Friday, October 22, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७०

 

उरूस, 22 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 208

(बांग्ला देशात हिंदुंवर अनन्वीत अत्याचाराच्या घटना समोर आल्या. त्याने सारे जग हादरून गेले. )

बांगला देशात । हिंदुंचा संहार ।
विषारी फुत्कार । धर्मांधांचे ॥
सेक्युलर येथे । वाजते डफली ।
हिंदुंची कापली । मान तिथे ॥
सीएए विरोधी । केला ज्यांनी शंख ।
त्यांना बसे डंख । कट्टरांचा ॥
बांगला देशी हा । ओके द्वेष आग ।
फणा काढी नाग । धर्मवेडा ॥
अडकले होते । पाक जबड्यांत ।
वाचवे भारत । बांग्लादेशा ॥
उपकाराची या । जरा न जाणीव ।
हिंदुंचा घे जीव । नीचपणे ॥
कट्टर इस्लामी । धर्मांधता शाप ।
जगा त्याचा ताप । कांत म्हणे ॥
(20 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 209

(आर्यन खानला सत्र न्यायालयात जामिन मिळाला नाही. आता त्यांचे वकिल उच्च न्यायालयात गेले आहेत.)

मागतो ‘मन्नत’ । तरी नाही बेल ।
नशिबात जेल । आर्यनच्या ॥
चर्चा करू करू । थकले लिब्रांडू ।
कायद्याचा दांडू । माथ्यावर ॥
शाहरूख ब्रँड । उतरला भाव ।
बदनामी घाव । कारट्याचा ॥
कायद्याचा कधी । मानतो ना धाक ।
त्याचे आज नाक । ठेचले हे ॥
कायद्यापुढती । सगळे समान ।
परि असमान । कायदाच ॥
अशा नाठाळांना । बसे आज धक्का ।
झाले हक्का बक्का । बॉलीवुड ॥
माज असे ज्याला । दुनिया ‘मुठ्ठी में’ ।
जाई तो ‘मिट्टी में’ । कांत म्हणे ॥
(21 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-210

(21 ऑक्टोबर रोजी 100 कोटी चा टप्पा कोरोना विरोधी लसीकरणाने गाठला. इकडे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात हप्ते वसुलीचा 100 कोटींचा टप्पा गाठला.)

100 कोटींचा । गाठला हा टप्पा ।
विरोधाच्या गप्पा । तरीसुद्धा ॥
कुणासाठी टप्पा । लसीकरणाचा ।
वशीकरणाचा । हप्त्यांसाठी ॥
100 कोटींच्या । हप्त्यांची वसुली ।
सत्तेची ढोसली । आघाडीने ॥
कोरोना काळात । केली बोंबाबोंब ।
भ्रष्टाचारी कोंब । उगवले ॥
इंजेक्शन असो । असो ऑक्सिजन ।
रडविले जन । व्यवस्थेने ॥
जनता सोशिक । चिवट जिवंत ।
झाली ‘लसवंत’ । अभिमाने ॥
साध्या माणसांचे । झुंजणे हे खास ।
रचे इतिहास । कांत म्हणे ॥
(22 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६९

 

उरूस, 19 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 205

(कॉंग्रस कार्यकारिणी बैठक पार पडली आणि त्यात परत सोनिया गांधीच एक वर्ष हंगामी अध्यक्ष राहतील असा निर्णय झाला. ऑगस्ट 2022 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू होईल. आणि ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष निवडल्या जाईल आसे ठरविण्यात आले. परत राहुल गांधीच अध्यक्ष होतील असे संकेत अंबिका सोनी यांनी दिले आहेत. )

जुनीच सोनिया । जुनाच राहुल ।
नव्याची चाहूल । नको आम्हा ॥
आम्हा प्रिय भारी । वंश परंपरा ।
अध्यक्ष दुसरा । नाही दूजा ॥
हंगामी अध्यक्ष । ठेवूया कायम ।
हाच तो नियम । प्रिय आम्हा ॥
कुणी म्हणो पप्पु । कुणी म्हणो मठ्ठ ।
चिकटला घट्ट । पदाला जो ॥
जात नाही पीळ । जळो जरी सुंभ ।
तैसाची हा शुंभ । कांगरेसी ॥
भाजपच्या मनी । फुटली उकळी ।
स्पर्धा हो मोकळी । नेतृत्वाची ॥
थुंकलेला थुंका । चाटतो जो पुन्हा ।
कॉंग्रेसी तो जाणा । कांत म्हणे ॥
(17 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 206

(नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार, अनिल देशमुख सर्व राष्ट्रवादीचे मंत्री विविध कारणांनी गोत्यात आले आहेत. देशमुखांना तर राजीनामाच द्यावा लागला.)

हर्बल गांजाची । खिशात ही पुडी ।
राष्ट्रवादी ‘घडी’ । विस्कटली ॥
वझे वझे गेला । एक ‘वाजे’ पायी ।
हर्बलची घाई । दूजा नडे ॥
‘अनंत’ लीलेने । मारला ‘कर्मुसे’ ।
झाले कसेनुसे । अटकेने ॥
‘अजित’ गोत्यात । ईडीच्या धाडीने ।
केंद्राच्या खोडीने । खेळ चाले ॥
जागी थांबलेले । सारे मंत्री काटे ।
शिवलेले फाटे । जागजागी ॥
‘बारामती’ स्तब्ध । मुख्य तास काटा ।
उपहास मोठा । राजकीय ॥
दिल्लीच्या मोहात । निसटे गल्लीही ।
उडते खिल्ली ही । कांत म्हणे ॥
(18 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-207

(दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नव हिंदुत्वाचा मुद्दा मांडून नविन वादाला तोंड फोडले आहे.)

पाळीव वाघोबा । बोलतो तडक ।
हिंदूत्व कडक । आमचेच ॥
नव हिंदुत्वाचा । लाविला जो शोध ।
त्याच्यातुनी बोध । कांही नाही ॥
सेनेच्या हिंदुत्वी । उरला न राम ।
भरे ‘रोम रोम’ । सोनियाचा ॥
सेना हिंदुत्वाचा । सेक्युलर झब्बा ।
‘राज’ घाली बिब्बा । राजकीय ॥
सेना भवनाच्या । समोर पोस्टर ।
हिंदुत्व बुस्टर । डोस जणू ॥
सेनेचे हिंदुत्व । मिठाची मासळी ।
बाहेर वा जळी । जिवंत ना ॥
हिंदुत्व धरता । निसटते खुर्ची ।
सोडताच मिर्ची । कांत म्हणे ॥
(19 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६८


 
उरूस, 16 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 202

(सावरकरांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या पत्राचा हवाला दिला आणि मोठा गदारोळ पुरोगाम्यांत उठला. वास्तविक हे पत्र खरे असल्याचे विक्रम संपत आणि उदय माहुरकर या लेखकांनी सप्रमाण सिद्ध केल्यावरही पुरोगामी ते मानायला तयार नाहीत.)

सावरकरांना । घातल्या ज्या शिव्या ।
त्याच्या झाल्या ओव्या । काळावर ॥
देशासाठी वीर । भोगे काळे पाणी ।
गौरवाची गाणी । त्यांच्यासाठी ॥
तरी पुरोगामी । काढितसे शका ।
बदनामी डंका । वाजतो हा ॥
अभ्यासक सत्य । मांडती निखळ ।
पुरोगामी मळ । जाईचना ॥
गांधीहत्या केस । निर्दोष सुटका ।
तरी दे फटका । आरोपांचा ॥
माफीपत्रांसाठी । फुकाचा गोंधळ ।
उलगडे घोळ । अभ्यासात ॥
कांत थुंकणे हे । सूर्यावरी जैसे ।
आपुल्याच बैसे । तोंडावरी ॥
(14 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 203

(आपला जावाई समीर खान हर्बल तंबाखु खातो त्याला विनाकारण एनसीबी ने पकडले असा अजब युक्तीवाद मंत्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आर्यन खानचा असा काही बचाव केला जातो आहे की तो निरागस मुलगा असून खिशात आईने दिलेल्या सातुच्या पिठाच्या गोळ्या घेवून फिरतो. )

दगडांत जैसा । शोभतो मार्बल ।
नशेत हर्बल । तंबाखू ही ॥
नवाबी थाटाने । बोलती मलिक ।
जावाई खारिक । खातो जणू ॥
आर्यन बाळाच्या । खिशामध्ये पीठ ।
तपासून नीट । पहा जरा ॥
सातू पीठ गोळ्या । देते गौरी आई ।
नका करू घाई । आरोपांची ॥
खावा गुपचुप । गायछाप जर्दा ।
कशासाठी गर्दा । करिता हा ॥
तुमची ती दारू । नाही जोरकस ।
थोर सोमरस । मोठ्यांचा हा ॥
कटला पतंग । तुटलेला मांजा ।
हर्बल हा गांजा । कांत म्हणे ॥
(15 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-204

(दरवर्षी शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा घेतला जातो. या वर्षी यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना जे तारे तोडले त्यावरून मुख्यमंत्री म्हणून आपण अपात्र आहोतच पण पक्ष प्रमुख म्हणूनही आपण अपात्र आहोत हेच उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले.)

दसरा मेळावा । काय ते भाषण ।
सीमा उल्लंघन । घरातून ॥
शोधून शत्रूस । म्हणे आम्ही ठेचू ।
गोवर्‍या या वेचू । काकां घरी ॥
शिवसैनिकाला । करू मुख्यमंत्री ।
परि आधी मंत्री । पोरगा हा ॥
हे करू ते करू । स्वप्नांवर साय ।
झाले किती काय । सांगेचना ॥
सांगितली गोष्ट । कासव नी ससा ।
मनसोक्त हसा । श्रोते जन ॥
केंद्र तसे राज्य । म्हणे सार्वभौम ।
पसरला भ्रम । मेंदूमध्ये ॥
पाळीव वाघ हा । बोलतो जोशात ।
काकांच्या खिशात । कांत म्हणे ॥
(16 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी-राजकीय उपहास-भाग ६७

 

उरूस, 13 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 199

(लखीमपुर हिंसाचारा विरोधात महाराष्ट्रात आघाडी सरकारने बंद पुकारला.)

युपीसाठी इथे । नौटंकीचा छंद ।
कशासाठी बंद । आघाडीचा ॥
करू म्हणे बंद । बोलतो जोमात ।
आधीच कोमात । महाराष्ट्र ॥
इथे सोयाबीन । गेले पाण्याखाली ।
कुणब्याला वाली । कुणी नाही ॥
जालियनवाला । बाग आठवते ।
मृत्यू विसरते । गोवारींचे ॥
मावळ आठवा । स्मरा सुरेगांव ।
काळजात घांव । कुणब्यांच्या ॥
कृषी कायद्यांत । काय आहे वांधा? ।
दलालांचा धंदा । बसणार ॥
कांत जो जो करी । महाराष्ट्र बंद ।
तोची भाउबंद । दलालांचा ॥
(11 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 200

(सलग 200 दिवस ही उसंतवाणी लिहिल्या गेली. आजची हा द्विशतकी अभंग. )

दोन शतकांची । झाली वाटचाल ।
पांघरती शाल । वाचक हे ॥
‘सत्य असत्याशी । मन केले ग्वाही ।
मानियेले नाही । बहुमतां’ ॥
तुकोबांचे शब्द । मानिले प्रमाण ।
जाहले निर्माण । हातून हे ॥
अस्वस्थ जनांची । मिटाया तलखी ।
वाहतो पालखी । शब्दांची ही ॥
संत रचनांचा । लागला जो लळा ।
ऐसी शब्दकळा । प्रकटली ॥
आपण लिहिले । नाही याचा दंभ ।
तुम्हा हाती कुंभ । नम्रतेने ॥
शतकांपासुनी । प्रबोधन वारी ।
त्यात वारकरी । कांत जाणा ॥
(12 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-201

(महा विकास आघाडी सरकारने बंद केला. ऍटो टॅक्सी वाल्यांना बंदसाठी दमदाटी केली मारहाण केली. दुकाने जबरदस्ती बंद करण्यास भाग पाडले.)

आघाडीने केला । महाराष्ट्र बंद ।
मनमानी छंद । सरकारी ॥
आंदोलन मोर्चा । विरोधी हत्यार ।
केला अंगीकार । सत्ता पक्षे ॥
चालविता न ये । जयासी शासन ।
सोडावे आसन । तातडीने ॥
उतरे रस्त्यात । लावतसे काडी ।
जाळे बसगाडी । आपलीच ॥
तेंव्हा राजीनामे । खेळले खिशात ।
काकांच्या खिशात । पक्ष सारा ॥
सत्ता घोड्यावर । पक्की हवी मांड ।
राघु बोलभांड । कामाचे ना ॥
फुसक्या स्वाराला । लाथ मारी सत्ता ।
कटे त्याचा पत्ता । कांत म्हणे ॥
(13 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६६



उरूस, 10 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 196

(लखीमपुर हिंसाचारावर मोठे राजकारण करण्यात विरोधी नेते मग्न आहेत. राहुल प्रियंका यांच्या दौर्‍याने अजूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.)

बंटी आणि बबली । हौशी पर्यटक ।
होतसे अटक । यु.पी.मध्ये ॥
आंदोलन नावे । नवे टुरिझम ।
चाले झमझम । माध्यमांत ॥
स्वत:च्या राज्यात । दिसेना मुसळ ।
शोधती कुसळ । दुसर्‍यांचे ॥
आपला तुपला । मृत्युमध्ये भेद ।
नितीलाच छेद । जाई यांच्या ॥
गाडीखाली आले । त्यांची करी कीव ।
ठेचले ते जीव । कोण होते? ॥
तपासाच्या अंती । येईल जे सत्य ।
तयाचे अगत्य । ठेवावे जी ॥
कांत आक्रस्ताळी । राजकीय शैली ।
विवेकाची थैली । रिकामीच ॥
(8 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 197

(कश्मिरातील हत्येचा प्रकार अतिशय भयानक असा आहे. लोकांना नाव गाव विचारून त्यातील हिंदू शिख बाजूला काढले आणि त्यांची हत्या केली. मुसलमानांना सोडून दिले. निषेध करत हजारो लोक श्रीनगरात रस्त्यावर उतरले हे दृश्य मोठे विलक्षण होते. कित्येक वर्षांत असा मोर्चा श्रीनगरात निघाला नव्हता. )

कश्मिरात बळी । शीख आणि हिंदू ।
पुरोगामी मेंदू । शांत बसे ॥
धर्माच्या नावाने । चालते ही हिंसा ।
म्हणे गप्प बसा । सामान्यांना ॥
तिरंगा घेवून । जन्ता रस्त्यावर ।
आक्रमक स्वर । निषेधाचा ॥
कडक शब्दांत । बोले तरूणाई ।
भितीचा तो नाही । लवलेश ॥
तिनशे सत्तर । वर्मी घुसे बाण ।
आतंकींचे प्राण । कंठाशी हे ॥
शेवटची चाले । ऐसी तडफड ।
मारिती भेकड । सामान्यांना ॥
कांत विषवल्ली । उपटा समुळ ।
नि:संतान कुळ । आतंकींचे ॥
(9 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-198

(एअर इंडिया टाटांनी बोली लावून खरेदी केली. 68 वर्षांपूर्वी सरकारीकरण केले होते ते चक्र परत ही कंपनी टाटाकडे जावून पूर्ण झाले. हा काळाने उगवलेला सुडच होय. )

नेहरू नितीला । लावुनिया चुड ।
उगवला सुड । काळाने हा ॥
टाटाची कंपनी । घातली घशात ।
परत खिशात । दिली त्यांच्या ॥
एअर इंडिया । पुरी बुडविली ।
विकाया काढली । त्याचमुळे ॥
लायसन कोटा । परमिट राज ।
नियंत्रण खाज । सरकारी ॥
उद्योजक वृत्ती । खच्ची केली पुरी ।
नियमांची सुरी । गळ्यावर ॥
नोकर दावतो । मालकाला धाक ।
प्रगतीचे चाक । थांबलेले ॥
कांत संपो त्वरे । कंट्रोल आजार ।
मुक्त हो बाजार । फळो फुलो ॥
(10 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

लखीमपुर खिरी - समज आणि गैरसमज !

 

साप्ताहिक विवेक १८-२४ ऑक्टोबर २०२१ 
 
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर आंदोलन करणार्‍या जमावाने दगडफेक केली. लाठ्यांनी हल्ला केला. या प्रकरणांत गाडीच्या काचा फुटल्या, चालकाला गंभीर मार लागला. त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. गाडी गर्दीत घुसली. परिणामी गाडीखाली चार लोक चिरडले गेले.

संतप्त जमावाने गाडीवर हिंसक हल्ला केला. चालकासह चार लोकांची ठेचून हत्या केली. एकूण 8 लोकांचा मृत्यू या प्रकरणी घडला.

झाला तो प्रकार अगदी कमी शब्दांत इतकाच मांडता येतो. जी काही उपलब्ध पुरावे, व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती यातून जे चित्र समोर येते ते इतकेच आहे. पण मुळातच ही बाब इतकी सरळ सोपी घ्यायचीच नसल्याने यावर गोंधळ घालणे, आरडा ओरडा करून परिस्थिती पूर्णत: चिघळून टाकणे, आपलेच असत्य लपविण्यासाठी अजून जोरात गोंधळ करणे हे विरोधी पक्षांचे आणि कृषी आंदोलकांचे एक विशेष असे तंत्र तयार झाले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे लखीमपुरची घटना.

या पार्श्वभूमीवर काही मुद्दे तपासून पाहिले पाहिजेत. दिल्लीला चालू असलेले आंदोलन मुळात विविध राज्यांमध्ये का नेले गेले? मुळात 26 नोव्हेंबर 2020 ला जेंव्हा हे आंदेलन सुरू झाले तेंव्हापासून सांगण्यात आले होते की हे पूर्णत: अराजकीय आहे. प्रत्यक्षात पश्चिमबंगाल सारख्या राज्यांतील निवडणुक प्रचारांत किसान मोर्चाचे नेते ज्या पद्धतीने सहभागी झाले आणि आंदोलनाच्या व्यासपीठावर राजकीय पक्षांच नेते ज्या मोठ्या प्रमाणात वावरले त्यावरून हा दावा अतिशय पोकळ आहे हे सिद्ध झाले आहेच. या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये हे पासून राजस्थान, मध्यप्रदेश येथे किसान मेळावे करण्याचे भरपूर प्रयत्न राकेश टिकैत आणि त्यांचे सहकारी यांनी केले. पण त्याही मेळाव्यांना प्रतिसाद फारसे मिळेनासा झाल्यावर तो मार्ग सोडून द्यावा लागला. विविध राज्यांतील भाजप विरोधी असलेल्या डाव्यांच्या शेतकरी संघटना, राजकीय पक्ष यांना हाताशी धरून बंद, मोर्चे, रेल रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. वारंवार बंदचे आवाहन करूनही असे प्रकारचे बंद यशस्वी होताना दिसले नाहीत.

या पार्श्वभूमीवर लखीमपुर खिरी येथे काय घडले ते समजून घ्या. येत्या 4 महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडुका होवू घातल्या आहेत. त्याची तयारी म्हणून विरोधी पक्ष विविध मुद्दे शोधत आहेत. किसान आंदोलनाचा मुद्दा त्यांच्या आयताच हाती लागला. या किसान मोर्चाच्या नेत्या कार्यकर्त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यांनी ‘दिल्ली के बाद लखनऊ घेर लेंगे’ अशी वक्तव्यं द्यायला सुरवात केली.

26 जानेवारी च्या लाल किल्ल्यावरील हल्ल्यांपासून किसान आंदोलनाचा हिंसक चेहरा लपून राहिलेला नाही. मुळात या आंदोलनात नक्षलवादी, पाकिस्तानवादी, खालिस्तानी, चीनचे छुपे समर्थन असलेले गट, इस्लामीक कट्टरपंथी या सगळ्यांचा शिरकाव झालेला आहे. याचे वारंवार पुरावेही मिळाले आहेत. जसे दिल्ली दंगे एक पूर्वनियोजीत कट होता आणि तसा निकालच आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे त्याच प्रमाणे किसान आंदोलनही आता एका पूर्व नियोजित कटाचा भाग असल्याचे सिद्ध होत आहे.

पहिला मुद्दा ज्या कृषी कायद्यांना विरोध आहे हे सांगितले जात आहे त्यांच्या बद्दल हे सर्व विरोधी पक्ष आणि राकेश टिकैत यांची किसान युनियन यांनी आधी काय वक्तव्य केली, मांडणी केली ते तपासून पहा म्हणजे हा विरोधी भास लगेच समोर येईल. हे सर्व लोक या कृषी कायद्याच्या पूर्णत: बाजूने होते. पण आता मात्र हे ‘कनून वापीस लो’ इतक्या एकाच मुद्द्यावर अडून बसले आहेत. त्यातूनच यांना केवळ आणि केवळ गोंधळ अस्वस्थता निर्माण करायची आहे हे लक्षात येते.

दुसरा मुद्दा कृषी कायद्याशी काहीही संबंध नसलेली एम.एस.पी. प्रमाणे खरेदी आणि एम.एस.पी. चा कायदा करण्याची मागणी यांनी लावून धरली आहे. ज्याचा कुठेच कसलाच उल्लेख तिनही कृषी कायद्यांत येत नाही.
तिसरा मुद्दा जो जास्त गंभीर आहे. कारण तो विषय कायद्याशी निगडीत आहे. सर्वौच्च न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती देता येईल का अशी विचारणा केंद्र सरकारपुढे केली होती. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने ती सुचना स्विकारली आणि कायद्याला स्थगिती दिली. शिवय सर्वौच्च न्यायालयाने या कायद्यांबाबत शिफारस करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीसमोर विविध शेतकरी संघटना, संस्था, तज्ज्ञ यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. या समितीने आपला अहवाल न्यायालयाला सादरही केली. पण चुकूनही संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी या समितीसमोर हजर झाले नाहीत. सर्वौच्च न्यायालयातही हे लोक हजर झाले नाहीत. वारंवार विचारणा करण्यात येवूनही यांनी तिकडे पाठ फिरवली. यातून या किसान आंदोलन वाल्यांचे हेतू शुद्ध नाहीत हे सिद्ध झाले.
न्यायालयाने यावर सक्त भाषेत टिप्पणीही केली आहे. शिवाय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आंदेालन करत असताना इतर नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर तूम्ही घाला का घालत अहात हेही विचारले. अजूनही संयुक्त किसान मोर्चाने यावर उत्तर दिले नाही. आता तर 43 संघटना आणि त्यांचे नेते यांना सर्वौच्च न्यायालयाने नोटिस पाठवली आहे.

केंद्र सरकारने कृषी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ नेमून त्यांची शेतकरी नेत्यांशी चर्चा घडवून आणली. चर्चेच्या 11 फेर्‍या पार पडल्या. पण शेतकरी नेत्यांच्या अडमुठपणाने हा सगळा प्रयास वाया गेला. आजही हे आडमुठ शेतकरी नेते ‘कनून वापस लो’ यावरच अडून बसले आहेत.

लखीमपुर खिरी प्रकरणाने हे परत एकदा सिद्ध होते आहे की वैध मार्गाने चर्चा,  कृषी समस्येचे निराकरण करून सकारात्मक पद्धतीने मार्ग काढणे, शेतकर्‍याच्या खात्यात सरळ पैसे जमा होवून त्याला लाभ मिळणे हे काहीच या शेतकरी नेत्यांना नको आहे. त्यांना फक्त गोंधळ निर्माण करायचा आहे. देशाच्या लोकशाहीला धक्के देण्याचे, तिच्यावर हल्ले करण्याचे एक आंतरराष्ट्रीय कारस्थान असून त्याचा हे एक भाग आहेत हेच आता पटत चालले आहे. कारण लखीमपुर येथे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या मोटारींच्या ताफ्यावर निदर्शनाच्या नावाने हल्ला करण्याचे कारणच काय? या सगळ्या प्रकरणांत उत्तर प्रदेश सरकारचा नेमका काय कुठे संबंध येतो?

जर मंत्र्याच्या मुलाच्या गाडीने आंदोलकांना चिरडले असा आरोप केला जातो आहे तर या कथीत आंदोलकांनी हे आधी स्पष्ट करावे की गाडीवर दगडफेक का झाली? काचा कशा फुटल्या? चालकाला जखमा कशा झाल्या?
आणि एक तर साधा व्यवहारिक मुद्दा आहे की जर गाडीने चिरडूनच टाकायचे होते तर कुणी काही माजक्या लोकांच्या अंगावर गाडी घालेल. 100-150 चा मोठा जमाव रस्त्यावर, बाजूला उभा होता त्याच्या अंगावर गाडी घालणे म्हणजे आत्मघाती हल्ला होय आणि असा उद्देश सत्ताधार्‍यांचा कसा काय असू शकेल?

इस्लामी कट्टरपंथी अतिरेकी असे आत्मघाती हल्ले करतात. सत्ताधारी भाजपचे नेते कार्यकर्ते असे आत्मघाती हल्ले जमावावर काय म्हणून करतील? चिडलेल्या जमावाने चार जणांची ठेचून हत्या केली त्यातून उलट हेच सिद्ध होते की जमाव हिंसक होता. त्याला चिरडण्यासाठीच जर गाडी चालवली गेली असती, गाडीतील लोकांजवळ बंदुका होत्या, गोळीबार झाला असे असते तर मृत्यूमुखी पडलेल्या एका तरी व्यक्तीच्या शरिरांतून बंदुकीच्या गोळ्या शवविच्छेदनानंतर मिळायला हव्या होत्या. पोस्टमोर्टम रिपोर्ट तसं सांगत नाही. एकही मृत्यू गोळी लागून झालेला नाही. मुळात गोळीबार झाल्याचाच पुरावा समोर आलेला नाही.

