Sunday, March 14, 2021

सुरेश भटांची आमच्या शाळेतील आठवण

 


उरूस, 14 मार्च 2021 

आज सुरेश भटांचा स्मृती दिन. त्यांना जावून आता 18 वर्षे झाली. आजही त्यांच्या आठवणीत सोहळे साजरे होतात. 

त्यांची एक अतिशय सुंदर आठवण बाल विद्या मंदिर परभणी या माझ्या शाळे बाबतची  आहे.  परभणीला स्टेडियमवर भव्य असा कविसंमेलन मुशायरा साजरा व्हायचा. माझे वडिल त्या समितीचे संस्थापक सचिव प्रमुख कार्यकर्ते. त्यामुळे मराठी कवी परभणीला यायचे तेंव्हा त्यांच्याशी बाबांचा वैयक्तिक स्नेह जमायचा. बाबांना शायरीची मराठी कवितेची चांगली आवड असल्याने हा रसिकत्वाचा धागा कविंना बाबांशी बांधून ठेवायचा. 

1985 च्या जानेवारी महिन्यात परभणीला कविसंमेलनासाठी भटांना बोलावले होते. ते माझ्या घरी आले. त्यांचा नविन कवितासंग्रह ‘एल्गार’ या पूर्वीच बाबांना त्यांनी सप्रेम भेट म्हणून पाठवला होता. आमच्या बैठकीत कवितेची एक छानशी मैफलही झाली. हे सर्व आमच्या जवळच राहणार्‍या हंसाबाई (सौ. उज्ज्वला कुरूंदकर या माझ्या मराठीच्या शिक्षीका. त्यांना आम्ही माहेरच्या नावानेच संबोधायचो.) यांनी भटांना आमच्या घरी आलेलं पाहिलं. त्या स्वत: अतिशय चांगल्या कविता लिहायच्या. त्यांना बाबांची साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातली सक्रियता माहित होती. त्यांनी आणि आमचे मराठीचे शिक्षक कथाकार गणेश घांडगे यांनी आमचे मुख्याध्यापक माधव पोटेकर सरांपुढे असा प्रस्ताव मांडला की सुरशे भटांना आपल्या शाळेत काव्यगायनासाठी आमंत्रित करावे. पोटेकर सरांनी लगेच याला मंजूरी दिली. त्यांचे परभणीच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रावर अतिशय बारीक असे लक्ष असायचे. 

पण मुख्य अडचण अशी होती की भटांना बोलवायचे कुणी? भटांच्या विक्षिप्तपणाचे भरपूर किस्से तोपर्यंत सर्वत्र पसरले होते. त्यांचे मानधन प्रचंड आहे. एका एका गाण्यासाठी ते किती पैसे घेतात. ते फारच व्यवसायिक आहेत वगैरे वगैरे. हंसाबाईंनी जरा डोकं लढवलं. आपण हे काम श्रीकांतला सांगू असे त्यांनी पोटेकर सरांना सुचवले. 

खरं तर या मोठ्या माणसांत माझ्यासारख्या पोराचे नाव पुढे येण्याची गरज नव्हती. पण माझं नाव पुढे आलं त्याला एक छोटंसं कारण घडलं होतं. शाळेत मराठीच्या पेपरला माझा आवडता कवी म्हणून निबंधासाठी विषय दिला होता. तेंव्हा मी सुरेश भटांवर अतिशय सुरेख (अर्थात माझ्या दृष्टीने) निबंध लिहिला होता. त्यात भटांच्या त्यांनी बाबांना सप्रेम भेट दिलेल्या एल्गार पुस्तकांतील कितीतरी कवितांच्या ओळीच्या ओळी दिल्या होत्या. मला भटांच्या इतक्या कविता पाठ आहेत याचे कौतूक हंसाबाईंना होते. त्यांनी तो निबंध शाळेच्या स्टाफरूम मध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांच्या समोर वाचून दाखवला. त्यामुळे भटांना बोलावण्याची जबाबदारी याच्यावरच टाकावी असे ठरले. 

दुसरंही एक कारण घरातले होते. तूमच्या कविता याला पाठ आहेत असं कौतुक बाबांनी भटांसमोर केल्यामुळे माझी कॉलर तशीही ताठ झाली होती. हा 9 व्या वर्गातला पोरगा आपल्या कवितेवर प्रेम करतो म्हटल्यावर भटांनी मला प्रेमाने जवळ घेतले. माझ्या पाठीवर हात ठेवला. पुढे परभणीत ते आल्यावर त्यांच्या जाहिर कार्यक्रमांसोबतच घरगुती मैफीलिंना मी आवर्जून जायचा तेंव्हा ते मला प्रेमाने जवळ बसवून घ्यायचे. 

भटांना शाळेतल्या कार्यक्रमाचे आमंत्रण कसे देवू असं बाबांना विचारल्यावर ते म्हणाले की मी तूला त्यांच्या हॉटेलपाशी सोडतो. तू कुणालाही बरोबर घेवू नकोस. सरळ त्यांना विनंती कर. लहान मुलाने आमंत्रण दिल्यावर ते नाकारणार नाहीत. शिवाय कुठलीही अट घालणार नाहीत. बाबांचा हा वकिली सल्ला मी अवलंबला. त्यांची विश्रांती झाली आहे हे कळल्यावर त्यांच्या खोलीत गेलो. त्यांना शाळेत येण्याची विनंती केली. वेळ तूमच्या सोयीनं सांगा असंही बोललो. बाबांची क्लुप्ती कामा आली. भटांनी तातडीने होकार दिला. मला आनंद झाला. धावत त्या हॉटेलच्या जीन्यांवरून खाली आलो. हंसाबाईंच्या घरी जावून भटांनी होकार दिला असून उद्या दूपारची वेळ ठरल्याचे सांगितले. त्या खुपच खुश झाल्या. 

आता मोठा प्रश्‍न उभा राहिला भटांना शाळेत आणायचे कसे? तेंव्हा वाहने फारशी नव्हती. मग रिक्शात आणायचे ठरले. मी आपला सायकलवर पोटेकर सरांनी सांगितलेला त्यांच्या ओळखीच्या रिक्क्षा घेवून हॉटेलवर गेलो. भटांना चलण्याची विनंती केली. रिक्क्षात येवू शकाल का? असे विचारलेही. ते नेमक्या कुठल्या मस्त मुडमध्ये होते कळले नाही पण त्यांनी होकार दिला. भटांचे वजन प्रचंड. ते रिक्क्षात बसल्यावर मला रिक्क्षावाल्याची दयाच आली. 

आमची वरात शाळेत पोचली. रिक्क्षा सरळ मुख्याध्यापकांच्या केबीन जवळ नेली. भटांना सरांकडे घेवून गेलो. दुपारची वेळ होती. जानेवारीतले आल्हाददायक दिवस. शाळेच्या नविन बांधलेल्या सिमेंटच्या वर्गांसमोर (बाकी शाळा टपरी म्हणजे लाकडी फळ्या आणि वर पत्रं अशी होती) मोठा कॅरिडोर होता. तिथेच छानशी व्यवस्था केली होती. तख्त जोडून मंच केला होता. समोर सतरंज्यावर खच्चून मुलं मुली शिक्षक यांनी गर्दी केली होती.  

भटांची औपचारिक ओळख गणेश घांडगे सरांनी करून दिली. स्वागत वगैरे झाले. हंसाबाईंनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आणि माईक भटांच्या हवाली केला. पुढचे दोन तास भटांनी मनसोक्त कविता वाचल्या, गायल्या, आठवणी सांगितल्या. ‘गोठ्यात इंदिरेच्या आता गाय दादा’ ही त्यांची तेंव्हा गाजलेली राजकीय कविता जी पुस्तकांत नव्हती मी तिथेच ऐकली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची ‘संपून राख गेली हाडे विकून झाली, ते मागतात आता आपापली दलाली’ ही कविताही तिथेच पहिल्यांदा ऐकलेली मला चांगले आठवते. त्यांच्या बाकी सुंदर कविता तर होत्याच. भट एरव्ही मंचावरून सादर करायचे नाहीत त्या कविताही त्यांनी म्हटल्या. आम्ही आपले पुढे बसून फर्माईश करत होतो. भट आमची मागणी पुरी करत होते. 

