Thursday, December 3, 2020

मूर्ती मालिका -१३

लोभस पुत्रवल्लभा

गुप्तेश्वर मंदिर धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) मंदिरावरील हे अतिशय लोभस असे शिल्प. कडेवर मुल असलेले जे सुरसुंदरी चे शिल्प असते त्याला "पुत्रवल्लभा" असे नाव आहे. यातही विविध पद्धतीनं आई आणि बाळाचे नाते दाखवले आहे. बाळाला ती खुळखुळा वाजवुन खेळवते आहे, नुसतेच कडेवर घेतले आहे, स्तनपान करतानाची अप्रतिम शिल्पे आहेत. पण हे जरा हटके आहे. यात हे बाळच आईचा मुका घेते आहे. आईने डाव्या हाताने त्याची कंबर सावरून धरली आहे. उजवा हात बाळाच्या मानेला सांभाळत आहे. या स्वर्गसुखाने दोघांनीही डोळे मिटून घेतले आहेत.
बाळाच्या पायातला वाळा विशेष उल्लेखनीय आहे. हे बाळ नुकतेच चालायला लागले असावे. म्हणून हा चांदीचा वाळा पायात आहे.
प्रेमचंद यांची एक सुंदर लघुकथा आहे. आईच्या बोटाला धरून जत्रेत फिरणारे मुल खेळणी, मिठाई, रहाटपाळणा असे विविध गोष्टींसाठी हट्ट करते आहे. पण गरिब आई त्याला फारसे काही घेवून देवू शकत नाही. पोराचा हट्ट वाढत जातो. तो हात झटकतो आणि मिठाईच्या आकर्षणाने कुठेतरी ओढला जातो. पोर जत्रेत हरवते. आई बाजूला नाही हे ध्यानात येताच त्याला रडू फुटते. आजूबाजूचे लोक त्याला समजावू लागतात. खेळणी देतात, मिठाई देतात, फुगे देवू करतात,रहाटपाळण्याचे आमिष दाखवतात. पण आता पोराला फक्त आईच हवी असते.. बाकी काहीच नको असते. फ.मुं. शिंदे यांनी आपल्या कवितेत लिहिल्या प्रमाणे
आई एक नाव असते
घरातल्या घरात
गजबजलेले गाव असते
केवळ गावच नाही तर लहानपणी आई म्हणजे बाळाचे सर्व विश्वच असते. आसा गोड मतितार्थ या शिल्पात अनामिक कलाकाराने १००० वर्षांपूर्वी कोरून ठेवला आहे. मराठवाडा हा मातृसत्ताक प्रदेश असल्याचे भरपुर ऐतिहासिक पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे. गौतमीपूत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी अशी चांदिची नाणीच सापडलेली आहेत. शिळालेखही आहेत.
मातृशक्तीचा हा एक लोभस आविष्कार, "पुत्रवल्लभा". मला एक शंका आहे. हे शिल्प निर्माण करणारी स्त्रीच असली पाहिजे. इतका नेमका क्षण पुरूषाला पकडता नसता आला. पण दूसरीकडून दासू वैद्य च्या कवितेप्रमाणे पण शक्य आहे
प्रत्येक आईचा मुलगा
कवी असतोच असे नाही
पण प्रत्येक मुलासाठी
त्याची आई एक कविता असते
हे शिल्प जर पुरूषाने घडवले असेल तर त्याची भावना दासूच्या कवितेसारखीच राहिली असेल.


रूसलेली पार्वती आणि शांत शिव
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या बाजूला शिव मंदिराच्या मंडोवरावर हे अतिशय वेगळं मनोज्ञ असं शिल्प आहे. डमरूआणि नाग दोन हातात असून पायाशी नंदी आहे, गळ्यातही नागबंध आहे. त्यावरून हा शिव आहे हे स्पष्ट होते. पार्वती डोळ्यात काजळ भरत आहे. तिच्या दूसर्या हातात आरसा आहे. लक्ष वेधण्यासाठी शिवाच्या डाव्या हातात दंडासारखे दिसणारे जे आयुध आहे त्याला पार्वतीने आपला उजवा पाय लावला आहे. शिवाच्या उजव्या खालच्या हातात बीजपुरक आहे.
हे शिल्प अलीकडच्या काळातले असल्याने फारसे बारीक नक्षीकाम त्यावर आढळून येत नाही. पार्वतीचे वस्त्र, त्याचा मागे दाखवलेला पदर सुंदर आहे. साधेच पण प्रमाणबद्ध आकर्षक असे हे शिल्प. यात कुठला पौराणीक संदर्भ न दाखवता नवरा बायकोच्या नात्यातील सहज भाव दाखवला म्हणून वेगळे उठून दिसते.
गौरी रूसली असं म्हणण्यापेक्षा शिवच रूसला आहे आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी खालील ओळीतील भावना पार्वती व्यक्त करत आहे.
दर्पण देखू रुप निहारु
और सोला सिंगार करू
फेर नजरीया बैठा बैरी
कैसे अखिया चार करू
(प्रसन्न माळेकर या मित्राने सुचवलेल्या समर्पक ओळी)
नाशिकचे मित्र
Ashok Darke
यांनी हा फोटो पाठवला. असे शिल्प कुठे आढळत नाही. याचा काही वेगळा संदर्भ असेल तर तज्ज्ञांनी विषद करून सांगावा. एरव्ही सामान्य दर्शकांसाठी "तूम रूठी रहो मै मनाता रहू" असं एका ओळीत या शिल्पाचे वर्णन करता येईल. देव असला म्हणून काय झालं आहेत तर नवरा बायकोच ना..


देखणा द्वारपाल
प्राचीन मंदिरांवर विविध शिल्पे आढळून येतात ती केवळ सहज म्हणून कोरलेली नसतात. त्यांची एक परिभाषा असते. ते शिल्प तिथेच का कोरले याचे विशिष्ट कारण असते. छायाचित्रातले हे जे शिल्प आहे ते द्वारपालाचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतानाच्या दरवाज्याची जी चौकट असते त्यावर अतिशय कलात्म नक्षीकाम असते. त्याला द्वारशाखा म्हणतात. या द्वारशाखा एक दोन तीन अगदी माणकेश्वर मंदिर (ता. भुम जि. उस्मानाबाद) इथे तर तब्बल सात द्वारशाखा आहेत. या द्वारशाखेच्या तळाशी द्वारपालाचे शिल्प कोरलेले असते. हे शिल्प होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपालाचे आहे.
या द्वारपालाच्या हातात डमरू आणि त्रिशुळ आहे. यावरून हा शैव द्वारपाल असल्याचे अनुमान काढता येते. म्हणजे हे मंदिर शैव देवतेचे आहे हे ठरवता येते.
आक्रमकांच्या भितीने बहूतांश मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती भक्तांनी मुळ जागेवरून दूसरीकडे नेवून ठेवल्या. मग बराच काळ लोटल्यावर सगळं काही स्थिरस्थावर झाल्यावर रिकामा गाभारा पाहून स्थानिक भाविकांनी घडवायला सोपी म्हणून महादेवाची पिंड आणून बसवली. मग मंदिर मुळ कुठल्या देवतेचे? हे ओळखणं अवघड होवून बसले. अभ्यासकांनी हे दाखवून दिले की जी मुख्य देवता मूर्ती आहे त्या अनुषंगाने द्वारपाल, ललाटबिंबावरील देवता, बाह्य भागातील देककोष्टकांतील देवता यावरून काही अनुमान काढता येते.
गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी जी प्रणाल असते तिलाही अर्थ आहे. तिथे गोमुख कोरले आहे किंवा मकर प्रणाल आहे याचेही अर्थ आहेत.
अतिशय देखणी अशी ही शैवद्वारपालाची मूर्ती आहे. आजूबाजूला इतर भक्तगणांची शिल्पे आहेत. सर्वच नृत्याच्या ललित मूद्रेत आहेत. भोवती सुरेख नक्षी आणि किर्तीमुखही कोरलेले आहे.
मंदिराचा मुख्यमंडप आणि गाभारा यांना जोडणार्या जागेला अंतराळ असा शब्द आहे. या ठिकाणी अंधारच असल्याने इथली शिल्पकला दूर्लक्षीत राहते. प्राचीन मंदिरात गेलात तर गर्भगृहाच्या द्वारशाखा आवर्जून बारकाईने न्याहाळा. खुप सुंदर कलाकृती इथे दिसतील.
फोटो सौजन्य.
Travel Baba
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

1 comment:

  1. मंदिरात पिंड घडवायला सोपी म्हणून ती बसवली जाते , या मताशी असहमत. प्राचीन मंदिरे हे शिवाचीच आहेत.

    ReplyDelete