उरूस, 18 डिसेंबर 2020
दहा वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने माझे लक्ष सोशल माध्यमाकडे वेधले आणि त्यावर लेखन करण्याचा सल्ला दिला. तो शिरोधार्ह मानून मी 2011 मध्ये ‘क्वेस्ट फॉर फ्रिडम’ - स्वातंत्र्याच्या कक्षा रूंदावण्याचा प्रयत्न हा ब्लॉग सुरू केला. 17 डिसेंबर रोजी 600 वी पोस्ट टाकली. याच महिन्यात दहा वर्षे संपत आहेत.
सुरवातीचे एक वर्ष ‘शेतकरी संघटक’ हे पाक्षिकात कार्यकारी संपादक म्हणून लिहीलेले अग्रलेखच मी टाकत होतो. 2012 मध्ये अलिबागच्या कृषीवल दैनिकात पाक्षिक सदर लिहीण्याचा प्रस्ताव संपादक पत्रकार मित्र संजय आवटे यांनी दिला. त्या अनुषंगाने मी दैनिक कृषीवल मध्ये ‘उरूस’ नावाने सदर लिहायला लागलो. या सदरातील लेख ब्लॉगवर टाकायला लागलो. कृषीवल रायगड नविन मुंबई आणि कोकण परिसरांत पोचते. पण उर्वरीत महाराष्ट्रात पोचण्यासाठी या ब्लॉगचा उपयोग झाला.
प्रस्थापित मुद्रीत माध्यमांच्या मर्यादांवर मात करून सर्वदूर पोचण्याचे साधन हे नविन माध्यम आहे याची जाणीव मला झाली. पुढे दीड वर्षांनी हेच सदर दै. पुण्यनगरीत मित्रवर्य सुशील कुलकर्णी यांनी सुरू केले. तेथे ते तब्बल चार वर्षे चालू होते. या दोन्ही संपादक मित्रांचे मन:पूर्वक आभार त्यांनी माझ्यातील सदर लेखक फुलवला. त्याला वाचकांपर्यंत नेले. ब्लॉगच्या माध्यमातून हे लिखाण सर्वदूर पोचले. दै. ‘उद्याचा मराठवाडा’ साठी संपादक राम शेवडीकर यांच्या आग्रहावरून त्यांच्याकडेही हेच सदर चालवले.
साप्ताहिक ‘विवेक’चे दिलीप करंबेळकर, अश्विनी मयेकर आणि मित्रवर्य रविंद्र गोळे यांनी माझे ‘उरूस’ सदर प्रसिद्ध करून त्याच्या कक्षा रूंदावल्या. मराठी माणूस साप्ताहिकांवर विशेष प्रेम करत आलेला आहे. एक मोठी परंपरा मराठीत साप्ताहिकांची राहिली आहे.
दै. दिव्य मराठीने कवितेविषयक सदर ‘काव्यतरंग’ गेले वर्षेभर प्रसिद्ध केले होते. ते लेखही यात समाविष्ट केले आहेत. दिव मराठीचे दिपक पटवे, संजय आवटे आणि श्रीकांत सराफ या पत्रकार मित्रांचे आभार.
या दैनिक आणि नियतकालिकांतील लिखाणासोबतच विविध दिवाळी अंक आणि मासिकांमधूनही मी लिहीत राहिलेलो आहे. माझे सर्वच लिखाण ब्लॉगवर टाकले आहे. त्यामुळे वाचकांना ते इथे एकत्रित पहायला मिळते.
विविध दैनिक नियतकालिके मासिके यांच्यासाठी लिहीत असताना काही विषय असे होते की ते मला उत्स्फुर्तपणे सुचले आणि विस्तृत लिहावे वाटले. जे मी स्वतंत्रपणे माझ्या ब्लॉगवर लिहीले. त्याला मिळालेला प्रतिसाद आचंबित करणारा होता. एकदा या माध्यमाची ही ताकद लक्षात आल्यावर मी सातत्याने स्वतंत्रपणे ब्लॉगवर लिहायला सुरवात केली. आता तर कुठल्या नियतकालिकासाठी दैनिकासाठी लिहीलेल्या लेखांपेक्षा स्वतंत्रपणे लिहीलेल्या लेखांचीच संख्या जास्त झाली आहे. माझ्या ब्लॉगने 2 लाख 80 हजाराचा दर्शक टप्पा गाठला. आपण माझ्यावर दर्शविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद.
ही दशकपूर्ती होत असतानाचा यु ट्यूबवर व्हिडिओ हे नविन माध्यम मी हाताळतो आहे. ऍनालयझर न्युज चे सुशील कुलकर्णी यांच्याकडे लॉकडाउनच्या काळात असे व्हिडिओ करता येतील का अशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने हे व्हिडिओ करण्यास आम्ही सुरवात केली. त्यांचीही संख्या नेमकी याच महिन्यात 50 पर्यंत गेली. म्हणजे नविन माध्यमांतील व्हिडिओचा हा सुवर्णमहोत्सव आहे.
दहा वर्षांपूर्वी ब्लॉग हे नविन माध्यम वाटत होते. आता त्याच्याही पुढे जावून यु ट्यूब हे एक माध्यम समोर आले आहे. त्याचेही आव्हान स्विकारावे असे मला मनोमन वाटले. त्याला मिळणारा प्रतिसाद तर अजूनच अचंबित करणारा होता. कोरोना काळात मोठ्याप्रमाणात लोक स्थानबद्ध होवून पडले होते. अशा काळात त्यांच्या पर्यंत पोचणारे प्रभावी माध्यम म्हणून यु ट्यूब व्हिडिओ समोर आले. मनोरंजनासाठी हे माध्यम मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे. पण गंभीर असे विषय पोचविण्यासाठी याचा कितपत उपयोग होवू शकेल याची शंका होती. तसा वापर कोणी फारसा केला नव्हता. पण भाउ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने अतिशय साधेपणाने या माध्यमाचा वापर करत 1 लाख 65 हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठून सर्वांना चकितच केले. त्यांच्या दर्शकांची संख्या तर तीन कोटींचा आकडा पार करून गेली आहे.
भाउंच्या उदाहरणावरून हे सिद्ध झाले की मराठी माणूस गंभीर राजकिय विषय या नविन माध्यमांतून समजून घ्यायला तयार आहेत. ऍनालायझरवरील विविध राजकिय सामाजिक व्हिडिओंना दिलेल्या प्रतिसादाबद्दल दर्शकांना मन:पूर्वक धन्यवाद. तांत्रिकदृष्ट्या अजून चांगले व्हिडिओ यावर देण्याचा आमचा मानस आहे. सुशील कुलकर्णी आणि त्यांचे सर्व तरूण सहकारी यांचे आभार.
मी रूढ अर्थाने पत्रकार नाही. माझा पिंड सामाजिक सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील कार्यकर्त्याचा आहे. त्याला पोषक म्हणून हे ब्लॉग लेखन आणि आता व्हिडिओ यांचा वापर मी केला. पण आता त्यांची ताकद लक्षात येवून त्या पलिकडेही यात खुप काही आहे याची जाणीव झाली आहे. मी माझ्याकडून चांगलं काही देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन केवळ माझ्या दर्शकांना/वाचकांना देतो असे नाही तर मी मलाच असे आश्वासन यातून देत आहे.
नामदेवांचे पसायदान फारसे कुणाला माहित नाही. पयासदान म्हटले की ज्ञानेश्वरांचेच आठवते. नामदेवांची भाषा अजूनच साधी सोपी आहे. हे पसायदान अगदी चारच ओळींचे आहे. ब्लॉग लेखनाची दशकपूर्ती आणि ऍनालायझर व्हिडिओंचा सुवर्ण महोत्सव या प्रसंगी मला नामदेवांच्याच ओळी आठवत आहेत
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
माझिया सकळा । हरिच्या दासा ॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।
हे तो संत मंडळी । सुखी असो ॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी ॥
नामा म्हणे व्हावे तयाचे कल्याण ।
ज्या मुखी निधान । पांडुरंग ॥
नामदेव हरिदासा असे म्हणतात. मी नविन काळात तूम्हा सर्वांना ‘डिजिटल दासा’ असे म्हणेन. तूम्हा सर्वांची विवेक बुद्धी शाबूत राहो. समाजाला विवेकाच्या पातळीवर आणण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू.
वैयक्तिक/धार्मिक/जातीय वगळून सर्व प्रकारच्या टीकेचे स्वागत.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा सर 🎉🎉🌹🙏💐🌷
ReplyDeleteदशकपूर्ति सोहळ्यानिमित्य खुप खुप शुभेच्छा श्रीकांतजी !!!
ReplyDelete