लखमीपुर हिंसाचारा नंतर ज्या पद्धतीनं विरोधकांनी राजकारण केलं, मृताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय हे सप्रमाण सिद्ध केलं त्यातून त्यांचे हेतू दिसून येतच आहेत. गाडीखाली चिरडल्या गेले नेमक्या तेवढ्याच 4 जणांचा हे वारंवार उल्लेख करत राहिले. त्यांच्याच नातेवाईकांना भेटी दिल्या. पंजाब सराकरने त्या कुटूंबियांना 50 लाखाची मदत जाहिर केली. पण चुकूनही ज्या 4 जणांची लिचिंग करून ठेवून हत्या केल्या गेली त्यांच्या कुटूंबियांना यांनी भेटी दिल्या नाहीत. माणुसकी म्हणून त्यांना कसलीही मदत जाहिर केली नाही. उलट त्या मृत्यूचे तर हे चक्क समर्थन करत आहेत. ‘ऍक्शन की रिऍक्शन तो होगीही’ असा उद्धट प्रतिवाद राकेश ट़िकैत यांनी केला. रस्ता रोकून का बसले तर असे विचारले तर ‘हम कहा रास्ता रोक के बैठे है, रास्ता तो पुलिस ने रोका है’ असली अजब तर्क ही माणसं मांडत आहेत. यातून सिद्ध एकच होते की यांना कायद्याने जे स्वातंत्र्य दिले आहे त्याचा गैर वापर करून इतर सामान्य जनतेला वेठीस धरायचे आहे.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्या तव्यावर विरोधी पक्षांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे. त्यासाठी कृषी आंदोलनचा वापर विरोधी पक्ष करून घेत आहेत. भारतात लोकशाही विरोधी वातावरण वाढावे म्हणून जॉर्ज सॉरोस सारखे अमेरिकन उद्योगपती डाव्यांना हातात धरून काही एक खेळी करत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांनी अशा खेळी केल्या आहेत. अमेरिकेतही अध्यक्षीय निवडणुकांत मोठ्या प्रमाणांत हिंसाचार करून लोकशाही ला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला होता.

कुमार केतकर वारंवार आंतरराष्ट्रीय कटाचा उल्लेख करतात. मोदी त्याच कटाचा भाग म्हणून देशाचे पंतप्रधान झाले असा युक्तीवाद ते मोदी संघ भाजप द्वेषांतून मांडत असतात. पण इथे तर ते ज्या पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत तो पक्षच लोकशाही विरोधी आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे याचे पुरावे समोर येत आहेत. चीनशी ज्या पद्धतीने राहूल गांधी सोनिया गांधी यांनी हातमिळवणी केली तो प्रकार अतिशय गंभीर आणि देशविरोधी आहे. आणि नेमका आरोप मात्र कुमार केतकर अगदी उलटा करत आहेत.

दिल्ली दंगे, शाहिनबाग आंदोलन, भीमा कोरेगांव दंगल, जामिया मिलिया- जेएनयु-अलिगड या विद्यापीठांतील दंगे, 26 जानेवारीचा लाल किल्ल्यावरील हल्ला, बेंगलोर दंगे ही सगळी एक मालिकाच आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कृषी आंदोलनात असे हिंसाचार घडवून आणले जात आहेत. कश्मिरमध्ये 370 हटल्यापासून आणि सुरक्षा दलाने अतिशय कडक कारवाई केल्याने हिंसक कारवाया करणार्‍यांची मोठी कोंडी झाली आहे. पाकिस्तानवादी-चीनवादी-नक्षली- खालिस्तानी हे सगळे आता कश्मिर शिवाय भारतात कुठे कुठे काय काय करता येईल यासाठी संधी शोधत आहेत. विविध निमित्ताने असे हिंसाचार घडवून आणले जात आहेत. दलित, स्त्रीया, मुसलमान, विद्यार्थी, शेतकरी यांच्यातील अस्वस्थता विविध निमित्ताने शोधून त्यांचा वापर या हिंसात्मक कारवायीसाठी केला जातो आहे.

हे सर्व विचारी राष्ट्रप्रेमी भारतीयांनी गांभिर्याने समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं याचा कडाडून विरोध केला पाहिजे. यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामील असणार्‍यांना ओळखून त्यांना उघडे पाडले पाहिजे. गरज असेल तिथे कायदेशीर कारवायी करून यांना अडकवून टाकले पाहिजे. जसे की एल्गार परिषद प्रकरण महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी न्यायालयात लावून धरले आणि या अर्बन नक्षलवाद्यांना तुरूंगात धाडले.

विरोधकांनी केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे चिरंजीव आशिष मिश्रा यांच्यावर एफआयआर दाखल झाला. त्यात त्यांचे नाव असल्याने त्यांना अटक ही करण्यात आली. आधी त्यांना अटक होणारच नाही, हे सरकार गुन्हेगारांना लपवत आहेत अशी ओरड करणारे सर्व विरोधक तोंडावर पडले. आता केंद्रिय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातून त्यांना केवळ आणि केवळ गोंधळच घालायचा आहे हे सिद्ध होते. या पूर्वीही पेगासेस प्रकरण, सेंट्रल विस्टा प्रकरण यातून हे दिसून आले आहेच. चौकीदार चोर है असं फक्त ओरडायचे. प्रत्यक्ष न्यायालयात या विरोधात खटला उभा राहिला तेंव्हा राहूल गांधींना लेखी स्वरूपात माफी मागवी लागली हे प्रकरण सर्वांच्या समोर ताजे आहे.  

कृषी आंदोलनात हिंसा पसरविणार्‍यांवरही अशीच कडक करवायी कशी होईल हे पाहिले पाहिजे. लखीमपुर खिरी चा हाच संदेश आहे की यांना वेळीच आवरले नाही तर हा कॅन्सर देश व्यापत जाईल.    
                   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, October 7, 2021

उसंतवाणी-भाग ६५

 

उरूस, 7 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 193

(उत्तर प्रदेशात लखीमपुर येथे मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीचे नियंत्रण सुटले. गार्डी गर्दीत घुसली. पाच लोकांचा मृत्यू झाला. जमावाने चार लोकांना बाहेर काढून ठेचून मारले. एकूण 9 मृत्यू झाले. यावरही विरोधी पक्ष मृत्यूचे भांडवल करून राजकारण करत आहेत.)

लखीमपुरात । हिंसेचे तांडव ।
मृत्युचा मांडव । घातला हा ॥
कृषी आंदोलन । पूर्ण भरकटे ।
हिंसा खरकटे । सांडलेले ॥
कराया बसले । लोकशाही खुन ।
घ्यावी ओळखून । चाल ऐसी ॥
शेतकरी सच्चा । राबतो शेतात ।
कुणाच्या हातात । दंडुके हे ॥
आंदोलनजीवी । घेतात हे जीव ।
माणसे सजीव । का म्हणावे ॥
विरोधी पक्षांचे । बबली नी बंटी ।
नौटंकीची घंटी । वाजविती ॥
मेलेल्या जीवांवे । लावुनी कातडे ।
वाजते डफडे । कांत म्हणे ॥
(5 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 194

(4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. दीड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली. मुला मुलींच्या डोळ्यांत अतोनात आनंद दिसून आला. सांग सांग भोलानाथ शाळा भरेल का? असं म्हणायची पाळी आली होती. )

वाजतसे घंटा । सुरू झाली शाळा ।
पोरं झाली गोळा । उत्साहाने ॥
घरी बसुनिया । सुट्टीचे अजीर्ण ।
मन हे विदीर्ण । निराशेने ॥
जुने भेटताच । मैत्रिणी व मित्र ।
डोळ्यामध्ये चित्र । फुललेले ॥
ऑनलाईनचा । सुका ज्ञान घास ।
लाभो सहवास । गुरूजींचा ॥
पोरांच्या मनीचा । भाव जाणा भोळा ।
मनातुन शाळा । हवी वाटे ॥
भोलानाथ भरो । नियमित शाळा ।
गळ्यामध्ये गळा । मित्र मित्र ॥
कांत माणसाचा । माणसांत जीव ।
तयावीण कीव । स्वत:चीच ॥
(6 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-195

(आज घटस्थापना. देवीने महिषासुराचा वध केला तसाच आपण सगळे मिळून कोरोनासूराचा वध करूया. )

देवीने वधिले । महिषासूराला ।
कोरोनासूराला । गाडू तैसे ॥
सार्‍या देवता दे । आपापले शस्त्र ।
मंत्रुनिया अस्त्र । देवी हाती ॥
सगळे मिळून । लावू शक्ती आता ।
सारी बद्धीमत्ता । पणाला ही ॥
कोरोनासूराचा । करण्या नि:पात ।
सारे देवू साथ । अभियाना ॥
करू ‘जागरण’ । घालूया ‘गोंधळ’ ।
वाजवू ‘संबळ’ । मनोभावे ॥
आपत्ती विरूद्ध । लढण्याचे मात्र ।
आहे नवरात्र । प्रतिक हे ॥
कांत निवारण्या । कोरोना आपत्ती ।
बुद्धी आणि शक्ती । आई तू दे ॥
(7 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, October 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६४



उरूस, 4 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 190

(पावसाने शेतीचे आतोनात नुकसान केले आहे. नेहमी ओला असो की सुका दुष्काळाचा फटका ग्रामीण भागालाच का बसतो? शहरी भागाला दुष्काळाने पूर्णत: उद्ध्वस्त व्हावे लागले असे घडत नाही. आणि तशी परिस्थिती आली की लगेच विम्याचे पैसे मिळतात, नुकसान भरपाई मिळते, मदत उभी राहते. शेतकरी मात्र वार्‍यावर सोडला जातो. हे भारत- इंडिया शरद जोशींनी लक्षात आणून दिले. आजही हा सापत्न भाव तसाच आहे.)

पाउस कोसळे । आडवा तिडवा ।
मिटवी गोडवा । जगण्याचा ॥
सर्वदूर रानी । पाणी साचलेले ।
मन खचलेले । कुणब्याचे ॥
कोरडा असो वा । असूदे रे ओला ।
दुष्काळाने डोळा । भरलेला ॥
फायदा घेवुन । ‘इंडिया’ मोकळा ।
‘भारता’च्या गळा । फास दोर ॥
‘इंडिया’च्या साठी । मोकळा बाजार ।
‘भारता’आजार । बंधनाचा ॥
नवे तंत्रज्ञान । ‘इंडिया’च्या साठी ।
फाटक्याच गाठी । ‘भारता’च्या ॥
कुणबी म्हणजे । सावत्र लेकरू ।
धोरणाने मारू । कांत म्हणे ॥
(2 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 191

(30 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर शिवाय गांधींचा संदर्भ येत नाही. ज्या कॉंग्रेसचे गांधी सर्वेसर्वा होते त्या कॉंग्रेसने तर गांधींचे ‘कॉंग्रेस विसर्जीत करा’ हे वक्तव्य प्रत्यक्षात उतरविण्याचा चंग बांधला आहे.)

