Monday, December 7, 2020

मूर्ती मालिका -१४


श्रीधर विष्णु
मंदिरांच्या बाह्य भागातील देवकोष्टकांत कोणती देवता आहे त्यावरून आतील मूख्य मूर्तीबाबत अनुमान लावले जाते. ही विष्णुची मूर्ती गुप्तेश्वर मंदिराच्या (धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) दक्षिणेला बाह्य भागातील देवकोष्टकांत स्थित आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात शंख असा क्रम आहे. या विष्णुला श्रीधर असे नामाभिधान आहे. या विष्णुची जी स्त्री शक्ती आहे तीला "मेधा" असे संबोधतात. अशी विष्णुची २४ नावे आणि त्यांच्या २४ शक्ती आहेत. या मूर्तीला मोजकेच पण रेखीव असे दागिने दाखवले आहेत.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
परभणी)



अनंतशयन विष्णु
(मूर्ती व्रताचा ५० वा दिवस म्हणजेच सुवर्ण महोत्सव)
मूर्तीबद्दल सांगण्याआधी नकळत सहज घडलेल्या या व्रताबद्दल सांगतो. घटस्थापनेच्या दिवशी (१७नोव्हेंबर) माझ्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्तीपासून याची सुरवात झाली. नवरात्राप देवीच्या मूर्तींपुरतं ठरवलं होतं. पण दसर्याच्या दूसर्या दिवशी
Sai Chapalgaonkar
ने तिच्या घरच्या पुजेतील व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीचा फोटो पाठवला. मग त्यावर लिहिलं. आणि मग लिहितंच गेलो. पन्नास दिवस लिहायचे ठरवले कारण माझे पन्नासावे वर्ष चालू आहे. ही मी मलाच दिलेली भेट आहे. पुढेही लिहित राहिन पण असं व्रत म्हणून रोजच लिहिन असं नाही. आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आश्चर्यकारक माझ्यासाठी अभूतपूर्व असा राहिला.
सुरवात घरच्या मूर्तीने केली आता शेवटही घराजवळच्या मूर्तीनेच करतो आहे. (उद्या ५१वा दिवस. समापन म्हणजेच काल्याचे किर्तन म्हणतात तसे एका अप्रतिम भव्य मूर्तीवर लिहिणार आहे. या देखण्या मूर्तीने आपण भैरवी करू.)
अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).
उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे. नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत. इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.
उद्या या मूर्ती व्रताचे उद्यापन करूया. आपणा सगळ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मूर्ती संवर्धनाचा जागृतीचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
(अष्टदिक्पाल संदर्भ "भारतीय मूर्तीशास्त्र" या
प्रदीप म्हैसेकर
च्या पुस्तकातून)
(छायाचित्र सौजन्य मल्हारीकांत देशमुख, परभणी)



सर्वांगसुंदर भव्य देखणा शार्ङगधर बालाजी
मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, "मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते."
साडेअकरा फुटाची ही भव्य काळ्या पाषाणातील मूर्ती शिल्पकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आयुधांचा क्रम बघितला तर उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख आहे. विष्णुच्या या रूपाला त्रिविक्रम म्हणतात. पण मेहकरला या मूर्तीला शार्ङगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात.
मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरलेले आहेत. डावीकडून क्रमाने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह या नंतर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. त्या वर वामन अवतार आणि मध्यभागी सर्वात वर शिखरावर विष्णु प्रतिमा आहे. खाली उतरताना दूसर्या बाजूने परशुराम, महेश, राम, बलराम, बौद्ध आणि कल्की अशा दशावतार अधिक ब्रह्मा विष्णु महेश १३ प्रतिमा आहेत.
डाव्या उजव्या बाजूला जय विजय आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला खाली भुदेवी आणि डाव्या बाजूला महालक्ष्मी आहे.
मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकरण याचे वर्णन करावे तितके थोडे आहे. ही मूर्ती ७ डिसेंबर १८८५ रोजी मेहकरच्या एका गढीत खोदकाम करताना सापडली. इंग्रज अधिकार्यांनी रितसर पंचनामा करून मूर्ती इंग्लंडला पाठविण्याचे ठरवले. पण गावकर्यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला. तातडिने तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
आठ वर्षात मंदिराचे बांधकाम लोकांनी पूर्ण केले आणि मग ही मूर्ती तिथे स्थापित केली. उद्या ७ डिसेंबरला मूर्ती सापडली त्या घटनेला १३२ वर्ष पूर्ण होतील. त्या लोकांनी शिकस्त केली म्हणून मूर्ती वाचली. म्हणूनच ही सर्वांगसुंदर मूर्ती आज आपल्या देशात आपल्या डोळ्यासमोर आहे. या मूर्तीचा चांगला फोटो मला भेटू शकला नाही. कदाचित शार्ङगधराचीच इच्छा तूम्ही त्याला प्रत्यक्ष पहावे अशी असेल. मूर्ती व्रताची सांगता करताना माझा आग्रह नव्हे हट्ट आहे. ही मूर्ती एकदा पहाच.
मेहकरचे ज्येष्ठ मराठी कवी ना. घ. देशपांडे यांनी या मूर्तीवर सुंदर काव्य रचले. तिनेच मी या मूर्ती व्रताच्या काल्याच्या किर्तनाचा शेवट करतो.
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शार्ङगधरा
तव चरणाशी लक्ष्मी सुंदर
जय विजयाचे युगूल मनोहर
अवताराची तूझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ।।१।।
तूझे गीत गाते हे मंगल
अविरत निर्मळ गंगेचे जळ
पिउन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ।।२।।
शिखराभवती शुभ्र पाखरे
प्रदक्षिणा करतात तूला रे
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ।।३।।
पडतो मी पण तू वरती धर
व्यथित असा मी तू करूणाकर
हे करूणामय तूझ्यात आहे पूर्णकृपेचा झरा ।।४।।
- ना.घ. देशपांडे
(श्री व्यंकटेश व कालहस्तीश्वर, ले. रा.चिं. ढेरे, प्रकाशक पद्मगंधा)
सर्व वाचकांचे शतश: आभार. मूर्ती व्रत येथे समाप्त झाले. मूर्तींवर वेळोवेळी लिहितच राहिन. मंदिर मूर्ती कोशाचे मोठे काम हाती घेतो आहोत त्यात तूम्हा सर्वांचा सहभाग राहू द्या सहकार्य करा. प्राचीन मंदिरे व मूर्तींचे जतन संवर्धन अभ्यास या चळवळीस सहकार्य करा.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575


No comments:

Post a Comment