Monday, April 5, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास - भाग १

उरूस, 5 एप्रिल 2021 

मराठवाडा ही संतांची आणि उसंतांची भूमी आहे असं फ.मुं.शिंदे गंमतीत म्हणायचे. त्यांच्या या शब्दाचा पुढे आम्हाला एक अतिशय चांगला उपयोग झाला. रविंद्र तांबोळी हा मित्र उपहास अतिशय चांगला लिहायचा. शेतकरी संघटक या पाक्षिकासाठी एखादे असे उपहासात्मक सदर चालव असं त्याला सुचवले. त्यात संत ठोकाराम नावाने त्याने काही अभंग लिहिले. त्या लेखांचे पुस्तक झाले तेंव्हा त्याचे नावच आम्ही ‘उसंतवाणी’ असे ठेवले. 

उसंतवाणी हा शब्द तेंव्हापासून माझ्या डोक्यात ठसून बसला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत एका लेखात मी उपहासात्मक अभंग लिहिला. पुढे मग असे अभंग गेले काही दिवस समाज माध्यमांवर लिहित आहे. आपसुकच उसंतवाणी हेच नाव त्या मालिकेला द्यावे असे सुचले. 

राजकिय उपहास मराठीत अतिशय चांगला लिहिला गेला आहे. पण सातत्याने राजकिय उपहासाची कविता मात्र लिहिल्या गेली नाही. रामदास फुटाणे यांनी आपल्या वात्रटिकांच्या माध्यमांतून हा विषय जिवंत ठेवला. त्याचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. ब्रिटीश नंदी (प्रविण टोकेकर) आणि तंबी दुराई (श्रीकांत बोजेवार) यांच्या उपहासात काही अतिशय सुंदर अशा कविता येवून गेलेल्या आहेत. संजय वरकड या माझ्या पत्रकार मित्राने ‘वरकडी’ हे राजकिय विडंबनाचे सदर दीर्घकाळ चालवले. या कविताही मला आवडत आलेल्या आहेत.

समाज माध्यमांवर त्या त्या वेळी घडलेल्या प्रसंगांवर मी अशा विडंबन कविता अशात लिहितो आहे. त्या एकत्रित स्वरूपात दिल्या तर वाचायला बरे अशी काही वाचका मित्रांनी मागणी केली. त्यानुसार या कविता एकत्रित काही भागात देतो आहे. या कवितेचे आयुष्य फार अल्प असते. त्या त्या वेळचे ते संदर्भ असतात. काही काळांनी या कविता कुणी वाचेल तर त्याला सगळेच संदर्भ लागतील असे नाही. म्हणून त्या खाली तारीख देत आहे. म्हणजे संदर्भच शोधायचे असतील तर ते सोयीचे पडेल. शिवाय प्रत्येक कवितेच्या सुरवातीला थोडक्यात ते प्रसंग आणि त्यावेळची परिस्थिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे वाचकांना हे आवडेल. सोशल मिडियावर याला मोठा प्रतिसाद मिळाला आहेच. या विडंबनांना कसा प्रतिसाद मिळतो आहे याचीच एक बातमी फोकस इंडिया या पोर्टलने केली होती. संपादक संतोष कुलकर्णी यांचे आभार.  (यातील काही रचना पूर्वी लेखात आलेल्या आहेत)

उसंतवाणी-1

(राहूल गांधी यांनी ऑनलाईन एका मुलाखतीत आणीबाणी ही चुक असल्याचा उच्चार केला. मग कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर जे आजतागायत आणीबाणीचे समर्थन करत आले आहेत यांची पंचाईत झाली. त्या संदर्भातील हे विडंबन. केतकर परदेशी विद्यापीठांत आमंत्रित प्राध्यापक म्हणून जायचे. पण भारत सरकारने अशा काही व्यक्तींवर बंधने आणली. अर्थात त्यात केतकरांचे नाव नाही. पण तोही एक संदर्भ आहे. शिवाय अशा वेबिनारमध्ये कुणाला बोलवायचे यावरही काही नियम मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घातले आहेत. त्यावरही ओरड पुरोगाम्यांनी सुरू केली आहे.)

आज्जीची ती चुक । लादे आणीबाणी ।
राहूलची वाणी । उमटली ॥
‘कुमार’ अवस्था । हो केविलवाणी ।
गावी कशी गाणी? । आणीबाणीची॥
गाउन आरती । जीभेला ना हाड ।
कौतुकाचे झाड । ओठांवर ॥
आंतर राष्ट्रीय । कटाचा हा भाग ।
नशिबात भोग । काय आला ॥
राहूलही त्यात । अडकला असा ।
फेकला हा फासा । कसा कुणी ? ॥
परदेशी जावे । कराया चिंतन ।
विचार गहन । लोकशाहीचा ॥
हूकुमशहा तो । अडवितो मोदी ।
पत्रकार गोदी । भंडावती ॥
उतार वयात । अवस्था सुमार ।
बेजार ‘कुमार’ । कांगरेसी ॥
दास‘कांत’ म्हणे । हाणा दोन लाथा ।
बुद्धिवंत माथा । कुजलेला ॥
(5 मार्च 2021)

उसंतवाणी-2

(ओवैसींचा पक्ष बंगालात निवडणुक लढवणार अशी हवा आधीपासून केल्या गेली. पण प्रत्यक्षात त्यांच्या बंगाल शाखेत फुटाफुट झाली. अध्यक्ष जमीर-उल-हसन यांनीच पक्ष सोडला. ज्या पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्यावर भरोसा ठेवून ओवैसींनी राजकिय डावपेच आखले होते त्यांनी आपला स्वतंत्र पक्षच स्थापन केला आणि कॉंग्रेस डाव्यांसोबत स्वतंत्र आघाडी करून निवडणुक लढवत आहेत.)

ओवैसींचा पक्ष । बंगालात फुटे ।
राजकीय तुटे । स्वप्न सारे ॥
बंगाली भाषेने । उतरीला आज ।
उर्दूचा हा माज । हुगळीकाठी ॥
हैदराबादेत । बिर्याणीची सत्ता ।
तिला कोलकोत्ता । ओळखेना ॥
ओवैसी काढतो । हिरवे फुत्कार ।
त्याचा ना सत्कार । बंगालात ॥
बक बक इथे । करू नको जादा ।
बोले पीरजादा । फुर्फुराचा ॥
दास ‘कांत’ म्हणे । गाठू नये टोक ।
पदराला भोक । राजकीय ॥
(8 मार्च 2021)
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

2 comments:

  1. आचार्य अत्रे यांचे राजकीय विडंबन काव्याचे पुस्तक परचुरे प्रकाशानानी प्रसिद्ध केले. प्रा. वसंत बापट यांनी विसाजीपंताची बखर व पु ल देशपांडेंनी राजकीय गोंधळावर लेख लिहिले. . लोकसत्तेमध्ये मिरासदार पण सुंदर लिहीत.

    ReplyDelete
  2. खरेतर मराठी साहित्यातील वाद विवाद आणि उपरोध उपहासाची परंपरा पूर्णपणे लोपली आहे .

    आपण आमचे मित्र असूनही आमच्या दुर्लक्षित उसंतवाणीला पुन्हा खळखळत्या स्वरूपात आणून आमची उसंत घालवली आहे !

    हा शब्द आपण शोधला त्याला 11 वर्षे झाली ।
    संथपणे तो कुठेतरी रेंगाळत होता .

    आमचे उसंतवाणी हे पुस्तक "कृषीविषयक"म्हणून ओळखले गेले आणि आम्ही तिथेच हाय खाल्ली ।

    आता आपली वाणी तरी योग्य अर्थाने घेतली जावी एवढेच ।

    ReplyDelete