30 जानेवारी । 2 ऑक्टोबर ।
बापुंची खबर । एवढीच ॥
जनता विसरे । महात्म्याचे धडे ।
पळाली माकडे । जंगलात ॥
अहिंसेचे नको । आम्हाला टिचिंग ।
मॉब हे लिंचिंग । रोज सुरू ॥
कशाला हवी ही । सत्याची झंझट ।
नको ते झेंगट । गळ्यामध्ये ॥
सत्याचे नको हेे । सत्तेचे प्रयोग ।
खुर्चीचा वियोग । सोसवेना ॥
बापु नको आता । जुने उपोषण ।
सत्ता कुपोषण । चालु येथे ॥
बापु तुम्ही आता । आउट डेटेड ।
व्हा अपडेटेड । कांत म्हणे ॥
(3 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-192

(शाहरूख खानचा पोरगा आर्यन खान रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज सेवन करताना सापडला. त्याला एनसीबी ने ताब्यात घेतले व अटक केली. )

दोस्तासंगे मस्त । करी रेव्ह पार्टी ।
अडकली कार्टी । बॉलीवुडी ॥
गांधी जयंतीचा । दिवस हा ड्राय ।
करीती एंजॉय । सुखेनैव ॥
तरंगते सारे । क्रुझ पाण्यावर ।
पोरं नशेवर । मदमस्त ॥
एन्सीबीला कुणी । दिली याची टीप ।
उघडली झीप । इज्जतीची ॥
जरा उचलता । शारूखने डोळा ।
तोंडामध्ये बोळा । मिडियाच्या ॥
सोशल मिडिया । काढतोय पिसे ।
लिब्रांडुंचे हसे । होई पहा ॥
पद वा पदार्थ । नशेला कारण ।
पेटविती रण । कांत म्हणे ॥
(4 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६३



उरूस, 4 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 187

(कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यासाठी भगतसिंग जयंतीचा मुहूर्त निवडला होता. पण नेमकं त्याच दिवशी सिद्धूनी राजीनामा देवून सर्व उत्साहावर पाणी फिरवले.)

बुडवाया पार । कॉंग्रेसची नैय्या ।
जिग्नेश कन्हैय्या । प्रवेशती ॥
देतो राजीनामा । नवज्योत सिद्धु ।
कॉंग्रेसला बुद्धु । बनवुनी ॥
सोनिया राहूल । मस्त सुट्टीवर ।
नेते कट्टीवर । राज्योराज्यी ॥
गांधी जयंतीला । स्वप्न करू पुरे ।
पक्ष संपवु रे । आपुलाची ॥
मुख्यमंत्रीपदी । दलित चेहरा ।
कावरा बावरा । सिद्धुपायी ॥
देती राजीनामा । पाठोपाठ मंत्री ।
नाराज वाजंत्री । अंगणात ॥
कांत ढासळतो । कॉंग्रेसचा किल्ला ।
राहुलला सल्ला । कोण देतो ॥
(29 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 188

(कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, मनिष तिवारी सर्वच ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात सुर लावला आहे. राज्यांराज्यांतील भांडणी संपायला तयार नाहीत.)

आम्ही जी-तेवीस । नाही जी-हुजूर ।
सिब्बलचा सुर । आक्रमक ॥
‘आझाद’ होवुनी । ‘गुलाम’ बोलतो ।
शब्दांनी सोलतो । चिठ्ठीतुनी ॥
व्याकुळ ‘तिवारी’ । विचारतो प्रश्‍न ।
पाकमध्ये जश्‍न । कशासाठी ॥
कार्यकर्ता सच्चा । पंजाबात दु:खी ।
शिवी त्याच्या मुखी । नेत्यांसाठी ॥
छत्तीसगडात । अस्वस्थ ‘बघेल’ ।
किती ही टिकेल । खुर्ची माझी ॥
‘पायलट’ विना । ‘अशोक’ विमान ।
चाले घमासान । राजस्थानी ॥
मतदारे दिले । सत्तापद ओटी ।
त्याची करी माती । कांत म्हणे ॥
(30 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-189

(माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर फरार घोषित करावे लागले. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महा संचालक यांना सीबीआय ने नोटिसा पाठवल्या आहेत.)

कुठे गेला शोधा । मंत्री देशमुख ।
लपवे श्रीमुख । कोण्या घरी ॥
सीबीआय पुसे । मुख्य सचिवाला ।
कुठे लपविला । माजी मंत्री ॥
नोटिस जाताच । उतरे जरब ।
हबके ‘परब’ । मनोमनी ॥
बोलके प्रवक्ते । आता गप्प कसे ।
काकांचीही बसे । दातखीळ ॥
‘परम’ पळाला । लावुनिया काडी ।
अडके आघाडी । कायद्यांत ॥
सेनेची ‘भावना’ । जाहला ‘आनंद’ ।
सीबीआय छंद । छापामारी ॥
घोटाळ्यांची धुणी । बडवे परीट ।
सोमय्या किरीट । कांत म्हणे ॥
(1 ऑक्टोबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575