उरूस, 29 मार्च 2021
कृषी आंदोलनाची दिशा पूर्णत: चुकली असून हे आंदोलक आता बावचळले आहेत. नुकतीच एक मारहाणीची घटना पंजाबात शनिवारी 27 मार्चला घडली. पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील मलौट येथे भाजप आमदार अरूण नारंग यांना प्रचंड मारहाण केली. त्यांचे कपडे फाडले. पोलिसांनी हस्तक्षेप करून नारंग यांना जवळच्या एका दुकानाचे शटर उघडून आत बंद केले. आणि माथेफिरू जमावापासून वाचवले.
प्रकार असा घडला की कृषी कायद्यांबाबत माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यासाठी हे आमदार आले होते. ते तिथे येणार याची माहिती कृषी आंदोलकांना होती. त्यांनी त्या जागेचा घेराव केला. आमदार नारंग पत्रकार परिषदेच्या स्थळी पोचताच हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यासोबत असलेले अजून दोन कार्यकर्ते पण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीत एका पोलिस अधिकार्यालाही जखम झाली आहे. नारंग पंजाबच्या अबोहर मतदार संघाचे आमदार आहेत.
आता प्रश्न असा निर्माण होतो की कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी लोकांना समजावून सांगण्यासाठी आमदार नारंग प्रयत्न करत होते. तर त्यांना मारहाण करण्याचे कारण काय? कृषी आंदोलक आणि त्यांचे समर्थक वारंवार म्हणत आहेत की चर्चा केली नाही, समजावून सांगितले नाही. मग आता कुणी यावर शांतपणे चर्चा करायला तयार आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये याबाबत जागृती करत आहेत तर यात नेमका आक्षेप काय आहे?
26 जानेवारीच्या हिंसक घटनेनंतर कृषी आंदोलनसाठी असलेली सामान्य माणसांची सहानुभूती पूर्णत: संपून गेली आहे. शेतकर्यांचा प्रतिसाद अतिशय अल्प असा आता शिल्लक राहिला आहे. आंदोलन भरकटले गेले आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलक विविध मार्ग हाताळून पहात आहेत.
राकेश टिकैत यांनी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत तिथे भाजप विरोधी प्रचार करण्याचा एक अपयशी प्रयत्न करून पाहिला. केवळ टिकैतच नाही तर योगेंद्र यादव, कॉ. हनन मौला, दर्शनपाल सिंग, मेधा पाटकर हे पण प.बंगालात पोचले होते. पण तिथे शेतकर्यांनी यांना प्रतिसाद दिला नाही. सिंगूर येथील सभेत न जाताच टिकैत विमान पकडून बंगालमधून पळून गेले. बाकीच्या नेत्यांनी घेतलेल्या सभांना अतिशय अल्प अशी उपस्थिती लाभली.
दुसरा प्रयत्न किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आला तो म्हणजे विविध राज्यांत जावून किसान पंचायत करण्याचा. त्या प्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान येथे अशा सभा घेण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही आता प्रतिसाद मिळत नाहीये. राजस्थान मधील सभेतील अतिशय अल्प उपस्थिती पाहून राकेश टिकैत कसे भडकले आणि कार्यकर्त्यांना काय काय बोलले याच्या सविस्तर बातम्या बाहेर आल्या आहेत.
आता हा तिसरा प्रकार म्हणजे आमदार नारंग यांना केलेली मारहाण. आपल्याकडे लक्ष वेधण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न किसान आंदोलक करत आहेत.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता हा प्रश्न सर्वौच्च न्यायालया समोर आहे. तेंव्हा न्यायालय जे काही सांगेत तो पर्यंत शांत बसणे याला दुसरा काहीच पर्याय नाही. एक वैचारिक अशी मांडणी या काळात सामान्य लोकांसमोर करण्याची मोठी संधी कृषी आंदोलकांच्या नेत्या कार्यकर्त्यांना होती. पण त्यांनी ती अगदी आरंभापासूनच गमावली आहे. मुळात आंदोलनाचा काहीच वैचारिक पाया नाही. त्याचा एक पुरावा तर आत्ताच नव्याने समोर आला आहे.
19 मार्च रोजी सरकारने डाळींच्या आयातीचा निर्णय घेतला. या निर्णयाने कोरडवाहू शेतीचे मुख्य उत्पादन असलेल्या डाळीचे देशांतर्गत भाव धाडकन कोसळायला सुरवात झाली. अपेक्षा ही होती की या आंदोलकांनी या निर्णयाची तातडीने दखल घेवून आयातीचा निषेध करायला हवा होता. एम.एस.पी. च्या गप्पा वारंवार करणारे हे लोक आता हे सांगत नाहीयेत की एम.एस.पी. पेक्षा खुल्या बाजारात डाळींचे भाव चढलेले होते. आयातीच्या निर्णयाने ते कोसळू लागले.
ज्या डाव्यांचा पाठिंबा या कृषी आंदोलनाला आहे ते पण कोरडवाहू शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहण्यास तयार नाहीत. ते आत्तापर्यंत ज्या बागायतदार पाणीवाल्या शेतकर्यावर टीका करत होते त्याच पंजाब हरियाणाच्या शेतर्यांसाठी आंदोलन करत आहेत. पण याच काळात डाळ पिकवणार्या कोरडवाहू शेतकर्याची बाजू मात्र लावून धरण्यास तयार नाहीत. यातूनही त्यांचे वैचारिक पितळ उघडे पडले आहे.
याच कृषी आंदोलकांनी हरिणात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करून पाहिला. कॉंग्रेसला हाताशी धरून विधानसभेत मनोहरलाल खट्टर सरकार विरोधात अविश्वास ठराव आणला. तो अर्थातच फेटाळला गेला. विरोधकांचीच 3 मते यात फुटल्याचे उघड झाले.
आता ज्या राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत त्यापैकी बंगालात तर यांचे तीन तेरा वाजलेच. पण असम, तामिळनाडू आणि केरळात तर हे जावूही शकले नाहीत. खरं तर प.बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तीनही राज्यांत भाजपेतर पक्षच सत्तेवर येण्याचे अंदाज सर्वेक्षणांतून समोर आले आहेत. तिथे भाजपेतर पक्षच अतिशय बळकट अशा स्थितीत आहेत. मग या आंदोलकांना मोठी संधी होती. यांनी आपला विषय तिथे या पक्षांच्या सहकार्याने मोठ्या जोरकसपणे सर्वसामान्य लोकांपर्यंत मांडायचा. पण यांनी जी बाब लपवली होती तीच आता उघड पडली आहे. हे आंदोलनच मुळात पंजबा हरियाणाच्या गहू तांदूळ पिकविणार्या शेतकर्यांपूरतेच मर्यादीत आहे. त्यासाठी भारतभरांतून पाठिंबा मिळणे केवळ अशक्य. या आंदोलनकांना ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत तेथील पीके कोणती आहेत आणि त्यांच्या काय समस्या आहेत याचीही पूरेशी जाणीव नाही. नंदीग्राम मध्ये राकेश टिकैत आणि त्यांच्या सोबत्यांची जी वैचारिक दांडी पत्रकारांनी उडवली ती सर्वांनी बघितली आहे.
हे आंदोलक मारहाण करणार असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक अशी कार्रवाई झाली पाहिजे. सर्वौच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर यांना तातडीने जे एक दोन रस्ते अडवून ठेवले आहेत ते तातडीने रिकाम करावेच लागतील. कारण शाहिन बाग प्रकरणांत तसाच निकाल आलेला होता.
कृषी आंदोलनाचे प्रवक्ते चॅनेलवरील चर्चेत जेंव्हा निरर्थक बडबड करताना दिसतात तेंव्हा लक्षात येते की आंदोलनाची हवा पूर्णत: निघून गेली आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी करत राहणे ही त्यांची मजबूरी आहे. त्यातूनच आमदाराला मारहाणी सारख्या घटना समोर येत आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल आणि सर्वौच्च न्यायालयाचा निकाल येताच यांचा गाशा पूर्णत: गुंडाळला जाईल अशीच शक्यता आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
यह सब कुजाट एक हे होंगे स्तरावर l ईनका दिमाग घुटने में होता है l
ReplyDeleteदिशाहीन आंदोलन
ReplyDelete