Tuesday, March 9, 2021

महिला दिन आणि मुलीवरची कविता

 

 
उरूस, 9 मार्च 2021 

जून 2011 मध्ये मी नविन घरात रहायला गेलो. त्या वर्षीचा महिला दिन होवून गेला होता. पुढच्या वर्षी 2012 च्या 8 मार्चला घरात एक नवल घडले. बैठकीच्या दर्शनी भिंतीवर माझ्या मुलीचा एक गोड फोटो मोठा करून लावला होता.  माझ्या घराच्या पूर्वेकडच्या मोठ मोठ्या इमारतींच्या रांगांमधून वाट काढत सुर्याची किरणं दरवाज्यातून बरोबर त्या फोटोवर सकाळी 8.15 च्या दरम्यान आली. मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. पुढे दोन दिवस सुर्यकिरणं त्या फोटोच्या आसपास राहतात. 

दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी हा किरणोत्सव आमच्या घरात साजरा होतो. माझ्या मुलीचे नाव अवनी आहे. मी, माझी दोन मुलं आणि दोन पुतणे आम्ही गमतीने याला ‘अवनोत्सव’ म्हणतो. मला बहिण नाही. शिवाय आम्हा दोघा भावांनाही हटवादीपणाने दोन दोन मुलंच झाली. 

आम्ही तिसरा चान्स घेतला. डॉ. सविता पानट मला म्हणाल्या कशाला तिसरं मुल होवू देतोस? तू सामाजिक क्षेत्रात काम करतोस निवडणुक लढवायची म्हणालास तर तिसरं अपत्य झाल्यास बाद होशील. मी त्यांना म्हणालो मला सामाजिक  क्षेत्रात काम करण्यात रस आहे पण निवडणुकीच्या राजकारणात मुळीच नाही. त्यांनी परत दुसरा मुद्दा समोर केला की काय म्हणून मुलगीच होईल? आता तर सोनोग्राफीवर बंदी आहे. माझ्या बायकोला मात्र  खात्री होती मुलगी होणार म्हणून. 

खरंच कुठले नवस फळाला आले माहित नाही पण मुलगीच झाली. जन्मली तीही बुद्ध पौर्णिमेला. 
तिच्या जन्माआधी मी अशी ओळ लिहिली होती

पाठी आलीस
ना पोटी आलीस
न केलेल्या कुठल्या गुन्ह्याची
अशी शिक्षा दिलीस?

पण ही गोड मुलगी माझ्या घरात आली. तिचे नाव आम्ही अवनी ठेवले. ती लहान असताना मी कविता लिहीली होती

नाचर्‍या पायांनी
मुलगी फिरते आहे
संबंध घरात
आणि बापाच्या उरातही

तिच्या हसर्‍या डोळ्यांतून
उमगून येते त्याला
साध्या साध्या गोष्टीतील 
जम्माडी गंमत

संध्याकाळी उशीरा
त्याची चाहूल लागताच
ती कारंज्यासारखी उसळते
त्याच्या डोक्यावरील
काळज्यांचे ओझं 
अलगद उतरवते
बोबड्या बोलांनी
अलगद पुसून घेते
काळजावरील पराभवांचे डाग

तिची भुक थांबली असते
त्याच्या हातातील घासासाठी 
त्याच्याच पांघरूणात
ती शिरते उबेसाठी
दिवसभराचे गार्‍हाणे 
सांगतात तिचे शब्द भोळे
बोलता बोलता अलगद 
मिटत जातात तिचे डोळे

रात्री उशीरा 
बापाच्या डायरीवर 
उतरत जातात ओळी

‘पुरूषाच्या आयुष्यावर हवा असतो
मुलीचा नाजूक ठसा
पोटी पोर असल्याशिवाय
आपल्याही पोटी ओल आहे
याचा पुरावा द्यावा कसा...’

9 मार्च 2021 ला आजच तिच्या फोटोवर पडलेल्या सुर्यकिरणाचे फोटो काढले. लेखाच्या सुरवातीला तेच वापरले आहेत. तिच्यावर लिहीलेली ही 12 वर्षांपूर्वीची कविता आठवली. आज ही गोड मुलगी 14 वर्षांची झाली आहे. महिला दिनाची एक छानशी आठवण. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment