Thursday, April 22, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९

   
उरूस, 19 एप्रिल 2021 

उसंतवाणी-25

(पाहता पाहता उसंतवाणीच्या अभंगांची संख्या 25 झाली. रसिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद चकित करणारा आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा अभंग लिहिला.) 

‘उसंतवाणी’ची । झाली पंचविशी ।
कौतुकाच्या राशी । पदरात ॥
आप्त मित्र सारे । सांगती प्रेमाने ।
लिहावे नेमाने । एैसे सदा ॥
चालू घडामोडी । मांड अभंगात ।
येवू दे रंगात । शब्द खेळ ॥
राजकिय किंवा । सामाजिक बरा ।
मिश्किल हा जरा । उपहास ॥
शब्दांचा आसुड । प्रबोधनासाठी ।
कडाडू दे पाठी । असत्याच्या ॥
तुळशीच्या पाशी । पेटविली वात ।
करण्यास मात । तमावरी ॥
कांत म्हणे माझी । छोटी ही ओंजळ ।
भावना प्रांजळ । काठोकाठ ॥
(20 एप्रिल 2021)

उसंतवाणी-26

(कुंभ मेळ्याची सुरवातच अकबराने केली. त्याने पहिले स्नान केले आणि मग साधुंनी स्नान केले म्हणून त्याला शाही स्नान म्हणतात असा अफलातून शोध ऍड. असीम सरोदे यांनी एका ट्विट द्वारे लावला. त्यावर त्याला प्रचंड ट्रोल केल्या गेले. इतके की त्याला आपले ट्विटर बंद करावे लागले. एक दिवसांनी त्याने ते परत सुरू केले. त्यावरची ही रचना. )

अकबरे केला । कुंभमेळा सुरू ।
बोले चुरू चुरू । ‘अफिम’ हा ॥
लाविता डुबकी । गंगेच्या पाण्यात ।
झाली सुरूवात । शाही स्नाना ॥
औरंग्या करितो । आषाढीची वारी ।
चातुर्मास धरी । जहांगीर ॥
बाबराच्या कडे । देवी नवरात्र ।
घरी अग्निहोत्र । निजामाच्या ॥
अफजल खान । थोर देवी भक्त ।
म्हणूनीच रक्त । सांडियले ॥
खोडसाळ चाले । ट्विटर ट्विटर ।
हाणावे खेटर । पुराव्याचे ॥
जयाची ना श्रद्धा । बसावे की शांत ।
काढू नये वांत । कांत म्हणे ॥
(21 एप्रिल 2021)

उसंतवाणी-27

(कोरोनाच्या उदास निराश काळात वसंत ऋतुत निसर्ग बहरून आलेला माझ्या आजूबाजूला दिसायला लागला. या निसर्ग किमयेने मी चकित झालो. अगदी माझ्या आजूबाजूला जी सुंदर झाडे आहेत त्यावरचा वसंत ऋतू पाहून हा अभंग रचला. बहाव्यावर एक स्वतंत्र कविता आधी मला सुरली होती. )

नसर्गाला कुठे । करोना कळतो ।
फुलतो फळतो । वसंत हा ॥
खुलतो बहावा । धम्मक पिवळा ।
पळसाची कळा । निराळीच ॥
गुलमोहरा ये । लाल लाल पुर ।
कोकिळेचा सुर । अंब्यावरी ॥
लिंब मोहोराचा । भारणारा गंध ।
श्‍वास झाला धुंद । मोगर्‍याचा ॥
चालताना वाटे । वाटसरू फसे ।
पानाआड हसे । सोनचाफा ॥
आठवण दाटे । तान्हुल्या बाळाची ।
पर्ण पिंपळाची । कोवळीक ॥
कांत म्हणे घ्यावा । वसा फुलण्याचा ।
सोसून उन्हाचा । बाण उरी ॥
(22 एप्रिल 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

    

No comments:

Post a Comment