Wednesday, April 28, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ११

उरूस, 28 एप्रिल 2021 

उसंतवाणी-31

( बनारस घराण्याचे महान गायक पं. राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन झाले. राजन साजन मिश्रा हे बंधू जोडीने गायन करायचे. राजन मिश्रा गेल्याने साजन मिश्रा यांचा सुर एकाकी झाला. त्यातून या उसंतवाणीचे हे करूण सुर उमटले. )

राजन साजन । बाणे बहराचे ।
झोके हे सुराचे । झुलविले ॥
राजन स्वर्गात । पोचे दूर दूर ।
साजनचा सुर । एकाकी हा ॥
शंकराभरणं । केवढी आर्तता ।
भक्तीची पूर्तता । सुरांमध्ये ॥
जुगलबंदी हे । जरी नाव भासे ।
गोफ विणलासे । दोन सुरी ॥
काशी विश्वनाथ । आज शांत शांत ।
गंगेचा आकांत । ऐकवेना ॥
‘बिस्मिल्ला’‘गिरीजा’। पुरबी हे अंग ।
बडा ख्याल रंग । तैसाची हा ॥
कांत म्हणे देवा । तुला लाज थोडी ।
फोडिलीस जोडी । गंधर्वाची ॥
(26 एप्रिल 2021)

उसंतवाणी-32

(कोरोना लस बाबत महाराष्ट्र सरकारचे तीन मंत्री आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, नवाब मलिक यांनी भिन्न भिन्न मत प्रदशन करून गोंधळ उडवून दिला. लस मोफत की विकत याची कसलीच स्पष्टता त्यातून झाली नाही. )

विकत फुकट । कोरोनाची लस ।
चाले जोरकस । चर्चा ऐसी ॥
सोनिया मातेचा । आदेश जोरात ।
बोलले थोरात । मुफ्त वाटा ॥
बोले आदुबाळ । चिमखडे बोल ।
किमतीचा घोळ । कळेचीना ॥
कोण बोलते हे । हड्डी मे कबाब ।
मलिक नवाब । कडाडले ॥
कशाचा ना मेळ । गावची रे जत्रा ।
कारभारी सत्रा । मनमानी ॥
टोपे बोले नाही । नॅशनल न्युज ।
सत्तेची ही सुज । जाणवते ॥
कांत पंक्चरली । तिघाडीची रिक्क्षा ।
रूग्ण सोसे शिक्षा । मरणाची ॥
(27 एप्रिल 2021)


उसंतवाणी-33 

(ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याचे उत्पादन या बाबत प्रचंड असा गदारोळ खरा खोटा प्रचार बातम्या यांना मोठा ऊत आला. यातच पुरोगामी मोदी सरकारच्या नावाने बोंब ठोकायला पुढे सरसावले. बंगालात मतदानाची सातवी फेरी पार पडली. तिच्याच 78 टक्के इतके विक्रमी मतदान शहरी भागात झाले. 4 दिवसांपासून कोरोनाचा आलेख उतरायला सुरवात झाली. )  

किती केली बोंब । वाजविले ढोल ।
मौत का माहोल । म्हणू म्हणू ॥
देश ढकलला । मृत्यूच्या खाईत ।
घेतले घाईत । मतदान ॥
गद्दार निघाले । परी लोक सारे ।
देईनात नारे । विरोधाचे ॥
बंगालात वाढे । मतदान टक्का ।
लिब्रांडूंना धक्का । जोरदार ॥
कोरोना हरामी । देईना रे साथ ।
ग्राफ उतारात । निघालेला ॥
प्राणवायु सोय । लागे हळू हळू ।
धैर्य लागे गळू । पुरोगामी ॥
खाण्यासाठी लोणी । कोरोना टाळूचे ।
कपट टोळीचे । कांत म्हणे ॥
(28 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment