Saturday, December 19, 2020

गौताळा -अंतुर किल्ल्यावरची कविता...


 
उरूस, 19 डिसेंबर 2020 

दोन वर्षांपूर्वी अंतुरच्या किल्ल्यावर गेलो होतो. या किल्ल्यावरचे आणि त्या परिसरातील निसर्गसंपन्न दृश्य पाहून मन अगदी मोहून गेलं. अजिंठा डोंगर रांगांत गेली तीन वर्षे मी फिरतो आहे. इथल्या विविध स्थळांनी सातत्याने आकर्षून घेतले आहे. परत परत माझे पाय इकडे वळत आले आहेत. पावसाळ्यात तर हा प्रदेश नेत्रसुखद दृश्यांनी नटलेला असतो. गौताळा अभयारण्यातून आम्ही पुढेे अंतुर किल्ल्यावर पोचलो. पुढे एक वर्षांनी माझी मुलं, पुतणे त्यांचे मित्र यांना घेवून परत एकदा मी मुद्दाम या किल्ल्यावर गेलो होतो. तेथील निसर्गसंपन्नतेचा परत एकदा अनुभव घेतला. त्यावेळी सुचलेली ही कविता. 


गवताळ्याच्या । वनराईतूनी । 
येता फिरूनी । जातो भरूनी । 
गर्द पोपटी । हिरवाईने । 
आपुला डोळा ॥
पाखरगाणी । एैकत एैंकत
दगडामधुनी । झुळझुळणार्‍या
पाण्याच्या । पायातील वाजे 
घुंगुरवाळा ॥

गौताळ्याच्या परिसरांतच सर्वत्र या काळात लहान मोठे ओहळ खळखळा वहात असतात. त्यांचा मंजूळ आवाज बाळाच्या पायातील घुुंगुरवाळा भासत रहातो. गौताळा अभयारण्यातून अंतुर किल्ल्याकडे येताना सीता न्हाणी  म्हणून अतिशय सुंदर असा धबधबा आहे. डोंगर चंद्रकोरीसारखा कातरून त्याच्या भोवती दगडी सुळके मोठे आकर्षक असे उभे असलेले दिसून येतात. या घळीतून धबधबा वाहातो तेंव्हा त्याचा विस्तारलेला पाणपसारा मोरपिसार्‍यासारखा वाटतो.

चंद्रकोरसा । डोंगर कापुनी
हिरवाईचे । तुरे लेवूनी
कातळ सुळके । देत पहारा ॥
नाद उमटता । दरीमधुनी 
धबधबाच मग । मोर बनुनी 
नाचे फुलवुनी । पाण पिसारा ॥

श्रावणातील तो काळ असल्याने उन पावसाचा खेळ अनुभवता येत होता. 

जरा सावळ्या । जरा पांढर्‍या
मेघांमधुनी । उन्हांत न्हावूनी
मिश्किल दिसते । आभाळ हसते  
निळे निळे ॥
मस्त कलंदर । शुभ्र पांढर्‍या  
दर्ग्याच्या । पायाशी आहे
पीरासारखे । मुक्तमनस्वी
एक तळे ॥

याच तळ्याचा फोटो वर लेखात वापरला आहे. या तळ्याकाठचा दर्गा एका सुफी संताचा आहे. तिथेच एक छोटी मस्जीदही आहे. इस्लामची निर्गुण अनुभूती अशा एकांतप्रिय निसर्गसंपन्न सुंदर जागी सहजच येते. या तळ्याच्या पाण्यावर उठणार्‍या लाटा पाहून पुढच्या ओळी सुचल्या

तळी साठल्या । पाण्यावरती
वारा लिहीतो । अल्लड गाणी 
थरथरणारी ।
लसलसणार्‍या । गवतामधुनी
लहरत जाते । गाण्याची लय
लवलवणारी ॥

लोकगीतांमध्ये स्वरांचे हेलकावे असतात. त्या ताना त्यामुळे गोड वाटतात. अगदी बासवरीवरची एखादी पहाडी धुन ऐकत असतानाही आपल्याला असा भास होत रहातो. 

श्वासांमधुनी । खेळत आहे
स्वच्छ मोकळी । शुद्ध हवा ॥
डोळे मिटता । मनी उमटतो
ध्यानमग्नसा ।  बुद्ध नवा ॥

या डोंगरावर एक वडाचे झाड आहे. त्या वडाच्या समोर एका सुफी संताची कबर आहे. तळ्याकाठचा दर्गा मस्जीद आणि ही दुसरी कबर आणि तिच्याकाठचे वडाचे झाड यातून एक वेगळीच अनुभूती येत रहाते. खुलताबाद हे सुफी संप्रदायाचे फार मोठे केंद्र राहिलेले आहे. चिश्ती संप्रदायातील अतिश पवित्र मानले गेले 21 वे ख्वाजा बुर्‍हानोद्दीन गरीब आणि 22 वे ख्वाजा औरंगजेबाचे गुरू जैनोद्दीन चिश्ती यांच्या समाध्या याच परिसरांत आहेत. या शिवाय औरंगाबाद परिसरांत अजून काही सुफी संतांच्या समाध्या आहेत. त्यामुळे तो संदर्भ या कवितेत आला. या दर्ग्यामधून सुफी कव्वाल्या आजही गायल्या जातात.  

इथे वडाच्या । पारंबीला
सुफी शांतता । घेते झोका ॥
शतकांपासूनी । विरून गेल्या
कव्वालीचा । स्मरूनी ठेका ॥

अंतुरचा किल्ला आणि गौताळा अभयारण्यातून परत येताना काहीतरी हरवले आहे असे वाटत होते. इतिहासातील प्रचंड घडामोडी जिथे झाल्या तो परिसर आता उध्वस्त विराण असा झाला आहे. पडझड झालेला हा किल्ला आता खुप चांगल्या पद्धतीने संवर्धन केल्या गेलेला आहे. अजून या परिसरांतील बरेच अवशेष विखुरले आहेत. शेवटच्या ओळी केवळ अंतुर किल्ल्यासाठी नसून परिसरांतील सर्वच अवशेषांसाठी आहेत. 

परतू बघता । वाट हरवते
गवसत नाही । काही काही
कानी येती । इतिहासाच्या
नुसत्या हाका ॥
कालपटाच्या । फाटूनी गेल्या
जीर्णशीर्ण । हिमरू शालीचा  
कुशल हाताने । कुणी शिवावा  
टाका टाका ॥

अनंत भालेराव पुरस्कार हिमरू नक्षी तज्ज्ञ अहमद कुरेशी यांना 26 ऑक्टोबर 2020 रोजी प्रदान करण्यात आला. आज यंत्रावर विणली जाणारी हिमरू शाल बहुतेकांना माहित आहे. पण अजूनही हातमागावर विणली जाणारी ही कलाकारी अहमद कुरेशी यांच्या सारख्यांनी जतन करून ठेवली आहे. ही कविता लिहीली तेंव्हा अहमद भाईंचा संदर्भ नव्हता. पण हा पुरस्कार प्रदान सोहळा झाल्यानंतर कवितेत एक बदल करत ‘कुशल हाताने’ असा शब्द वाढवला.

कविता मुक्त आहे. एकमेकांत गुंतत जाणारी अशी लयबद्ध शब्द रचना केली आहे. यमकांचा मुक्त वापर आहे. कडव्यांतील ओळींची संख्याही तशी नियमित नाही. या परिसरांत पावसाळ्यांत गेलात तर हा अनुभव तूम्हाला नक्की येईल.

(छाया चित्र सौजन्य व्हिन्सेंट पास्कीनली) 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment