द्राक्ष सुंदरी
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) मंदिरावरची सुरसुंदरींची शिल्पे मोठी आकर्षक सौष्ठवपूर्ण सौंदर्यपूर्ण अशी आहेत. चित्रातील सुरसुंदरीला नेमकं काय नाव आहे मला माहित नाही. तिच्या डाव्या हातात द्राक्षाचा घोस दिसतो आहे म्हणून मी तीला "द्राक्ष सुंदरी" असं नाव ठेवलं. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.
हीच्या गळ्यातील दागिना जरा वेगळा दिसतो आहे. शिवाय जानव्या सारखी एक साखळी डाव्या खांद्यावरून दोन वक्षां मधून खाली कमरेकडे आली आहे. हा प्रकारही वेगळा वाटतोय. उजवा हात जो खाली सोडलेला आहे त्यावरचे एक कंकण खाली झुकलेलं आहे. केसांची रचना पण मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाठीमागे मानेखाली उतरलेला हा केसांचा शेपटा वेगळा आकार ल्यालेला आढळतो. किंवा तो पातळ कापडात गुंडाळलेला आहे की काय असे वाटते. डावा पाय हा जमिनीला टेकला नसून भिंतीला टेकवलेला दिसतो आहे. दोन पायांच्या मधून सोडलेला कटीवस्त्राचा शेव लयबद्ध असा डावीकडे वळलेला आहे. या सुंदरीचे स्तन अतिशय प्रमाणबद्ध दाखवलेले आहेत. उन्नत दाखवण्याच्या नादात काही शिल्पात एकुण शरिर रचनेचा तोलच बिघडतो.
ठाम सरळ रेषेतील उजवा पाय वगळता डावा पाय व दोन्ही हात यांची रचना लयबद्ध अशी मोहक केलेली आहे. चेहरा नेमका उजवे पाउल जिकडे आहे त्याच्या विरूद्ध वळलेला आहे. "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" असा भाव जाणवतो. पाउल तर तिकडे वळले आहे पण "आम्ही नाही जा" अशी स्त्री सुलभ भावना आहे.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage
तोरण शिल्पाचा 3D नमुना
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिरांचा विविध पैलूंनी बारीक विचार झाला पाहिजे. आता हे जे शिल्प आहे ते गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील तोरणाचे आहे. समोरून पाहताना हातात माळा घेतलेले यश किन्नर दिसतात. त्यांच्या हातातील माळांची सुरेख अशी नक्षी बनलेली आढळून येते. या भागात सहसा अंधार असतो त्यामुळे संपूर्ण शिल्पाकडे लक्ष जात नाही. पण या तोरणावर प्रकाश टाकला आणि खालची बाजू बघितली तर आपण चकित होतो. हे शिल्प 3D आहे. आपल्याला दिसते ती छाती पासून वरची बाजू दर्शनी प्रतलात आहे. पण कमरेपासून खालची बाजू दूसर्या प्रतलात आहे. ९० अंशाचा कोन करून या मानवी आकृत्या वळवलेल्या आहेत. शिल्पकलेतील हे मोठं आव्हानात्मक काम आहे. अशाच पद्धतीने द्वारशाखेवर नृत्य करणारे स्त्री पुरूष दाखवलेले आहेत. म्हणजे शिल्पकलेत एकाच प्रतलाचा वापर न करता दोन दिशा दोन प्रतलात शिल्प कोरलेली आढळून येतात. हे केवळ सौंदर्यपूर्णच आहे असे नाही तर गणिताचा अभ्यास करून निर्माण झालं आहे.
प्राचीन मंदिरांबाबत अशा काही बाबी खरंच आचंबीत करतात. वास्तुशास्त्र, शिल्प सौंदर्य, विज्ञान, गणित असा अद्भुत संगम इथे पहायला मिळतो. दगडाची प्रतवारी शोधून मगच शिल्प कोरले जाते. दगडी चिर्यांची रचना नुसती सौंदर्यपूर्ण नसते तर त्यात शास्त्रही सांभाळलेले असते.
Travel Baba Voyage
अशा अवघड जागी वर चढून फोटो काढल्या बद्दल धन्यवाद मित्रा.घोटण (ता. शेवगांव, जि. नगर) येथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावर पशु पक्षांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं असल्याचे याच मालिकेत पूर्वी लिहिलं होतं. याच मदिराच्या स्तंभांवर युद्ध आणि युद्ध सराव अशी काही शिल्पे आढळून आली. ही शिल्पे पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या शिल्पात तलवार घेवून लढणारे दोन योद्धे दिसत आहेत. त्यांनी शिरस्त्राण घातलेले आहेत. प्रत्यक्ष युद्धापेक्षा हा युद्ध सराव असावा. दूसरे शिल्प कुस्तीचे आहे. खेळा सोबतच युद्धाची तयारी म्हणून प्रशिक्षणाचा भाग असावा.
तिसर्या शिल्पात हत्ती आणि घोडा आहे. हत्तीने सोंडेत एक माणूस पकडला आहे. समोरचा घोडा उधळलेला आहे. हत्तीवर माहूत नाही. प्रत्यक्ष युद्धातीलच एक क्षण शिल्पात फोटोसारखा पकडला आहे. चौथे आणि शेवटचे शिल्पही असेच गतीमान आहेत. यात दोन अश्वस्वार दिसत आहेत. दोघांच्याही हातात भाले दिसत आहेत. दोघांच्या मध्ये जमिनीवर एक योद्धा आहे. घोडे मागील दोन पायांवर आहेत. युद्धाचा जोर इथे दिसून येतो. वीररसात ही शिल्पे न्हावून निघाली आहेत.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575
सरजी....!
ReplyDeleteखूपच सूंदर हा blogs बनविला आहे.
वाचून आनंद आणि शिल्प बघून मनाला गारवा मिळाला
मनाला मिळालेल्या आनंदा मुळे
मी तुमच्या ऋणात असेन