उरूस, 13 डिसेंबर 2020
औरंगाबाद शहरात सातारा परिसरांत टेकडीवर एकच बाभळीचे झाड दिसून येते. त्यावर मी याच सदरात लिहीले होते. त्या बाभळीवर लिहीताना वसंत बापट आणि इंदिरा संत यांच्या कवितांची आठवण झाली. त्याही कवितांचा उल्लेख केला होता. पण माझ्या लक्षात येत गेले हे झाड अजून जरा वेगळे आहे. या प्रदेशातील सोशीक माणसांचे ते प्रतिक आहे. आक्रमकांचे खुप घाव या प्रदेशाने झेलेले आहेत. तरी या परिसरांत कला संस्कृती फुलली जगणं रसरशीत बनत गेलं. कोरडवाहून प्रदेशात वाढणारी झाडंही वेगळी असतात. इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कवितेत असं लिहून ठेवलं आहे
बारोमास खळाळणार्या दांडातून
आम्ही उकललो नाहीत
केळीच्या गाभ्यासारखे
आम्ही वाढलोत
वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त
भागातल्या झुडूपासारखे
पण खबरदार
आम्हाला खुरटे म्हणाल तर
आम्ही तूमच्यापेक्षा
अधिक उन्हाळे पावसाळे पाहिलेत
ही बाभळ खुरटी नाही. चांगली उंच वाढली आहे. आणि तीच या डोंगराची ओळख बनवली आहे. या डोंगरावर आम्ही वणव्यात होरपळलेली झाडे वाचविण्यासाठी गेलो होतो. तो अनुभव, या बाभळीचे जवळून दर्शन, इंदिरा संत वसंत बापटांची कविता, इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेतील भावना या सगळ्यांतून मला एक कविता सुचत गेली. हा हेमंत ऋतू आहे (नविन पिढीला हे समजावून सांगावे लागते). तेंव्हा साहजिकच कवितेतील पहिली ओळ तशी आलेली आहे
हेमंतातील पहाटवेळी
उन्हे लेवूनी तांबूस पिवळी
डोंगरमाथी उभी एकटी
अशी देखली एक बाभळी ॥
कोरड्या डोंगरावर हे एकच झाड दिसून येते. बाकी कुणीच वाढले नाही आणि टिकले नाही. या वातावरणात टिकण्याची विलक्षण अशी किमया या बाभळीत आहे. नविन प्रकारचा अंबा रूजवायचा तर त्याची कलम गावरान अंब्यावर करावी लागते असे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. या मातीत रूजण्याची किमया याच झाडात आढळते. दुसरे काही नविन करायचे तर यावर कलम करावी लागेल. या बाभळीचा काही नखरा नाही. आयुष्य सोसून येणारे एक समंजसपण दिसून येते. म्हणून पुढच्या ओळी सुचल्या.
घट्ट रोवूनी मुळे आपली
दिसे समंजस नाही तोरा
पदराखाली झाकून घेते
शुष्क कोरडा डोंगर सारा ॥
बाभळीच्या खोडाला गाठी असतात, भेगा पडलेल्या दिसून येतात. यातून या झाडाने किती आणि काय सोसले याचा पुरावा मिळतो. बाभळीवर या काळात येणारा पिवळा फुलोरा विलक्षण देखणा असतो. यातूनच पुढच्या ओळी सुचत गेल्या
खोडावरच्या रेषांमधूनी
दु:ख ठणकते जरी पुराणे
धम्मक पिवळा फुलवर गाई
आनंदाचे नविन गाणे ॥
ही बाभळी या प्रदेशांतील माणसांना जगण्याची प्रेरणा देते असं मला वाटून गेलं. सुख आणि दु:ख या दोन पाळूत आपले जगणे भरडून निघते अशी एक ओवी याच प्रदेशात गोदावरीच्या काठावर गायली जाते. त्यामुळेच कष्ट सोसणार्या ग्रामीण प्रदेशातील माणसांना ‘दु:ख दळून खाणारी माणसं’ असं संबोधलं जातं. ही बाभळी जमिनीपासून उंचावर आहे. आभाळ मातीत तिनं स्वत:ला टांगून घेतलं आहे. सुख-दु:खात, जन्म-मृत्यूच्या दोन टोकांत हेलकावणार्या जगण्याचं ती प्रतिक आहे. असं वाटल्याने मला शेवटचे कडवे सुचले
बोलत नाही जरी ती काही
असेल तिजला सांगायाचे
आभाळ माती मध्ये आपुले
हसूनी जगणे टांगायाचे ॥
कविता शब्दांनी पूर्ण झाली पण माझ्या मनात मात्र रूंजी घालतच राहिली. आजही औरंगाबाद शहरात कुठून कुठेही जाताना हा डोंगर आणि हे झाड नजरेस पडते आणि हे शब्द माझ्या मनात फेर धरून नाचायला लागतात.
(ह्या बाभळी कडे पाहत असताना माझ्या नकळत माझे छायाचित्र मित्रवर्य प्रमोद ढवळे यांनी काढले. त्यांचे धन्यवाद)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment