Monday, December 14, 2020

जोगिया : गदिमांची आठवण



काव्यतरंग, 14 डिसेंबर 2020

14 डिसेंबर हा गदिमांचा स्मृती दिन. त्यांची जन्मशताब्दी 2019 ला नुकतीच साजरी झाली. गदिमांचे स्मारक व्हावे म्हणून विविध संस्था आज त्यांच्या स्मृतीत कार्यक्रम करत आहेत. गदिमांच्या विविध कविता गाणी कथा यांच्या आठवणी आज त्या निमित्ताने जागवल्या जात आहेत. मला गदिमांच्या एका कवितेची आज विशेषत्वाने आठवण होते आहे. जोगिया नावाने ही कविता प्रसिद्ध आहे. माझ्या साठी वेगळी आठवण म्हणजे या कवितेच्या चार ओळी. 
‘कोन्यात झोपली सतार’ या चार ओळी माझ्या कानावर पडल्या. मी मोठ्या उत्सुकतेने त्या लिहून घेतल्या. मला वाटले की कार्यक्रमाची भैरवी झाल्यावर कार्यक्रम संपवताना या ओळी छान वाटतील. ‘स्वराभिषेक’ नावानं भाव भक्ती गीतांचा एक कार्यक्रम मल्हारीकांत देशमुख या मित्राने धडपडीन बसवला होता. गायक वादक माझ्यासारखे निवेदक सहवादक असा सगळा जोडजमाव किंबहुना तारेवरची अवघड कसरत करत त्याने मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचा घाट घातला होता. या कार्यक्रमांत शेवटी गदिमांच्या या ओळी मी म्हणायचो. ऐकणार्‍यांना त्या फार आवडायच्या.  गदिमांच्या या ओळी अशा होत्या

कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग
दुमडला गालिचा तक्के झुके खाली
तबकात राहिल्या देठ लवंगा साली

मला वाटायचे की एखाद्या सुंदर कवितेतील या शेवटच्या आळी असतील. पुढे एकदा ‘जोगिया’ याच नावाचा गदिमांचा कविता संग्रह हाती पडला. त्यातील ही संपूर्ण कविता पाहून मी हरखून गेलो. मला छानसा धक्का बसला तो वेगळ्याच कारणांनी. मी म्हणायचो त्या कवितेच्या शेवटच्या ओळी नसून सुरवातीच्या ओळी होत्या. तिथूनच कविता सुरू होते. त्याच्या पुढच्या चार ओळी या प्रमाणे होत्या.

झुंबरी निळ्या दिपात ताठली वीज
कां तुला कंचनी अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी

माझ्या लक्षात आले की ही कविता म्हणजे कथाकाव्य अशा पद्धतीची आहे. एक छोटासा प्रसंग गदिमांनी रंगवून कवितेत सांगितला आहे. गदिमा जसे गीतकार होते तसेच ते कथा व पटकथाकारही होते. त्यांना ते दृश्य डोळ्यासमोर दिसायचे. या कवितेतील कंचनी तिच्या महालात कशी बसली हे त्यांच्या डोळ्या समोर स्पष्ट दिसत असणार. त्या महालातील झुंबराचे दिवे आणि त्यातील ‘ताठलेली वीज’. एरव्ही दिव्यांची ज्योत हलते तेंव्हा तिच्यात जिवंतपणा असतो. पण इथे ही वीज आता ‘ताठली’ आहे. म्हणजेच मृतवत झाली आहे. ही कंचनी हळूवारपणे पान लावत आहे. हे जे वर्णन आले आहे ते केवळ अप्रतिम.

हळूवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय तें? - गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी

साधतां विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसतां होसि कशी बेभान
चित्रांत रेखितां चित्र बोलले ऐने
कां नीर लोचनी आज तुझ्या ग मैने?

त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग
हालले साधला भावस्वरांचा योग
घमघमे, जोगिया दवांत भिजूनी गाता
पाण्यांत तरंगे अभंग वेडी गाथा

यातील ‘स्वरवेल थरथरे’ ही उपमा लताबाईंच्या आवाजाला नेहमी वापरली गेली आहे. या महालात आरसे बसवले आहेत. त्यामुळे प्रतिबिंब चहुकडे दिसत आहेत. बाकी तर कोणी महालात नाही. सगळ्यांना घालवून देवून ही कंचनी एकटीच बसली आहे. तिची प्रतिमाच तिला प्रश्‍न करत आहेे. गदिमा पटकथाकार असल्याने दृश्या सोबत ते संवादही लिहीत जातात. ही कंचनी तिची कथा आपल्याच शब्दांत सांगते आहे. हे शब्द गीतातून उमटत जातात. आपली जिवीत कहाणी ती संागते आहे. कवितेचा हा पुढचा तुकडा संवादांनी भरलेला आहे. 

मी देह विकुनिया मागुन घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेहि नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळूं तो दबकत नवख्यावाणी.
मम प्रीती जडली आजे तूजवर राणी

नीतिचा उघडला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार
हांसून म्हणाल्ये, ‘‘दाम वाढवा थोडा..
या पुन्हां, पान घ्या... ’’ निघून गेला वेडा

या कंचनीकडे निखळ प्रेमभावना एक तरूण व्यक्त करतो. हीला खुप अनुभव असतो जगाचा. त्यामुळे तिला त्याच्या शब्दांतील भाबडेपणा जाणवतो. ही त्याला व्यवहाराची आठवण करून देते. हीच्याही नकळत त्याच्या कोमल भावनेचा अपमान होतो. त्या भावनेची बूज राखली जात नाही. तो ताडकन निघून जातो आणि मग हीला त्याचे भान येते. आता हळहळ करून काही उपयोग नाही.  

राहिले चुन्याचे बोट थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हां धुंडिते अंतर आता त्याला
तो कशाल येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस हो हिच तिथी ही रात
ही अशीच होत्यें बसले परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां कापित अंधाराला
तो तारा तुटतो- तसा खालती गेला

कवितेचा शेवट मोठा भावूक आहे. आज ही कंचनी रसिकांना महालाबाहेर घालवून एकटी बसली आहे ती हीच तिथी होते. एखादे व्रत पाळावे तसे ती या दिवशी त्याची आठवण जागवते. त्याच्यासाठी विडा घडवून त्याची वाट पहाते. व्रतस्त राहते. ही जी वेदना आहे ती तिच्या गाण्यांतून उमटते. म्हणून ‘वर्षात एकदा असा जोगिया रंगे’ अशी ओळ गदिमांच्या लेखणीतून उतरली. आज गदिमांचे स्मरण आपण करत आहोत. सर्व रसिकांसाठी गदिमांची ही माझी आवडती कविता सादर. या शेवटच्या चार ओळीं भैरवीसारख्या. 

हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षांत एकदा असा जोगिया रंगे. 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment