उरूस, 8 एप्रिल 2021
उसंतवाणी-10
(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह हा एक चेष्टेचा विषय होवून बसले आहे. शिवसैनिकांत आणि ज्येष्ठ नेत्यांत कशी नाराजी आहे हे वारंवार समोर आले आहे. शिवसेनेच्या वाट्यांतील 9 पैकी पाच मंत्री मुळचे शिवसेनेचे नसलेले असे आहेत. दोन तर खुद्द ठाकरे घराण्यांतीलच सदस्य आहेत. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांच्या वाट्याला केवळ 2 मंत्रीपदे आली. त्यावरून जी अस्वस्थता आहे त्याचा संदर्भ या अभंगांत आहे.
घरात बसून । करतो लाईव्ह ।
शाब्दिक ड्राईव्ह । मनसोक्त ॥
पत्नी संपादक । मंत्रीपदी पोर।
नाचे बिनघोर । कार्यकर्ता ॥
बाहेरचे पाच । दोन ‘गृह’ मंत्री ।
वाजवा वाजंत्री । सैनिकहो ॥
राज्य ना पक्षाचा । घरचा शीऐम ।
काका करी गेम । माझ्यासाठी ॥
होवू दे बेजार । कितीही जनता ।
राजकीय सुंता । केली आम्ही ॥
फक्त झेंडा हाती । सैनिक कट्टर ।
चाटतो खेटर । मातोश्रीचे ॥
फोडी कधी काळी । वाघ डरकाळी ।
सत्ता लाळ गाळी । ‘कांत’ म्हणे ॥
(3 एप्रिल 2021)
उसंतवाणी-11
(उच्च न्यायालयात जयश्री पाटील यांची याचिका सुनावणीस आली आणि त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली. स्वाभाविकच यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही जिथे अनिल देशमुख कसे स्वच्छ पारदर्शी कारभार करतात त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगत होते त्याच गृहमंत्र्यांना न्यायालयाच्या दणक्याने पद सोडावे लागले.)
कोर्टाचा आदेश । रंगले श्रीमुख ।
देती देशमुख । राजीनामा ॥
सीबीआय चौकशी । बसला दणका ।
तुटला मणका । सत्ताधारी ॥
आघाडीचा घडा । भरला पापाचा ।
साधूंच्या शापाचा । तळतळाट ॥
वाटला नरम । निघाला गरम ।
करतो ‘परम’ । कायदाकोंडी ॥
सचिन हा वाझे । भामटा जोडीला ।
त्यानेच फोडिला । कट सारा ॥
काका घाली जन्मा । अनौरस सत्ता ।
तिच्या माथी लत्ता । प्रहार हा ॥
झाली सुरवात । नाही ही इतिश्री ।
गोत्यात मातोश्री । ‘कांत’ म्हणे ॥
(5 एप्रिल 2021)
उसंतवाणी-12
(अनिल देशमुखांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री करण्यात आले. जाणते राजे शरद पवार यांचे अवघे राजकारण जे की अतिशय धोरणी म्हणून ओळखले जाते तेच गोत्यात आले आहेत. कॉंग्रेस शिवायची तिसरी आघाडी देशभर उभी करावी हे पवारांचे राजकारण ही फसताना दिसत आहे.)
गेले देशमुख । आलेत वळसे ।
खोटेच बाळसे । अब्रुवरी ॥
वाझे उसवतो । रोज एक टाका ।
करणार काका । काय आता? ॥
सत्ता डळमळे । तरी करू चर्चा ।
तिसरा हा मोर्चा । कोलकत्ता ॥
कॉंग्रेसच्या माथी । बंगालात लाथ ।
राज्यामध्ये साथ । काकानिती ॥
तिसरी आघाडी । सदाची बिघाडी ।
काकाला ना नाडी । गवसली ॥
काकांचे आयुष्य । तळ्यात मळ्यात ।
पक्षीय खळ्यात । काही नाही ॥
कांत म्हणे गाठा । संन्यास आश्रम ।
राजकिय श्रम । पेलवेना ॥
(6 एप्रिल 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
मोजक्या आणि योग्य शब्दात।
ReplyDeleteषटकार असतात तुमचे कांत।।
रंगवता सामना मार्मिक अभंगात।
ओळखता जणू सर्वांना नखशिखांत।।
कवितेत सुंदर प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद!
Delete