Friday, March 12, 2021

प्राचीन मंदिरे बारवांत दिवे लागले रे



उरूस, 12 मार्च 2021 

कोरोनाची मळभ अजून दाटलेले आहे. आणि अशा वातावरणांत औरंगाबाद परभणी येथील प्राचीन बारवांत मंदिरांत शिवरात्रीला दिपोत्सव साजरा झाला हे विशेष. दु:ख दळून खाणारी माणसं असे वर्णन खेड्यांतल्या माणसांचे करण्यात येते. या माणसांनी कोरोनाच्या अंधारावर मात करून दिवे लावले आहेत. 

परभणी जिल्ह्यात गेले दोन वर्ष प्राचीन वारश्याबाबत जागृती अभियान राबवले जात आहे. विविध गावांतील प्राचीन मंदिरे, मूर्ती, नदीचे घाट, समाधीस्थळे, बारवा यांचा शोध घेतला जातो आहे. त्या बाबत माहिती गोळा केली जाते आहे. जिल्हाधिकार्‍यांनी एक समिती तयार केली असून त्यांच्या वतीने जानेवारी महिन्यांपासून अशा प्राचीन वारसा असलेल्या स्थळांचे सर्वेक्षण दौरे केले जात आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 50 गावं अशी सापडली आहेत की जिथे प्राचीन वारसा स्थळं आहेत. 

11 तारखेला शिवरात्रीच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील हातनुर, रायपुर, चारठाणा, पिंगळी,  ढेंगळी पिंपळगांव आणि धारासुर या गावांत गावकर्‍यांनी दिपोत्सव साजरा केला. प्राचीन बारवा साफ केल्या. जून्या मंदिरांची स्वच्छता केली. हातनुर गावचा आदर्श समोर ठेवून रायपुर येथील ग्रामस्थांनी आपल्या बारवेची दुरूस्ती केली. त्यासाठी स्वेच्छा वर्गणी गोळा केली. शिवरात्रीला ही बारव दिव्यांनी सजवली गेली होती. 

परभणी नांदेड रेल्वे मार्गावर पिंगळी रेल्वेस्टेशन आहे. या गावांतील बारव आणि तिच्या काठावर पिंगळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही बारव भव्य आणि मोठी देखणी आहे. गावकर्‍यांनी या बारवेची साफसफाई करून इथे दिवे लावले.  धारासुर, ढेंगळी पिंपळगांव आणि चारठाणा येथील मंदिरांची साफसफाई आणि सजावट गावकर्‍यांनी केली. या मंदिरांवरही शिवरात्रीला दिवे लावण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालूक्यात शेकटा या गावी एक मोठी बारव आहे. या बारवेची पाहणी जानेवारी महिन्यात व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राला घेवून आम्ही केली होती. गावातल्या तरूण मुलांना एकत्र केले. बारवेची अवस्था अतिशय वाईट होती. किमान इथे स्वच्छता तरी करा असे आवाहन केले. त्या तरूणांनी हा विषय मनावर घेतला. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तेथे स्वच्छता अभियान राबविले गेले. त्या तरूण मुलांनी मला फोन करून सगळा वृत्तांत कथन केला. फोटो पाठवले. शिवरात्रीला तेथे मोठा दिपोत्सव गावातील महिलांनी साजरा केला. 

हाच उत्साह गावागावांत पसरण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यांत ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे जनसामान्यांनी ही चळवळ पुढाकार घेवून चालवली आहे तशी ती इतरत्र चालली पाहिजे. नसता केवळ सरकारी पातळीवर किंवा एनजीओ पद्धतीने झाल्यास त्यातला उत्साह संपून जातो. केवळ कर्मकांड शिल्लक राहते. कितीही टिका केली तरी मंदिर संस्कृती हजारो वर्षे आपण टिकवून ठेवली आहे. तेंव्हा ही प्राचीन स्थळेही त्याच भावनेने जपली गेली तरच ती टिकतील. पौर्णिमा, शिवरात्र, जत्रा, उत्सव अशा निमित्ताने यांची देखभाल स्वच्छता झाली पाहिजे. या सण समारंभांवर पुरोगामी बनून टिका करण्यात काहीच अर्थ नाही. गुढी पाडवा, पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना पण बारवेत दिवे लागत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. गुढी पाडवा साजरा कशाला करायचा? असले मुर्खतापूर्ण प्रश्‍न विचारण्याचे इथे काहीच औचित्य नाही. 

हीच बाब प्राचीन मंदिरे, मुर्ती, शिलालेख यांच्या बाबत आहे. याचा काय उपयोग? आम्ही हे सगळेच नाकारत आलो आहोत असा दृष्टीकोन ठेवता येणार नाही. आपला प्राचीन वारसा जपणे याला कर्मकांड म्हणत नाहीत.  परदेशांत विशेषत: युरोपात प्राचीन वास्तुंबाबत अतिशय काळजीपूर्वक धोरण आखले जाते. त्यांचे जिवापाड जतन केले जाते. आणि या साठी केवळ सरकारवर अवलंबून राहिले जात नाही. स्वयंस्फुर्तपणे लोक पुढे येतात. देगण्या गोळा होतात. स्वयंसेवी संस्था पुढे येतात. आपल्याकडे नेमके याच्या उलट सगळं काही सरकारने करावं अशी अपेक्षा ठेवून आपण हातावर हात ठेवून बसून राहतो. केवळ हातावर हात ठेवून लोक शांत बसून आहेत असंही असलं असतं तर चाललं असतं. पण आपण प्राचीन वारसा खराब करतो. तिथले दगड चोरून नेतो. जून्या बारवांत कचरा टाकतो. त्यांना बूजवून टाकतो. ही नेतकी काय वृत्ती आहे? जून्या दगडी मंदिरला वार्निश फासून काय मिळते? जून्या वीरगळी, शिलालेख, सतीच्या शीळा धुण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. ही भयानक अनास्था काय दर्शवते? 

13 एप्रिलला गुढी पाडवा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश बारवा साफ होतील. त्यातील गाळ काढला जाईल. दुरूस्ती होईल आणि तिथे दिवे लागतील यासाठी आपण प्रयास करूया. परभणीने आदर्श समोर ठेवला आहे. औरंगाबादने त्यापासून प्रेरणा घेतली आहे. सारा महाराष्ट्र याच वाटेने जाईल अशी आशा करू या.    

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


No comments:

Post a Comment