उरूस, 30 डिसेंबर 2020
प्राचीन मंदिरांचा जिर्णाद्धार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभेत केली, मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. साहजिकच हा विषय चर्चेसाठी ऐरणीवर आला. जागजागच्या प्राचीन मंदिरांकडे लोकांचे लक्ष जायला लागले. आपल्या आपल्या भागातील प्राचीन मंदिर कसं महत्त्वाचं आहे आणि त्याचा जिर्णोद्धार कसा झाला पाहिजे अशी मागणी व्हायला लागली. पत्रकारांनी अशा काही बातम्या आपल्या परिसरांतील प्राचीन मंदिरांबाबत द्यायला सुरवात केली. एरव्ही गावाकडे न फिरकणारेही आपल्या गावच्या प्राचीन मंदिरांबाबत भरभरून बोलायला लागले.
या सगळ्या धामधुमीत एक गांव शांतपणे आपलं काम करत आहे. ही सगळी चर्चा समोर येण्याच्या पाच वर्षे आधीच त्यांनी आपल्या गावातील 700 वर्षे जून्या मंदिराचा, तेथील बारवेचा जिर्णोद्धार केला. आणि त्यासाठी कुणाकडेही हात पसरले नाहीत. अगदी शासनाकडेही नाहीत. कुठल्या धनाढ्य माणसाकडे, आमदार खासदाराकडे अगदी एखाद्या कंपनीच्या सीएसआर मधूनही पैसा घेतला नाही.
हे आदर्श काम केलं आहे हतनूर (ता. सेलू जि. परभणी) च्या बहाद्दर गावकर्यांनी. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी अवलंबलेले सुत्र मोठे विलक्षण आहे. गावच्या शिवारात ज्यांची ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांनी आपल्या शेतात जो माल होईल त्याच्या 1 टक्के इतका माल अथवा तो विकून येणारी रक्कम या कामासाठी देगणी म्हणून द्यायची.
पाच वर्षांत अशा पद्धतीने या गावकर्यांनी तब्बल एक कोटी रूपये उभे केले. गावात प्राचीन नागेश्वर शिव मंदिर आहे. त्याच्या समोर बारव आहे. या मंदिरावर एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार याचा कालखंड हा इ.स. 1301 चा इतका जूना निघतो आहे. या मंदिराच्या समोर चारही दिशांनी प्रवेश असलेली देखणी बारव आहे. हीचे दगड निखळले होते. बराचसा भाग पडला होता. ही बारव उकलल्या गेली. एका एका दगडावर नंबर टाकून अतिशय कुशलतेने दगडांची रचना परत केल्या गेली. जिथले दगड तुटले होते अथवा नाहिसे झाले होते तिथे नविन दगड घडवून बसवले.
गावात ज्यांनी ज्यांनी मंदिराचे आणि परिसरांतील दगड आपल्याकडे नेले आहेत अथवा आपल्या बांधकामात वापरले आहेत ते सगळे शोधून यांनी वापस आणले. सलग दोन वर्षे हे किचकट काम चालेले. इ.स. 2019 च्या फेब्रवारी महिन्यात बारवेचे काम पुर्ण झाले. एकूण तब्बल 22 लाख रूपये त्याला खर्च आला.
मंदिराचा परिसर त्याच्या जोत्याचे ओट्याचे निखळलेले दगड, अंगणातील फरशी हे सर्व नव्याने करण्यात आले. मुखमंडपाचे खांब कलले होते त्याला अधार देण्यात आला.
हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीनं गावकर्यांनी एकोपा दाखवला तो विलक्षण आहे. पक्ष गट तट आपसांतील भाउबंदकी असले अडथळे त्यांनी मध्ये येवू दिले नाहीत. या परिसरांत शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आहे. पंचक्रोशीतील लोक गावात गोळा होतात. मंदिराचे भक्त दूर दूरवरून येतात.
याच परिसरांत प्राचीन मंदिराचे अवशेषही विखुरलेले आहेत. ते एकत्र करून ठेवण्याची गरज आहे. अभ्यासकांना या अवशेषांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यावर सविस्तर लिखाण संशोधन केले पाहिजे.
बारव आणि मंदिराला लागूनच नविन पद्धतीने मंगल कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. सर्वच परिसर आता विकसित झाला आहे. एकूण 1 कोट रूपये खर्च याला आला. आणि हा सगळा निधी गावकर्यांच्या शेतमालाच्या विक्रीतून देणग्यांतून गोळा झाला हे विशेष.
मराठवाड्यात खुप प्राचीन मंदिरं आहेत. पुरातत्त्व खात्याकडे ज्यांची नोंदणी झाली आहे किंवा जे संरक्षीत वास्तू म्हणून आहेत त्यांच्या शिवाय भरपूर अशी स्थळं आहेत. शासनाकडे संरक्षीत असलेल्यांसाठी शासनाकडून निधी मिळवून त्यांचे काम करता येवू शकते त्यासाठी पाठपुरावा निधी मिळावा म्हणून दबाव हे तंत्र अवलंबता येईल. पण इतर जी मंदिरं आहेत, जून्या अतिशय सुंदर अशा बारवा आहेत, नदीवरचे घाट आहेत त्यांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारावी लागणार आहे.
जून्या मंदिरांची दूरूस्ती करणारे पाथरवट शिल्पी यांनाही या कामात सहभागी करून घेतले तर त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न मिटेल. आजही हे काम करणारे शिल्पकार उपेक्षेत जगत आहेत. ज्यांनी हजारो वर्षोंपासून ही कला जपली आहे त्यांची दखल पुरेशी घेतली जात नाही. अगदी त्याच पद्धतीनं मुर्ती शास्त्रीय ग्रंथाचा आधार घेवून मुर्ती घडवणारेही आहेत. त्यांच्या हातातील कसब पुरेसे वापरलेच जात नाही अशी त्या लोकांची खंत आहेत.
हतनुरच्या कामाचा आदर्श यासाठी घेण्याची गरज आहे की त्यामुळे ग्रामीण पर्यटनाला गती येईल. गावोगाची प्राचीन मंदिरं आपण होवून गावकर्यांनी शास्त्रीय पद्धतीनं दुरूस्त केली पाहिजेत. दगडांना भडक वार्निश फासणे, सिमेंेट लावून टाईल्स बसवणे म्हणजे जिर्णोद्धार नव्हे. त्यामुळे प्राचीन वास्तूकलेचा सत्यानाश होतो. तेंव्हा अश कामं करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
मराठवाड्यात प्राचीन बारवा अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेल्या आहेत. पण त्या केवळ प्राचीन वास्तू आहेत असं नव्हे. त्या म्हणजे जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या बारवांचा जिर्णाद्धार करताना दुरूस्ती करताना जलतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे. त्या नुसारच ही कामं झाली पाहिजेत.
प्रत्येक जिल्ह्यातील प्राचीन वास्तूंची माहिती गोळा करून त्याचा सविस्तर अभ्यास झाला पाहिजे. जिल्ह्याचा नकाशा, या वास्तूंचे चांगले छायाचित्र, ठिकाणाची माहिती असे संकेतस्थळ तयार केले गेले पाहिजे. या सगळ्यांसाठी शासनावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. स्वयंस्फुर्तपद्धतीनं काम करता येते हे हतनूरने दाखवून दिले आहेच.
रोहन काळे नावाचा एक तरूण महाराष्ट्रभर बारवा शोधत आणि त्यांची माहिती गोळा करत फिरतो आहे. येत्या गुढी पाडव्याला महाराष्ट्रांतील बारवांमध्ये दिवे लावून उत्सव साजरा करावयाचा आहे. हे कुण्या एकाच्या आवाक्यातले काम नाही. तूम्ही तूमच्या परिसरांतील बारवांची/प्रचीन मंदिरांची/ नदीवरच्या घाटांची/ स्मारकांची माहिती आमच्या पर्यंत पोचवा. आपण सर्व मिळून महाराष्ट्रात आज ज्या बारवा शिल्लक आहेत त्यांची साफसफाईची मोहिम राबवूया. रोहन काळे चा मो. नं. देत आहे. माझा तर खाली दिलेला आहेच. सर्वांना कळकळीचे आवाहन आपण सर्व मिळून आपला प्राचीन वारसा जतन करू या.
रोहन काळे मंुंंबई- 9372496819
(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575