Saturday, March 23, 2013

ब्राह्मण संताचे मराठा गुरू!


दैनिक कृषीवल दि. २३ मार्च २०१३ मधील माझ्या "उरूस" या सदरातील लेख
.....................................................................................................................

भारतीय परंपरा ही एक मोठी गंमतशीर गोष्ट आहे. झापडबंद पद्धतीने काही एक निष्कर्ष काढायला जावं तर समोर वेगळंच उदाहरण उभं राहतं. त्याचा अन्वयार्थ लावता लावता परत आपली दमछाक होते.
ज्ञानाच्या बाबतीत ऋषीचे कुळ विचारू नये असं म्हणतात. आणि ते खरेही आहे. ज्ञान कुणाकडेही असू शकते आणि त्यासाठी आपल्याला नम्र होवून त्याच्याकडे याचना करायला हवी असं आपली परंपराच सांगते. एक उदारमतवादी दृष्टीकोन ठेवला तरच हे सगळं समजून घेणं शक्य होतं.
कबीराचे उदाहरण मोठं मासलेवाईक आहे. वीणकर असलेल्या मुस्लिम जोडप्याला सापडलेलं हे मुल. याचा धर्म कुठला? याचा उलगडा शेवटपर्यंत कुणाला करता आला नाही. त्या कबीरानंच मोठं सुंदर लिहून ठेवलं आहे
जाती न पुछो साधु की पुछो उसका ग्यान ।
मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान ॥
पण आपल्याकडे ‘म्यान’च फार महत्त्वाची बाब होऊन राहिली. म्यान तर सोडाच पण त्या बाहेर दिसणारी तलवारीची मुठ तेवढी शोभिवंत रत्नजडित करण्याची ‘आयटी-म्यानेजमेंटी’ दिखाऊ कला आपण प्राप्त केली. मग या सगळ्या खटोटोपीत आतली तलवार गंजून गेली, तीची धार बोथट झाली, ती काहीच उपयोगाची उरली नाही. त्याची कुणाला परवा नाही.
‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ या तीन ग्रंथांना वारकरी संप्रदायात ‘प्रस्थान त्रयी’ म्हणतात. यांचे पारायण करणे ही आवश्यक बाब या संप्रदायात मानली गेली आहे. संत ज्ञानेश्वरांना शेवटपर्यंत तेंव्हाच्या ब्राह्मण समाजाने स्वीकारले नाही. परिणामी धार्मिक अर्थाने ते ब्राह्मण नव्हेत. संत एकनाथांनी अस्पृश्यांच्या बाबत जी उदार भूमिका घेतली त्यावरही मोठी टिकेची झोड तत्कालिन उच्चवर्णीय समाजाने घेतली. परिणामी अतिशय करूण असा ‘जलसमाधी’चा पर्याय आयुष्याच्या उत्तरार्धात एकनाथांना स्विकारावा लागला. तुकाराम तर बोलून चालून वाणीकुणबी. त्यांचे हाल तेंव्हाच्या उच्चवर्णीयांनी केले यात काय आश्चर्य. जिथे ज्ञानेश्वर एकनाथाचा पाड यांनी लागू दिला नाही. तिथे तुकारामांना हे काय मोजणार? पण याच तुकाराम महाराजांना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळच्या शिवूर गावच्या संत बहिणाबाईंनी स्वत: ब्राह्मण असून गुरू केले आणि सर्व परंपरावाद्यांच्या तोंडात मारली.
संत बहिणाबाई यांचे शिऊर हे  देवगिरी किल्ल्याच्या परिसरातील गाव. या परिसरात ज्ञानाची एक मोठी उदारमतवादी परंपरा गेली 800 वर्षे नियमित चालू असलेली आढळून येते. त्या परंपरेत अगदी शोभून दिसावं असं बहिणाबाईंचे उदाहरण.
ही मोठी उदाहरणं झाली. मला असं सारखं वाटत होतं की जर ही परंपरा असेल तर त्याचे काही तरी अवशेष या परिसरात नक्कीच आढळतील. या परिसरातील मुस्लिम संतांना गुरू करण्याची परंपरा आढळली. ब्राह्मण संताने मराठा समाजातील ज्ञानी माणसास गुरू केलेले आढळल्याचा पुरावा मिळाला आणि इतिहासाचा हा धागा जुळून आला.
परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी पूर्णे जवळ टाकळी म्हणून गाव आहे. या गावाला दाजी महाराज टाकळी असेच म्हणतात. या गावात धनगर समाजाची वस्ती जास्त असल्यामुळे त्याला पूर्वी धनगर टाकळी म्हणायचे. पण अलिकडच्या काळात दाजी महाराज या सत्पुरूषाच्या नावाने हे गाव ओळखले जाते.  दाजीमहाराजांच्या मंदिरात त्यांची आरती चालू असताना मी पोंचलो. तेंव्हा त्या आरतीत ‘गंगाजी बापू मराठा’ असा उल्लेख आला. माझे कान टवकारले. ज्या आरत्या चालू होत्या त्यांच्या चाली माझ्या परिचयाच्या होत्या. माहूरला विष्णुकवींची समाधी आहे. त्यांनी रचलेल्या बहुतांश रचना या परिसरात देवीच्या आरत्या-पदे-अष्टके म्हणून भक्तिभावाने गायिल्या जातात. त्यांच्या ज्या चाली आहेत त्याच प्रकारच्या चालींवर बर्‍याच आरत्या नंतर रचल्या गेल्या. लोकगीतांच्या त्या पारंपरिक चाली आहेत. महानुभाव संप्रदायाच्या आरत्याही याच चालींवर आहेत. माझी उत्सूकता मला शांत बसू देईना. सध्या गादीवर असलेल्या उमेश महाराजांचे तरूण पुत्र अवधूत महाराज हे माझे मित्र. मी त्यांना आणि त्यांच्या मोठ्या बंधूंना  गंगाजी बापू बाबत विचारले. तेंव्हा त्यांनी सविस्तर माहिती दिली. शिवाय ज्या पोथीत हे संदर्भ आहेत ती पोथीही दिली. दाजी महाराज शिष्यांना गंगेकाठी (आमच्या प्रदेशात गोदावरी नदीला गंगाच म्हणतात.) संथा देत होते. शिकवत असताना त्यांचे लक्ष ढळले, शिष्यांनीही चुक उच्चार केले. पण हे कोणाच्याच लक्षात नाही. बाजूला एक शेतकरी गायी चरत बसला होता. तो दोर वळता वळता महाराजांना म्हणाला, ‘लक्ष कुठे आहे, शिष्यांना चुक शिकवता की काय?’ महाराज चपापले. त्यांनी विचारले, ‘पण हे आपणाला कसे कळले?’ तेंव्हा तो शेतकरी म्हणाला, ‘ते नंतर सांगतो, आधी चुक दुरूस्त करा.’ महाराजांनी मग शिष्यांना बरोबर संथा दिली. शिष्यांना जावयास सांगितले. व त्या शेतकर्‍याचे पाय धरून म्हणाले, ‘तूम्ही माझी चुक दाखविली. तूम्ही माझे गुरू. मजला अनुग्रहित करा.’ तो शेतकरी म्हणजे गंगाजी बापू. गंगाजी बापू यांनी  अमृतगीर महंत म्हणून नाथपंथी गोसावी होते त्यांच्याकडून दिक्षा घेतली होती. आपल्या गुरूकडून त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. त्यांना दोन पुत्र होते तान्हाजी व उमाजी. पण त्यांच्याकडून ज्ञानाची परंपरा पुढे चालणार नाही हे जाणून सत्पात्री ज्ञानदान द्यावे म्हणून ते शिष्याच्या शोधात होते.
दाजी महाराजांच्या रूपाने त्यांना योग्य शिष्य मिळाला व त्यांनी आपली सिद्धी दाजी महाराजांना दिली.
ही सगळी कथा मला त्या पोथीतून आणि अवधूत महाराजांच्या बोलण्यातून समजली. यातील इतर सर्व विसरून मी ज्ञान हस्तांतरणाच्या या विलक्षण कहाणीने जास्त मोहित झालो. दाजी महाराजांचा काळ म्हणजे 1862 ते 1930  हा कालखंड. आज आपण शिवाजी महाराजांचे गुरू रामदास होते की नव्हते यावर गदारोळ माजवतो. प्रत्यक्षात ते नव्हते असेच 1928 साली न.र.फाटकांनी सिद्ध केलं होतं. पण तथाकथित ब्राह्मण वर्चस्ववादी वृत्ती ‘बुद्धि फक्त ब्राह्मणांनाच असते’ मानत असताना शंभर वर्षांपूर्वी याच परिसरातील (रामदासांचे गाव मराठवाड्यातीलच, शिवाजी महाराजांचे वतन वेरूळचे म्हणजे मराठवाड्यातीलच) एक ब्राह्मण एका मराठा समाजातील ज्ञानी सिद्ध पुरूषासमोर नतमस्तक होतो, त्याला आपला गुरू करतो ही ज्ञानमार्गातील फार मोठी उदारमतवादी घटना आहे. आजही दाजी महाराजांचे वंशज गंगाजी बापूंच्या गावी त्यांचा उत्सव साजरा करतात.
म्हणजे आजच्या पिढीलाही आपल्या घराण्याचे गुरू घर इतर जातीतील आहे याचा सार्थ अभिमानच आहे. ही ओळख लपविण्याचे कुठलेही प्रयत्न त्यांनी केले नाहीत.
आज छोट्या गावांमधून ब्राह्मण जवळपास हद्दपार झाले आहेत. त्याची सामाजिक सांस्कृतिक कारणं काहीही असो. पण आज तालूक्यापेक्षा खालच्या गावात ब्राह्मण नाहीत ही वस्तूस्थिती आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की या ठिकाणच्या ज्या छोट्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे पावित्र्य, त्यांचा किमान एक दर्जा राखण्याचे काम करायचे कुणी? ही जबाबदारी निश्चितच ब्राह्मणेतर बहुजन समाजावर येवून पडते. ज्ञानाची परंपरा आपल्याकडे नेहमीच उदारमतवादी राहिली आहे. जे ज्ञान विशिष्ट जातीत अडकले होते ते कुबट पोथ्यांमधले ज्ञान संपून गेले. उलट जे ज्ञान बाहेर पडले त्यांने चमत्कार दाखविला असा इतिहास आहे. ब्राह्मणांनी ज्ञान नाकारले पण निदान ते पोथ्यांमधून जपून ठेवले होते म्हणून आज काही प्रमाणात तरी शिल्लक आहे. पण बहुजन समाजातील कारागिरांनी आपले ज्ञान कुठेच नोंदवून ठेवले नाही. परिणामी साधी जून्या वाड्याची दगडी भिंत ढासळली तर तीला जोड देताना आपल्या तोंडाला फेस येतो. कारण तशी दगडी जोडणी करणारे करागीरही नाहीत व त्यांनी वास्तूशास्त्राचे जे ज्ञान कमावले होते त्याच्या नोंदी नाहीत.
कुणीबीकी करणार्‍यांकडे प्रचंड प्रमाणात त्या विषयाचे पारंपरिक ज्ञान आजही आहे. पण याच्या नोंदी करण्याचे कष्ट  कुणी घेताना दिसत नाही. ज्ञानाची तथाकथित मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती असं म्हणत आम्ही निवांत राहिलो. ब्राह्मण गेले गाव सोडून आणि इतर समाजही ज्ञानाबाबतची आपली जबाबदारी सोडून निवांत बसला आहे. याचे दुष्परिणाम आता जाणवायला लागले आहेत. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आजही जून्या दगडी बारवांमधे पाणी आढळलते. ते कसे जपले गेले याचे उत्तर डोके खाजवूनही आम्हाला सापडत नाही. सिंचनाच्या घोटाळ्यात खालपासून वरपर्यंत बहुजन समाजाचे धुरीणच अडकलेले पाहून ज्ञानाच्या परंपरेचे काय झाले हे वेगळे सांगायची गरजच नाही.

Saturday, March 9, 2013

‘महोत्सवां’ची चलती, ‘मैफलीं’ना गळती !

दै. कृषीवल दि. ९ मार्च २०१३



मार्च महिना जवळ आला की काही संस्थांच्या अंगात येते. आणि भराभर जिकडे तिकडे कार्यक्रम व्हायला लागतात. त्याची चाहूल तशी डिसेंबर जानेवारीपासूनच लागलेली असते. यातही विशेषत: संगीताचे कार्यक्रम मोठ्या धडाक्याने होतात. कुणाला असे वाटेल की काय रसिकता उतू जात आहे. काय हे कलेचे प्रेम. काय या संस्थांना संगीताबद्दल आस्था.
अयोजनातल्या एखाद्या दुय्यम पण ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी असते अश्या पदाधिकार्‍याला विचारलं की लगेच याचं बिंग बाहेर पडते. मार्च महिन्याच्या आत ‘बजेट’ संपवायचे असते. शिवाय वर्षभर काहीतरी केलं असं दाखवायचं असतं. मग करा काहीतरी भराभर. त्यात कलेचे काही का वाट्टोळे होईना. सर्वसामान्य रसिकांना वाटते, ‘चला काही का होईना चार मोठ मोठे कलाकार तर ऐकायला बघायला मिळाले.’ मोठ्या शहरांमध्ये असा एक वर्ग तयार झाला आहे की त्याला प्रत्यक्ष कलेशी काही देणं घेणं नसते. त्याला इतकंच माहित असतं की हरिप्रसाद चौरसिया नावाचा एक मोठा बासरीवादक आहे. त्याचा कार्यक्रम ऐकला असं आपण इतरांना सांगितलं की झालं. किंवा त्याच्यासोबत एखादा फोटो काढता आला, पोराला ‘ऍटोग्राफ बुक’वर सही घेवून देता आली की झालं. जसं दारू प्यायला मोठ्या हॉटेलात जावं आणि दारू पिण्यापेक्षाही तिथे जमलेल्या इतरांना आपणही इथे येतो असं दाखवावं तसंच काहीसं हेही आहे. 
वरवर पाहता यात कलेचे काही नुकसान झाले असं कुणाला वाटणार नाही. पण जेंव्हा या समारंभाचे आकडे आपल्या हाती लागतात आणि मग त्यातले सत्य बाहेर येते. सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या एका सामाजिक संस्थेचे संगीताचे कार्यक्रमाचे बजेट मी पाहिलं. त्यात 5 लाखाच्या खर्चामध्ये जेमतेम एक लाख रूपये कलाकारांवर खर्च झालेले होते. त्यात कलाकारांचे जाणेयेणे, बिदागी, राहणे सर्व आले. आणि जागेचे भाडे, रंगमंचाची सजावट करणारे, शुटिंग करणारे, फोटोग्राफर, ध्वनीव्यवस्था सांभाळणारे, पत्रिका महिती पत्रक छापणारे, पदाधिकार्‍यांचे खाणे पिणे, पाण्याच्या बाटल्या, फुलं या सगळ्याचा खर्च 4 लाख रूपयांच्या जवळपास होता. मग गाणार्‍याला बसण्यासाठी स्टेज केलेलं आहे का स्टेज तसंच रिकामं कसं ठेवायचं म्हणून गाणारा आणून बसवला आहे?
या मोठ्या हायफाय कार्पोरेट महोत्सवांमध्ये गाण्याला जागा किती आहे? गाणं कुणाला कळतं आहे? तर याचं उत्तर दुर्दैवाने नकारार्थीच द्यावं लागेल. उस्ताद राशिद खां सारखा मोठा गायक औरंगाबादला वेरूळ महोत्सवात तासभर शास्त्रीय संगीत गायला. नंतर त्याला फर्माईश आली, जब वुई मेट चित्रपटातील गाण्याची. त्यानं डोक्यावर हात मारून घेतला. उघड्यावर थंडीत गाताना आधीच त्याचे हाल झाले होते. त्यानं गाणंच आवरतं घेतलं आणि मंचावरून निघून गेला.
जयपूर घराण्याचे गायक आणि अभ्यासक वामनराव देशपांडे यांनी आपल्या पुस्तकात भारतीय शास्त्रीय संगीताचे स्वरूप स्पष्ट करताना हे गाणं छोट्या मैफीलींमधून कसे फुलत जाते, श्रोत्याचा सहभाग कसा महत्वाचा आहे, आणि तो जर नसेल तर या संगीताची वाढ कशी खुंटेल हे स्पष्ट केलं आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे कागदावर नोटेशन करून ठेवायचे आणि ते वाचून कुणीतरी गात बसायचं असं नाही हे मूळात समजून घेतलं पाहिजे. रागाची एक चौकट फक्त आखुन दिलेली असते. कुठले स्वर या रागात आहेत हे सांगितलेलं असतं. पण त्याची मांडणी प्रत्येक गायकानं आपला गळा, आपली बुद्धी आपली प्रतिभा व त्याला श्रोत्यांचा मिळणारा प्रतिसाद हे जाणून करायची असते. आणि तसं केलं तरच हे गाणं पुढे पुढे जात राहिल. फुलत राहिल.
मोठ्या महोत्सवात हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत होतं काय की श्रोता डोळ्यासमोर दिसतच नाही. त्याची मिळालेली दाद किंवा त्याला हे संगीत कुठपर्यंत पोंचलय हे कळायला मार्गच नसतो. शिवाय नुसता दिव्यांचा झगमगाट करून टाकलेला असतो. म्हणजे गायकाच्या वादकाच्या डोळ्यांसमोर अंधारीच येते. मग तो काय करतो तर आपल्या मनानं जे सुचेल, त्याची जी तयारी असेल तेवढंच फक्त वाजवतो. मग श्रोते ज्याला टाळ्या देउ शकतील अशी द्रुत गतीतील रचना सादर करतो, तबलेवालाही त्याला जोरदार साथ करून उरलेल्या टाळ्या घेतो. दुसरा कलाकार विंगेमध्ये वाटच पहात असतो. याला रंगत चाललेलं गाणं लगेच संपवावं लागतं. नवा कलाकार परत हाच खेळ चालू करतो.
याच्या नेमकं उलट छोट्या मैफिलीमध्ये घडते. तिथे एकच कलाकार असतो. मोठा महोत्सव नसल्यामुळे स्टेज म्हणून फार उंच फार लांब असं काहीच केलेलं नसतं. श्रोत्याशी जवळीक साधता येते.100/150 लोकांमध्ये गायकाला लोकांचे चेहरे स्पष्टपणे वाचता येतात. एखादाच कलाकार असल्यामुळे त्याला वेळही भरपूर मिळतो. साहजिकच त्याला संगीतातले जे काही प्रयोग करायचे आहेत ते तो मोकळेपणाने करू शकतो. 
पंडित विजय कोपरकर यांचे गाणे अशा छोट्या मैफिलीत ऐकण्याचा योग मला नुकताच आला. त्यांच्या सांगण्यावरूनच मला छोट्या मैफिली आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या नात्याचा उलगडा झाला. जेमतेम 125 श्रोते कार्यक्रमाला होते.विजय कोपरकरांनी ‘किरवाणी’ राग जो कमी वेळात आणि तेही वादकांकडूनच सादर केला जातो ते निवडला. आणि सविस्तर सादर केला. शिवाय त्यानंतर ‘रागेश्रीकंस’ नावाचा अनवट राग सादर केला. गाताना त्यांनी रागाची रचना समजावून सांगितली. त्याचं सौंदर्य कसं खुलत जातं हेही विशद केलं. राजाभैय्या पुछवाले यांच्याकडून या रागाची माहिती कशी मिळाली. त्यावर मी विचार करून आज हा राग इथे कसा गायलो हेही सांगितलं. कोपरकरांचा प्रश्न असा होता की ही सवलत मोठ्या महोत्सवात मिळणार आहे का? आणि जर असा विचार झाला नाही, प्रयोग झाला नाही तर आपले संगित पुढे जाणार कसे?
मोठे महोत्सव कलाकारांची व्यवहारिक गरज भागवू शकतात. त्याबद्दल आपण काय बोलणार? पण सांगितिक गरजेचे काय? छोट्या मैफिलींची गरज ही भारतीय शास्त्रीय संगीताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे याचा मात्र गांभिर्याने विचार व्हायला पाहिजे. अशा मैफिलींचे आयोजन विविध ठिकाणी नियमितपणे केलं जायला हवं. 
श्रोते घडविण्यासाठीही हे आवश्यक आहे. कारण मोठ्या मोठ्या ठिकाणी जी एक घाई असते त्यातून सामान्य श्रोत्याला हे गाणं समजून घेण्यासाठी जी उसंत लागते ती मिळत नाही. हे संगीत नुसते ऐकलं आणि आवडलं असं होत नाही. याचा एक संस्कार श्रोत्यांच्या कानावर व्हावा लागतो आणि तो होण्यासाठी छोट्या मैफिलींतील गाणे पोषक ठरते. 
शास्त्रीय कशाला उपशास्त्रीय किंवा आपल्याकडील नाट्यगीत-भावगीत-भक्तिगीतांच्या बाबतही आजकाल परिस्थिती मोठी कठिण होत चालली आहे. संगणकावर तयार संगीताचे तुकडे मिळातात. त्याचा वापर करून गायक एखादा निवेदक आपल्या सोबत घेतो आणि कार्यक्रम करतो. यातून जिवंतपणा हरवून चालला आहे. जून्याकाळी जत्रेत मोठमोठ्या नट नट्यांची कट आउटस् करून ठेवलेले असायचे. त्याच्या खांद्यावर किंवा कमरेवर हात ठेवून फोटो काढायची सोय असायची. असे फोटो आपल्या घराच्या बैठकीत लावून मी अमिताभ बरोबर फोटो काढला, किंवा हेमा मालिनीच्या (मी त्या काळातलीच उदाहरणे देत आहे) कमरेला हात घालून फोटो काढला असे समाधान लोक मिळवायचे. संगणकावर तयार संगीतावर गाउन हे असेच समाधान गाणारे व ऐकणारे लोक मिळवत आहे.
मोहरमचे वाघ पाहाता पाहाता खरा वाघ आला तर ओळखूच ऐवू नये असंच होण्याची शक्यता आहे. म्हणजे महोत्सवातील आक्रस्ताळे, रसिकशरण, टाळ्याखाऊ गाणे किंवा संगणकावर तयार संगीतासोबत म्हटलेले गाणे ऐकण्याची सवय झाली अन् अस्सल सणसणीत गाणं ऐकायला मिळालं तर आपला श्रोता गांगरूनच जायचा. 
पुढच्या पिढीवर संस्कार करताना हे फारच घातक आहे हे लक्षात येते आहे. सध्या 12 वी फिजिक्सचा पेपर सगळ्यांना अवघड गेला. त्याचे समोर आलेले कारण फारच धक्कादायक आहे. ट्युशनच्या नोट्सच्या अहारी गेलेल्या, प्रश्न आणि त्याची ठराविक पठडीतील उत्तरे अशी घोकंपट्टी करणार्‍यांची अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न जरा फिरवून विचारले तर भंबेरी उडाली. इतका आपला पाया कच्चा राहून गेला आहे.
संगीत असो की जगण्यातील इतर कुठलीही गोष्ट असो आपण ‘महोत्सवां’च्या अहारी गेलो इतकं गेलो आहोत की आपल्याला स्वाभाविक ‘मैफिली’ची ओळखही राहिली नाही.   

Friday, March 8, 2013

महिला प्रश्नांचा सरकारी बट्ट्याबोळ


जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख

दै. कृषीवल दि. ८ मार्च २०१३

आपल्याकडे कुठल्याही प्रश्नाचे वाट्टोळे करायची एक विशेष सरकारी पद्धत आहे. एखादा विषय हाताळण्यासाठी कमिटी/आयोग नेमायचा. त्या निमत्ताने त्या विषयावर आवाज उठवणार्‍यांना त्यात सामिल करून घ्यायचे. काही योजना जाहिर करायच्या. मोजक्या लोकांचे सत्कार करायचे. पुरस्कार द्यायचे.  बघता बघता त्या विषयाचे काही वर्षातच वाट्टोळे होऊन जाते. शिवाय मग कुणालाही बोलायला काही जागाच रहात नाही. महिला प्रश्नांच्या बाबतही आपल्या शासनाने हेच धोरण गेल्या काही वर्षांत आणि तेही विशेषत: जागतिकीकरणाच्या पर्वात राबविले. परिणामी आज महिलांचे प्रश्न अजूनच बिकट झालेले आढळतील.
शेतकरी चळवळीनं 1986 ला चांदवड जि. नाशिक येथे शेतकरी महिला आघाडीचे अतिशय भव्य असे अधिवेशन भरवून 5 लाख ग्रामीण महिला पहिल्यांदाच जगाच्या इतिहासात गोळा करून दाखवल्या. या अधिवेशनाचे जे घोषवाक्य होते ते मोठं महत्त्वाचे होते. ‘स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरूष मुक्ती’. म्हणजे महिलांचा प्रश्न म्हणजे जणू स्त्री विरूद्ध पुरूष असा काहीतरी असतो आणि तो तसाच सोडवला पाहिजे या दृष्टीकोनाला पहिल्यांदा तडा शेतकरी संघटनेने दिला होता. आणि नंतरही सातत्याने हीच मांडणी शेतकरी चळवळीने केली. शेतकरी चळवळीला स्त्रीच्या प्रश्नाबाबत इतके महत्त्व का द्यावे वाटले आणि आपणही त्यांचा दृष्टीकोन महत्त्वाचा का मानायचा? याचे सरळ साधे कारण म्हणजे शेतीचा  शोधच मुळात बाईने लावला आहे. आजही शेतीत जास्त कष्ट बाईच करते. देशाची बहुतांश लोकसंख्या ही अजूनही शेतीवरच पोट असणारी आहे. म्हणजे परत अप्रत्यक्षरित्या शेतकरी स्त्रीयांपाशीच महिला प्रश्नांचा प्रवास येवून थांबतो.
कुठला वेगळेपणा या चळवळीत होता? सगळ्या महिलांच्या चळवळी या पुरूषांना बाजूला सारून ती जागा स्त्रीयांना द्यावी या मताच्या होत्या. आणि दुर्दैवाने आजही आहेत. म्हणजे महिला खासदार आमदार निवडल्या गेल्या पाहिजेत, नौकरीत महिलांना आरक्षण पाहिजे वगैरे वगैरे. जसं फुल्यांना वाटायचं भट कारकूनाच्या जागी बहुजन कारकून यावा तसं. यानं काय होईल? तर मोठी क्रांती होईल असं या चळवळीतल्या मुखंडींचे म्हणणे असायचे. बेजिंग येथे 1995 च्या सप्टेंबर महिन्यात जागतिक महिला परिषद भरली होती. या परिषदेत सरकारी आधाराने महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात आला.
आता विरोधाभास पहा. जागतिकीकरणात जगभरात सरकारचे महत्त्व कमी होत जात असताना स्त्रीयांच्या परिषदांत मात्र सरकारवर जास्तीत जास्त अवलंबून राहण्याचा ठराव करण्यात आला. यातून सिद्ध हेच झालं की या सगळ्यांना करायचं काहीच नसून मोजक्या स्त्रीयांना मानाच्या खुर्च्या देणे, त्यांच्या प्रवास भत्त्याची सोय करणे इतकेच उद्दीष्ट होते.
हे सगळं मांडायचं कारण म्हणजे एक प्रश्न यावेळी विचारला गेला होता. एक चाचणी घेण्यात आली. स्त्री आणि पुरूष दोन्ही गटांत ही चाचणी घेतली गेली. पुढचा जन्म तूम्हाला कुठला घ्यायला आवडेल स्त्री की पुरूष? आणि कोणत्या आणि किती सवलती दिल्या की तूम्ही तूमचा निर्णय बदलायला तयार व्हाल? एकजात सर्व बायकांनी उत्तर दिले की पुढचा जन्म पुरूषाचाच हवा आहे. आणि कितीही सवलती दिल्या तरी आम्ही निर्णय बदलण्यास तयार नाही. याचे साधे कारण हेच आहे की वरवर कुणी कितीही सांगो, कितीही मातृगौरवाचे गोडवे गावो, कितीही आयोग महिलांसाठी निर्माण करो बाईचे जीणे कष्टाचे अपमानाचे आहे आणि ते खुषीने स्वीकारण्यास कुणीच तयार नाही.
आपण हे दलित आणि मुस्लिम प्रश्नाशी ताडून पाहू शकतो. सवर्णातील काही घटक बर्‍याचदा अशी टिका करीत असतात, ‘‘या दलितांचे काही कौतुक सांगू नको. त्यांना मोठ्या सवलतील आहेत. ते सरकारचे जावाई आहेत. त्यांच्या वस्तीत चांगले रस्ते आहेत. वीज फुकट आहे. पाणी फुकट आहे. मुस्लीमांचे सगळे लाड करतात. त्यांना सगळे फायदे मिळतात.’’ मग जर कुणाला आपण विचारले की जर तूला पुढचा जन्म कुठे घ्यायचे हे निवडायची संधी मिळाली तर तू दलित किंवा मुस्लिम समाजात घेशील का? तर याचे उत्तर मात्र सपशेल नाही येते. माझ्या एका मित्राचे शेत एका मुसलमानाने विकत घेतले. पण त्याने विनंती केली की तूमच्याच नावाने ते नगर आपण ठेवूत. कारण मुसलमानाचे नाव असले तर आमचे प्लॉट विकले जाणार नाहीत.
हीच गोष्ट काहीशी ग्रामीण भागाबाबतही बोलता येईल. खेड्यामध्ये हवा किती शुद्ध आहे, भाजीपाला ताजा आहे, गाई-म्हशीचे दुध किती चांगले मिळते, गावाकडची जूनी घरे किती चांगली आहेत, गावाकडे कशी माणुसकी आहे  असे गोडवे गाणारा माणूस हा 100 % शहरातला असतो हे लक्षात घ्या. आणि आपण जर त्याला विचारलं की चला मी तूमची सोय गावाकडे करतो. अगदी आत्तापासून गावाकडे रहायला चला. मग मात्र तो तयार होत नाही. इतकंच काय एकदा का कुणी खेडं, छोटं गाव, तालुक्याचं शहर सोडून मोठ्या गावात, महानगरात गेला तर त्याच्या परतीच्या वाटा कायमच्या बंद होतात. इतकंच काय त्याच्या पुढच्या पिढ्यातही कुणी गावाकडे येण्याची शक्यता नाही.
म्हणजेच महिला काय दलित-मुस्लिम काय किंवा ग्रामीण जनता काय यांना आपण कायम दुर्लक्षित ठेवलं उपेक्षीत ठेवलं. याच पुरेपूर जाणीव असल्यामुळे त्यांच्या तोंडावर सवलतींचे काही तुकडे फेकले. आणि आज आपण त्या सवलतींचे गुणगान गातो आहोत. जर त्यांना तूम्ही विचारले तर सर्वसामान्य बायका स्पष्टपणे आपली भावना व्यक्त करतात. आणि पहिल्यांदा काय मागणी करतात तर आम्हाला मुक्त करा याची.
म्हणजे स्वातंत्र्य ही सगळ्यात मोठी मागणी स्त्री चळवळीची आहे. आणि ते सिद्धही झालं आहे. उच्चवर्णीय स्त्रीयांना स्वातंत्र्य कमी होते, पुनर्विवाहाची परवानगी नव्हती पण त्यांच्याभोवती समृद्धीचे एक खोटे वलय मात्र आम्ही निर्माण केले. परिणामी संधी मिळताच या जाचक अटींना पूर्णपणे बाजूला सारून बायका पुढे आल्या. त्यामानाने कनिष्ठ जातींमधील स्त्री स्वतंत्र होती. तीला पुनर्विवाहाचा हक्क होता, रोजगाराचा हक्क होता, समाजात वावरणे तूलनेने सोपे होते. साहजिकच तीनं आपली प्रतिभा शेतीत सिद्ध केली. आजही मोठ्या प्रमाणात आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये स्त्रीयांचे प्रमाण अतिशय अल्प आहे.
सरकारीकरणाने बट्ट्याबोळ केलेली ही स्त्री चळवळ भविष्यात पुढे न्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्त्री चळवळीतील शासकीय हस्तक्षेप थांबवला पाहिजे.
मध्ये आमच्या भागातील एका नेत्याच्या मुलीने पदयात्रा काढली. तीच्याशी चर्चा करतांना मी तीला विचारले, ‘‘ताई तूम्हीच सांगा तूम्हाला ग्रामीण भागात कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत असं बायकांनी सांगितलं?’’ ती म्हणाली, ‘‘दारू आणि पाणी.’’ मग मी तीला अगदी साधा प्रश्न विचारला, ‘‘दारूसाठी तूम्ही एक साधी गोष्ट कराल का?’’ तीला वाटले इतके लोक यासाठी प्रयत्न करून थकले आणि तरी दारू हटत नाही बायकांचा त्रास संपत नाही, हा काय मोठं सांगतो आहे आणि तेही परत साधी गोष्ट म्हणतो आहे, ती सौजन्याने म्हणाली, ‘‘सांगा नं भाऊ. आम्ही तर बायकांसाठी काहीही करायला तयार आहोत.’’ मी म्हणालो, ‘‘दारूचे दुकान बंद व्हावे म्हणून मतदान घ्यावे लागते. आंदोलन करावे लागते. मोठा आटापिटा करावा लागतो. स्वयंसेवी संस्थां चालवाव्या लागतात. त्यापेक्षा दारूचे दुकान गावात असावे म्हणून मतदान का नाही घेत? शासनाकडे ठराव गेल्याशिवाय पाण्याचा टँकर मिळत नाही. शाळा मिळत नाही. रस्ता मिळत नाही. रॅशन दुकान मिळत नाही. मग दारूसाठी असा ठराव, ग्रामसभेचे स्त्रीयांचेच फक्त मतदान का नाही घेत? म्हणजे शासनही म्हणून शकतं बघा या गावानेच आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही दारू दुकानाला परवानगी दिली. अन्यथा दिली नसती.’’ ती गोरीमोरी झाली. तिला बिचारीला काहीच उत्तर देता आलं नाही.
हे तर छोटं उदाहरण झालं. नाशिकला शरद पवारांच्या कन्या खा. सुप्रिया सुळेंना बायकांनी जाहिर विचारलं, ‘‘तूमचा पक्ष इतक्यावर्षांपासून सरकारमध्ये आहे मग तूम्ही शासनाचे अधिकृत धोरण म्हणून दारूदुकान बंदी का नाही लागू करत.’’ सुप्रिया सुळेंना हे जाहिर कबूल करावे लागले की हे महसूलामुळे शक्य नाही.
यातच स्त्रीप्रश्नांची कॅन्सरची गाठ अडकली आहे. म्हणजे एकीकडे शासनाने विचित्र धोरणं ठरवायची आणि दुसरीकडे मोजक्या स्वयंसेवी संघटनांना हाताशी धरून त्याविरूद्ध लुटूपुटीची लढाई खेळायची. यात कशी होणार स्त्री मुक्ती?
इतक्या सवलती मुलींना शिक्षणासाठी दिल्या पण तरी कुठे स्त्रीभ्रूणहत्या थांबल्या? आपण एका साध्या निष्कर्षापर्यंत येऊन थांबतो इतर प्रश्नांसारखेच सरकारी धोरणाने स्त्री प्रश्नाचाही बट्ट्याबोळ करून टाकला आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा हस्तक्षेप आपणाला आणि विशेषत: स्त्री चळवळीतील धुरीणांना कमी करावा लागेल.
उद्योगीपणा हे स्त्रीचे वैशिष्ट्य आहे. कोळी जमातीत पुरूष हा फक्त मासे पकडून आणतो. विकते ती स्त्रीच. मधमाशीचे उदाहरण तर इतकं वापरलं गेलं आहे की परत ते द्यायचं माझ्या जीवावर येतं आहे. सर्वत्र व्यापार, उद्योग यात स्त्रीला विलक्षण गती असल्याचं सिद्ध झालं आहे. आणि नेमकं उलट आपण व्यवस्थेनं तिला जखडून टाकलं आहे.
स्त्रीला खरी मुक्ती दिली ती विज्ञानाने. नविन व्यवस्थेने. दुसर्‍या महायुद्धानंतर रॅशनिंग खात्यात नौकर्‍या निर्माण झाल्या आणि स्त्रीया मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या. गर्भनिरोधकांचा शोध लागला आणि लादल्या जाणार्‍या नकोशा गर्भधारणेपासून स्त्रीची सुटका झाली. आजही संगणक आणि मोबाईल सारखी लायसन्स कोटा परिमिट राज्याच्या बाहेरची वैज्ञानिक साधनं सुलभतेने हाताळता येतात आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा उपेक्षीत वर्गाला, स्त्रीयांना मोठ्या प्रमाणात होतो.
स्वातंत्र्य नाकारले म्हणून स्त्रीयांची पिछेहाट होत गेली. स्त्रीयांच्या सरकार धार्जिण्या संस्थांनी त्यांची अवस्था अजूनच बिकट केली. जसं शेतकरी म्हणतो, ‘‘नको आम्हाला तूमची फुकट वीज, करमाफीची सवलत, न मिळणारी सबसिडी, आम्हाला द्या घामाचे दाम’’ तसेच स्त्रीयांही म्हणताहेत, ‘‘नको आम्हाला तूमची दया माया, नको आम्हाला मातृगौरवाची नौटंकी, आमच्यासाठी काहीच करू नका. फक्त आमच्या मार्गातून बाजूला व्हा. आम्ही तर आमच्या अडचणींतून बाहेर येवूतच शिवाय घरालाही बाहेर काढूत. तूम्ही आमच्या उरावर बसला अहात ते उठा जरा.’’