Wednesday, September 30, 2020

मुस्लीम महानुभाव संत शहामुनींची दुर्लक्षीत समाधी


उरूस, 30 सप्टेंबर 2020 

भारतीय संस्कृती ही एक खरेच अजब असे मिश्रण आहे. आपला जन्म कुठे/ कुठल्या धर्मात पंथांत होतो हे आपल्या हातात नसते. पण आपली श्रद्धा अभ्यास यातून काही माणसं वेगळाच मार्ग निवडतात. शाहगड (ता. अंबड जि. जालना) येथील महानुभावी संत शहामुनी यांची कथा अशीच काहीशी आहे. 

औरंगाबाद-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी नदीवर प्रचंड मोठा पुल आहे. हा पुल ज्या गावात आहे ते गाव म्हणजे शहागड. नविन झालेल्या पुलाखालून गावात शिरलो की उजव्या बाजूला एक रस्ता सरळ चिंचोळा होत नदीच्या दिशेने जात राहतो. त्याच्या टोकाशी नदीच्या काठावर जूना प्राचीन किल्ला आहे. किल्ल्याचे अगदीच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. एक भव्य पण काहीशी पडझड झालेली कमान आहे. या कमानीतून आत गेलो की भाजलेल्या वीटांच्या कमानी आणि एक दीपमाळ लागते. हे म्हणजे पुराण्या समाधी मंदिराचे अवशेष आहेत. आता नविन बांधलेले एक सभागृह आहे. यातच आहे शाहमुनींची समाधी. यालाच शाह रूस्तूम दर्गा असे पण संबोधले जाते.

लेखाच्या सुरवातीला वापरलेले छायाचित्र त्याच सुंदर कमानीचे आहे. 


शहामुनींनी त्यांच्या सिद्धांतबोध ग्रंथात आपल्या कुळाची माहिती दिली आहे. आपल्या घराण्यात चार पिढ्यांपासून हिंदू देवी देवतांची पुजा अर्चना होत असल्याची माहिती स्वत: शहामुनींनीच लिहून ठेवली आहे. त्यांचे पंणजोबा प्रयाग येथे होते. पत्नी अमिना हीला घेवून ते तेथून उज्जयिनी येथे आले. शहामुनींचे पणजोबा मराठी आणि फारसी भाषेचे तज्ज्ञ होते.  शहामुनींच्या आजोबांचे नाव जनाजी. जनाजी विष्णुभक्त होते. जनाजी हे सिद्धटेक (ता. कर्जत. जि. नगर) येथे स्थलांतरीत झाले. जनाजीच्या मुलाचे नाव मनसिंग. हे मनसिंग म्हणजेच शहामुनींचे वडिल. मनसिंग सिद्धटेकला असल्याने असेल कदाचित पण त्यांना गणेशभक्तीचा छंद लागला. मनसिंगांच्या पत्नीचे नाव अमाई. याच जोडप्याच्या पोटी शके 1670 (इ.स. 1748) मध्ये पेडगांव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे शहामुनींचा जन्म झाला. काशी येथे  मुनींद्रस्वामी यांच्याकडून त्यांना गुरूमंत्र प्राप्त झाला. सातारा जिल्ह्यात त्यांनी सिद्धांतबोध ग्रंथाची रचना केली. यांनी शके 1730 (इ.स.1808) मध्ये शहागडला त्यांनी समाधी घेतली. 

शहाबाबा असे त्यांचे जन्मनाव. त्यांना मुनी ही उपाधी लावली जाते ती संत असल्यामुळे नव्हे. त्यांच्या गुरूंचे नाव मुनींद्रस्वामी होते. म्हणून शहाबाबा यांनी आपल्या नावापुढे मुनी जोडून आपले नाव ‘शाहमुनी’ असे केले. जसे की 'एकाजनार्दनी'. शहामुनींची गुरूपरंपरा त्यांच्याच पुस्तकांत दिल्याप्रमाणे दत्तात्रेय-मुनींद्रस्वामी-शहामुनी अशी सिद्ध  होते.

शहामुनींचे मोठेपण हे की त्यांनी आपल्या मुस्लीम धर्मातील विद्धंसकारी शक्तींची कडक निंदा आपल्या ग्रंथात करून ठेवली आहे. त्याकाळी हे मोठेच धाडस म्हणावे लागेल. आजही सुधारणावादी मुसलमान व्यक्तींना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर त्याला मारूनही टाकले जाते. अशा वेळी शाहमुनी लिहीतात

नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण ।

शुद्रापरीस हीन वर्ण । अविंधवंशी जन्मलो ॥

ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा । म्हणती महाराष्ट्रधर्म खोटा ।

शिवालये मूर्ति भंगिती हटा । देवद्रोही हिंसाचारी ॥

जयांच्या सणाच्या दिवशी । वधिता गो उल्हास मानसी ।

वेदशास्त्र पुराणांसी । हेळसिती उद्धट ॥

ऐसे खाणींत जन्मलो । श्रीकृष्णभक्तीसी लागलो ।

तुम्हां संतांचे पदरी पडलो । अंगीकारावे उचित ॥

शहामुनींची समाधी आज दुर्लक्षीत आहे. खरं तर समाधीचा परिसर हा नदीकाठी अतिशय रम्य असा आहे. प्राचीन किल्ल्याचे अवशेष इथे आहेत. हा सगळा परिसर विकसित झाला पाहिजे. किमान येथील झाडी झुडपे काढून स्वच्छता झाली पाहिजे. प्राचीन सुंदर कमानीची दुरूस्ती झाली पाहिजे. 


शहामुनींचे वंशज असलेली 5 घराणी आजही या परिसरांत नांदत आहेत. या समाधीची देखभाल हीच मंडळी करतात. मुसलमान असूनही हे शहामुनींच्या उपदेशाप्रमाणे मांसाहार न करणे पाळतात. चैत्री पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरते (जयंतीची तिथी चैत्र वद्य अष्टमी आहे). तो उत्सव ही मंडळी साजरा करतात. एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

केवळ ही समाधीच नव्हे तर शहागड परिसरात जून्या मुर्ती आजही सापडतात. जून्या वाड्यांमधून अप्रतिम असे नक्षीकाम केलेले सागवानी खांब आहेत. याच परिसरांत सापडलेली विष्णुची प्राचीन मुर्ती एका साध्या खोलीत ठेवलेली आहे. ओंकारेश्वर मंदिर परिसरांत तर बर्‍याच मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. दोन मुर्ती तर परिसरांत मातीत पडलेल्या आमच्या सोबतच्या फ्रेंच मित्राच्या दृष्टीस पडल्या. दोन जणांनी मिळून त्या उचलून मंदिराच्या भिंतीला लावून ठेवल्या. पाण्याने स्वच्छ धुतल्या. त्यावर रंगांचे डाग पडले आहेत. इतकी आपली अनास्था आहे प्राचीन ठेव्यांबाबत. 

स्थानिक लोकांनी आता पुढाकार घेतला आहे. मुर्तींची स्वच्छता करून मंदिरात आणून ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. शिवाय अजून काही अवशेष सापडले तर नोंद करण्याचे मनावर घेतले आहे. 

शहामुनींचे समाधी स्थळ एक धार्मिक सलोख्याचे विशेष ठिकाण म्हणून विकसित केल्या गेल्या पाहिजे. मंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघातील हे गाव आहे. त्यांनी या प्रकरणांत लक्ष घालावे असे सर्वसामान्य इतिहाप्रेमींच्या वतीने विनंती आम्ही करत आहोत.  

(शहामुनींच्या बाबतीत सविस्तर माहिती रा.चिं.ढेरे यांच्या ‘मुसलमान मराठी संतकवी’ या पुस्तकांत दिली आहे. प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन पुणे.)  (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, September 28, 2020

शाश्‍वत पर्यटन : काळाची गरज


दै. सामना वर्धापन दिन विशेष पुरवणी २७ सप्टेंबर २०२० 

२७ सप्टेंबर  हा जागतिक पर्यटन दिन. कोरोना काळात पूर्वीच्या खुप संकल्पना बदलून गेल्या आहेत. पर्यटनातही आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाश्‍वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ही संकल्पना जास्त करून समोर आली युरोपातून. आपला देश, आपली संस्कृती, चालिरीती, रितीरिवाज, संगीत, खाद्य पदार्थ यांबाबत त्यांना जास्त आस्था राहिलेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात व्यापाराला आणि त्या सोबतच पर्यटनाला विशेष गती मिळाली. या पर्यटनाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे शाश्‍वत पर्यटन. त्यात या स्थानिक मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले जाते. 

कोरोना आपत्तीनंतर भारतात आणि महाराष्ट्रातील पर्यटनाचाही आपण या दृष्टीने वेगळा विचार करू शकतो. आत्तापर्यंत पर्यटन म्हणजे उंची महागडे हॉटेल्स, खाण्यापिण्याची मौजमजा आणि यासोबतच जरा जमले तर बाहेर फिरणे. गोव्या सारख्या प्रदेशाने मौजमजेलाच पर्यटन म्हणा असा गैरसमज पसरवला. पण आता सगळीकडेच पैशाच्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. याचा आघात पर्यटनावरही पडत आहे. मग यातून पर्याय काय? तर शाश्‍वत पर्यटन एक चांगला पर्याय समोर येतो आहे.

1. वेगळी ठिकाणे :

जी अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत त्यांचा विचार आपण बाजूला ठेवू. तसेही त्यांच्याकडे पर्यटक येत असतातच. अतिशय उत्तम पण पर्यटकांना ज्ञात नसलेली स्थळं शोधून पर्यटकांसमोर असे पर्याय ठेवता येतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था मुद्दाम वेगळी न करता आधीच अस्तित्वात असलेल्या घरांमधून शक्य आहे.  ज्या गावांमधून जूने वाडे आहेत त्यांची जराशी डागडुजी करून घेतली तर पर्यटक विशेषत: परदेशी पर्यटक अशा जागी मुद्दाम रहायला जातात. पर्यटन स्थळाजवळ स्थानिक लोकांना हाताशी धरून अशा सोयी करता येणे सहज शक्य आहे. त्यांनाही रोजगार मिळेल, पर्यटकांचे पैसेही कमी खर्च होतील आणि यातून एका वेगळ्या व्यवसायाला चालना मिळेल. 

उदा. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा आपण विचार करू. गौताळा अभयारण्याजवळ अंतुरचा किल्ला आहे. तसेच अजिंठा लेणी जवळ हळदा घाटात वेताळ वाडीचा किल्ला आहे. वाडीच्या किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे. अंतुर किल्ल्यासाठी मुख्य सडकेपासून 6 किमी. कच्या खराब रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी राहण्याची खाण्याची कसलीही व्यवस्था नाही. स्थानिक गावकर्‍यांशी बोलून खाण्यापिण्याची व्यवस्था करता येते. (असा अनुभव आम्ही वाडिच्या किल्ल्या जवळ घेतला आहे. अगदी शेतात बसून जेवण केले आहे.) परदेशी पर्यटक असा अनुभव घेण्यासाठी मुद्दाम तयार असतात. या किल्ल्यांवर साहसी पर्यटकांना चांगली संधी आहे. 

काही अतिशय चांगली मंदिरे दुर्गम ठिकाणी आहेत ज्यांची माहिती लोकांना नाही. काही मंदिरे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यांचीही माहिती होत नाही. पाटणादेवी सारखे ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे. घाटात आहे. तिथे चांगला धबधबा आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा गावात छोट्याशा टेकडीवर त्वरिता देवीचे मंदिर आहे.  हे मंदिर शिवकालीन असून उत्तम दगडी बांधणीचे आहे. टेकडीवर असल्याने येथे निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येतो. तसेच अंबडच्या जवळ जामखेड म्हणून गाव आहे. येथील टेकडीवर असलेले जांबुवंताचे मंदिरही असेच उत्तम पर्यटन स्थळ आहे. अशा कितीतरी जागा महाराष्ट्रभर शोधता येतील. या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तम संधी आहेत. गड किल्ले लेण्या जून्या वास्तू येथे पर्यटनास चालना देणे सहज शक्य आहे. जी ठिकाणं चांगल्या स्थितीत आहेत तेथे पर्यटन वाढू शकते. 

शाश्‍वत पर्यटनातील पहिला मुद्दा येतो तो अशा फारशा परिचित नसलेल्या स्थळांबाबत. शिवाय काही निसर्गरम्य ठिकाणं शोधून तिथेही पर्यटनाला चालना देता येते.

2. स्थानिक अन्न : 

दुसरा मुद्दा यात पुढे येतो तो अन्नाचा. आपण पर्यटकांचा विचार करताना त्यांना जे पदार्थ खायला देतो ते त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे असावेत असा विचार केला जातो. पण स्थानिक जे पदार्थ आहेत, जे अन्नधान्य आहे त्याचा विचार होताना दिसत नाही. आपण जिथे जातो आहोत तेथील धान्य आणि तेथील पदार्थ यांचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांच्या चवी समजून घेतल्या पाहिजेत. नसता कुठेही जावून आपण तंदूर रोटी आणि दाख मखनी पनीरच खाणार असू तर त्याचा काय उपयोग?  बारीपाडा हे गाव महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर धुळे जिल्ह्यात आहे. या गावात दरवर्षी रानभाज्यांची स्पर्धा भरते. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. निसर्ग पर्यटन आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपण जावू शकतो. पर्यटनांत अशा ठिकाणांचाही विचार झाला पाहिजे.

विविध पदार्थ करण्याची पण एक प्रत्येक प्रदेशातील एक पद्धत असते.  तिचा अनुभव घेतला पाहिजे. अशामुळे स्थानिक आचार्‍यांना एक संधी उपलब्ध होते. त्यासाठी बाहेरून माणसे आणायची गरज उरत नाही. अगदी जेवणासाठी त्या त्या भागात मिळणारी केळीची पानं, पळसाच्या पत्रावळी यांचा उपयोग झाला पाहिजे. तोही एक वेगळा अनुभव असतो. हैदराबादी पदार्थात ‘पत्थर का गोश’ म्हणून जो मांसाहारी पदार्थ खाल्ल्या जातो तो खाताना कसे बसावे कसे खावे याचेही नियम आहेत. अशा रितीने पर्यटनाच्या एका वेगळ्या पैलूचा विचार यात केला जातो.

3. लोककला, जत्रा, उत्सव : 

खाण्यापिण्या सोबतच अजून एक मुद्दा शाश्‍वत पर्यटनात येतो. तो म्हणजे त्या त्या प्रदेशातील संगीत, रितीरिवाज, सण समारंभ, जत्रा, उत्सव, उरुस. आपल्याकडे देवस्थानच्या जत्रा असतात. त्यांचा एक विशिष्ट काळ ठरलेला असतो. त्याच काळात तिथे जाण्यात एक वेगळा आनंद असतो. उदा. अंबडच्या मत्स्योदरी मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या दगडी पायर्‍यांवर हजारो दिवे लावले जातात. (मागील वर्षी सात हजार दिवे लावले होते.) हा दिपोत्सव पाहणे एक नयनरम्य सोहळा असतो. काही ठिकाणी रावण दहन केले जाते दसर्‍याच्या दिवशी. त्याही प्रसंगी पूर्व कल्पना दिली तर पर्यटक येवू शकतात. गणपतीच्या काळात नवरात्रीच्या काळात पर्यटनात वाढ झालेली दिसून येते. हा एक वेगळा पैलू आहे. शिवरात्र आणि श्रावणातील सोमवारी बहुतांश महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त जमा होतात. शिवरात्रीला रात्रभर भजन चालते. हे दिवस ओळखून त्या प्रमाणे पर्यटकांच्या सहली आयोजीत करता येतात. 

नवरात्रीत बहुतांश देवी मंदिरांत गर्दी होते. निसर्गरम्य असलेली ठिकाणं निवडुन अशा ज़त्रांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तिथे पर्यटकांना आवर्जून बोलावता येवू शकते. 

काही दर्ग्यांमधून उरूस भरतात. उरूस म्हणजे त्या सुफी संताची पुण्यतिथी. अशा वेळी कव्वाल्यांचा कार्यक्रम आयोजीत केलेला असतो. त्यासाठी पर्यटकांना पूर्वकल्पना असेल तर तेही येवू शकतात. (खुलताबाद येथील दर्ग्यात अशा कव्वालीसाठी आम्ही परदेशी पर्यटकांना घेवून गेलो आहोत. तो अनुभव अतिशय आगळा वेगळा आहे.)

कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. रात्रीची जागरणं अशावेळी केली जातात. त्या जागी काही सांस्कृतिक सांगितीक कार्यक्रम करणे सहज शक्य आहे. अशा निमित्तानेही पर्यटकांना आणता येवू शकते. 

4. पर्यटन वाढीसाठी संगीत महोत्सव/ सांस्कृतिक कला महोत्सव :

ऐतिहासिक वास्तुंच्या परिसरांत संगीत महोत्सव आयोजीत करण्यासाठी शासकिय पातळीवर काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले जायचे. लालफितीच्या कारभारामुळे ते जवळपास सगळे बंद पडले. या शिवाय काही मंदिरे आणि मठ, दर्गे यांच्या संस्था यासाठी सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या परिसरांत संगीत महोत्सव छोट्या प्रमाणात घेणे सहज शक्य आहेे. यामुळे पर्यटनाचा एक वेगळा पैलू समोर येवू शकतो. शाश्‍वत पर्यटनात याचाही विचार केला जातो.

लोककला नृत्य लोकसंगीत यांचा अतिशय चांगला वापर पर्यटनाच्या वाढीसाठी करता येवू शकतो. शिवाय या कलांना प्रोत्साहन देण्याचेही काम यातून होवू शकते. तेलंगणात दलित किन्नरी वादक कलाकारांना शासन स्वत: प्रोत्साहन देवून विविध ठिकाणी पाठवते. त्यांचा कलाविष्कार लोकांच्या समोर यावा म्हणून धडपड करते. अशा काही योजनांतून पर्यटनाला चालना मिळू शकते. 

शाश्‍वत पर्यटनात हस्तकलांचाही विचार केला जातो. हातमागावर कापड विणणारे, हॅण्डमेड कागदवाले, धातूवर कोरिवकाम करणारे (बिदरी कला), मातीची/लाकडाची खेळणी तयार करणारे असे कितीतरी कलाकार आपल्या जवळपास असतात. यात परदेशी पर्यटकांना विशेष रस असतो. समोर बसून चित्र काढून देणारे. किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळी तिथेच बसून त्या जागेचे चित्र काढणारे यांचाही विचार शाश्‍वत पर्यटनांत केला जातो. त्या त्या जागची चित्रे काढून त्याचे प्रदर्शन भरवता येवू शकते. त्या त्या भागातील वस्त्र विणण्याची परंपरा हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. अशा वस्त्रांचे प्रदर्शन भरवता येवू शकते. उदा. पैठणी, हिमरू, महेश्वरी, पाटण पटोला, कांचीपुरम, बालुचेरी, बनारसी इ.इ.

 5. घरगुती राहण्याची व्यवस्था (होम स्टे) : 

  प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी जाताना वाटेत घरगुती राहण्याची खाण्याची व्यवस्था होणार असेल तर बर्‍याच जणांना ते हवे असते.  कोकणात तर मुद्दाम समुद्रकिनार्‍या जवळ घरांत जावून राहणे पर्यटक आजकाल पसंद करत आहेत. कर्नाटकांत हंम्पी हे गांव असे आहे की तिथे एक पन्नास शंभर घरांचे खेडेच संपूर्णत: पर्यटन व्यवसायावर चालते. तुंगभद्रा नदीच्या काठी छोट्या घरांतून लोक राहतात. तिथेच जेवायची चहापाण्याची व्यवस्था केली असते. काही परदेशी पर्यटक तर तिथे केवळ शांततेसाठी येवून राहतात. 

काही दिवसांनी जंगलात, दूरवरच्या खेड्यात, एखाद्या तळ्याच्या काठी जावून आठ दिवस राहणे  हा प्रकारही लोकप्रिय होत चाललेला आपल्याला दिसेल. निसर्गरम्य वातावरण, शांतता, पक्ष्यांचे मधुर आवाज, चुलीवरचे जेवण, जवळपासच्या शेतांत डोंगरात फेरफटका, रात्री खुल्यावर बसून चांदण्याचा आनंद घेणे अशा गोष्टी लोक आवर्जून करताना दिसून येतील. 

6. उपसंहार :

शाश्‍वत पर्यटनांत सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे ती संसाधने आहे ते मनुष्यबळ याचा सुयोग्य उपयोग करून घेण्यावर भर दिला जातो. तेथील लोककलाकार, कारागिर यांचाही विचार यात केला जातो. तिथील जनजिवनाशी जूळवून घेण्यावर भर दिला जातो. अन्यथा इतर वेळी आपण पर्यटक म्हणून आपल्या आवडीनिवडी त्या प्रदेशावर तेथल्या माणसांवर लादत असतो. तेथील निसर्गाची हानी करत असतो. 

कोरोना आपत्तीमधुन एक आर्थिक पेच समोर आला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काटकसरीने सर्व काही करण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी स्थानिकांना संधी, स्थानिक संसाधनांचा वापर यामुळे बचतही होवू शकते व रोजगाराच्या वेगळ्या संधीही निर्माण होवू शकतात. 

याची सुरवात म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या अशा एखाद्या कधी न गेलेल्या थोडेफार माहिती असलेल्या ठिकाणी  गेलं पाहिजे. तेथील अनुभव इतरांना सांगितला पाहिजे. सध्या समाज माध्यमे (सोशल मिडिया) अतिशय प्रभावी पद्धतीनं काम करत आहे. त्यावरून हे अनुभव इतरांना समोर आले तर या पर्यटनाला चालना मिळू शकते. सहजपणे अर्थकारणाला गती येवू शकते.       

(लेखात सुरवातीला वापरलेले छायाचित्र अजिंठा डोंगरातील वाडीच्या किल्ल्यावरील हवा महालाच्या कमानीचे आहे. ता. सिल्लोड जि औरंगाबाद सौजन्य : AKVIN Tourism) 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, September 25, 2020

जागतिक पर्यटन दिनाचे विनम्र ‘चॅलेंज’

  


उरूस, 25 सप्टेंबर 2020 

 समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) विविध चॅलेंज दिली जातात. सध्या कपल चॅलेंज म्हणजेच बायको सोबत फोटो टाकण्याचे चॅलेंज दिल्या गेले आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने (27 सप्टेंबर, रविवार) सर्वांना मी एक विनम्रपणे चॅलेंज देतो आहे. कृपया त्याचा स्विकार करावा. 

सध्या कोरोना आपत्तीमुळे फिरण्यावर बंदी आलेली आहे. अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे बंदच आहेत. गर्दीची ठिकाणं तर टाळायलाच हवी. आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यायला हवी. या सगळ्यांतून व्यवहार्य मार्ग  काढत जागतिक पर्यटन दिन (27 सप्टेंबर) कसा साजरा करावयाचा?

आपल्या आजूबाजूला गावातून बाहेर पडल्यावर अगदी 50 किलोमिटरच्या परिसरांत दूर्लक्षीत असलेली खुप अशी सुंदर ठिकाणं असतात. पण आपलं तिकडे लक्ष गेलेलं नसतं. ही ठिकाणं पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत. यांची फारशी माहिती पण उपलब्ध नसते. स्थानिक पातळीवर थोडीबहुत माहिती कुणाला असते. 

जूनी मंदिरे, गढ्या, भक्कम सागवानी वाडे, काही दुर्लक्षीत दर्गे, मकबरे, धबधबे, नदीचे घाट, दर्‍या, डोंगर  आपल्या परिसरांत आहेत. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने यांना भेटी देवून ते फोटो व माहिती समाज माध्यमांवर टाकण्याचे ‘चॅलेंज’ विनम्रपणे सर्वांसमोर ठेवतो आहे. 

परभणी जवळच्या जाम गावच्या महादेव मंदिराचे उदा. म्हणून समोर ठेवतो. हे मंदिर मुळचे विष्णु किंवा लक्ष्मी मंदिर असावे. अकराव्या शतकातील हे मंदिर अभ्यासकांकडून दुर्लक्षीत राहिले. या मंदिरावरील अप्रतिम शिल्पकाम अजूनही शाबूत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम, गाभारा, सभामंडप सर्वच सुरक्षीत आहे. याची कुठे नोंद नाही. जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने या मंदिराला भेट देता येईल. 

पळशी (ता. पारनेर, जि.नगर) येथील सरदार पळशीकरांचा लाकडावरील अप्रतिम कोरीव काम असलेला वाडा आवर्जून भेट द्यावा असा आहे. समाज माध्यमांवर नुकतेच त्याचे फोटो काही हौशी पर्यटकांनी टाकलेले आहेत. त्यावर एक छोटासा व्हिडिओही आता सर्वत्र फिरत आहे. याच गावांत होळकर काळांतील सुंदर असे विठ्ठल मंदिर आहे. मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी आहे बुरूज आहे. ही ठिकाणं पर्यटकांकडून दुर्लक्षीत राहिलेली आहेत.

औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर औंढा(जि. हिंगोली) येथे आहे. त्याचा सर्वांना परिचय आहे. पण याच औंढ्यापासून हिंगोलीच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला जरासे आत गेल्यावर राजापूर नावाचे गाव आहे. या गावात एका साध्या मंदिरात तीन अप्रतिम अशा मुर्ती ठेवलेल्या आहेत. 


यातील सरस्वतीच्या अप्रतिम मुर्तीचे छायाचित्र (सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर) लेखाच्या सुरवातीला दिले आहे. सरस्वतीच्या हाती एकतारीसारखी दिसणारी वीणा, पुस्तक आहे. मुर्तीच्या मागची प्रभावळ सुंदर आहे. चेहर्‍यावरील शांत सात्विक भाव विलक्षण आहेत. उभी असलेली सरस्वतीची सुडौल मुर्ती सहसा आढळत नाही. सरस्वती बसलेली जास्त करून दाखवलेली असते.

याच मंदिरात ठेवलेली दुसरी मुर्ती ही नरसिंहाची आहे. सहसा दोन प्रकारच्या नरसिंह मुर्ती मंदिरातून पुजल्या जातात. एक असतो तो लक्ष्मी नरसिंह. ज्याला भोग नरसिंह असेही म्हणतात. ज्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असते म्हणून तो लक्ष्मी नरसिंह. या मुर्तीच्या चेहर्‍यावरी भाव प्रसन्न असतात. दुसरा असतो तो उग्र नरसिंह. अर्थातच याच्या चेहर्‍यावरील भाव उग्र असतात. मांडीवर हिरण्यकशपू असून त्याचे पोट नखांनी फाडणारा असा हा उग्र नरसिंह. हळेबिडूच्यामंदिरावर उग्र नरसिंहाची एक अतिशय अप्रतिम मुर्ती आहे. त्यात हिरण्यकशपुचे आतडेही बाहेर आलेले दाखवलेले आहेत. इतके बारकावे शिल्पात अचुकपणे आले आहेत. औंढ्या जवळच्या राजापुरमध्ये असलेली नरसिंह मुर्ती मात्र अतिशय वेगळी आहे. हा योग नरसिंह आहे. अशी सर्वात भव्य नरसिंह मुर्ती हंपीला आहे. मांडी घातलेल्या या नरसिंहाच्या पायांना योगपट्टा वेढलेला आहे. औंढ्याजवळच्या राजापुरी येथील नरसिंह जरा याहून वेगळा आहे. ही मुर्ती अर्धसिद्धासनातील आहे. चेहर्‍यावरील भाव अतिशय शांत आहे.


तिसरी जी मुर्ती आहे ती अतिशय वेगळी दुर्मिळ अशी अर्धनारेश्वराची मुर्ती आहे. शिव पार्वती असे दोन एकाच मुर्तीत दाखविण्यात आले आहे. मुर्तीचे उजवे अर्धे अंग म्हणजे शिव आहे. त्याच्या हातात त्रिशूळ आहे. दुसरे डावीकडचे अर्धे अंग म्हणजे पार्वती आहे. तिच्या हातात नाजूकपणे कलश धरलेला आहे. हा कलश धरतानाच्या तीच्या बोटांचा नाजूकपणा व दुसरीकडे त्रिशुळ धरतानाच्या शिवाच्या बोटांची ताकद यातून या अनामिक शिल्पकाराच्या प्रतिभा दिसून येते. गळ्यात एक सुंदर अशी माळ आहे. पार्वतीच्या बाजूंनी ही माळ वक्ररेषांची असून माळेच्या बाहेर गोल पताका लोंबाव्यात अशी नक्षी आहे. आणि तीच माळ शिवाच्या बाजूने सरळ आणि तिच्यातील मण्यांची रचना ठसठशीत ढोबळ बनून जाते. हे सौंदर्य खरेच अदभूत आहे. (नृसिंह व अर्धनारेश्वर छायाचित्र सौजन्य अनिल स्वामी जिंतूर)

अंबाजोगाईच्या जवळ धर्मापुरी म्हणून गाव आहे. तिथे केदारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पडझड झालेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्व खात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. हे मंदिर आवर्जून पहा. मंदिराच्या बाह्य भागावरील मुर्तीकाम फारच अप्रतिम आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 68 मुर्ती कोरलेल्या आहेत.

नाशिक जवळ सिन्नर मध्ये गोंदेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर आहे. या परिसरांतच काही भग्न मंदिरांचे अवशेष आढळून येतात. नांदूर माधमेश्वर जवळच्या एका अशा मंदिराचे फोटो समाज माध्यमांवर नितीन बोडखे या इतिहास प्रेमी मित्राने टाकले. त्याच्याशी संपर्क साधून मी तेथली माहिती घेतली. आता त्या परिसराला भेट देण्याचे नियोजन केले आहे. 




महाराष्ट्रभर अशी कितीतरी ठिकाणं आहेत जी काहीशी दुर्लक्षीत राहिलेली आहे. नदीचे सुंदर घाट आहेत (कृष्णा नदी वाई). मुदगल येथील पाण्यातील महादेवाचे व गणपतीचे मंदिर पाहण्यासारखे आहे. सध्या गोदावरील पुर आल्याने तिथे जाता येत नाही. मंदिर बुडून जावे इतके पाणी सध्या पात्रातून वहात आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवकालीन कितीतरी ठिकाणं अतिशय उत्तम निगा राखलेली अशी आहेत. पण त्यांची माहिती स्थानिकांशिवाय इतरांना फारशी होत नाही. नगर जिल्ह्यात अकोले गावात गंगाधरेश्वराचे अप्रतिम अगदी संपूर्ण चांगल्या स्थितीतले मंदिर आहे. बडोड्याच्या गायकवाडांचे  कोषाधिकारी पोतनिस  यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराच्या बांधकामाला तेंव्हा इ.स. 1782 मध्ये 4 लाख रूपयांचे खर्च झाल्याची नोंद आहे. याच गावात अतिशय पुरातन असे सिद्धेश्वराचे मंदिर आहे. 

अकोला (विदर्भ) जिल्ह्यात बाळापुर येथे मिर्झा राजे जयसिंह यांची अतिशय देखणी सुबक राजस्थानी शैलीतील छत्री आहे. अमरावती जवळ मातापुरला सात मजली पुरातन बारव आहे. अशी कितीतरी फारशी परिचित नसलेली ठिकाणं सांगता येतील. बरिच ठिकाणं अस्वच्छ बकाल झाली आहेत. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मी विनम्र आवाहन करतो की अशा आपल्या जवळच्या ठिकाणांना भेटी द्या. स्थानिक प्रशासन आणि गावकर्‍यांच्या सहकार्याने तेथे साफसफाई करता आली तर जरूर प्रयत्न करा. या ठिकाणाची माहिती गोळा करा. अशा ठिकाणांचे फोटो व माहिती आपल्या आपल्या प्रोफाईलवर टाका.

27 सप्टेंबरला आपण सर्वांनी जवळपासच्या रम्य पुरातन ठिकाणांना नैसर्गिक सौंदर्य स्थळांना किल्ल्यांना वाड्यांना गढ्यांना भेटी देवून त्याचे फोटो व माहिती सोमवार 28 सप्टेंबर रोजी समाज माध्यमांवर द्यावी अशी विनंती आहे.


मित्रांनो मैत्रिणींनो इतिहास प्रेमींनो कृपया हे ‘चॅलेंज’ स्वीकारा. अगदी फारही दूर जायची गरज नाही. परभणी ला माझा जन्म गेला. पण तिथे क्रांती चौकात टाकळकर कुटूंबियांच्या राम मंदिरात असलेली शेषशायी विष्णुची मुर्ती माझ्या पाहण्यात आली नाही. तिचा उल्लेख बारव स्थापत्यावरील आपल्या ग्रंथात डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी केला तेंव्हाच आमचे डोळे उघडले. कृपया तूम्ही तूमचे डोळे झाकून घेवू नका. आपल्या जवळपासच्या स्थळांबाबत मुर्तींबाबत लिहा. माहिती घ्या. फोटो काढा. संस्कृती जागृती अभियानात सक्रिय व्हा.         

(शेषशायी विष्णू मूर्ती छायाचित्र सौजन्य डॉ. संजय टाकळकर नांदूर मधमेश्वर छायाचित्र सौजन्य नितीन बोडखे)   


      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, September 23, 2020

‘हमी’ भाव म्हणजेच ‘कमी’ भाव!


उरूस, 23 सप्टेंबर 2020 

कृषी विषयक तीन विधेयके संसदेत मंजूर झाली. पण या निमित्ताने जो अभूतपूर्व गोंधळ संसदेत घालण्यात आला तो पाहता विरोधी पक्ष शेतकर्‍यांच्या किती विरोधी आहेत हेच सिद्ध होते. 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी विधेयकांवर दुरूस्ती सुचवलेली आहे. या दुरूस्त्या केल्या गेल्या तरच कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आपला बहिष्कार उठवतील अन्यथा आम्ही संसदेत येणारच नाही असा पवित्रा घेतला आहे. या दूरूस्त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतमालाच्या हमी भावाचा. म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस (एम.एस.पी.) म्हणजेच किमान आधारभूत किंमत. 

बाजार समित्यांसारखेच किमान किंमतीची हमी दिली तर शेतकर्‍याचे भलेच होणार आहे असा बर्‍याच जणांचा भ्रम आहे. हमी भावाच्या खाली खासगी व्यापार्‍यांनी खरेदी करू नये असा कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अगदी सरकारनेही हमी भावानेच खरेदी करावी अशीही मागणी या दुरूस्त्यांत करण्यात आली आहे. 

मुळात हमी भाव म्हणजे काय? सरकार 22 धान्ये/कडधान्याचे दरवर्षी हंगामात भाव जाहिर करते. हे भाव जाहिर केल्यावर त्याची खरेदी सरकारने केली असे कधीही घडले नाही. या भावापेक्षा नेहमीच बाजार खालच्या पातळीवर किंवा त्याच्या आसपास स्थिरावतो. म्हणजे उलट हमी भाव म्हणजे शेतमालाच्या किंमतीवर ठोकलेला खिळाच आहे. याच्या वर किंमत जाणारच नाही याचीच ही ‘हमी’ आहे. तेंव्हा हमी भाव हा वस्तूत: ‘कमी’ भाव आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. 

नेहमी चढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आतोनात उचापती केल्या आहेत. पण भाव जेंव्हा पडतात, माल रस्त्यावर फेकुन द्यायची वेळ येते तेंव्हा शेतकर्‍याला वार्‍यावर सोडून दिलेले आढळून येते. 

उदा. म्हणून 2016 साली डाळीचे भाव आतोनात कोसळले. आधी दोनशे रूपयांच्या पूढे गेलेली तूर डाळ घसरून अगदी 40 रूपयांपर्यंत आली. तेंव्हा शासनाने 55 रूपये हमी भाव जाहिर केला. साहजिकच सरकारने खरेदी करावी म्हणून शेतकर्‍यांनी रांगा लावल्या. या सरकारी खरेदीत किती आणि कसा भ्रष्टाचार झाला ते वेगळे सांगायची गरज नाही. नडलेल्या शेतकर्‍यांकडून व्यापार्‍यांनी राजकीय नेत्यांशी संगमनत करून अगदी 35 रूपये पर्यंत तूर खरेदी केली. हीच तूर त्याच शेतकर्‍याचा सातबारा वापरून सरकारला 55 रूपयांनी विकली. हा मधला 20 रूपयांचा नफा व्यापारी-दलाल-नेते यांच्या  साखळीने खावून टाकला. इतकं होवूनही सरकारी खरेदी संपूर्ण झालीच नाही. म्हणजेच शेतकर्‍याचे तर नुकसान झालेच पण सरकारचा प्रचंड पैसा यात वाया गेला. त्या अर्थाने परत सामान्य जनतेच्या खिशालाच कर रूपाने चाट बसली. 

मग या हमी भावाची गरजच काय? भारत सरकारच नव्हे तर जगातील कुठलेही सरकार आपल्या देशात तयार झालेला सगळा शेतमाल खरेदी करू शकत नाही. व्यापार करणे हे सरकारचे काम नाही. व्यापारावर नियंत्रण ठेवणे हे पण सरकारचे काम नाही. ही व्यवस्था सुरळीत चालावी, त्यासाठी जर काही कर सरकार लावणार असेल तर तो सरकारनी चोखपणे जमा करावा इतकंच सरकारचे काम आहे. 

कॅगने जो अहवाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत दिला होता (इ.स. 2014) त्यात असे स्पष्टपणे नोंदवले होते की 60 टक्के इतके शेतमालाचे व्यवहार नोंदवलेच गेले नाहीत. परिणामी हा सगळा महसुल सरकारचा बुडाला. आणि हे सगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकाधिकार चालू असतानाची गोष्ट आहे. बाजार समितीचे संचालक सुभाष माने यांनीच याविरूद्ध तेंव्हा आवाज उठवला होता. 

गुलाम नबी आझाद यांनी आधी हे सांगावे की ज्यांचे हमी भाव जाहिर केले जात नाहीत त्या शेतमालाचा व्यापार इतकी वर्ष कसा चालू आहे? 

फळे भाजीपाला फुले यांच्या शिवाय इतरही जो शेतमाल आहे त्यांचे सौदे कुठलीही हमी किंमत जाहिर न होता चालू आहे. हे भाव निर्धारण कसे काय होते? तर बाजारात विकणारा आणि विकत घेणारा यांच्या सहमतीने हे होत आलेले आहे. यातही शेतमाल खरेदीसाठी परवाने मोजक्याच लोकांना दिल्या गेल्याने त्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली. यावर तोडगा काढण्यासाठीच नियमन मुक्ती करण्यात आली आहे. बाजार समितीचा एकाधिकार मोडण्यात आला आहे. आता खुल्या बाजारात स्पर्धा निर्माण होवून शेतकर्‍याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.  असे असताना हमी भावाची मागणी कशासाठी? खुला बाजार मागत असताना परत हमी भावाच्या बेड्या कुठला शेतकरी अडकवून घेणार आहे? 

स्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा अशी एक मागणी आपल्या अहवालात केली आहे. आर्थिक दृष्ट्या कुठल्याच पातळीवर ही मांडणी योग्य ठरत नाही. 50 टक्के नफ्याची हमी मिळणार असेल तर जगातील सर्वच उद्योगपती इथेच येतील आणि हाच धंदा करतील.आणि उत्पादन खर्च काढणार कोण? आणि कसा? वातानुकुलीत दालनात बसलेले नोकरशहा उत्पादन खर्च ठरवणार की काय? स्वामीनाथन आयोगाची ही मागणी अव्यवहार्य आणि हास्यास्पद आहे. तुरीची खरेदी हमी भावाने करायची वेळ आली तर सरकारच्या तोंडाला फेस आला. सगळा शेतमाल खरेदी करून त्याचे पैसे द्यायचे म्हटले तर सरकार दिवाळखोर बनून जाईल. आणि जर खासगी व्यापार्‍याला त्याला न परवडणार्‍या दराने खरेदी करायचा आग्रह केला तर तो दुकानदारीच बंद करून टाकेल. मग हे चालणार कसे? स्वामीनाथन आयोगाची शिफारस पुढे रेटणारे मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. त्यांना अर्थशास्त्रातले ‘अ’ही कळत नाही. 

मुळ मागणी ही शेतमाल बाजार मुक्त करण्याची आहे. एकदा मुक्त बाजाराची मागणी केल्यावर परत हमी भाव मागायचा नसतो. आणि तो जाहिर करून काही फायदाही होत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. 

शेतमाला शिवाय इतर जी उत्पादने आहेत ती खुल्या बाजारात सामान्य ग्राहकाला उपलब्ध असतात. त्यांचे व्यापारी ग्राहकाला लूटत असतात का? किंवा उत्पादकाला हा व्यापारी लूटत असतो का? हा बाजार चालतो कसा? साधे उदाहरण मोबाईलचे आहे. एकातरी मोबाईल कंपनीने असा दावा केला आहे का की दुकानदार आम्हाला लुटतो म्हणून शासनाने मोबाईलचे हमी भाव जाहिर करावेत. मोटार सायकलच्या एका तरी उत्पादकाने असा दावा केला की गावोगाव पसरलेली शोरूम्स आहेत त्या आम्हाला लुबाडतात. एखाद्या मोटारसायकलचे भाव अचानक वाढले असे काही कुठे आढळून आले का? औद्योगिक उत्पादनांच्या किंमती बाजारात कशा काय आपोआप स्थिर होतात? 

प्रत्यक्ष शेतीतले उत्पादन नाही पण शेतकर्‍याच्या आवारात तयार होणारी अंडी, कोंबड्या, शेळ्या, बकर्‍या यांच्या भावासाठी कुणी आंदोलन केले आहे का? याचे हमी भाव कधी जाहिर झाले आहेत का? यांचे भाव अचानक वाढले असे कधी घडले का? अंडे तर नाशवंत पदार्थ. पण त्याची खरेदी विक्री वाहतूक साठवणुक सारं सारं सरकारी हस्तक्षेपाशिवाय सुरळीत होत आलेलं आहे. या अंड्यापासून खाद्य पदार्थ तयार करण्याचे छोटे उद्योग कुठेही गाड्यांच्या रूपाने हजारो लाखोंच्या संख्येने उभे राहिले. प्रचंड रोजगार तयार झाला. यासाठी सरकारी नियम करण्याची आवश्यकता निर्माण झाली नाही. अंड्याचे ऑम्लेटचे भुर्जीचे भाव रोखण्यासाठी काही करण्याची गरज अजून तरी निर्माण झालेली नाही. 

हमी भाव प्रत्यक्षात कमी भाव असतात. ही एक बौद्धीक धुळफेक आहे. शेतमालाचा बाजार मुक्त करा इतकीच एक कलमी मागणी शेतकर्‍यांची आहे. शेतकर्‍यांसाठी काहीच करू नका. फक्त शेतकर्‍याच्या छातीवरून उठा हे शरद जोशी म्हणत होते तितकेच झाले तरी सध्या पुरे. बाकी शेतकरी त्याचं तो बघुन घेईल. शरद जोशींची जयंती याच महिन्यात 3 सप्टेंबरला होती. त्याच महिन्यात ही विधेयके मंजूर करून सरकारने शरद जोंशींना विनम्र अभिवादन केले आहे. े      

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, September 21, 2020

उद्ध्वस्त प्राचीन केशव मंदिर (माजलगांव-केसापुरी)!


उरूस, 21 सप्टेंबर 2020 

माजलगांव शहराच्या पश्चिमेला अगदी लागूनच केसापुरी गावात उत्तर बाजूला तळ्याच्या काठी शिवारात जीर्ण मंदिराचे अवशेष दिसून येतात. हे मंदिर आहे अकराव्या शतकांतील एकेकाळी शिल्पसौंदर्यदृष्ट्या अप्रतिम असे प्राचीन केशव मंदिर. मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही आता शिल्लक नाही. जंगली झाडोर्‍याने परिसर वेढला गेला आहे. गुप्तधनाच्या मोहात मंदिरात खोदाखोद केल्याने कोरीव दगडी चिरे ढासळले आहेत.

मंदिराचा मुख्य मंडप अजून बर्‍यापैकी शिल्लक आहे. मंडपाच्या छताला चौरसाकृती चौंकटीत कोरीव दगडांत नरसिंहाची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाच शिव गणेश कार्तिकेय यांच्या मुर्ती आहेत.


 मंदिराच्या बाह्य अंगावर अतिशय सुंदर अशा सुरसुंदरिंच्या मुर्ती होत्या. त्यातील दोन अजूनही शिल्लक आहेत. इतरत्रही कुठे परिसरांत शोध घेतल्यास या मुर्ती विखुरलेल्या मातीत आढळून येतीलही. मंदिराचे कोरीव खांब सुंदर आहेत. सध्या शिल्लक जे खांब आहेत त्यांच्यावरची नक्षी उत्तम अवस्थेत आहे. गाभारा पूर्णत: ढासळलेला आहे. 

बाराव्या शतकात मंदिर शैली विकसित होवून त्रिदल पद्धतीची (तीन गाभारे असलेली) मंदिरे बांधली गेली. लक्षणीय अशी सहा मंदिरे मराठवाड्यात आहेत. केशव मंदिर हे त्यातीलच एक. 


या मंदिरात विष्णुची अतिशय देखणी अशी मूर्ती होती. दीडएकशे वर्षांपूर्वी ही मुर्ती गुराख्यांना सापडली. मुर्ती आता गावातील केशवराज मंदिरात विराजमान आहे. हे मंदिरही अहिल्याबाईंच्या काळातील उत्तम दगडी बांधणीचे भक्कम कमानींचे असे आहे. मुळ मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखा उचलून इथे नव्याने दरवाजाला लावण्यात आल्या आहेत. मुळ मंदिराचे खांबही काही नविन मंदिरात बसवण्यात आले आहेत.  ब्रह्मदेवाचीही एक अतिशय सुरेख मुर्ती विष्णुच्या मुर्तीशेजारीच ठेवण्यात आली आहे. 

महादेव मंदिराच्या गाभार्‍याबाहेर गोमुख असते. त्यातून अभिषेकाचे पाणी बाहेर येते. त्याप्रमाणे विष्णुचे जे अवतार आहेत त्या मंदिरांच्या गाभार्‍यांतून पाणी बाहेर जाण्यासाठी मकर प्रणाली कोरल्या जातात. केसापुरीच्या मंदिराला अतिशय देखणी अशी मकर प्रणाली आहे. ही आता नविन मंदिरात प्रवेशद्वाराजवळच्या ओट्याला बसवली आहे. 


आज केसापुरीचे मुळ केशव मंदिर अतिशय वाईट अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी या परिसरांची दुरूस्ती करण्याची तयारी दर्शविली आहे. नविन मंदिराच्या विश्वस्तांनी सर्व सहकार्य करण्यास हात पुढे केला आहे. 


आता गरज आहे इतिहासप्रेमी, पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक/ विद्यार्थी यांनी पुढे येवून या मंदिराचा जिर्णाद्धार कसा होवू शकतो यासाठी प्रयत्न करण्याची. अशा मंदिरांचा जिर्णाद्धार शास्त्रशुद्ध पद्धतीने होट्टल येथे करण्यात आला आहे. ते एक अतिशय चांगले उदाहरण समोर आहे. विदर्भातील मार्कंडा मंदिराचा जिर्णाद्धार अशाच पद्धतीनं पुरातत्त्व खात्याच्या वतीने चालू आहे. सर्वच कामे पुरातत्त्व विभागाकडून होतील असे नाही. होट्टलचे काम इंटॅक या संस्थेने केले आहे. आता केसापुरीच्या कामासाठी इतर संस्था व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. 

गोदावरी खोर्‍यात विष्णुमुर्ती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मंदिरे पडली आणि मुर्ती मात्र शिल्लक असाही प्रकार दिसून येतो. गोदावरीला काठावरच पार्थपुरी येथे भगवान पुरूषोत्तमाचे म्हणजेच विष्णुचे मंदिर आहे. आता अधिक मासात तिथे मोठी जत्रा भरते. सध्या कोरोनामुळे हे मंदिर बंद आहे.

महाविष्णु शेळगांव (ता. सोनपेठ, जि. परभणी) हे गांवच विष्णुमंदिरामुळे ओळखले जाते. धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर अकराव्या शतकांतील अतिशय महत्त्वाचे असे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी असलेली विष्णुमूर्ती आता गावातच दुसर्‍या मंदिरात विराजमान आहे. सेलू जवळ ढेंगळी पिंपळगांव येथेही हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. आश्वर्य म्हणजे गावातच दुसर्‍या मंदिरात बालाजीची अशीच प्राचीन देखणी मुर्ती आहे. परभणीला वडगल्लीच्या जबरेश्वर महादेव मंदिरात विष्णुच्या दोन प्राचीन मुर्ती नंदीजवळ ठेवलेल्या आहेत.  

गोदावरी काठी गंगाखेड या प्रसिद्ध तीर्थस्थळी बालाजीचे मंदिर आहे. चारठाणा येथील नृसिंह तीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंदिरात नृसिंहाची मुर्ती नाही. ती गावात देवीच्या मंदिरात एका भिंतीवर आढळते.  जिंतूरला नृसिंह मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठी राहेर येथील नृसिंह मंदिर तेराव्या शतकांतील अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पोखर्णी (जि. परभणी) येथे नृसिंह मंदिर आहे.  

खामनदीच्या काठी शेंदूरवादा (ता. बीडकीन जि. औरंगाबाद) येथे शिवकालीन सुंदर विठ्ठल मुर्ती आहे. विठ्ठलाला विष्णुचा अवतार मानला गेला आहे. पानगांव (ता. परळी जि. बीड) येथील विठ्ठल मंदिर अकराव्या शतकांतील प्रसिद्ध असे मंदिर आहे. ही विठ्ठलाची मुर्तीही देखणी आहे.  औंढा नागनाथ या ज्यांतिर्लिंग मंदिरात तळ्यात सापडलेली अप्रतिम अशी विष्णुमूर्ती काचेत ठेवलेली आढळून येते. मराठावाड्यात अशा पद्धतीनं विष्णुमुर्ती आढळून येतात.

पूर्वीच्या काळी आक्रमणाच्या भितीने मंदिरातील मुर्ती तळ्यात विहिरीत लादणींत लपवून ठेवल्या गेल्या. मग कालांतराने भिती ओसरल्यावर संकट टळल्यावर या मंदिरात घडविण्यास सोपी म्हणून महादेवाची पिंड ठेवल्या गेली. अभ्यासकांनी अशी मंदिरे शोधून त्यावरच्या मुर्तींचा अभ्यास करून माहिती लिहून ठेवली आहे. अजून बर्‍याच मंदिरांचा अभ्यास होण्याची गरज आहे. 

मुळात सगळ्यात पहिल्यांदा सामान्य माणसांची प्राचीन मंदिरं- बारवा-लेण्या-गढ्या-किल्ले-दर्गे यांच्याबाबतची अनास्था दूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. मगच हा विषय ऐरणीवर येईल आणि काहीतरी मार्ग सापडेल.(जून्या दर्ग्यांचा मकबर्‍यांचा विषय निघाला की काही जण झटकून टाकतात. याचा आपला काहीच संबंध नाही असे म्हणतात. पण या वास्तू भारतीय परंपरेतील आहेत याचा त्यांना विसर पडतो. मूळात समाधी स्थळे बांधणे आणि त्यांची पूजा करणे ही आपलीच परंपरा आहे). 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संस्कृती जागृती अभियान राबवितो आहोत. तूमच्या परिसरांतील जूनी मंदिरे, मुर्ती, जून्या वास्तू, गढी, वाडे, दर्गे-मकबरे यांची माहिती जरूर कळवा. व्हॉटसअप वर त्याचे फोटो पाठवा. स्थानिक सहकार्य करू इच्छिणार्‍यांची नावेही पाठवा. 

चारठाणा येथे संस्कृती संवर्धनाच्या अभियानात स्थानिक लोकांनी मोठी चळवळ चालवली आहे. त्यांनी एक आदर्श मराठवाड्यात आपल्या कृतीने  समोर ठेवला आहे.याप्रमाणे इतरत्रही काम सुरू झाले पाहिजे.

(या विषयात रस आसणार्‍यांसाठी खाली मंदिरांची यादी परत एकदा देत आहे.)          

(इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील सुंदर मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.8. अन्वा शिव मंदिर ता. भोकरदन जि. जालना.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल मंदिरे 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)

(इ.स. 1200 ते 1300 या काळातील उत्तर यादव कालीन मंदिरे. 1. अमलेश्वर मंदिर 2. सकलेश्वर मंदिर 3. खोलेश्वर मंदिर -तिन्ही मंदिरे अंबाजोगाई येथील 4. नरसिंह मंदिर राहेर जि. नांदेड 5. शिवमंदिर येळूंब जि. बीड 6. नरसिंह मंदिर-चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी (येथे अजूनही 5 मंदिरे आहेत) 7. नागनाथ मंदिर-पाली जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Saturday, September 19, 2020

अन्वा महादेव मंदिर : देखणा शिल्पाविष्कार!

 

उरूस, 19 सप्टेंबर 2020 

अजिंठा डोंगररांगा आणि परिसरांत अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य आहे, कातळात कोरलेल्या लेण्या आहेत. या शिवाय दोन अतिशय प्राचीन अशी मंदिरे आहेत. ही मंदिरे महाराष्ट्राच्या एकुणच मंदिर स्थापत्य शैलीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जातात. यातील जंजाळा किल्ल्या जवळचे अंभईचे वडेश्वर मंदिर हे त्रिदल पद्धतीचे पण त्याची बरीच पडझड झालेली आहे. नविन बांधकाम करताना जून्या बर्‍याच गोष्टी नाहिशा झाल्या. 

पण दूसरे जे मंदिर वडेश्वरापेक्षा प्राचीन आणि अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे अन्वा येथील शिव मंदिर. हे मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इ.स. 1000 ते 1100 या काळातील आठ महत्त्वाची मंदिरे मराठवाड्यात आहेत.    त्यापैकी हे एक अतिशय सुंदर सुबक असा शिल्पाविष्कार असलेले मंदिर.

औरंगाबाद अजिंठा मार्गावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांव वरून डाव्या बाजूला जो रस्ता आत जातो त्याच रस्त्यावर 8 कि.मी. अंतरावरील अन्वा गावात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरांची अतिशच चांगली बांधबंदिस्ती दुरूस्ती पुरातत्व खात्याने केली आहे. मंदिराची संरक्षक भिंत उभारल्या गेली आहे. संपूर्ण परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. मंदिराचीही डागडुजी करण्यात आली आहे. मंदिराला लोखंडी खांबांचा आधार देवून पुढील पडझड होण्यापासून वाचवले आहे. 


हे मंदिर उत्तर चालूक्यांच्या काळातील आहे. याला लागूनच भोकरदन ही एकेकाळची राष्ट्रकुटाची राजधानी असलेले गाव आहे. राष्ट्रकुटांची सत्ता लयाला गेल्यावर या परिसरावर उत्तर चालुक्यांची सत्ता होती. त्या काळातील हे मंदिर आहे.

अन्व्याच्या तूल्यबळ त्याकाळातील फारच थोडी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. बदलापुर अंबरनाथचे शिवमंदिर, कोल्हापूरजवळील खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर शिवाय विदर्भातील काही मंदिरे या काळातील आहेत.

अतिशय देखणे असे कोरीव स्तंभ हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पाच सहा फुटी उंच पीठावर हे मंदिर विराजमान आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याला दक्षिण आणि उत्तर दिशेनेही पायर्‍या आहेत. तिन्ही बाजूच्या पायर्‍यांवरून आपण प्रदक्षिणापथावर येतो. पण मंदिरात प्रवेश मात्र फक्त पूर्व दिशेनेच ठेवलेला आहे. 

एक दोन नाही तर तब्बल 50 कोरीव देखण्या स्तंभावर हे मंदिर तोलल्या गेलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय सुंदर नाजूक असे मुर्तीकाम केलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूच्या शक्ती रूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मुर्ती. अशा मुर्ती फारशा कुठे आढळून आल्याची नोंद नाही. विष्णूची शंख, चक्र, गदा व पद्म ही चारही चिन्हे या मुर्तींच्या चार हातात आहेत. त्या स्त्रीरूपात दाखविल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या नाहीत. यांना विष्णूची शक्ती असे संबोधले गेलीे आहे. 


गर्भगृहाचे द्वार अतिशय कोरीव कामगिरीने नटलेले आहे. एकानंतर एक अशा चार द्वारशाखा या ठिकाणी आढळून येतात. गर्भगृहात मध्यावर महादेवाची पिंड आहे. 

मंदिराच्या मंडप छताला मध्यभागी अर्धवट उमलते खाली लोबलेले फुल कोरलेले आहे. त्याच्या भोवती आठ दिशांना म्हणून आठ फुले कोरलेली आहेत. ही सर्व रचना एक चौरस दगडी चौकटीत  बसवलेली आहे. मंडपाच्या जमिनीवर वर्तूळाकार असे उंचावलेले पीठ आहे. त्यावर नंदी बसवलेला आहे. तिन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे आहेत. खांबांची रचना अशी आहे की कुठेही बसले तरी सभामंडपाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो. एकही खांब मध्ये येत नाही. यावर हा अंदाज लावता येतो की या ठिकाणी नृत्य, संगीत सेवा अर्पण केली जात असावी. आणि त्यासाठी गर्भगृहाची दिशा सोडून इतर तिनही ठिकाणी लोक बसून त्याचा आनंद घेत असावेत.


भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत.  

मंदिराच्या बाह्यभागात गजलक्ष्मी आणि नृसिंह शिल्पे देवकोष्टकांत बसवलेली आहे. ती खुप देखणी आहेत. मंदिराच्या  बाह्य भागात हंसपट्टीका, सिंहपट्टीका आढळून येतात. 

अन्व्याच्या मंदिराचा परिसर आता स्वच्छ करण्यात आला आहे. पण मंदिर संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरांत मात्र घाण बकालीचा अनुभव येतो. ग्रामपंचायतीने याची जबाबदारी घेवून मंदिरालगतचा भाग स्वच्छ चांगला केला तर मंदिराचे सौंदर्य वाढेल. पर्यटकांना इथपर्यंत आणता येईल पण परिसराची बकाली पाहून तो परत येण्याची शक्यता नाही.

हे मंदिर पूर्वी विष्णुचे अथवा लक्ष्मीचे असावे असा अंदाज बाहेरील शिल्पांवरून वर्तवल्या जातो. पण अर्थात हा अभ्यासकांचा विषय आहे. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्पसौंदर्य पाहून तो विस्मयचकित होतो. एक हजार वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मकदृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकामातून मिळतो.

हा प्राचीन वारसा फार महत्त्वाचा आहे. आपल्या अगदी जवळच हे ठिकाण आहे. किमान एकदा तरी हे मंदिर नजरेखालून घातले पाहिजे.   

(अन्व्या शिवायची इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील महत्वाची सुंदस मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल पद्धतीची मंदिर शैली विकसित झाली. अशी सहा मंदिरे मरावाड्यात आहेत. 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).  

(फोटो सौजन्य AKVIN tourism)  

  

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Friday, September 18, 2020

खालीद उमर - कायद्याने तोडली कमर!


उरूस, 18 सप्टेंबर 2020 

शर्जिल इमाम याच्यावर गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकण्यात आले तेंव्हा मी शिर्षक दिले होते, ‘शर्जिल इमाम-कायद्याने केले काम तमाम’. काही दिवसांत असाच मथळा परत वापरायची वेळ येईल याची  खात्री होतीच. यावेळी पाळी आली आहे उमर खालीदची. 

तुकडे तुकडे गँगचा पोस्टर बॉय असलेला उमर खालीद कधी ना कधी तपास यंत्रणेच्या हाती लागणार यात काही शंकाच नव्हती. त्याला पूर्वीही अटक झाली होती. तेंव्हा जामिन मिळाला. सुटका झाली. पण त्याच्या पुढील काळातील कारवाया पाहात हा परत अडकणार हे स्पष्ट दिसतच होते. 

1960 नंतर भारतात दोन प्रकारची आंदोलने भारतीय लोकशाहीला आतून पोखरून टाकत होती. एक होता नक्षलबारी गावातून सुरू झालेला नक्षलवाद. आणि दुसरा होता पाकिस्तान प्रेरीत कश्मीरमुद्द्यावरून सुरू झालेला इस्लामी आतंकवाद. या दोन्हीवर विविध मार्गांनी सतत कारवाया झाल्या आहेत. त्या अपुर्‍या होत्या किंवा कायद्यातील पळवाटा त्यांना वाचवत होत्या, डावे पुरोगामी बुद्धीवंत त्यांना पाठिंबा देत होते, कायदेतज्ज्ञ असलेली वकिल मंडळी त्यांना न्यायालयात सोडवत होती. माध्यमांतून डावी विचारसरणी आणि कश्मीरमधील फुटीर यांना मोठी सहानुभूती मिळत होती. 

उमर खालीद हा दिल्ली दंग्यांमध्ये, शाहिन बाग आंदोलन हिंसक बनविण्यात सहभागी होता याचे सकृतदर्शनी पुरावे समोर आले आहेत. आणि त्यांच्याच आधारावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दिल्ली दंग्यांचा सुत्रधार ‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन, आणि दुसरा आरोपी खालीद सैफी यांच्यातील दूवा उमर खालीद होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारतात येतील तेंव्हा भारतात अस्वस्थता निर्माण करण्याचा एक डाव होता. हे समोर आलं आहे. 

या विषयाला वेगळं वळण देण्यासाठी म्हणून हिंदू मुसलमान किंवा भाजप संघ विरूद्ध इतर असे सांगितल्या जाते. खरं तर नक्षलवाद आणि इस्लामिक विविध गटांच्या कारवाया यांचा इतिहास वर सांगितल्याप्रमाणे किमान पन्नास वर्षांचा आहे. त्यात कुठले एक सरकार आणि कुठली एक विचारसरणी यांच्यावर टीका करून मुळ प्रश्‍न सुटणार नाही. 

मोदी पंतप्रधान होण्या अगोदर सर्वच सरकारांनी हा धोका ओळखला होता पण त्यावर कडक कारवायी करण्याचे टाळले होते. पोलिस यंत्रणा न्यायालयात होणार्‍या निर्णयांनी हतबल झाली होती. कायदेतज्ज्ञ म्हणवून घेणारे अशा गुन्हेगारांना लिलया सोडवून आणत होते. 

दुसरीकडून सरकार नावाची यंत्रणा पोलिसांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवत होती. म्हणजे तेच अधिकारी, तेच पोलिस, त्यांचे तेच खबरे पण यांनी नक्षलवाद व इस्लामिक आतंकवादी संघटना यांच्यावर केलेल्या कारवाया फलद्रूप होताना दिसत नव्हत्या. 

मोदी पंतप्रधान झाल्यापासून या दोन्ही बाबत एक निश्चित कडक धोरण ठरविण्यात आले. आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली जावी अशा सुचना सर्व यंत्रणांना मिळाल्या. याचाच परिणाम म्हणून आता या अटका होताना दिसत आहेत. 

उमर खालीदला अटक झाली त्या सोबतच दूसरी एक अतिशय मोलाची बाब घडत आहे. सर्वसामान्य जनतेतून यांना असलेली मान्यता/ पाठिंबा संपून जाताना आढळून येतो आहे. जे पत्रकार यांच्यावर आधी स्तूती सुमने उधळत होते तेच आता यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्या बाबतचे छोटे मोठे पुरावे समोर आणत आहेत. समाज माध्यमांनी एक मोठी ताकद सिद्ध केली आहे. शर्जिल इमामची वक्तव्ये, फोटो तसेच आता उमर खालीदचे व्हिडिओही समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यातील जे निखालस खोटे आहेत ते बाजूला ठेवू. पण जी वक्तव्यं खरंच त्यांनी केली आहेत त्यांचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झाल्याने यांच्याबाबत समाजमन विरोधात जाताना दिसून येते आहे.

कायदा त्याचे काम करतो आहे पण सोबतच समाजमाध्यमांची ही भूमिका पण याला फार पोषक राहिली आहे. 

तिसरी आघाडी आता डाव्या विचारवंतांच्या बाबतीत उभी राहिलेली दिसून येते आहे. अगदी आत्ता आत्तापर्यंत खोट्या गोष्टी अगदी रेटून नेलेल्या आपल्याला दिसून येतील. पण कायद्याने केलेली कारवाई, समाजमाध्यमांची भूमिका यामुळे या डाव्या पुरोगामी विचारवंतांना आता उमर खालीद, शेहला राशीद, शर्जिल इमाम, जिग्नेश मेवाणी यांच्या देशविरोधी चुक भूमिकांचे समर्थन करणे अवघड होवून बसले आहे. तात्काळ यावर प्रचंड अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. 

न्यायालयात जेंव्हा निकाल लागायचा तेंव्हा लागो पण समाजमाध्यमांवर उथळपणे काम करणारे वगळले तर गंभीर पण खुप लोक आहेत. ते या खोटेपणाचा बुरखा लगेच फाडत आहेत. 

राम मंदिर प्रकरणात  मस्जिदीखाली सापडलेल्या अवशेषांवरून पुरोगाम्यांची वाचाच बंद झाली. रोमिला थापर व इरफान हबीब सारख्यांनी जो खोटा प्रचार चालवला होता त्याला लगेच चाप बसवला गेला. हे करण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. वैचारिक खोटा प्रचार हाणून पाडल्या जातो आहे. 

अटक झालेल्या सफुरा झरगर, शर्जिल इमाम, देवांगना कालिता, नताशा नरवाल या नावांत आता उमर खालीद हे नाव पण सामील झाले आहे. लवकरच कन्हैया कुमारचे पण नाव यात येण्याची शक्यता आहे. 

संविधान बचाव म्हणत संविधान न मानणाऱ्यांच्या आता कायद्याने मुसक्या आवळ्या चालल्या आहेत. आता यांना पाठिंबा देणारी फळी मोडून काढण्याची गरज आहे.  हे कामही होताना दिसून येते आहे. हा लोकशाहीसाठी शुभशकून आहे.   

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Thursday, September 17, 2020

स्वामीजी आम्हाला माफ करूच नका.. !


उरूस, 17 सप्टेंबर 2020 

 आदरणीय स्वामीजी सा.न.

स्वामीजी आज 17 सप्टेंबर. तूमच्या नावाने आणि हैदराबाद मुक्ती संग्रमाच्या नावाने गळे काढण्याचा सार्वजनिक कार्यक्रम आज मोठ्या उत्साहाने साजरा होतो. शासकीय सुट्टी आता मराठवाडा आणि चंद्रपुरचा राजूरा तालूका या प्रदेशात मंजूर झाली आहे. कागदोपत्री 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे यांच्या बरोबरीनेच या दिवसाचे महत्त्व आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात क्रांती चौकात प्रचंड मोठा ध्वजस्तंभ उभारला आहे. ही जागा म्हणजेच 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या क्रांतीकारकांना फासावर चढवले ती जागा. याला काला चबुतरा म्हणतात. त्याची आठवण म्हणून झाशीच्या राणीचा पुतळा इथे बसवला होता. 

2017 मध्ये स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकशाही सरकारला अचानक जाग आली आणि हे स्मारक आधुनिक करण्याच्या नावाखाली काम सुरू झाले. प्रचंड उंच झेंडा इथे उत्साहात उभारला गेला. जवळपास अडीच करोड रूपये यावर खर्च झाला. आता अगदीच महत्त्वाची असलेली कामे म्हणजे बांधकाम, रंगरंगोटी, बागबगीचा, जागेचे रक्षण करण्यासाठी पहारेकरी,  प्रकाश योजना यावर निधी खर्च झाला. तरी आम्ही आमच्याकडून झाशीची राणी आणि तूमच्या पुतळ्यासाठी छान ग्रॅनाईटमध्ये चौथरे उभारूनही ठेवले. 

पूर्वीच्या उद्यानातील झाशीच्या राणीचा पुतळा होताच. तो बसवून टाकला. पूर्वीच्या उद्यानात तूमचा पुतळा नव्हता त्याला आम्ही तरी काय करणार? नसता तो पण बसवून टाकला असता. बरं ज्यांनी या स्मारकासाठी देणग्या दिल्या त्यांनी सगळ्यांनी पैसेच दिले. पुतळा कोणीच दिला नाही. मग मला सांगा स्वामीजी पुतळा कसा आणायचा? 

4 नोव्हेंबर 2017 मध्ये या स्मरकाचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आता याला 3 वर्षे उलटून गेली आहेत. पण या काळात तूमचा पुतळा बसवणे शक्य झाले नाही. आहो शासनाच्या मागे खुप कामे आहेत. इतके किरकोळ काम इतक्या लवकर कसे शक्य आहे. तेंव्हा तूम्ही समजून घ्या स्वामीजी. 

तसेही स्वामीजी तूम्ही भगवे वस्त्र धारण केलेले संन्यासी. तूम्ही नि:संग होता. मग पुतळ्याची तरी काय गरज ? असे आम्हाला वाटले. 

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्‍न पेटला होता. त्याला विरोध करणारे सर्व तूमचेच शिष्य. त्यातील पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ तेवढे 1994 मध्ये हयात होते. मग यावर तडजोड म्हणून मराठवाड्याची शैक्षणीक फाळणी केल्या गेली. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद हे जिल्हे औरंगाबादमध्ये  तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठांत ठेवल्या गेले. आणि विद्यापीठाचा नामविस्तार (नामांतर नाही) केल्या गेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली विरोध करण्यांर्‍यांना शांत करण्यासाठी नांदेड येथे नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांसाठी नविन विद्यापीठ स्थापन झाले. त्याला नाव देण्यात आले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. अशा प्रकारे स्वामीजी तडजोडीचा एक भाग म्हणून तूमच्या नावाने विद्यापीठ स्थापन झाले. बोली भाषेत या दोन्ही विद्यापीठांना बामु आणि रामु अशी नावे आहेत हा भाग वेगळा. 

तर स्वामीजी तूमच्या नावाने विद्यापीठ आहे ना. मग परत आता पुतळा कशाला पाहिजे आहे?  तसाही तूमचा आणि  औरंगाबादचा काय संबंध? तूम्ही भलेही इथे खासदार म्हणून निवडुन आला असाल. पण हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी तूम्ही पुढे आलात आणि राजधानीचे ठिकाण म्हणून तूम्ही मुख्यालय बनवले ते हैदराबाद येथेच. शिवाय तूमचे निधनही हैदराबाद येथेच झाले ना. मग औरंगाबादला तूमचा पुतळा कशाला पाहिजे? तूम्ही मुळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे. तेंव्हा तिथे फार तर तूमचे पुतळे वगैरे ठिक आहे.

तूम्ही खासदार होतात तेंव्हा तूमच्या खासदार निधीतून स्वत:च्या पुतळ्यासाठी निधीपण तूम्ही राखून ठेवला नाही (तेंव्हा खासदार निधी नव्हता असे सांगू नका. ते आम्हालाही माहित आहे). आता याला आम्ही काय करणार? 

तूम्ही ज्यांच्या विरोधात लढलात तोच सातवा निजाम उस्मान अली पाशा हैदराबाद राज्याचा प्रमुख म्हणजेच राज्यपाल बनवला गेला. तूमच्या विरोधातील जे राजकीय नेते होते त्यांचे पुढारी बी. रामकिशनराव यांनाच हैदराबाद राज्याचा मुख्यमंत्री केल्या गेले. तूम्ही खासदार होता पण तूम्हाला नेहरूंच्या मंत्रीमंडळात घेतल्या गेले नाही. तेंव्हा तूम्हीच सांगा स्वामीजी तूमचा पुतळा कसा काय बसवायचा? 

22 जानेवारी 1972 ला तूमचे निधन झाले तेंव्हा तूमची अंत्ययात्रा निघाली होती हैदराबादला. तूम्ही रहात होत्या त्या बेगम पेठेतील गल्लीमधून निघालेल्या या अंत्ययात्रेत किती माणसं होती स्वामीजी? फक्त पंधराशे ते दोन हजार. आहो अशावेळी ट्रकांमधून माणसे आणावी लागतात. जागजागी फलक लावावे लागतात. ‘स्वामीजी अमर रहे’ असे पोस्टर छापून घ्यावे लागतात. वर्तमानपत्रांतून पुरवण्या छापून आणाव्या लागतात. हे तूम्ही काहीच केले नाही.

तूम्ही ज्याच्या विरोधात लढलात तो सातवा निजाम उस्मान अली पाशा त्याचे निधन झाले तेंव्हा किती लोकं होते बघितले का? लाखभर लोक त्याच्या जनाजात शरीक झाले होते. आजही त्याला मानणार्‍या पक्षाचे दोन खासदार असदुद्दीन ओवैसी हैदराबाद आणि इम्तीयाज जलील औरंगाबाद येथून निवडून आलेले आहेत. तूम्हाला मानणारे कोण आहे सांगा तरी एकदा?

तेंव्हा स्वामीजी (तूमचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर होते हे खुप जणांना माहितच नाही. माहित करूनही काय करणार म्हणा). पुतळ्याचे काही आम्हाला सांगू नका. 

कागदोपत्री म्हणाल तर कॉ. मुरूगप्पा खुमसे (रेणापुर. जि. लातूर) यांनी उच्च न्यायालयात तूमचा पुतळा बसविण्यासाठी याचिका दाखल केली होती. तेंव्हाचे विभागीय आयुक्त यांनी न्यायालयात पुतळा बसवू असे आश्वासन दिले. याचिका मागे घेण्यात आली. आता विषय संपला ना स्वामीजी. शासन म्हणाले आहे बसवु तेंव्हा बसवु कधीतरी. त्यात काय एवढे.    

आपले मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मा. अशोकराव चव्हाण हे मराठवाड्याचे भूमीपुत्र. यांनीही आश्वासन दिले पुतळा बसवू. एक पुतळा सिद्धार्थ उद्यानात कापडात गुंडाळून पडून आहे ना. आता नियमच असे आहेत की नाही लवकर बसवता येत पुतळा. गोविंदभाई श्रॉफ यांचा पुतळा पैठणगेटला बसवला आहेच ना. ते तूमचेच शिष्य. मग परत तुमच्या पुतळ्याची गरजच काय स्वामीजी? भाईंचा पुतळा उत्तम पाचारणे यांनी तयार केला. भाईंच्या पुतळ्याचे बील काढण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वित्तविभागात ‘भाईचारा’ दाखवत कोणाला किती ‘चारा’ खावू घालावा लागला हे सगळे तूम्हाला कळाले असेलच ना. मग परत आता तुमच्या पुतळ्याच्या निमित्ताने झंझट कशाला? 

तेंव्हा स्वामीजी आम्हाला माफ करूच नका. खरं कारण म्हणजे आमची काहीच चुक नाही. तूम्हीच तूमच्या खासदार निधीतून सोय करायला पाहिजे होती. तूम्ही मंत्री मुख्यमंत्री झाला असता तर काही झाले असते. शिवाय तूमचे पोरंबाळं असले असते तर त्यांनीही बापासाठी मरमर करून पुतळे उभारण्याची काही सोय सत्ता मिळताच केली असती. शासकीय निधीतून बापाची जन्मशताब्दि पुतळे स्मारके हे सारे करता येते. तेही तूम्ही केलं नाही. तूम्ही संन्याशी. 

पत्राच्या खाली तूमचाच म्हणून सही करण्याची पद्धत असते. पण आम्ही तूमचे नाहीतच स्वामीजी तेंव्हा तूमचा म्हणून सही तरी कशी करू? स्वामीजी नशिब तूमच्या नावाचा चौथरा तरी आहे. तेवढे तरी भाग्य कोणाच्या वाट्याला येते? 

तूमचे नसलेले आम्ही सर्व !

 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Tuesday, September 15, 2020

वेताळवाडी : अजिंठा डोंगरातील एक दुर्लक्षीत किल्ला !



उरूस, 15 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगर रांगांतील रूद्रेश्वर लेणी, जंजाळा किल्ला व घटोत्कच लेणी यांवर मी याच सदरात लिहीले होते. त्याच मालिकेतील हा पुढचा लेख. संपूर्ण तटबंदी आणि दोन भव्य दरवाजे शाबूत असलेला अजिंठा डोंगर रांगेतील किल्ला म्हणजेच वेताळवाडीचा किल्ला. औरंगाबाद अजिंठा रस्त्यावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांवपासून डाव्या बाजूला एक  रस्ता फुटतो. हा रस्ता उंडणगाव मार्गे सोयगांवला जातो. याच रस्त्यावर हळदा घाटात तीन्ही दिशेने डोंगर रांगांनी वेढलेला असा हा वाडीचा किल्ला.  


किल्ल्याची संपूर्ण तटबंदी लांबूनच दिसते आणि त्याची भव्यता लक्षात येते. भोवताली डोंगर रांगा आणि मध्यभागी मोदक ठेवावा असा एक डोंगर. लांबट आकारात पसरलेला भव्य भक्कम बुरूज पहिल्यांदा आपले लक्ष वेधून घेतो. यादव राजा भिल्लम याच्या काळातील हा किल्ला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. किल्ल्यावर एक तोफ पण सापडलेली आहे. तिच्यावरची चिन्हे आणि दरवाज्यावरची चिन्हे यांवरून किल्ला यादव काळातील असल्याची पुष्टी मिळते. 

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूजांच्या त्रिकोणी रचनेतून तयार झालेले आहे. त्याची रचना इतकी अवघड आहे की शत्रूला सहजा सहजी मुख्यद्वार सापडू नये. हल्ला करण्यासाठी दरवाजा समोर जराही जागा मोकळी सोडलेली नाही. परिणामी या दरवाजासमोर शरण गेल्याशिवाय कुणाला त्यातून प्रवेशच मिळू शकत नाही. 


किल्ल्याचे प्रवेशद्वार, अगदी त्याला लागूनच असलेले द्वारपालाचे दालन, मुख्य बुरूजावर टेहेळणीसाठी बांधलेली झरोके झरोके असलेली माडी. या गॅलरीवजा सज्जाच्या कमानीतून समोरचे डोंगर आणि त्याच्या पायाशी असलेले तळे हे दृश्य मोठे कलात्मक दिसते.

किल्ल्याच्या प्रवेशद्वार आणि परिसराची डागडुजी पुरातत्त्व खात्याकडून चांगल्या प्रकारे करण्यात आलेली दिसून येते आहे. किल्ल्यावर सापडलेली एक मोठी लोखंडी तोफ लाकडी गाड्यावर बुरूजावर मांडून ठेवली आहे. किल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याची दुसरी तटबंदी लागते. ही संपूर्ण नसली तरी बर्‍याच जागी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्या एका महालाचा बुरूज पडक्या अवस्थेत आहे.


किल्ल्यावर धान्य साठवणुकीचे दोन भव्य दालनं चांगल्या अवस्थेतील आहेत. शिवाय एक अतिशय देखणे असे दगडी चिर्‍यांचे अष्टकोनी बांधीव तळे आहे. त्याच्या एका बाजूला पूर्वेला तोंड करून ‘जलमहाल’ आहे. याच्या तीन भिंती शिल्लक आहेत. दगडांवरील सुंदर कोरीव काम कोण्या एके काळी हा महाल अतिशय रसिकतेने उभारलेला असावा याची साक्ष देतात.

या किल्ल्यावरील सर्वात देखणी आणि सुंदर जागा म्हणजे उत्तर टोकावर असलेल्या हवामहलच्या शिल्लक चार कमानी. मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणार्‍या डोंगरकड्यावरील टोकाचा बिंदू म्हणजे ही जागा. एकेकाळी सुंदर असा हवामहल या ठिकाणी होता. त्याची पडझड होवून महालाच्या चार कमानी आणि दोन भिंतीच आता शिल्लक आहेत. या कमानींमधून दूरवर पसरलेला खानदेशचा परिसर, सर्वत्र पसरेली शेते, जागजागी पाणी साठून तयार झालेली सुंदर तळी असे मोठे नयनरम्य दृश्य दिसून येते. याच किल्ल्याच्या डाव्या अंगाला सोयगाव धरणाचा पाणीसाठा डोळ्याचे पारणे फेडतो. किल्ल्याच्या उजव्या अंगाला प्रसिद्ध अशी रूद्रेश्वर लेणी आणि धबधबा आहे. 


अजिंठा डोंगराची नैसर्गिक अशी भव्य संरक्षक भिंत औरंगाबाद आणि जळगांवला विभागते. तेंव्हा या डोंगराच्या कड्यांवर चार किल्ले बांधल्या गेले आहेत. त्यांची रचना टेहेळणीचे संरक्षक किल्ले अशी असावी. हे चार किल्ले म्हणजे वाडिचा किल्ला, त्याच्या बाजूचा जंजाळ्याचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला आणि गवताळा अभयारण्या जवळचा अंतुरचा किल्ला. वाडीच्या किल्ल्यावरून जवळचा जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणीचा डोंगर दिसतो.  

वाडीच्या किल्यावर हवामहलच्या बाजूने खाली उतरल्यास किल्ल्याचा उत्तरेकडचा म्हणजेच सोयगावच्या दिशेचा दरवाजा आढळतो.  दरवाजापासून आतपर्यंत डाव्या बाजूला ओवर्‍या ओवर्‍यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून येते. कदाचित हा भाग किल्ल्यावरील बाजारपेठेसारखा असावा. उत्तरेकडील दरवाजापासून डाव्या हाताने तटबंदीला लागून चालत गेले तर आपण परत दक्षिणेकडील मुख्य दरवाजापाशी येतो.

वाडिच्या किल्ल्याजवळ डोंगरात उजव्या बाजूच्या (पूर्वेकडील) डोंगरात काही रिकाम्या लेण्या आहेत. हा परिसर अजिंठा लेणीच्या कालखंडात लेणी कोरण्यासाठी तपासला गेला होता. दगडा हवा तसा सापडला नाही म्हणून ही लेणी सोडून दिलेली दिसते. हौशी पर्यटकांसाठी अशा झाडांत लपलेल्या लेण्यांचा शोध घेणे हे एक आव्हान असते. 

वाडिचा किल्ला जून ते डिसेंबर काळात एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकते. किल्ल्यावरील माजलेली झाडी, झुडपे काढणे, हवामहल ते उत्तर दरवाजापर्यंत जाणारी चांगली पायवाट तयार करणे, मुख्य तटबंदीला लागून पर्यटकांना फिरण्यासाठी उत्तम पायवाट तयार करणे आवश्यक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जशी डागडुजी झाली आहे तशीच किल्ल्यावरील इतर भग्न अवशेषांची व्हायला हवी. 

जंजाळा किल्ला, घटोत्कच लेणी, वाडीचा किल्ला, रूद्रेश्वर लेणी, रूद्रेश्वर धबधबा, वडेश्वर महादेव मंदिर, मुर्डेश्वर देवस्थान असा हा अगदी एकमेकांच्या जवळ असलेला परिसर. औरंगाबादेहून पहाटे निघून जंगलात एक दिवसाचा मुक्काम (तशी चांगली सोय उंडणगावात व जवळच गणेशवाडीत उपलब्ध आहे) केल्यास दोन दिवसात सर्वच ठिकाणं पाहणं शक्य होते.

जळगांव कडून सोयगांव मार्गे आल्यास तर हा परिसर अजूनच जवळ आहे. अगदी अर्ध्याच अंतरावर आहे.

पर्यटनाचा एक वेगळा विचार पंतप्रधान मोदींनी मांडला आहे. प्रत्येक भारतीयाने वर्षातून किमान एकदा देशांतर्गत पर्यटनासाठी गेले पाहिजे. कोरोना काळात जास्त खर्चिक पर्यटन करण्यापेक्षा आपल्या जवळच्या अशा स्थळांना भेटी दिल्यास हा उद्देश सफल होईल.

या प्रदेशात हौशी पर्यटकांसोबतच अभ्यासक विद्यार्थी आल्यास त्यांच्याकडून इतिहासातील अजून काही लपलेल्या बाबींवर प्रकाश पडू शकतो.

(छायाचित्र सौजन्य -ऍक्वीन टूरिझम)  

 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, September 14, 2020

घटोत्कच लेणीचा सुंदर निसर्ग आणि आपली अनास्था !


उरूस, 14 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगराचा परिसर विलक्षण अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. इथल्या दगडाचा दर्जा पारखून दोन हजार वर्षांपूर्वीपासून इथे लेणी कोरल्या गेली आहेत. अजिंठा लेणी सर्वपरिचित आहे पण याशिवाय त्याच काळातील किंवा त्यापूर्वीचीही काही लेणी या डोंगरात आहेत. पितळखोरा लेणी तर अजिंठ्याच्या आधीची आहे. 

सिल्लोड तालूक्यात हळदा घाटात वाडीचा किल्ला आणि रूद्रेश्वर लेणी आहे. याच किल्ल्याच्या बाजूला दुसर्‍या घाटात आहे ऐतिहासिक जंजाळा किल्ला (याला वैश्यगड किंवा तलतमचा किल्लाही म्हणतात). याच किल्ल्यासमोरच्या दरीत घटोत्कच लेणी आहे. नितांत सुंदर अशा दाट जंगलाने हा परिसर वेढलेला आहे. जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी याच्या मध्ये दरीत आजूबाजूच्या शेत शिवारातून वाहत येणारे पाणी धबधबा बनून कोसळते. कोसळते म्हणण्यापेक्षा वहात येते असं म्हणणं जास्त संयुक्तीक आहे. हिंदीत ‘झरना’ असा जो शब्द आहे तो याला नेमका लागू पडतो. 


जून्या मोगल वास्तूंमध्ये दगडांवरून वहात जाणार्‍या पाण्याची कारंज्याजवळ रचना केलेली असते. तशीच रचना या अनोख्या धबधब्याची आहे. उंचावरून तिरक्या असलेल्या दगडावरून हे पाणी खळाळत येते. अन्य जागी उंच कड्यांवरून पाणी खाली झेप घेते. इथे अतिश वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी दगड रचना असल्याने या झर्‍याचे सौंदर्य वेगळेच जाणवते. (औरंगाबाद परिसरांत बिबीचा मकबरा, सोनेरी महाल, औरंगजेबाचा राजवाडा किलेअर्क, हिमायत बाग, विद्यापीठातील सलाबत खानाचा मकबरा अशा कितीतरी ठिकाणी दगडांवरून पाणी वाहण्याची सुंदर रचना केलेली आढळून येते.)

घटोत्कच लेणीला जायला मुळात रस्ताच नाही. अक्षरश: शेत शिवारांतून वाट काढत जावे लागते. स्थानिक माणसाच्या मदतीशिवाय लेणीचा रस्ता शोधणे अवघडच आहे. पुरातत्त्व खात्याने अगदी अशात प्रत्यक्ष लेणीपर्यंत डोंगरमाथ्यापासून नीट पायर्‍या खोदल्या आहेत. लेणीजवळही एक ओहोळ परत आडवा येतो. तो ओलांडून पाय पाण्यात भिजवूनच लेणीला जाता येते. लेणीजवळ पुरातत्त्व खात्याने माहितीचा फलक लावला आहे. एक रक्षक तिथे नेमला आहे जो की कधीच हजर नसतो.

महायान पंथातील ही पहिली लेणी आहे. वाकाटकांच्या काळातील ही लेणी अजिंठा लेणीला समकालीन अशी आहे. लेणीत एकच दालन आहे. वीस सुंदर भव्य खांबांवर एक मोठे सभागृह आहे. त्याच्या एका बाजूला बुद्धाची भव्य अशी धम्मचक्र परिवर्तन मुर्ती आहे. लेणीत फारसे कोरीव काम दिसून येत नाही. कदाचीत त्या काळात काढलेली चित्रे नष्ट झाली असावीत. ब्राह्मी भाषेतील एक शिलालेख लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे. लेणी समोर प्रशस्त अशी जागा मोकळी सोडलेली आहे. लेणीला दोन खिडक्या आहेत. आतल्या अंधारातून बाहेर प्रवेशद्वार आणि खिडक्यांकडे पाहिल्यास खांबांमधून मोठे सुंदर चित्र दिसते. 


लेणी समोरची दरी पावसाळ्यात दगडावरून वाहणार्‍या पाण्याच्या आणि मोरांच्या आवाजाने भरून गेलेली असते. लेणीच्या अगदी समोर जंजाळा किल्ल्याचे अवशेष दिसतात किल्ल्याचा एक दरवाजा या दरीत उतरण्यासाठी आहे. तोच किल्ल्याचा दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. तटबंदीचे थोडे अवशेष, दिल्ली दरवाजा, किल्ल्यावरील महाल आणि एक पडकी मस्जिद असे फारच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत.

हा सगळा परिसर विलक्षण सुंदर आहे. सागाच्या हिरव्या गर्द वनराईने सगळा डोंगर भरून गेलेला आहे. घटोत्कच लेणी समोरच डोंगरात अजून लेणी कोरल्याच्या खुणा दाट झाडीतून डोकावताना दिसतात. ही लेणी रिकामी असून तिथे फारसे कोरीव काम नाही अशी माहिती स्थानिक हौशी गाईड अक्रम भाई यांनी दिली. 

हा परिसर हौशी पर्यटकांना आकर्षण ठरावा असाच आहे. पण याची किमान माहितीही पर्यटकांना होत नाही. अगदी गावात गेल्यावरही लेणीकडे जाणारा रस्ता सापडत नाही. आता गावामधून जाणार्‍या सिमेेंट रस्त्याचे काम चालू आहे. पण मार्गात येणार्‍या शेतकर्‍यांनी रस्ता आडवून ठेवला आहे. 

ऐतिहासिक पुराण वास्तूंबाबत आपली अनास्था जागजागी दिसून येते. दोन हजार वर्षांपूर्वीचा सुंदर वारसा जवळ आहे आणि त्याकडे जाणारा साधा रस्ता आपण आजतागायत बांधू शकलो नाही याची अत्यंत खंत वाटते. लेणीच्या शोधात आमच्यासोबत असलेला फ्रेंच मित्र व्हिन्सेंट वाटेत शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून कॅमेर्‍यासह पडला. एक भारतीय म्हणून आणि त्याचा मित्र म्हणून मला विलक्षण शरम वाटली. कुणीतरी आपला ऐतिहासिक दिव्य वारसा आपली वास्तूकला आपली शिल्पं आपल्या परंपरा यांचा शोध घेत धडपडत आहे आणि आपण किमान सोयीही पुरवू शकत नाही ही फारच शोकांतिका आहे. 

बरं केवळ या लेणीसाठी रस्ता करायला पाहिजे असेही नाही. अगदी लेणीच्या जवळ जंजाळा या गावातील लोकांसाठीही याची गरज आहे. भराडीपासून अंभईपर्यंत किंवा उंडणगावपासून अंभईपर्यंत बर्‍यापैकी रस्ता आहे. तिथपासून जंजाळ्यापर्यंत चांगला रस्ता करणे हे केवळ लेणीच नाही तर येथील लोकसंख्येसाठीही आवश्यक आहे.

याच वाटेवर अंभई जवळ वडेश्वराचे पुरातन महादेव मंदिर आहे. तेही पुरातत्त्व खात्याने नोंदीकृत केले आहे. त्या ऐतिहासिक वास्तुसाठीही रस्ता गरजेचा आहे.  

प्रत्यक्ष लेणी आणि त्या परिसरांतील घाण, आतमध्ये मोकाट जनावरे शिरून त्यांनी टाकलेले शेणाचे पोवटे, वटवाघळांनी केेलेली घाण या तर अजून वेगळ्या बाबी. पण इथपर्यंत येण्यासाठी आपण किमान वाटही करू शकत नाही याला काय म्हणावे? बारमाही रस्ते ही बाब महत्त्वाची आहे. मग याचा उपयोग करून इथे बाहेरचे लोक येवू शकतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकते. चलनवलन वाढू शकते. आणि त्यामुळे त्या भागातील अर्थकारणाला गती येवू शकते. पण आपण याचा विचार करत नाही. 

आम्हाला वाट दाखविणारे अक्रम भाई हौसेने आलेल्या पर्यटकांना लेणी दाखवतात, किल्ला दाखवतात, डोंगरावर फिरून आणतात. त्यांच्याच छोट्याश्या झोपडीवजा घरामसोर बसून चहाची खाण्याची व्यवस्था कुणी सांगितले तर ते करतात.  ही सामान्य माणसे आणि व्हिन्सेंट सारखे परदेशी पर्यटक/अभ्यासक विनातक्रार हे सर्व करत आहेत. आणि ज्यांच्या हातात निर्णयाचे अधिकार आहेत, सत्ता आहे ते मख्ख बसून आहेत. 

केवळ सरकारच नव्हे तर त्या त्या परिसरांतील लोकांची अनास्था पण याला कारणीभूत आहे. किमान स्वच्छता, किमान सोयी स्थानिक स्वराज्य संस्था करू शकते. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करू शकते. 


अजिंठा डोंगराचा दिडदोनशे किलोमिटरचा पट्टा हा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या परिसरांत अभयारण्ये, लेण्या, मंदिरे, किल्ले दर्‍या डोंगर धबधबे असे पर्यटनाचे विविध पैलू उपलब्ध आहेत. सर्व परिसरांत अग्रक्रमाने बारमाही चांगले पक्के रस्ते पहिल्यांदा निर्माण करण्याची गरज आहे. नुसतं या परिसरांत फिरले तरी आनंदाची अनुभूती सामान्य पर्यटकांना होवू शकते. आधी आपण आपल्या मनातील अनास्थेवर मात करू. मग स्थानिक प्रतिनिधींवर दडपण आणू. आणि मग राज्य व केंद्र सरकारवर दबाव तयार करून हा परिसर विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करूया. परत कुणी व्हिन्सेंट सारखा परदेशी हौशी पर्यटक/अभ्यासक रस्ता नाही म्हणून शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून पडला असे व्हायला नको.      

(फोटो सौजन्य अॅक्विन टूरीझम, या भागातील भटकंतीसाठी मला छोट्या भावासारख्या असलेल्या नीलेश महाजनचे विशेष धन्यवाद)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

Thursday, September 10, 2020

कायद्याच्या भोवर्‍यात आरक्षणाची नाव !


उरूस, 10 सप्टेंबर 2020 

 मराठा आरक्षणाची नाव सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवाहात कायद्याच्या भोवर्‍यात जावून अडकून पडणार आहे याची सर्वांनाच कल्पना होती. पण कुणी तसे कबुल करत नव्हते. केवळ मराठा आरक्षणच नव्हे तर भारतातील विविध राज्यांमध्ये आरक्षणासाठी शेतकरी जातींनी आंदोलने केली आणि अशा आरक्षणाची मागणी पुढे आली. या पूर्वीही विविध कारणाने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण विविध राज्यांनी दिले होते. विशेषत: तामिळनाडूचे उदाहरण सर्वच जण देत होते. तिथे तर आरक्षण 69 टक्क्यांचा टप्पा पार करून गेले होते.

आरक्षणाचे समर्थन करणारे कुणीही हे सामान्य जनतेला सांगत नव्हते की आजतागायत 50 टक्क्यांवरचे कुठलेच आरक्षण सर्वौच्च न्यायालयात टिकले नाही. आजही विविध प्रकरणे तिथे प्रलंबित आहेत. केवळ त्यांचा निकाल लागलेला नव्हता याचा फायदा घेत सर्वच या विषयातील सत्य लपवत होते. 

हा विषय केवळ मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही. भारतभरच्या आरक्षण विषयक विविध खटल्यांना एकत्रित करून हे सर्व खटले सर्वौच्च न्यायालयाच्या पूर्णपीठा समोर आणावे लागणार आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून निर्णय द्यावा लागणार आहे. सर्वच दावे खारीज होतील हे तर स्पष्टच दिसत आहे. पण तसं कबुल करण्याची कुणाचीही तयारी नाही. स्वत:ला मागास म्हणविणार्‍या जातींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाणच जर 80 टक्के इतके प्रचंड होत असेल तर या सर्वच मांडणीत काहीतरी वैचारिक गोंधळ आहे किंवा जाणीवपूर्वक तसा गोंधळ घातला जातोय हे स्पष्ट आहे. 

या विषयातील तज्ज्ञ किचकट भाषेत लिहीत बोलत असतात. पण समान्य जनतेसाठी काही मुद्दे अतिशय स्पष्ट आहेत. ते सोपेपणाने समोर ठेवले पाहिजेत. 

पहिली गोष्ट म्हणजे सर्वच जनता मागास असेल तर त्यांना सर्वांना आरक्षण देणे याला काहीच अर्थ नाही. मागासपणाची व्याख्या ही तूलनेत केलेली असते. दोन समाजांची आपसात तुलना करून मागासपण ठरवले जाते. या दोघांची इतर कुणा परदेशी समुहाशी तुलना करून मागासपणाचे निकष ठरवले तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. महाराष्ट्राचा विचार केल्यास मराठ्यांची स्थिती खराब आहे पण कुणाशी तुलना करून? ही स्थिती सामाजिक राजकीय सांस्कृतिक पातळीवर खराब आहे का? इतिहासात खराब होती का? या सगळ्यांची प्रमाणिक उत्तरे आपली आपल्यालाच द्यावी लागणार आहेत. वेगळा राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करून स्वत:ला मागास घोषित करून हा प्रश्‍न सुटू शकत नाही.

दुसरी बाब म्हणजे आरक्षण हा आर्थिक मागासपणा दुर करण्याचा उपाय नाही हे घटनेत स्पष्टपणे म्हटलेले आहे. असं असताना वारंवार आर्थिक मागासलेपणाचे दाखले देत आरक्षणाची मागणी काय म्हणून करण्यात येते आहे? मराठाच कशाला बाकी सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीही 10 टक्के आरक्षण द्या अशी विचित्र मागणी सतत केली जात आहे. यात मुळातच एक बुद्धीभेद आहे हे समजून घ्या. कुठलीही आर्थिक विषमता दूर करण्याचे साधन म्हणजे आरक्षण नव्हे हे एकदा स्वच्छपणे समजून घेतले तर या प्रश्‍नावर जो बौद्धिक गोंधळ घातला जातो आणि त्याला भले भले बळी पडतात ते पडणार नाही. (मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासाठी शेतीमालाचे सरकारी धोरणाने केलेले शोषण जबाबदार आहे. पण तो स्वतंत्र विषय आहे.) आर्थिक विषमता दूर करण्याचे उपाय वेगळे आहेत.

तिसरी बाब म्हणजे आरक्षण कुणालाही वैयक्तिक कारणांसाठी दिले जात नाही. एखादा समाज शतकानुशतके मागास राहिला आहे. त्याला जी सामाजिक राजकीय सांस्कृतिक कारणे आहेत ती ओळखून त्यावर उपाय म्हणून प्रतिकात्मकरित्या केलेली कृती म्हणजे आरक्षण. ज्या व्यक्तीला हे आरक्षण मिळते तेंव्हा ते त्याला वैयक्तिक पातळीवर दिल्या गेले नसते. त्याने त्याचा उपयोग करून आपल्या समाजाला वर आणाणे अपेक्षीत असते. मागास समाजातील अशा व्यक्ती त्या समाजातील सर्व घटकांपर्यंत लाभ पोचविण्याचे एक माध्यम समजले गेले आहे. त्यामुळे त्याची वागणुक तशी अपेक्षीत आहे. हे विसरून नालायक असताना ‘त्याला’ मिळाले असून आणि लायक असून ‘मला’ मिळाले नाही असा जो एक बाळबोध वाद घातला जातो त्यामागची बुद्धीहीनता समजून घेतली पाहिजे. 

आजपर्यंत आरक्षणाचे लाभ मूळात कुणाला आणि किती मिळाले हे एकदा नीट समजून घ्या. सवर्ण असो की दलित की इतर मागास वर्गीय (ओबीसी) एकूण लोकसंख्येच्या केवळ अडीच टक्के इतकीच लोकसंख्या सरकारी नौकरीत सध्या आहे. भारतातील एकूण सरकारी नोकरांची संख्या 2 कोटी 72 लाख इतकी आहे. यांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांची संख्या मोजली तर ती साधारणत: 10 कोटी इतकी भरते. म्हणजे ज्या आरक्षणासाठी आणि त्यामुळे मिळणार्‍या सरकारी नौकरीसाठी ही मारामारी चालली आहे तिचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभार्थी आहेत केवळ दहा बारा कोटी. मग उर्वरीत 120 कोटी लोकांचे काय? एका माणसाला मिळू शकणार्‍या लाभासाठी लाखो रस्त्यावर का उतरत आहेत? कशासाठी एकमेकांची डोकी फोडली जात आहेत? गेली 72 वर्षे सरकारी नौकर्‍यात संख्येने किती वाढ झाली? 

जगभरात सरकारी यंत्रणेवरील खर्चात कपात कशी आणि किती करता येईल हे कसोशीने पाहिले जात आहे. त्यावर उपाय शोधले जात आहेत. मुळात सरकार म्हणजे प्रचंड अशा जनसमुदायाने आपसांतील व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून तयार केलेली यंत्रणा आहे. ही यंत्रणा मुळात स्वत: संपत्तीचे निर्माण करत नाही. सामान्य माणसांनी आपल्या बुद्धीमत्तेने प्रतिभेने मेहनतीने संपत्तीचे निर्माण केलेले असते. यातील एक छोटा वाटा ही सगळी व्यवस्था चालविण्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेवर खर्च केला जातो. आता हीच अनुत्पादक अशी यंत्रणा जास्त मग्रूर बलशाली आणि शोषण करणारी बनत गेली तर तो समाज सुदृढ बनणार कसा? 

आपल्याकडे सरकारी नौकरी म्हणजे सर्वस्व बनले आहे. कारण या सरकारी नौकर्‍यांना दिले गेलेले अनावश्यक संरक्षण. इतर सामान्य लोकांना मिळणार्‍या पगारापेक्षा जास्त मिळणारी रक्कम सोयी सवलती. म्हणून मग कुणीही उठते आणि सर्वकाही सरकारने करावे म्हणून आंदोलन करते. त्यासाठी रस्त्यावर उतरते. राजकारणीही या मानसिकतेचा फायदा उचलत अशी आंदोलने पेटवतात. हे आपण कधी समजून घेणार आहोत? 

आरक्षणाने प्रश्‍न सुटू शकत नाहीत. मुळात दलित, आदिवासी आणि भटक्यांपुरता आरक्षण हा एक प्रतिक म्हणून योजलेला उपाय आहे. त्याचीही परिणामकारकता हवी तेवढी सिद्ध झालेली नाही. दलित आरक्षणांतही आता विविध जातींना वेगळे करून त्यांचे स्वतंत्र गट करावेत अशी एक याचिका सर्वौच्च न्यायालयात विचारार्थ आली आहे. कारण सर्वच दलित जातींपर्यंत आरक्षणाचे लाभ पोचलेले दिसत नाहीत.

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने असे विविध मुद्दे समोर आले आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर मराठा समाजाचे हित शेतमालाच्या भावात जास्त सामावलेले आहे. आरक्षणात नाही. आरक्षण ही दिशाभूल आहे. शेतकरी संघटनेने एक घोषणा अगदी सुरवातीलाच दिली होती. ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है’ तेंव्हा आरक्षणासाठी शक्ती खर्च न करता शेतमालाच्या भावासाठी केली तर मराठा समाजचे जास्त भले होईल.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

Tuesday, September 8, 2020

नीमा तेन्जिंग : भारतासाठी शहिद झालेला तिबेटी !


उरूस, 8 सप्टेंबर 2020 

 लेह-लदाख मध्ये चीनची लष्करी धुसफुस चालूच आहे. 29 ऑगस्टच्या रात्री पेन्गॉंग त्से तळ्याजवळ मोठी चकमक उडाली. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला पिटाळून लावले. यात तिबेटी सैनिकांच्या एस.एफ.एफ. (स्पेशल फ्रंटियर फोर्स) तुकडीने मोठी कमाल केली. या तुकडीचा अधिकारी नीमा तेन्जिंग याचा पाय चीनने पेरलेल्या भूसुरूंगावर पडला. त्यावेळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात हा तिबेटी अधिकारी भयानक जखमी झाला. आठ दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिल्यानंतर शनिवारी उपचार चालू असताना त्याचे निधन झाले. 

नीमा यांचा अंत्यविधी संपूर्ण शासकिय इतमामात लेहमध्ये करण्यात आला. यावेळी हजारो तिबेटी निर्वासित तिथे गोळा झाले होते. शोकाकुल अवस्थेत त्यांनी आपल्या या वीराला अखेरचा निरोप दिला. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या.

तिबेटी सैनिक भारतासाठी कसे काय लढत आहेत? असा प्रश्‍न कुणाही भारतीयाला पडू शकतो. चीनने जबरदस्ती तिबेटवर ताबा मिळवल्यावर तिबेटींचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह भारताता आश्रय मागितला. या सर्व शरणागतांना आपण हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे राहण्यास जागा दिली. दलाई लामांसोबत त्यांचे असंख्य तिबेटी अनुयायी तेंव्हा भारतात आले. आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याची त्यांनी शपथ घेतली. महात्मा गौतम बुद्धाच्या वास्तव्याने पावन झालेली भारत भूमी त्यांच्यासाठी अतीव श्रद्धेचा विषय आहे. आपल्याला आश्रय देणार्‍या आणि आपल्यासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या या भारतमातेसाठी हे तिबेटी अगदी जीवही द्यायला तयार आहेत. नीमा तेन्जिंग यांच्या वीर मरणाने हे परत एकदा सिद्ध केले आहे. 

1971 च्या बांग्लादेश युद्धाच्यावेळेस आणि 1999 च्या कारगीलच्या युद्धाच्या वेळेसे या सैनिकांनी आपले शौर्य दाखवले होते. आताही आघाडीवर जावून ते संघर्ष करत आहेत. 

नीमा यांच्या वीर मरणाने भारतात राहून चीनचे गोडवे गाणार्‍यांच्या तोंडावर चांगलीच चपराक दिली आहे. तिबेटी निर्वासित सैन्यात भरती होवून भारतासाठी कडवा संघर्ष करत आहेत. हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात लढत आहेत. आणि हे भारतात सुरक्षीत राहून नागरि स्वातंत्र्याचे सगळे फायदे उपटून चीनचे गोडवे गात आहेत. 

हिमालयाच्या बर्फाळ डोंगररांगांत विरळ हवेत मुळात वावरणेच मुश्किल. त्यात युद्ध करणे तर अजूनच कठिण. चीनी सैनिकांसमोर हीच मोठी अडचण आहे. भारतीय सैन्यात लेह लदाखचे निवासी, गुरखा आणि तिबेटी असे अतिशय काटक कष्टाळू आणि  या वातावरणाला सरावलेल्या लोकांची मोठी भरती आहे. यांना तोंड देता देता चिनी सैनिकांच्या नाकीनऊ येत आहेत. आत्तापर्यंत युद्धाच्या नुसत्या धमक्या देवून भागत होते. या भागात जसे चीनने मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं केली. पुल बांधले. हेलीपॅड तयार केले. तसे भारताने फारसे केले नव्हते. तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांनी लोकसभेत 2013 मध्ये सीमेवर रस्ते न बांधण्याचे आपले धोरणच असल्याचे जाहिर केले होते. 

पण गेल्या काही वर्षांत विशेषत: मोदी सरकारच्या कारकिर्दीत या धोरणात मोठे बदल करण्यात आले. सीमेवर फार मोठ्या प्रमाणावर रस्ते पुल धावपट्ट्या हेलीपॅड यांची कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे सैन्याची वाहतूक, शस्त्रांची वाहतूक आधीपेक्षा सुकर झाली आहे. आणि या जोडीला आहे तो तिबेटी गुरखा सैनिकांचा चिवटपणा त्यांचा अदम्य असा उत्साह त्यांची अखंड लढाऊ उर्जा. शिवाय पाठीशी दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांचा संपूर्ण पाठिंबा.  चीनविरोधी हे असे  ‘डेडली कॉम्बीनेशन’ पूर्वी कधी जूळून आले नव्हते. 

आश्चर्य म्हणजे या नीमा तेन्जिंग यांच्याबद्दल बोलायला भारतातील डावी माध्यमं तयार नाहीत. आपण चालवत असलेल्या खोट्या विचारसरणीचा धडधडीत पराभव होताना दिसत आहे. मग ते कशाला तोंडातून ब्र काढतील.

भाजप नेते राम माधव हे नीमा यांच्या अंत्यविधीला हजर राहिले होते. त्यांनी त्या संदर्भात एक ट्विटही केले. पण नंतर लगेच हे ट्विट काढून टाकण्यात आले. कदाचित राजकीय धोरणाचा भाग म्हणून ही खेळी खेळली गेली असावी. पण यातून एक खणखणीत संदेश चीनला दिला गेला आहे. तिबेटचा प्रश्‍न चीनसाठी ‘गलेकी हड्डी’ बनला आहे. शेकडो वर्षे ज्यू आपल्या मायभूमीसाठी लढत राहिले. आणि शेवटी त्यांनी आपली मायभूमी स्वतंत्र करून दाखवली. याच धर्तीवर आता तिबेटी आपल्या मायभुमीसाठी लढत आहेत. भारताचा यासाठी नेहमीच नैतिक पाठिंबा राहिलेला आहे. 

पण आधीच्या सरकारांनी नेहमीच तिबेटबाबत बोटचेपे धोरण अवलंबिले. एकीकडून दलाई लामांना आसरा देणे आणि दुसरीकडून चीनने डोळे वटारताच शांत बसणे असला भारताचा विचित्रपणा जगाने पाहिला. पण आता चीनविरोधी एक कणखर असे धोरण आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती समोर येते आहे. 

पहिल्यांदाच चीनची भयंकर अशी कोंडी या विषयावर झाली आहे. कश्मीरचा अक्साई प्रदेश चीनने बळकावला होता त्यावर दादागिरी करणे हेच आत्तापर्यंत चीनला सोयीचे होते. पण आता प्रत्यक्ष चीनच्या तिबेटमधील जनता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. भारतात राहणारे तिबेटी प्रत्यक्ष रणांगणावर आपल्याच विरोधात समोर पाहून चीनी सैन्याची पाचावर धारण बसली आहे. केवळ शत्रूशी लढाई एक वेळ ठीक होती. पण आपलेचे नागरिक आपल्याच विरोधात असल्यावर करायचे काय? हा पेच आहे. 

दुसरीकडे तैवान मधील वातावरण पेटले आहे. नुकतेच चीनचे एक लढाउ विमान तैवानने पाडले. हॉंगकॉंग प्रश्‍नी तेथील चीनी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.  दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन आरमार उतरले आहे. रशियन सीमेवर वाद नहेमीच चालू असतो. गलवान खोर्‍यातील चकमकीनंतर रशियाने उघडपणे भारताची बाजू घेतली आहे. कोरोना महामारीमुळे आपले प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तेंव्हा त्याची भरपाई चीनने द्यावी असे दावे जर्मनी इटली फ्रांस या युरोपीय देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लावले आहेत. 

त्यामुळे चीन सर्वच बाजूंनी घेरल्या गेला आहे. तिबेटी सैनिकांनी चीनविरूद्ध एल्गार पुकारून शेवटचा घाव घालण्याचे काम केले आहे. चुकून माकून चीनने युद्धाचा निर्णय घेतलाच तर तिबेटी सैनिक भारताच्या बाजूने प्रचंड त्वेषाने लढतील आणि या निमित्ताने आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याची स्वप्न पुर्ण करतील याची शक्यता जास्त आहे.  याच धामधुमीत तैवान, हॉंगकॉंगही आपले स्वातंत्र्य प्राप्त करतील. हीच चीनला भिती आहे.  

भारतासाठी लढलेल्या नीमा तेन्जिंग या तिबेटी वीरला यांना विनम्र श्रद्धांजली. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

Saturday, September 5, 2020

कलेचा संस्कार करणारी ‘आमची शाळा’ !



उरूस, 5 सप्टेंबर 2020 

 बाल विद्या मंदिर, परभणी या शाळेत 1978 पासून ते 1986 पर्यंत मी शिकलो. आज लक्षात येते आहे की ज्ञानासोबतच अतिशय वेगळा आणि अतिशय सखोल असा कलात्मक संस्कार या शाळेनं माझ्यावर केला. एका दोघा शिक्षकांनी नाही तर आख्खी शाळाच हा संस्कार आपल्या मुलांवर अशा पद्धतीनं करते आहे हे फार दुर्मिळ उदाहरण त्या काळातलं असावं. आज शिक्षक दिनाच्या दिवशी इतर शिक्षकांसोबत ह्या कला जाणीवा रुजविणाऱ्या विशेष शिक्षकांची आठवण येते. 

लेखाच्या शिर्षकात ‘आमची शाळा’ हे शब्द वापरले आहेत ते केवळ स्वत:ची शाळा सुचविण्यासाठी नाहीत. ‘आमची शाळा’ नावाचे एक मासिक वार्तापत्र माझ्या शाळेत निघायचे. (त्याच्या अंकाचेच छायाचित्र लेखात वापरले आहे) प्रसिद्ध लेखक कथाकार गणेश घांडगे त्याचे सर्वेसर्वा होते. ज्या काळात दै. मराठवाडा खेरीज दुसरे वर्तमानपत्र परभणी गावात यायचे नाही. त्या काळात एक शाळा आपल्या मुलांसाठी चार पानांचे एक मासिक वार्तापत्र चालवते ही एक फार मोठी सांस्कृतिक घटना होय. याचा एक फार सुंदर असा संस्कार आमच्यावर झाला. 

वर्तमानपत्रांत सांस्कृतिक घडामोडींचे वार्तांकन आजकाल सर्रास वाचायला मिळते. पण 1983 ला हा प्रकार अतिशय कमी होता. मला चांगले आठवते बाल विद्यामंदिर मध्ये पलूस्कर भातखंडे पुण्यतिथीला गुणी विद्यार्थी, आमचे आवडते संगीत शिक्षक अरूण नेरलकर यांच्या गाण्यासोबतच औरंगाबादहून सतारवादक वैशाली बामणोदकर यांना आमंत्रित केले होते (इ.स. 1983 ऑगस्ट). त्यांचे अतिशय सुंदर सतारवादन त्या दिवशी झाले. मी तेंव्हा 8 वीत शिकत होतो. तानसेन नसलो तरी आम्ही कानसेन मात्र होतो. मला वाटले या कार्यक्रमाचे आपण शब्दांकन करावे. घांडगे सरांच्या कानावर घातल्यावर त्यांनी प्रोत्साहन देवून माझ्याकडून त्या कार्यक्रमावर आधारीत ‘रात्र ती स्वरात भिजलेली’ असे एक छोटे फिचर लिहून घेतले. अगदी आजही शाळांमधून असं काही कुणी शिक्षक करत नाही. नकळतपणे संगीत आणि त्याचा आस्वाद घेण्याचा एक संस्कार बाल विद्या मंदिरने आमच्यावर केला.

‘गीतमंच’ मध्ये सहभाग असायचा त्यांना संगीत शिकवले जायचे ते स्वाभाविक होते. पण पाचवी ते सातवी असे सगळे विद्यार्थी मैदानात गोळा करून त्यांना ‘समुह गीत’ शिकवले जायचे तो अनुभव विलक्षण असायचा. आम्हाला पाचवी ते सातवी या काळात शिकवलेले ‘वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गदिमांचे गीत चांगलेच आठवते. एखादी ढगाळलेली दुपार असायची. मैदानात गाणं म्हणायचं म्हणून उत्साहात मुलं मुली रांगेत येवून बसलेली असायची. कुठलेही निमित्त शोधून पळून जाणारी मुलंही हमखास थांबायची. तीन चारशे मुलांचे कोवळे आवाज एका सुरात उमटायचे आणि अंगावर काटा उमटायचा. प्रकाश नारायण संत यांनी आपल्या कथेत सगळ्या सुरांचा मिळून कसा रेशमी दोर वळला जायचा असं एक सुरेख वर्णन केलं आहे. तसा अनुभव आम्हाला शाळेत समुहगीताच्या वेळी यायचा. हा फार वेगळा सांगितिक संस्कार शाळेनं आमच्यावर केला. 

अरूण नेरलकर आमच्या या गीताचा सराव घ्यायचे. सातवीच्या वर्गाजवळ असलेल्या सैतुकाच्या झाडाखाली टेबलावर पेटी ठेवून ती वाजवत ते शिकवायचे. आणि त्यांच्या पाठोपाठ मुलं म्हणायची. कडवे संपवून धृवपदावर येताना मातरम् शब्द उच्चारताना एक मिंड घेतली जायची. ही अवघड मिंडही मुलं सरावाने अतिशय छान घ्यायचे. आठवी ते दहावी ला समुह गीत माधव वसेकर सर शिकवायचे. ते पुढे माझे वर्गशिक्षकही होते पण तेंव्हा विषय संगीत नव्हता.

जंगली बाई आम्हाला चित्रकला शिकवायच्या. एलिमेंटरी, इंटरमिडिऐट किंवा आनंद-आरंभ-बोध अशा चित्रकलेच्या परिक्षांसाठी जी मुलं बसलेली असायची त्यांना त्या शिकवायच्या. तो त्यांचा विषयच असल्याने त्यात वेगळेपण काही नव्हते. पण जन्माष्टमीला दहीहंडी च्या कार्यक्रमासाठी मडकी रंगवल्या जायची. हे काम आम्ही काही हौशी मुलं स्वेच्छेने करायचो. यासाठी जंगली बाईंचा उत्साह विलक्षण असायचा. त्यात केवळ परिक्षेसाठी हे नसून एक रंगांचा संस्कार मुलांवर व्हावा असा त्यांचा दृष्टीकोन असायचा. आज असे किती शिक्षक आहेत की जे आपल्या विद्यार्थ्यांवर रंगांचा संस्कार व्हावा म्हणून जीव टाकत असतील?

‘विठ्ठल तो आला आला’ ही पुलं देशपांडे यांची एकांकिका शाळेने बसवली होती. त्यासाठी विठ्ठल मंदिर आणि त्याचा गाभारा तयार करायचा होता. तो सेट बाईंनी ज्या पद्धतीनं रंगवून दिला तो मला आजही डोळ्यासमोर दिसतो. अनील गंडी हा माझ्या मोठ्या भावाचा मित्र विठ्ठलाचे काम करायचा. त्याचा मेकअपही बाईंनी आणि ह.प. पाटील सरांनी फार मेहनतीनं करून दिला होता. 

अशात मी लिहीलेल्या एका कवितेत ‘पोपट रंगी मखमालीचा । हिरवा हिरवा दाटे पुर’ अशी ओळ आलेली आहे. माझ्या नंतर वाचताना लक्षात आलं हिरव्या रंगांच्या विविध छटांबाबत आपण हे लिहू शकलो कारण जंगली बाईंनी तेंव्हा केलेला तो रंगांचा संस्कार. विविध रंगांच्या छटा आणि त्यांचे वैशिष्ट्ये त्यांनी फार सुरेख समजावून सांगितली होती. नुसतं सांगणं नाही तर किमान फटकार्‍यांतून त्याचे जिवंत प्रात्यक्षिक त्या करून दाखवायच्या. 

चित्रकला परिक्षेचा सराव म्हणून जास्तीच्या तासिका घेतल्या जायच्या त्यासाठी परभणीला वसमत रोडला विद्यापीठ कमानीपाशी असलेल्या ‘विष्णु जिनींग’ परिसरांतील त्यांच्या घरी जावे लागायचे. तिथे मोकळ्या मैदानात भरपूर झाडी आणि हिरवळ असायची. आम्ही कागदावर जे काढायचो ते हिरवे पोपटी निळे ढगांचे पांढरे लालसर पिवळे रंग आमच्या आजूबाजूला झाडं माती आभाळ यातून जिवंतपणे प्रकट होवून भोवती फेर धरायचे. तिथल्या वडाच्या झाडाच्या कलात्मक पारंब्या आपसुकच मग चित्रांत उमटायच्या. 

केशव दुलाजी अडणे उर्फ के.डी. अडणे सर हा माणुस आमच्यासाठी साक्षात ‘नटसम्राट’ होता. खणखणीत विलक्षण प्रभावी आवाजाचा धनी असलेल्या या शिक्षकाने आमच्या रक्तात नाटक रूजवले. सरांचे व्यक्तीमत्व लौकिक अर्थाने प्रभावी कधी जाणवले नाही. पण एकांकिका त्यांनी बसवायला घेतली की त्यांच्या सुंदर संवादफेकीत आम्ही कधी ओढले जायचो ते कळायचं नाही. नाटक बसवतानाच्या काळात त्यांच्या अंगात खरोखरीच नटराज संचारायचा. ते मोठ्या गटाचे नाटक बसवायचे. छोट्या म्हणजे पाचवी ते सातवी गटाचे नाटक बसवायची जबाबदारी मंगला कुरूंदकर बाईंची असायची. बाईंची उंची कमी देहयष्टी किरकोळ. तेंव्हा जवळपास सर्वच मुलंमुली त्यांच्या इतकी किंवा त्यांच्याहीपेक्षा उंच होती. त्यामुळे त्यांना नावच ‘मी उंच बाई’ असं  ठेवलं होतं. बाई विलक्षण मिश्कील. आवाजाला धार, डोळ्यांच्या किमान हालचालींतून भाव व्यक्त करण्याचे एक कसब त्यांचे अंगी होतं. अगदी हसत खेळत त्या नाटक बसवायच्या. सहजपणे अभिनय शिकवायच्या. त्यांची साडी नेसायची पद्धत, विशेषत: पदर  घेण्याची पद्धत मला अजून आठवते. हा सगळा परफॉर्मिंगचाच एक भाग असायचा. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता शब्दफेक करून प्रभाव कसा पाडावा हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले. वर्गात शिकवत असताना एक लय त्यांच्या बोलण्याला असायची. बाकांच्या रांगांमधून फिरताना त्यांच्या चालण्यातला डौल जाणवायचा. 

अडणे सर आणि कुरूंदकर बाईंनी आम्हा नाटकात सहभागी असणार्‍या मुलांना नाटक शिकवले असं कुणाला वाटू शकेल. ते वर वर पाहता खरेही आहे. पण यांच्या वागण्याबोलण्यांतून उच्चारांतून संवादफेकीतून नाटकाचा एक संस्कार आमच्यावरच नाही तर आख्ख्या शाळेवरच होत होता हे आज जाणवत आहे.

अडणे सर माझ्या वडिलांकडे काही तरी कामासाठी एकदा आले होते. तेंव्हाचे त्यांचे बोलणे ऐकून मला लक्षात आले की या माणसांत एक विलक्षण अशी अभिनयाची समज आहे. कुरूंदकर बाईंच्या बाबतीतला एक अनुभव अतिशय हृद्य असा आहे. शाळेत मराठी शिकवणार्‍या हंसा कुरूंदकर बाई होत्या. त्यांच्या नावाशी मंगला कुरूंदकर बाईंचे साम्य असल्याने बर्‍याचदा घोटाळे व्हायचे. त्यावर बाई मस्त फिरकी घ्यायच्या. मी त्यांना शिक्षण संपल्यावर एकदा सहजच भेटायला गेलो होतो. त्यांची मुलं आमच्या बरोबरचीच. त्यांचे घर माझ्या आजीच्या घरा जवळच म्युनिपल कॉलनीत दर्गा रोड परभणी येथे होते. मी सहजच त्यांना बोलता बोलता ‘बाई तब्येत कशी आहे?’ असं विचारलं. त्यावर खळाळून हसत त्या म्हणाल्या, ‘मला काय धाड भरली. हंसा गेली तेंव्हा सगळ्यांना वाटले मीच गेले की काय. आमचे गावाकडचे गडी तर घरी येवून मोठ्यानं रडू लागले. मी बाहेर आल्यावर ‘तूम्ही तर जित्त्या हायती की’ म्हणायला लागले.’ बाई बोलताना त्यांच्या हसण्यातून हंसाबाईंचे दु:ख त्या लपवत होत्या हे मला स्पष्ट जाणवलं. मला त्यांच्या अभिनयाची ताकद कळाली. 

ह.प.पाटील हा एक विलक्षण असा शिक्षक आमच्या आयुष्यात आला. आज कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण या सरांनी आख्ख्या शाळेला एकादशीच्या दिंडीत पावली खेळायला, अभंग गायला, टाळ मृदंग वाजवायला रिंगण घालायला शिकवलं. आता हा काही शाळेच्या अभ्यासक्रमातला विषय नाही. ह.प. पाटील सर निष्ठावंत वारकरी. टाकळी येथील (ता. पूर्णा जि. परभणी) दाजी महाराजांच्या संस्थानचे अनुग्रहीत कपाळाला. गंध बुक्का लावणारे. आषाढी एकादशीला परभणीच्या गांधी पार्कातील विठ्ठल मंदिरापासून दिंडी निघायची. ती नांदखेडा रस्त्यावरील रंगनाथ महाराजांच्या समाधीपर्यंत जायची. या दिंडीत भजनी मंडळांचा मोठा सहभाग असायचा. आमचे मुख्याध्यापक मा.रा. पोटेकर सरांसमोर ह.प. पाटील सरांनी एक प्रस्ताव ठेवला. दरवर्षी या दिंडीत शाळेचा संच सहभागी करू या. धोतर टोपी कपाळी गंध बुक्का गळ्यात तुळशी माळा अशा वेशात विद्यार्थी तयार केले जायचे. नाऊवार नेसून गळ्यात माळ घालून डोक्यावर तुळस अश्या मुली सजायच्या. हातात टाळ, एखादा तालात पक्का असलेला मुलगा मृदंग वाजविण्यासाठी पक्का असायचा. या दिंडीमधील अभंगांचा पाउलीचा सराव नियमितपणे आठ पंधरा दिवस आधीपासून कसून केल्या जायचा.

पाटील सरांचे घर माझ्या घराच्या अगदी मागेच होते. दर गुरूवारी त्यांच्या घरी भजन असायचे. दोन दोन खोल्यांची पाच घरे या बाजूला आणि पाच घरे समोरच्या बाजूला असा तो गजबजलेला डांगेचा वाडा होता. घरांच्या ओळींमधली मोकळी जागा म्हणजे भले मोठे अंगण. गुरूवारी रात्री हे अंगण म्हणजे पंढरीचे चंद्रभागे काठचे वाळवंट बनून जायचे. ज्यांना गळे नाहीत ते आमच्यासारखे कानसेनही गुरूवारी गाण्याच्या ओढीने तिथे तासंतास अभंग गवळणी ऐकत भारवल्या सारखे बसून रहायचे. आजही आषाढीच्या दिवशी माझ्या कानात त्या अभंगाचा नाद घुमत असतो. डोळ्यासमोर ती दिंडी येत राहते.

नाटक चित्रकला संगीत भक्तीसंगीत असा विलक्षण संस्कार माझ्या शाळेनं आणि या शिक्षकांनी आमच्यावर केला. 

कुणी आपल्या शाळेची आठवण सांगताना शिक्षकांच्या ज्ञानाचा आवर्जून उल्लेख करतात. ते तसे आमच्या शाळेत होतेही. (त्यावर परत कधी सविस्तर लिहीन. साहित्यिक संस्कार करणार्‍या हंसा कुरूंदकर बाई, घांडगे सर, सेलमोकर बाई, जपे बाई, नजमा रंगरेज बाई, ग्रंथालयाचे लोनसने सर यांच्यावर स्वतंत्र लिहायला पाहिजे). उज्ज्वल निकालाची मोठी परंपरा आमच्या शाळेची राहिली आहे. पण हा परिक्षेसाठी नसलेला कलेचा संस्कार कुणाच्या भाग्यात असतो? तो आमच्या भाग्यात होता. आज समाजात वावरताना सहजपणे सांस्कृतिक क्षेत्रात मी काम करतो तेंव्हा संपन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेलं घर आई वडिल भाउ यांच्या सोबत शाळेत हा संस्कार गडद करणारे शिक्षक आणि त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे मुख्याध्यापक मा.रा. पोटेकर आणि उपमुख्याध्यापक वि.म. औंढेकर मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. शिक्षक दिनाला यांना प्रणाम.      

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575