवून बसेल. माध्यमांनी जागल्याची भूमिका निभवायची असते. पण त्याचा अर्थ असा नाही प्रत्येक छोट्या मोठ्या बाबतीत  बोंेब मारून घाबरावयाचे असते. सरकारच्या चांगल्या कामाचे कौतूक करायचे नसेल तर आपण समजू शकतो. पण चुक  पद्धतीनं किंवा अस्थानी टीका करू नये. त्यामुळे टीकेची तीव्रता कमी होते. गांभिर्य नष्ट होते.

ई.व्हि.एम. वर प्रचंड गदारोळ विरोधी पक्षांकडून माजवला जातो आहे. त्याला इतकी प्रसिद्धी देण्याचे काय कारण? सगळे राजकीय पक्ष बाजूला ठेवून तंत्रज्ञान क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून यावर लेख लिहून घेता आले असते. त्यांच्या मुलाखती प्रसारीत करता आल्या असत्या. एखादे डमी मशिन मिळवून प्रत्यक्षात एक डमी मतदान घेवून त्याचे सगळे चित्रण करून ते दाखवता आले असते. पण असे काहीच केल्या जात नाही.

प्रियंका यांची एक तरी सविस्तर मुलाखत कॉंग्रेस पक्षाच्या पूर्व उत्तर प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यावर आली का? किंवा उत्तर प्रदेश मध्ये कॉंग्रेसची संघटनात्मक ताकद काय आहे? जिल्हा अध्यक्षांनी नियुक्ती झाली आहे का? आता ज्या जागा कॉंग्रेस लढवत आहे त्यांचा काही एक आढावा घेत या पूर्वी तिथे कॉंग्रेसची काय परिस्थिती राहिली? असं काहीही होताना दिसत नाही.

पत्रकारिता म्हणजे काहीतरी सनसनी उडवून द्यायची. त्याला काही आगापिछा असण्याची गरजच नाही. नंतर या गोष्टींना सामान्य लोकांनी दुर्लक्षिले तरी चालेल. आताही जेंव्हा प्रियंका यांच्याऐवजी अजय राय यांना उमेदवारी देण्यात आल्यावर त्याबाबत जराही अंदाज पत्रकारांना का आला नाही?

भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ट पत्रकारांनी वारंवार प्रियंकांच्या राजकीय ताकदीबाबत लिहीलं आहे. प्रस्थापित माध्यमांवर ताशेरे ओढले. ज्येष्ट पत्रकार संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या ‘मंत्रीमंडळाचा विस्तार’ या पतंगबाजीवर झोड उठवली होती. पण आपली माध्यमं सुधरायला तयार नाहीत.
मोदी हरायला पाहिजे असं वाटणं वेगळं आणि मोदी हरण्यासारखी परिस्थिती आहे हे नोंदवणे वेगळं. नीरजा चौधरी सारख्या पत्रकार ज्या तटस्थ किंवा मोदी विरोधी राहिल्या आहेत त्यांनी स्पष्टपणे मोदींच्या बाजूने ‘अंडरकरंट’ म्हणजेच सुप्त लाट असल्याचे लिहीले आहे. आपल्या मुलाखतीतही सांगितले आहे. त्यांनी जो संदर्भ दिलाय तो मोदींच्या वाराणशीच्या रोड शो चा आणि प्रियंकाच्या माघारीचाच आहे. पण हे असं काही पत्रकारांना दिसत नाहीये का?

आज कॉंग्रेस केवळ 350 जागांच्या आसपास लढत आहे. हा पक्ष प्रत्यक्षात सगळ्या जागाच लढत नाहीये. शिवाय पूर्वीपेक्षाही कमी जागा लढवत आहे. हा मुद्दा गंभीर आहे. पण पत्रकार हे समजून नीट मांडायलाच तयार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेससोबत युती करण्याच्या सगळ्या शक्यता खुल्या ठेवल्या. पण त्याला राहूल गांधींनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

प्रियंका यांनी तर असे विधानच केले आहे की उत्तर प्रदेशात आम्ही विजयासाठी लढत नाहीत. जिथे जिथे आमचे हलके उमेदवार असतील तिथे आम्ही भाजपाची मते खावूत. आता याला काय म्हणायचे? एकीकडे भाऊ तोरसेकर सारखे पत्रकार राहूल-प्रियंका यांच्यावर टीकेची झोड उठवत असताना हे सातत्याने सांगत आहेत की हे आपल्याच पक्षाचे नुकसान करायला बसले आहेत. आणि पुरोगामी पत्रकार मात्र यांच्या जीवावर भाजपचा पराभव होणार याची ग्वाही देत आहेत.   म्हणजे परत परत पत्रकार माध्यमे तोंडघाशी पाडण्याचे काम राहूल-प्रियंका करत आहेत. 23 मेच्या निकालानंतर तर माध्यमे जास्तीच तोंडघशी पडतील असे दिसते आहे. 
   
               
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575