अतिशय रंगलेला हा कार्यक्रम संपला. आमचे मुख्याध्यापक वेगळ्याच कारणांनी अडचणीत आले होते. भटांना मानधन काय द्यायचे?  ठरले तर काहीच नव्हते. शिवाय भटांनी अटीही काहीच घातल्या नव्हत्या. पोटेकर सर मला म्हणाले त्यांना मानधनाचे विचार. माझी तर काहीच हिंमत होईना. शेवटी हंसाबाईंनी सरांना पाकिटांत काही रक्कम घालून श्रीकांत जवळ द्या. तो भटांना देईन. असे सुचवले. त्याप्रमाणे पोटेकर सरांनी एक पाकिट माझ्या हातात दिले आणि भटांना द्यायला सांगितले. मी आपला चाचरत घाबरत भटांना म्हणालो, ‘हे मानधन... ’ पुढे मला काहीच बोलता येईना. भट मस्त हसले. त्यांना सर्व अडचण कळली असणार. माझ्या हाताने पाकिट देण्याची किंवा माझ्याच तोंडून निमंत्रण देण्याची सगळी खेळी कदाचित लक्षात आली असणार. त्यांनी आपल्या खिशातून एक रूपयाचे नाणे काढले. त्या पाकिटावर ठेवले आणि मला म्हणाले, ‘ही तूझ्याच शाळेला देणगी..’ मला कळेच ना काय प्रतिक्रिया द्यावी ते. ‘अरे घे रे.. मी मानधन नाही घेणार तूझ्या शाळेकडून.’ आमचे मुख्याध्यापक, हंसाबाई, उपमुख्याध्यापक औंढेकर सर, गणेश घांडगे असे सगळे भटांच्या या कृतीने चकितच झाले. मधल्या मध्ये उगाचच माझा भाव वाढून गेला. 

त्याच दिवशी संध्याकाळचे जाहिर कविसंमेलन भटांनी गाजवले. त्याची आठवण सगळे अजूनही काढतात. पुढे एकदा भर पावसात कविसंमेलन उधळण्याच्या बेतात आले होते तेंव्हा सर्व कवी व रसिक मिळून मंचावरून स्टेडियच्या आतल्या लहानश्या जागेत गेले. आणि तिथे साध्या सतरंजीवर बसून कुठल्याही माईकशिवाय चार तास कविसंमेलन कसे रंगत गेले याच्या आठवणीही सगळे अजून सांगतात.

पण माझ्या आठवणीत मात्र आमच्या शाळेत रंगून कविता सादर करणारे भटच रूतून बसले आहेत. भटांनी बाबांना दिलेल्या पुस्तकावरच्या त्यांच्या स्वाक्षरीवर हात फिरवताना मोरपिसावर हात फिरवल्यासारखे वाटते. भट गेले, पोटेकर सर गेले, हंसाबाई तर चटका लावून अचानक गेल्या. 

ही आठवण मनात अजूनही भटांच्या कवितेसारखीच तशीच ताजी टवटवीत राहिली आहे.    


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


8 comments:

  1. मनोज्ञ आठवण आहे !

    ReplyDelete
  2. GREAT OLD MEMORY &
    MR. UMARIKAR YOUR CONTRIBUTION WAS ALSO GREATEST.

    ReplyDelete
  3. एकदम छान आठवण .... आम्ही त्यावेळेस संभाजीनगरात होतो.परंतू एकदा भावाला भेटण्यासाठी भटांच्या घरी नागपुरात जाण्याचा योग आला होता. एवढंच आठवतंय

    ReplyDelete
  4. सुंदर आठवण आणि हा काव्यमय प्रवास आपल्या वाट्याला आला, आपल्याला आवड आहेच पण हे खरंच भाग्याने घ्यावं लागतं

    ReplyDelete