Saturday, December 5, 2020

डोंगरमाथा बाभुळझाड । होतच नाही नजरेआड ॥

  


उरूस, 1 डिसेंबर 2020 

औरंगाबाद शहराला टेकड्यांनी वेढलेले आहे. दक्षिणेकडच्या म्हणजेच सातारा परिसरांतल टेकडीवर एक सुरेख झाड आहे. टेकडीवरील हे एकटेच झाड कुठूनही उठून दिसते. ही टेकडी ‘वन ट्री हील’ म्हणूनच ओळखली जाते. हे झाड जवळून पाहण्याची फार दिवसांची इच्छा होती. 

पर्यावरणप्रेमी तरूणांच्या एका गटाने पावसाळ्यात तिथे वृक्षारोपण केले. दोन तीन दिवांपूर्वी वणव्यात ही सर्व झाडे होरपळली. जी वाचू शकतील अशा झाडांना पाणी देवू या, त्यांच्या मुळाशी पाण्याच्या बाटल्या ठेवून ठिबकच्या माध्यमातून तेथे ओल जपली जाईल. या झाडांना वाचविण्यासाठी आज शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी पहाटे सुर्योदय होताना उत्साही तरूण तरूणींच्या गटासोबत मी या टेकडीवर पोचलो. 

ज्या झाडाला जवळून पहायची ईच्छा होती ते दृष्टीपथास पडल्यावर आश्चर्य वाटलं, आनंद झाला. आश्चर्य यासाठी की बाकी काहीच त्या बोडक्या डोंगरावर टिकू शकले नाही पण हे झाड मात्र तग धरून चिवटपणे टिकून आहे. आणि आनंद यासाठी की हे तर एक साधं आपलं गावठी बाभळीचे झाड आहे. नेहमी आढळणारी अशी ही आपल्या जवळची बाभूळ इथे इतक्या उंचावर औरंगाबाद शहराच्या माथ्यावर अभिमानाने तुर्‍यासारखी डौलात उभी आहे. 

झाडांना पाणी द्यायचे काम थोडावेळ करून नविन आलेल्या उत्साही गटाच्या हाती सोपवले आणि झाडाजवळ येवून बसलो. कधीपासून हे झाड आपल्याकडे खेचून घेत होतं. गर्द हिरवी पाने, त्यावरची पिवळी सुंदर फुले, काळे अस्सल भक्कम  खोड मला बापटांची कविता आठवली


अस्सल लाकुड भक्कम गांठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे


देहा फुटले बारा फांटे

अंगावरचे पिकले कांटे

आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे


अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे


बापटांच्या कवितेत या झाडाचा टणकपणा स्पष्टपणे आला आहे. इथे बाकी कुठलेच झाड टिक़ले नाही. आहेत ती झुडूपे. नविन लावलेली झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी धडपडत आहेत. 

बापटांच्या कवितेपेक्षा काहीतरी अजून वेगळे या झाडात आहे असे मला वाटले. भोवती फिरून पाहताना झाडावर पडलेले कोवळे ऊन, पिवळ्या फुलांची आकर्षक झळाळी, काळ्या फांद्यांच्या जाळीतून पलीकडे दिसणारे शहराचे सुंदर चित्र हे मला ‘माथ्यावरची हळद विटली’ या ओळीशी विसंगत वाटायला लागले. 

मार्गशीर्षातली पहाट आहे. शिसवी शिल्पासारखे खोड, कोवळ्या उन्हात पिवळ्या फुलांची झळाळी उठून दिसते आहे, फांद्यांच्या जाळीतून पलीकडचे शहर खुप सुंदर दिसते आहे. मला इंदिरा संतांची कविता आठवली. हे झाडही इंदिरा संतांच्या कवितेतील बाभळीसारखे गावाबाहेर एकटे उभे आहे. त्यांनी बांधावर म्हटले इथे हे डोंगरावर आहे.



लवलव हिरवी गार पालवी

काट्यांशी वर मोहक जाळी

घमघम करती लोलक पिवळे

फांदी तर काळोखी काळी


झिलमिल करती शेंगा नाजूक

वेलांटीची वळणे वळणे

या सार्‍यांतून झिरमिर झरती

रंग नभाचे लोभसवाणे


अंगावरती खेळवी राघू

लाघट शेळ्या पायाजवळी

बाळ गुराखी होउनिया मन

रमते तेथे सांज सकाळी


संध्याकाळी येते परतून 

लेउन हिरवे नाजुक लेणे

अंगावरती माखुन अवघ्या

धुंद सुवासिक पिवळे उटणे


कुसर कलाकृती अशी बाभळी

तिला न ठावी नागररीती

दूर कुठेतरी बांधावरती

झुकुन जराशी उभी एकटी


औरंगाबाद शहराचा मानाचा तुरा असणारी अशी बाभळी. ही टेकडी म्हणजे बाभुळ टेकडी असेच म्हणायला पाहिजे. जशी गोगाबाबा टेकडी आहे, हनुमान टेकडी आहे तशीच ही बाभुळ टेकडी. हे झाड नजरेआड होताच नव्हते. म्हणून मला ओळ सुचली "डोंगरमाथा बाभूळ झाड | होताच नाही नजरेआड ||"

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

1 comment: