उरूस, 30 मार्च 2021
प.बंगाल आणि असमच्या पहिल्या फेरीचे मतदान 27 मार्चला पार पडले. त्याची जी अधिकृत आकडेवारी निवडणुक आयोगाने जाहिर केली आहे ती मोठी आशादायक आहे. पूर्वीच्या 79 % मतदानाच्या तुलनेत यावर्षी प. बंगालात पहिल्या फेरीत 30 विधान सभा मतदारसंघात 85 % मतदान झाले आहे. हीच आकडेवारी असमची मागच्या निवडणुकी इतकीच म्हणजे 80 % इतकी आहे.
या आकडेवारीसोबतच दुसरी जी बातमी आली अहो तीही फार सकारात्मक आहे. या मतदानाच्या काळात अतिशय कमी हिंसाचार झालेला आहे. जम्मु कश्मिर, हरियाणा, बिहार, प.बंगाल, असम आणि एकूणच ईशान्य भारत येथे निवडणुका हाच एक मोठा ताण प्रशासनावर असायचा. या ठिकाणी मतदारांना बाहेर न येवू देणे, मतदान केंद्र ताब्यात घेणे, बोगस मतदान घडवून आणणे, प्रचंड हिंसाचार रक्तपात होणे हे सर्व आपण इतकी वर्षे अनुभवत आलेलोे आहे. पण गेली काही वर्षे या सर्व ठिकाणच्या निवडणुका सुरळीत पार पडत आहेत. मतदानाची टक्केवारीही वाढलेली आहे. प.बंगालात ज्या काही घटना हिंसाचाराच्या समोर आल्या आहेत त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा दलांनी नियंत्रण मिळवले. हिंसाचार फोफावू दिला नाही.
यातून हे सिद्ध होते की सामान्य लोकांचा भारतीय लोकशाहीवर नितांत विश्वास आहे. नव्हे ती त्यांची श्रद्धाच आहे. शहरी भागापेक्षा नेहमीच ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात मतदान जास्त होत आलेले आहे. याच मार्गाने आपण आपला विकास साधू शकतो, सन्मानाने जीवन जगू शकतो, हेच एक प्रभावी हत्यार आपल्या हातात आहे असा विश्वास सामान्य भारतीय नागरिकांना वाटत आलेला आहे. आणि तेच त्यांनी सिद्ध केले.
याचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी कॉंग्रेसेच सर्वोच्च नेते राहूल गांधी यांनी एका आंतरराष्ट्रीय वेबीनार मध्ये आपले मत मांडताना भारतीय लोकशाहीवर विनाकारण शिंतोडे उडवले होते. भारतात लोकशाही शिल्लक राहिली नाही असा त्यांचा दावा होता. विनोद म्हणजे ज्या दोन राज्यांत पहिल्या फेरीचं मतदान झाले त्या दोन्ही राज्यांत त्यांचाच पक्ष प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यातील पश्चिम बंगाल मध्ये तर राहूल गांधी प्रचारासाठी फिरकलेही नाहीत. असम मध्ये त्यांच्या पक्षाची परिस्थिती खुपच चांगली होती. तिथे त्यांनी अजून जोर लावला असता तर त्यांची सत्ताही येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते. पण हे काहीच न करता राहूल गांधी ट्विटरवर, वेबीनारमध्ये, मुलाखतींमध्ये लोकशाहीच्या नावाने बोंब मारत बसले आहेत.
राहूल गांधी आणि त्यांच्या मताला दुजोरा देणारे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते, त्यांची री ओढणारे पुरोगामी पत्रकार विचारवंत या सर्वांना सामान्य मतदाराने एक जोरदार थप्पड मारली आहे. कुठलीही तोंडपाटीलकी न करता या सामान्य माणसांनी आपल्या कृतीतून असा संदेश दिला आहे की लोकशाही मुल्यांची जपणूक आम्ही प्राणपणाने करत आहोत. तूम्हाला करता येत नसेल तर तूम्ही बाजूला व्हा. पर्याय म्हणून इतर राजकीय पक्षांना आम्ही स्थान देतो आहोत. निरोगी लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्ष हवा आहे याची संपूर्ण जाण आम्हाला आहे. त्यासाठी काय करायचे हे पण आम्हाला कळते. हा भाजपेतर विरोधी पक्ष म्हणजे कॉंग्रेसच आहे. त्याशिवाय दुसरा कुणी नाही या तूमच्या भ्रमांतून तूम्हीच बाहेर येण्याची गरज आहे. असेच जणू हा सामान्य मतदार मुकपणे यांना ठामपणे सांगतो आहे.
प. बंगालात तृणमुल, तामिळनाडूत डिएमके आणि केरळात डावी आघाडी यांची सत्ता येण्याचे अंदाज पूर्वीच ओपिनियन पोल मधून समोर आलेले आहेत. म्हणजे ही निवडणुक विरोधी पक्षांना राज्यां राज्यांतील सत्ता देवून लोकशाही बळकट करण्याचेच सुचीत करते आहे. मग हे तथाकथित पुरोगामी गळा का काढत आहेत? कॉंग्रेसला सत्ता मिळाली तरच लोकशाही बळकट असते का?
बरं यासाठी स्वत: कॉंग्रेसचे नेतृत्व आणि त्यांचे प्रमुख इतर नेते हे काय करत आहेत? केरळात चाको सारखे ज्येष्ठ नेते आणि महिला आघाडीच्या लतिका सुभाष यांनी पक्षाविरूद्ध उभारलेला बंडाचा झेंडा काय सुचवतो? ज्या केरळात कॉंग्रेसचे सत्ता येण्याची शक्यता होती. तिथेच पक्षांतील बंडखोरी हाताच्या बाहेर गेली आहे. तामिळनाडूत डिएमके सोबतची आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता आहे. तिथेही कमी जागा लढवायला मिळाल्या म्हणून प्रदेश कॉंग्रेस कमिटीत नाराजी समोर आली. पुद्दुचेरीत तर पक्ष सत्तेवर होता आणि आपल्याच हाताने निवडणुकीच्या तोंडावर सत्ता गमावली.
प.बंगाल मध्ये फुर्फुरा शरिफच्या पीरजादा आब्बास सिद्दीकी यांच्या सेाबतच्या निवडणुक आघाडीमूळे मोठी नाराजी सहन करावी लागते आहे. हीच बाब असम मधील बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षासोबतच्या युतीमुळे घडताना दिसत आहे.
गेली 2 वर्षे आपल्या पक्षाचा अध्यक्ष निवडता न आलेले नेते भारतातील लोकशाहीवर खोटे आसु गाळत आहेत. हा एक मोठा विरोधाभासच आहे.
प.बंगाल आणि असम मधील मतदानाच्या मोठ्या आकड्यांनी मोठे आशावादी चित्र समोर आणले आहे. पुढील टप्प्यातही मतदान असेच चांगले हिंसाचार रहित होईल ही अपेक्षा.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment