उरूस, 11 एप्रिल 2021
उसंतवाणी-13
(सचिन वाझे यांच्या पत्रात विविध मंत्र्यांचे उल्लेख आले आहेत. त्याने महाविकास आघाडी सरकार भयंकर अडचणीत आले आहे. या सरकारचे चाणक्य भाग्यविधाते खुद्द शरद पवार यांचेच नाव वाझेने घेतले आहे. न्यायालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, सीबीआय अशा विविध संस्थांनी या प्रकरणाभोवती फास आवळल्याने राजकीय कोंडी सत्ताधार्यांची झाली आहे.)
वाझेच्या पत्राचा । फिरे दांडपट्टा ।
मंत्रीपद थट्टा । महाराष्ट्री ॥
भाजपचे म्हणे । आहे षडयंत्र ।
बारामती मंत्र । चालेची ना ॥
राजीनामे तेंव्हा । शोभती खिशात ।
आता प्रकाशात । येती कसे? ॥
किंगमेकर हो । होण्यापरी किंग ।
शाबूत हे बिंग । राहतसे ॥
बरा होता हाची । व्यवहार्य सल्ला ।
दादरचा किल्ला । सुरक्षीत ॥
‘कुट’ बारामती । संजू करामती ।
नासवली मती । मातोश्रीची ॥
फोटोग्राफी जैसे । नाही सत्ता विश्व।
उधळले अश्व । कांत म्हणे ॥
(8 एप्रिल 2021)
उसंतवाणी-14
(सर्वौच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळण्यात आली. आणि सीबीआय चौकशी चालूच राहिल असे सांगितल्या गेले. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी सारखे वकिलही कामा आले नाहीत. महाराष्ट्र सरकारने नेमलेली चांदीवाल समितीही अर्थहीन होवून गेली. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी हास्यास्पद अशी भूमिका पत्रकार परिषदेत घेतली. स्व. बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेवून मी सांगतो की मी सचिन वाझे आरोप करत आहेत तसे काही केले नाही. यात परत एबीपी माझा सारख्या मविआ ची बाजू घेणार्या चॅनेलची वेगळीच गोची झाली. त्यांनी जाहिर केलेले कोराना लसीचे आकडे खोटे असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. त्यांना केंद्र सरकारने या प्रकरणी नोटीस पाठवली. )
मुंबईत उच्च । दिल्लीत सर्वौच्च ।
पाचरही गच्च । बसते ॥
वकिल तगडे । सिंघवी सिब्बल ।
झाले हतबल । कोर्टापुढे ॥
समिती नेमली । आम्ही ‘चांदीवाल’ ।
कुणी तिचे हाल । विचारीना ॥
सीबीआय चा हा । तपास कडक ।
बसली धडक । आघाडीला ॥
परब घे आण । बायको पोरीची ।
खंडणीखोरीची । झाकपाक ॥
मातोश्रीला धावू । का सिल्व्हर ओक ।
जहाजाला भोक । भलेमोठे ॥
दूजा अनिलाचा । कटणार पत्ता ।
पचते ना सत्ता । अनैतिक ॥
कांत म्हणे चळे । पुरोगामी ‘माझा’ ।
खोटा गाजावाजा । आकड्यांचा ॥
(9 एप्रिल 2021)
उसंतवाणी-15
(प.बंगालच्या निवडणुकांत मोदींचा एका मुसलमान तरूणाबरोबरचा फोटो व्हायरल झाला. मोदी भाजप विरोधकांना वाटले हा काहीतरी डाव असणार. पण प्रत्यक्षात झुल्फीकर अली या नावाचा हा मुलगा खराच निघाला. त्यानं ज्या पद्धतीनं राष्ट्रीय माध्यमांना मुलाखती दिल्या त्यानं तर पुरोगाम्यांचे पितळ अजूनच उघडे पडले. याच काळात काशीच्या ग्यानवापी मस्जिद प्रकरणांत जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानं तर पुरोगामी अजूनच बावचळले.)
बंगालात झुल्फी । मोदींच्या गळ्याला ।
पुर ये डोळ्याला । पुरोगामी ॥
छाती पिटूनिया । म्हणती ‘या अल्ला’।
सेक्युलर कल्ला । करितसे ॥
झुल्फीकार पोट्टा । बोले चुरू चुरू ।
मरे झुरू झुरू । व्होट बँक ॥
आब्बास सिद्दीकी । ममता ओवैसी ।
मते ऐसी तैसी । विखुरली ॥
रोहिंग्यांचा प्रश्न । कोर्ट यांना झापी ।
त्यात ग्यानवापी । सुरू चर्चा ॥
मस्जिद खोदता । लागेल मंदिर ।
भितीने बधीर । पुरोगामी ॥
कांत म्हणे खोदा । ढोंगाची कबर ।
बरी ही खबर । देशकाळी ॥
(10 एप्रिल 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment