Monday, December 21, 2020

जयराम रामेशांनी मागितली डोवालांची माफी



उरूस, 21 डिसेंबर 2020 

कॉंग्रेसचे माजी आणि भावी अध्यक्ष राहूल गांधी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना एक गुरूमंत्र देवून ठेवला आहे असे दिसते आहे. एखाद्या प्रकरणांत बेफाट आरोप करायचे. अंगाशी आले तर मग माफी मागून मोकळं व्हायचं. फरक इतकाच की राहूल गांधी यांनी सहजा सहजी माफी मागितली नाही. प्रकरणं पुरतं वाढू दिलं. मग सर्वोच्च न्यायालयात अगदी लेखी स्वरूपात माफी मागितली. त्यांचाच गुरूमंत्र अरविंद केजरीवाल यांनीही घेतला. त्यांनीही असेच माफीनामे लिहून दिले.

पण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रिय मंत्री जयराम रमेश त्या मानाने जरा कच्चेच निघाले. त्यांनी प्रकरण न्यायालयात जाण्याच्या आधीच माफी मागितली. कदाचित त्यांची ‘विवेक’ बुद्धी अजून शाबूत असावी.

घडले ते असे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांचे सुपुत्र विवेक डोवाल यांच्यावर आरोप करणारा एक लेख कारवान मासिकाने प्रकाशीत केला होता. त्यावर जानेवारी 2019 मध्येच विवेक डोवाल यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. या लेखात विवेक एका परदेशी संस्थेत कार्यरत असून त्या संस्थेच्या संचालकांची पार्श्वभूमी संशयास्पद आहे.  याच लेखात विवेक डोवाल यांनी नोव्हेंबर 2016 च्या नोटबंदी नंतर केवळ 13 दिवसांत करमुक्त अशा के मॅन्स आयलंड मध्ये एका कंपनीची स्थापना केली. आणि या कंपनीने 8 हजार 300 रूपयांची परकिय गुंतवणुक भारतात केली असा अरोप करण्यात आला होता. 

हा लेख प्रकाशीत झाला 16 जानेवारी 2019 मध्ये. लगेच एकाच दिवसांत म्हणजे 17 जानेवारी 2019 ला जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेवून विवेक डोवाल यांच्यावर अफरातफरीचे आरोप केले. केवळ विवेक डोवालच नव्हे तर एकूणच अजीत डोवाल आणि कुटूंबाला त्यांनी आरोपाच्या घेर्‍यात ओढले. 

या प्रकरणाला विवेक डोवाल यांनी अतिशय गांभिर्याने घेतले. जसे मनोहर पर्रिकर आणि नितीन गडकरी यांनी आपल्यावरचे आरोप पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले आणि त्याची तड लावली. अरविंद केजरीवाल, राजदीप सरदेसाई यांना हात जोडून माफी मागायला लावली. तसेच विवेक डोवाल यांनी प्रकरण तडीस न्यायचे ठरवले. याचे गांभिर्य लक्षात आल्याने जयराम रमेश गडबडले. कारण त्यांना विवेक डोवाल यांच्या गैरव्यवहाराचे कुठलेच ठोस पुरावे दोन वर्षे उलटले तरी मिळाले नाहीत. कारवान विरूद्धचा दावा न्यायालयात चालूच आहे. पण जयराम रमेश यांनी मात्र सपशेल माफी मागितली. 

कारवान सारख्या मासिकाने असे का छापावे? तर त्यामागे एक सुत्रबद्ध असा कट आहे. लोकशाही मार्गाने निवडुन आलेल्या सरकार विरूद्ध वारंवार बदनामी मोहिम राबवली जाते. भारतात लोकशाही असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तेंव्हा कारवान मासिक, द प्रिंट, बीबीसी, एनडीटीव्ही, आज तक हे सातत्याने खोट्या बातम्या पसरवतात. त्या विरूद्ध प्रत्येकवेळी कुणी काही कारवाई करतेच असे नाही. आणि जर विवेक डोवाल सारखे कुणी हा विषय तडीस लावला तर मग मात्र हे सपशेल माफी मागून मोकळे होतात. पण तोपर्यंत एक विषारी असा प्रचार यांनी केलेला असतो. 

24 मार्चला लॉकडाउन झाले. शहरांत अडकलेल्या मजूरांना आपल्या गावाकडे जाण्याचा विषय ऐरणीवर आला. या सगळ्या ढोंगी पुरोगामी माध्यमांनी मजुरांच्या स्थलांतराच्या अतिरंजीत बातम्या पसरवल्या. जालन्या जवळ रूळावर रात्री झोपलेले मजूर एका मालगाडीखाली चिरडल्या गेले. यावर तर प्रचंड गदारोळ माजवला गेला. काही दिवांतच हा विषय थंड पडला. गावाकडे गेलेले मजूर जेंव्हा परत शहरात यायला लागले त्याबद्दल कुणी चकार शब्द काढला नाही. त्यांचे फोटो कुणीही दाखवले नाहीत. 

आत्ता शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर चालू आहे. त्या बाबतही अशाच अतिरंजीत बातम्या पसरवल्या जात आहेत. लेख लिहीले जात आहेत. सरकार कसे हृदयशून्य आहे, शेतकर्‍यांच्या मागण्या कशा रास्त आहेत. त्यांचे रस्ता रोकणे कसे योग्य आहे. याची नको तितकी भलामण केली जात आहे. काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालय याचा निपटारा करेल. हे सगळे माध्यमवाले पुरोगामी तोंडावर आपटतील. परत नव्याने दुसरा विषय शोधतील.

सातत्याने काही एक विषय उकरून काढायचा. त्यांचा अपप्रचार करायचा आणि सामान्य वाचकांची/दर्शकांची दिशाभूल करायची. या मोहीमेत विरोधी पक्षातील लोकही साथ देतात. एखादा असा विवेक डोभाल सारखा खमक्या निघतो मग माफी मागण्याची नौबत यांच्यावर येते. 

कश्मीर 370 प्रकरणांतही अतिशय जहरी विषारी विरोधी प्रचार या सगळ्यांनी मिळून केला. आज जवळपास सव्वा वर्ष उलटून गेलं. तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही मोदी सरकारने घेवून दाखवल्या. मग आत्तापर्यंत या निवडणुका का झाल्या नव्हत्या? भाजपचे सरकार यायच्या आधी त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर लोकशाही का पोचू शकली नाही? 

एकीकडे कुमार केतकर सारखे ज्येष्ठ पत्रकार आताचे कॉंग्रेस खासदार मोदी निवडणुकाच होवू देणार नाहीत असा सर्रास खोटा प्रचार करत होते. निकाल विरोधात गेले तर सत्ता सोडणार नाहीत. दंगे होतील. वाट्टेल तो खोटा प्रचार 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी केल्या गेला. प्रत्यक्षात काय घडले? शांतते निवडणुका झाल्या. त्यानंतर आता गेल्या दीड वर्षांत विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. अगदी कोरोना काळातही बिहार सारख्या मोठ्या राज्यातील निवडणुका शांततेत पार पडल्या. मग केतकर आपल्या खोटारडेपणासाठी देशाची माफी मागणार आहेत का? जयराम रमेश यांनी तरी माफी मागितली आणि त्यांच्यापुरता विषय संपवला. 

विवेक डोवाल यांनी कारवान मासिकावर दावा ठोकलेला आहेच. त्याचा निकाल काही दिवसांत येईलच. असाच राहूल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येत संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. तेही आता न्यायालयाच्या चकरा मारत आहेत. 

2014 च्या नंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर आपले पक्ष आपल्या संघटना संस्था यांची बांधणी करून मजबूत असे आवाहन सत्ताधार्‍यां समोर उभे करायला हवे होते. पण तसे झाले नाही. मग असे कोणतेही प्रकरणं उकरून त्यावर मल्लीनाथी आणि खोटे आरोप करत बसतात. ‘चौकिदार चोर है’ सारख्या मोहिमेचा शेवट काय आणि कसा झाला याचा अनुभव उभ्या देशाने 2019 च्या निवडणुकांत घेतला आहेच.

कॉंग्रेस हा विनाशाकडे धावत सुटलेला पक्ष आहे. त्याच्या नेत्यांना काही बोलण्यात अर्थच नाही. पण पत्रकार, विचारवंत, बुद्धिवादी, पुरोगामी, लेखक यांनी मात्र यातून काही एक बोध घेतला नाही तर त्यांची अवस्था मोठी कठीण होवून जाणार आहे. राम मंदिर प्रकरणांत इरफान हबीब आणि रोमिला थापर यांच्या बुद्धिभ्रष्टतेची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगली गेली आहेतच. रवीशकुमार, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, पुण्यप्रसुन वाजपेयी, विनोद दुआ सारखे पत्रकार बाजूला पडत चालले आहेत. काही दिवसांनी हे कुठे चुकून टिव्हीत दिसले तरी लोक यांना दगडं मारतील. ही अवस्था यांनी स्वत: करून घेतली आहे.

सर्वसामान्य वाचक/दर्शक आता जागरूक होत चालला आहे. त्याच्या हातात प्रस्थापित माध्यमांवर वचक ठेवायला समाज माध्यमांची ताकद आलेली आहे. ज्या बातम्या मोठी प्रस्थापित माध्यमं दाबून ठेवतील त्या बातम्यया समाज माध्यमांवर पसरतील. जशा आताही विवेक डोवाल यांची बातमी समाज माध्यमांवर पसरलेली दिसते आहे.
या संपूर्ण प्रकरणांत चिवटपणे न्यायालयीन लढाई लढल्या बद्दल विवेक डोवाल यांचे अभिनंदन. कारवान विरूद्धच्या पुढील लढाईसाठी त्यांना शुभेच्छा !

(अजीत डोवाल आणि विवेक डोवाल हे भाजप कार्यकर्ते नाहीत. पुरोगामीत्वाची कावीळ झालेल्यांनी याची नोंद घ्यावी.)          

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

2 comments:

  1. खुप सुंदर विश्लेषण 🌹💐🌷

    ReplyDelete
  2. छान विश्लेषण केले.

    ReplyDelete