Thursday, March 18, 2021

दु:खा जावे शरण असे की । बांधापाशी धरण जसे की ॥



उरूस, 18 मार्च 2021 

गेली 10 वर्षे मी क्वेस्ट फॉर फ्रिडम हा ब्लॉग चालवतो आहे. नुकताच 3 लाख दर्शकांचा टप्पा पार केला. त्यानंतर असं लक्षात आलं की आपण विविध विषयांवर लिहितो पण ज्याला सर्वात कमी प्रतिसाद मिळतो त्या साहित्य क्षेत्रावरच काहीतरी लिहावं. त्यातही लक्षात आलं की कवितेला सगळ्यात कमी प्रतिसाद मिळतो. जसं आजारी अपंग लेकरू आईचं लाडकं असतं. किंवा त्यातच तिचा जीव अडकलेला असतो. कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ मधील एक फार सुंदर कविता आहे

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणि करते व्याकुळ केंव्हा
त्या माज घरांतील मंद दिव्यांची वात

आज मलाही या 3 लाख दर्शकांच्या झगमगाटात सगळ्यात कमी ज्या विषयाला प्रतिसाद मिळाला तो कवितेचा प्रांतच जास्त आठवतो आहे. कळत नाही असं का होतं. खुप आनंदाच्या प्रसंगीही दु:ख आपल्याला चिटकून बसलेलं असतं. किंवा आपणच दु:खाला कवटाळून का बसलेलो असतो? नुकताच औरंगाबाद शहरात पीर बाजार कडून वेदांत हॉटेल (आताचे व्हिटस) कडे जाणार्‍या रस्त्यावर अतिशय देखणा सुर्यास्त बघायला मिळाला. कुसुमाग्रजांनी टागोरांच्या कवितेचा जो अनुवाद केला त्यातील एक शब्द ‘दिन मावळता’ माझ्या डोक्यात घुसून बसला होता. हाच शब्द मनात घोळायला लागला. त्याला जोडून पुढच्या ओळी तयार झाल्या. एक लय गेले काही दिवस सारखी घुमत आहे. त्याच लयीत घोळून घोळून हे शब्द समोर आले. 

दिन मावळता । उगवून येते ।
दु:ख सनातन । काळजातूनी ॥
सांत्वन फुंकर । कितीही घाला ।
बसते हटूनी । ठणकत आतूनी ॥

मना वाटते । दु:ख पांगळे ।
चालत चालत । जाईन कोठे ॥
दु:ख बेरके । हुकवूनी टाकी ।
सर्व अडाखे । छोटे मोठे ॥

जानेवारी महिन्यात पैठणला नाथ सागरावर गेलो होतो. पहाटे त्या अथांग पाण्यापाशी एक वेगळीच अनुभूती आली आणि त्यावर एक कविता सुचली. तोही लेख याच ब्लॉगवर टाकला आहे. याच साठलेल्या पाण्याची एक वेदना या नविन कवितेत जाणवली. वाहत्या पाण्याला रोकून ठेवल्याने काय होते? हळू हळू हे पाणी धरणाचे दरवाजे उघडून वाहू दिली जाते आणि त्यातून येणारी एक वेगळीच अनुभूती लक्षात आली.

सोडूनी द्यावा । हट्ट आपुला ।
दु:खा जावे । शरण असे की ॥
वाहणे विसरून । बांधापाशी ।
पाणी गुपचूप । धरण जसे की ॥

साठू द्यावा । सोशिकतेचा ।
तुंबारा हा । अथांग मागे ॥
त्या दाबाने । पीळे उसवूनी ।
दु:खाचे हे । विरती धागे ॥

दार उघडता । दु:ख जरासे ।
वाहू लागते । हळू हळू ॥
कोंब उगवतो । रसरशीत हा ।
जीर्ण शीर्ण । लागते गळू ॥

दु:खाचे एक सनातन रूप आपोआप शब्दांतून उमटत गेले. जगण्याच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच सनातन दु:ख. ते तर चिटकून राहणारच आहे. उलट या दु:खामुळेच आपले मन ताळ्यावर राहते. 

कितीही ढकला । चिटकून राहते ।
हृदयापाशी । दु:ख सनातन ॥
आपुल्या नकळत । सदैव ठेवी ।
ताळ्यावरती । भरकटले मन ॥

माझ्या ब्लॉगवर कवितांवरच्या सर्व लेखांना प्रतिसाद दिला त्यांच्या रसिकतेला ही कविता विनम्रपणे अर्पण. 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

3 comments:


  1. जपावे काही ,मित्र नजिकचे,
    कवाड किलकिले,करा मनाचे,
    दार उघडता,दु:ख मनीचे ,
    वाहू लागते,हळू हळू ,
    निचरा होतो,काही पळातच,
    आनंद जलधी ,भरे मनातच ||


    ReplyDelete
    Replies
    1. व्वा किती सुंदर.. कवितेतूनच प्रतिसाद!

      Delete
  2. नक्कीच सर ..अप्रतिम रचना..आज प्रत्येक जण नैराश्याच्या खाईत लोटला गेला आहे...आतली आत स्वतःला खात आहे..स्वता भोवती दुःखाचे कोण्या प्रमाणे जाळे विनंत आहे..नंतर त्याला त्यातुन बाहेर पडण अशक्य होत

    ReplyDelete