Sunday, December 6, 2020

मराठी लेखक शेती स्वातंत्र्याच्या विरोधात

उरूस, रविवार 6 डिसेंबर 2020

दिल्लीत चालू असलेल्या पंजाबातील शेतकर्‍यांच्या आंदोलनास मराठी लेखकांनी पाठिंबा जाहिर केला आहे. समाज माध्यमांत आणि प्रस्थापित वर्तमानपत्रादी माध्यमांतून तशा बातम्या झळकल्या आहेत. 

मुळात सध्या चालू असलेले शेती आंदोलन जरा बाजूला ठेवू. महाराष्ट्रात 40 वर्षांपूर्वी शरद जोशींनी शेतकरी आंदोलनाची मुहर्तमेढ रोवली. हे सर्व मराठी लेखक तेंव्हा या चळवळीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधीत होते. केवळ आंदोलन उभं केलं असे नव्हे तर शेती प्रश्‍नाची साधार सविस्तर अर्थशास्त्रीय मांडणी शरद जोशींनी करून दाखवली. दोन चार वर्षांतच म्हणजे 1982 पासून पंजाब आणि इतर प्रदेशांत शरद जोशी यांच्या आंदोलनाचा वैचारिक दबदबा पसरला. उत्तर प्रदेशात महेंद्रसिंह टिकैत किंवा कर्नाटकांत नंजूडा स्वामी यांनी उभारलेल्या आंदोलनास कधीच वैचारिक आधार नव्हता. उलट शरद जोशी यांच्या मांडणीला भारतभरांतून पाठिंबा मिळत गेला.

हे सर्व मराठी लेखक ज्यांच्या प्रदेशांतील एक शेतकरी नेता किंबहुना शेती प्रश्‍नाची मांडणी करणारा विचारवंत अनुभवत होते. त्याचे लिखाण वाचत होते. बंगाली लेखकांच्या कादंबर्‍यांत 1985 पासूनच शरद जोशी यांची मांडणी आणि आंदोलनाची दखल यायला सुरवात झाली होती (तिस्तेकाठचा वृत्तांत). खुद्द या लेखकांनीही त्या काळात आपल्या कथा कविता कादंबर्‍यांत शेतकरी आंदोलनाची वैचारिक मांडणी कलात्मक पद्धतीने मांडली होती. आज पत्रक काढणार्‍या पाच प्रातिनिधीक लेखकांच्या कलाकृतींचेच उदाहरण आपण येथे पाहूया.

पहिला लेखक आहे इंद्रजीत भालेराव. त्यांच्या ‘काबाडाचे धनी’ या दीर्घकाव्यात आडतीवर कापूस विक्रिचे वर्णन आलेले आहे. कापसाला न मिळालेल्या भावाची वेदना त्यांनी शब्दांत मांडली आहे. ती वाचून शरद जोशींनी असे लिहीले की ‘शंभर भाषणं करून आकडेवारी मांडून जे सांगता येणार नाही ते इंद्रजीतने चार ओळीत मांडले आहे.’

भावामधी काट्यामधी पस्तोरीत उणीपूरी

ज्यानं त्यानं जिथं तिथं देल्या हातावर तुरी

पट्टी घेवून येतानी त्याचा उतरला नूर

जनू वाहून गेलाय उभ्या झाडावून पूर

कापसाची सरकारी खरेदी व्यवस्था आपल्या बापाला लुटते हे लिहीणारे इंद्रजीत भालेराव आज शेतकर्‍यांच्या गळ्या भोवती सरकारी धोरणाचा पाश आवळणारी मागणी करणार्‍या आंदोलनास पाठिंबा का देत आहेत? ही कापुस एकाधिकार योजना कधीच कापसाला पुरेसा भाव देवू शकलेली नाही हा त्यांच्या आजूबाजूचा अनुभव नाही का? परभणी आणि परिसरांतील सर्व प्रदेश काळ्या मातीचा म्हणजेच कापसाचा प्रदेश आहे.

दुसरे लेखक कवी अकोल्याचे नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या ‘मागील पानावरून पुढे चालू’ या कविता संग्रहात अशी ओळ लिहीली आहे

अस्मानीतून सुटशील 

तर सुलतानीत अडकशील

टाकांच्या निभांनी 

तूझी कणसं खुडतील

म्हणजे सरकारी धोरण शेतकर्‍याला मारते याची पूर्ण कल्पना नारायण कुलकर्णी कवठेकर यांना आहे. शरद जोशी ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या आहे’ ही घोषणा आधीपासून देत आले होते. इतकंच नाही तर ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशीही मांडणी करत होते याचीही कल्पना अनुभव या मराठी लेखकांना येत होता आणि त्याचे त्यांच्या साहित्यकृतीत प्रतिबिंब दिसून येते.

या पत्रकावर सही करणारे कथाकार भास्कर चंदनशीव यांनीही आपल्या ‘लाल चिखल’ या कथेत भाव न मिळाल्याने टमाटे रस्त्यावर ओतून परतणार्‍या शेतकर्‍याचे दु:ख मांडले होते. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्था आपल्या बळीराजाला न्याय देवू शकत नाही याची पूर्ण कल्पना भास्कर चंदनशीव यांना होती.

राजन गवस यांनी आपल्या अकादमी पुरस्कारप्राप्त ‘तणकट’ कादंबरीत गावातील पतपेढीचे राजकारण रंगवताना डबकं बनलेल्या गावगाड्यातील अर्थप्रवाहाचे वर्णन केले आहे. ही सहकारी सरकार आश्रीत व्यवस्था बळीराजावर अन्याय करते हे नीट माहित आहे. 

आसाराम लोमटे यांच्या इडा पीडा टळो या कथासंग्रहात भर दिवाळीत बलीप्रतिपदा म्हणजे शेतकरी विरोधी सण आहे तेंव्हा तो साजरा करायचा नाही या शेतकरी संघटनेच्या मांडणीचा पाठपुरावा करणार्‍या महिलेची कथा आहे. कथा वाङमयीन दृष्ट्या अतिशय दर्जेदार आहे. वर्षोनुवर्षे सत्ताधारी मग ते कुठल्याही काळातील कसे असो शेतकर्‍याला लुटतात हे सत्य कलात्मक रित्या मांडता येते.  मग त्याच आसाराम लोमटे यांना आजचे सरकारी धोरण पोषक आंदोलन शेतकर्‍यांच्या हिताचे कसे काय वाटते?

 हे जर यांच्या कलाकृतीतून स्पष्टपणे दिसून येते तर मग आता यांची नेमकी भूमिका बदलण्याचे कारण काय? आताचे शेतकरी आंदोलन हे पूर्णत: डाव्यांच्या प्रभावातील मागण्या पुढे करत आहे. सरकारशाही बळकट करत आहे. शेतकर्‍या हाती वाडगा घेवून भीकवादी बनवत आहे. सरकारी खाटीकखान्याकडे शेतीप्रश्‍नाची गाय घेवून जात आहे. मग हे मराठी लेखक त्या गायीच्या गळ्यात हार घालण्यासाठी, तिला कुंकूम तिलक लावण्यासाठी, पुरणाचा गोग्रास भरविण्यासाठी पुढे का निघाले आहेत? 

शेतकर्‍यांचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयास होतो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. असे या लेखकांनी म्हटले आहे. कुठलेच आंदोलन दडपून टाकू नये. त्यावर वाद करण्याचे कारणच नाही. पण या शेतकर्‍यांनी त्यांच्या मागण्याासाठी अवैध पद्धतीने रस्ता अडवून ठेवावा याचे समर्थन ही लेखक मंडळी का करत आहेत? सर्वोच्च न्यायालयाने शाहिनबाग प्रकरणांत आंदोलन करताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे हे यांना माहित नाही का? का हे सर्व लेखक न्यायालयाच्या विरोधात जाणार आहेत?

शरद जोशींनी केलेले सर्व लिखाण मराठीतून उपलब्ध आहे. त्यात विविध आकडेवारीही वेळोवेळीची दिलेली आहे. सरकारी पातळीवर विश्वनाथ प्रतापसिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील दोन अहवाल उपलब्ध आहेत.  आणि तरीही हे काहीच न वाचता ही लेखक मंडळी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. ही कमाल आहे. 

आसाराम लोमटे यांनी आजच (रविवार 6 डिसेंबर 2020) लोकसत्तामध्ये ‘भूमी आणि भूमिका’ असा लेख लिहीला आहे. संपूर्ण लेखात एकाही ठिकाणी या कायद्यांतील शेतकर्‍यांवर अन्याय करणारे कलम कोणते? हे सांगितलेले नाही. नेमका विरोध कोणत्या कारणासाठी पंजाबचे शेतकरी करीत आहेत याचाही उल्लेख लोमटे करत नाहीत. याला काय म्हणावे? 

डंकेल प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहनसिंग यांना असाच कडवा विरोध समाजवादी चळवळीच्या प्रभावातील शेतकरी नेत्यांनी केला होता. तेंव्हाही काही लेखक त्याला बळी पडले होते. 

शेतकर्‍याचा पोरगा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अधिकारी बनून गेला की धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी करत नाही असे शरद जोशींनी लिहून ठेवले होते. तसेच आज शेतकर्‍याचा पोरगा लेखक झाला की बापाचा गळा आवळणारी धोरणं राबविण्यासाठी आग्रह धरणार्‍या आंदोलनाला पाठिंबा दिल्याशिवाय रहात नाही असेच दूर्दैवाने म्हणावे लागेल. शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. तशी संपूर्ण वैचारिक मांडणी करून ठेवली. आणि त्याच शरद जोशींच्या प्रदेशातील त्यांच्याच मराठी भाषेत लिहीणारे लेखक याच शेतकर्‍यांला भीकारी बनविणार्‍या आंदोलनाची पालखी वहात आहेत. 

शेतकर्‍यांसाठी संपूर्ण स्वातंत्र्याची अतिशय स्वच्छ मागणी शरद जोशींनी केलेली होती. बाजार स्वातंत्र्य, तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायद्यांपासून मुक्ती या त्रिसुत्रीशिवाय शेतकर्‍यांचे भले होणे शक्य नाही. हे जर मराठी लेखकांना समजूनच घ्यायचे नसेल तर त्यांना समजावून सांगणे मुश्किल आहे. 

  

    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575   

      


2 comments:

  1. सटीक मांडणी.

    ReplyDelete
  2. सर,सरकार जो हमीभाव देते तेवढा सुध्दा भाव व्यापारी लोक देतील की नाही याची शाश्वती नाही.
    आणि साठेखोरीमुले
    कालाबाजार वाढणार नाही का?

    ReplyDelete