Tuesday, December 1, 2020

दिवे लागले रे दिवे लागले । प्राचीन मंदिर उजळून निघाले ।।


  उरूस, 1 डिसेंबर 2020 

 त्रिपुरारी पौर्णिमेला मराठवाड्यात प्राचीन मंदिरांवर दिपोत्सव करण्याची संकल्पना देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने काही गावांमध्ये मांडली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या अगदी तालूकाही नसलेल्या गावांची निवडी यासाठी केली होती. चार गावांत प्रातिनिधीक स्वरूपात हा दिपोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. 

शेदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या ठिकाणी खाम नदीच्या काठावर प्राचीन गणेश मंदिर आहे. तिथे नृत्य, गायन वादन असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता. खाम नदीच्या पात्रात दिवे सोडून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गिरीजा गोळे ही गुरू मुक्ता सोमण यांची विद्यार्थीनी. तिने भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर सचिन नेवपुरकर आणि वर्षा जोशी यांनी विविध भक्तिगीते गाउन श्रोत्यांना चिंब भिजवले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रेषित रूद्रवार याने केले. 

औरंगाबादहून खास या कार्यक्रमासाठी आलेले रसिक गणेश मंदिर, छोटी बारव, नदीचा घाट आणि मध्वमुनीश्वर समाधी परिसर फिरून पाहताना ‘इतकी सुंदर जागा आपल्या शहराच्या अगदी जवळच आहे आणि आपल्या माहित नाही हे दुर्दैवी आहे’ अशी भावना व्यक्त करत होते. शेंदूरवाद्याच्या ग्रामस्थांना आपल्या छोट्या गावात असा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम होवू शकतो आणि त्यासाठी रसिक 30 किमी दूर अंतरावरून गाड्या करून येवू शकतात याचेच अप्रूप वाटत होते. 

चाराठाणा हे औरंगाबाद नांदेड महामार्गावर जिंतूरच्या अलीकडे असलेले छोटे गाव. या गावाला अतिशय उज्वल अशी परंपरा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या गावाला महत्व आहे. हेमाडपंथी मंदिरांनी गाव नटलेले आहे. भव्य अशी दगडी ओवर्‍यांची सुरेख बारव (पुष्करणी) गावात आहे. या गावी असलेल्या प्राचीन मानस्तंभ परिसराची स्वच्छता गावकर्‍यांनी मेहनतीने केली. स्त्रीयांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या. जमिनीवर मानस्तंभाची प्रतिकृती केली. त्याप्रमाणे दिव्यांची रचना केली. 

आपल्या गावच्या प्राचीन स्थळांबाबत अभिमान, स्थानिकांमध्ये जागृती ही सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे. त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधणे, पर्यटकांना तिथपर्यंत आणणे ही कामे स्थानिक लोकांनी पुढाकार घेवून केली पाहिजेत.  चारठाणा या गावात गेली 3 वर्षे गावकरी पुढाकार घेवून इतिहास विषयक जागृती अभियान चालवत आहेत. विविध निमित्ताने उपक्रम हाती घेतले जात आहेत. जानेवारी महिन्यात सांस्कृतिक पदयात्रेचे  (हेरिटेज वॉक) आयोजन करण्यात आले होते. आताही पर्यटकांसाठी नियोजन केले जात आहे.

तिसरं ठिकाण होतं धारासुर. या ठिकाणी पूरातत्त्वीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले गुप्तेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम पुरातत्व खात्याकडून सुरू होत आहे. शिखर शिल्लक असलेले महाराष्ट्रातले हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची स्वच्छता दिवसभर गावकर्‍यांनी केली. रात्री मंदिरावर अक्षरश: दिवाळीच वाटावी अशी रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या जोत्यावर समोर दिवे लावले होते. गावकर्‍यांनी यात उत्सुर्त सहभाग नोंदवला. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम विविध निमित्ताने घेण्याचा निर्धार गावकर्‍यांनी केला आहे. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम जलद गतीने व्हावे ही गावकर्‍यांची तळमळ आहे. 

चौथे ठिकाण होते परभणी तालूक्यात असलेले जाम. या गावी जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरांवरील शिल्पांची दखल तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात घेतली आहे. पण सखोल अभ्यासाची अजूनही गरज आहे. गावकर्‍यांना मंदिराचे महत्त्व पटल्याने त्यांनी परिसराची साफसफाई व मंदिराचा जिर्णाद्धार केलेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरावर दिपोत्सव घेवून त्यांनी गावकर्‍यांत जागृती निर्माण केली. याच मंदिर परिसरांत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत सकारात्मकता गावकर्‍यांनी दाखवली आहे.

या चार गावांत झालेला दिपोत्सव आणि सांगितिक कार्यक्रम याचे महत्त्व यासाठी आहे की ही गावे अगदी तालूकाही नसलेली छोटी गावे आहेत. सहसा आपण सगळे सांस्कृतिक नियोजन करत असताना मोठी शहरे केंद्रभागी ठेवतो. त्यासाठी मोठे प्रयोजक मिळतात. पण लहान गावांतील प्राचीन स्थळांपाशी सांस्कृतिक उपक्रम करण्याला वेगळे महत्त्व आहे. एक तर आपली जी अतिशय अभिमानास्पद उज्वल परंपरा आहे तिचे जतन या निमित्ताने केले जाते, लहान गावांतील वातावरण सांस्कृतिक कलात्मकतेला पोषक आहे त्याचीही दखल घेतली जाते. पूर्वीच्या काळी मंदिरे ही कलेची आश्रयदाती होती. म्हणूनच चित्र संगीत शिल्प साहित्य मंदिर परिसरांत फुलले. आज मंदिरांवर धार्मिक अंगाने टिका करणारे हे विसरतात की ही ठिकाणं कलेची स्फुर्ती स्थळे आहेत. मध्वमुनीश्वर महाराजांची 300 वर्षांपूर्वीची पदे रचना आजही लोक गातात. त्याची बूज या निमित्ताने राखली जाते आहे. भरतनाट्यम शेंदूरवाद्याला सादर झाले. प्राचीन मंदिरं लेण्या आहेत त्यावरील नृत्य मुद्रा आजही अभ्यासकांना खुणावतात. त्याची दखल घेतल्या शिवाय पुढे जाताच येत नाही. जी वाद्ये या मंदिरांवर दर्शविली आहेत त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे. लेण्यांमधील चित्रांवर तर जगभरचे अभ्यासक काम करत आहेत. 

नदीच्या काठी संस्कृती निर्माण झाली असं मानलं जातं. तसे पुरावेच मंदिरांच्या रूपाने उपलब्ध आहेत. मग याची आठवण म्हणून या मंदिरांच्या ठिक़ाणी सांस्कृतिक उपक्रमांचा विचार का केला जात नाही? 

सरकारी पातळीवर वेरूळ महोत्सव अयोजीत केला जात होता. त्या आयोजनाचे पुढे काय झाले ते आपण बाजूला ठेवू. पण असा विचार सर्वच प्राचीन मंदिर परिसरांत छोट्या प्रमाणात करण्याचा विचार आपण का करत नाही? त्यासाठी फारश्या निधीची गरजही नाही. अगदी छोट्या प्रमाणात अभिजात कलांसाठी काम करणारे झटणारे कलाकार कार्यकर्ते रसिक आणि स्थानिक गावकरी यांच्या सहकार्याने प्रत्येक मंदिर परिसरांत, नदीच्या घाटांवर, प्राचीन बारवांच्या परिसरांत सांस्कृतिक उपक्रम सहज शक्य आहेत. त्या निमित्ताने या स्थळांकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल. पर्यटकांचे पाय इकडे वळतील. अभ्यासकही इथे येतील. या ठिकाणांचा अजून सखोल अभ्यास होईल. 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यासाठी पुढाकार घेत आहे. आपल्या परिसरांतील अशा वास्तुंबद्दल आम्हाला जरूर कळवा. त्यांचे फोटो पाठवा. त्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करा. आम्ही सर्व मदत करण्यास तयार आहोत. इतिहास प्रेमी मंदिर मुर्ती प्रेमी रसिकांनी जरूर संपर्क साधावा. या चळवळीत सहयोग नोंदवावा. 

(हे केवळ हिंदूंसाठी आहे असे नाही. औरंगाबाद परिसरांतील शेकडो मजारी धुळखात पडून आहेत. बौद्ध लेण्याची अवस्थाही अतिशय वाईट आहे. त्यावर मी सविस्तर लिहीणार आहेच नंतर. तेंव्हा हा उपक्रम सर्वांसाठीच आहे.)    

     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

 

No comments:

Post a Comment