उरूस, 25 एप्रिल 2021
मधुरी टाकळीकर गौतम गरूड ऍडची संचालक आमची मैत्रिण नातेवाईक हीचा आज वाढदिवस. माझ्यापेक्षा जेमतेम चार पाच वर्षांनी मोठी असलेली माधुरी ताईपणाची एक भूमिका नेहमीच निभावत आली आहे. गोविंद देशपांडे यांच्या निधनानंतर माधुरीने गरूडचा कारभार मोठ्या धैर्याने निष्ठेने चिवटपणे नामदेव च्या सहाय्याने सांभाळला. खरं तर जाहिरात क्षेत्रात कुणाही स्त्रीला पाय रोवून उभं राहणं अवघड. पण माधुरीने हे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं.
2007 मध्ये काकांचे निधन झाले तेंव्हा पासून म्हणजे जवळपास 14 वर्षे भरताने सिंहासनावर रामाच्या पादूका ठेवून कारभार करावा असंच हे उदाहरण. बरोबर 14 वर्षे होत आहेत माधुरी गरूड सांभाळत आहे. जाहिरात कंपनीचे कार्यालय म्हणजे तिथे झकपक असावी, चकचकीतपणा असावा, बोलण्यात चापलुसी विविध मार्केटिंग फंड्यांच्या कारंजी उडत असावी असा समज असतो. यातला काहीच गरूड मध्ये आढळत नाही. या क्षेत्रात टिकण्यासाठी आकर्षक भाषाशैली, बोलूनच माणसाला पटवणे वगैरे वगैरे, धाडस, महत्वाकांक्षा असावी लागते असं म्हणतात. यातलं काहीच माधुरीपाशी आढळत नाही. मला कुसुमाग्रजांची कविता माधुरीला गरूड मध्ये पाहताना नेहमी आठवते
नवलाख तळपती दिप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परते स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात
माधुरी अशीच शांतपणे गरूडमध्ये काम करत बसलेली असते. आज जवळपास 25 वर्षे होत आहेत ती या क्षेत्रात आहे. गोविंद देशपांडे काकांच्या जाण्याने जी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचे फार मोठे काम माधुरीने केले. आजही या क्षेत्रातले विविध वयोगटाचे लोक थकून गरूडमध्ये दुपारी येवून बसतात तेंव्हा त्यांना आधार असतो काकांच्या सुंदर तैल चित्राचा. गरूडमधील शांत वातावरणाचा. आणि माधुरीच्या चेहर्यावरील आश्वासक मंद स्मिताचा. माठातले थंड पाणी पिताना आपण शांत होवून जातो ते त्या सगळ्या वातावरणाने आणि मुख्यत: माधुरीच्या अस्तित्वाने.
ती कधीच फार आकर्षक असे काही बोलते किंवा फार अलंकारिक भाषा वापरते किंवा जिव्हाळ्यानं शब्द ओतप्रेत भरलेले असतात असं नाही. पण तिच्या साध्या भाषेत माणसाला दिलासा देण्याची एक मोठी ताकद आहे. काकांच्या सर्व व्यवसायीक पुण्याईचा अर्क तिच्यात उतरला आहे. जाहिरात क्षेत्रात माझ्या पाहण्यात खुप संस्था आल्या, झगमगल्या, त्यांचा चमचमाट डोळे दिपवून गेला. पण काही काळातच त्या विझुन गेल्या. व्यवहारिक मोठी धाडस करणारे बहुतांश तोट्यात जावून हद्दपार झाले. दिवाळखोरीत निघाले. पण ससा आणि कासवाच्या शर्यतीमधील गरूड हे कासव माधुरी आणि नामदेव यांनी शांतपणे आपल्या गतीने चालवले आणि विजयी करून दाखवले. गोदावरी काठचे पूर्णे जवळचे दाजी महाराजांची टाकळी हे तिचे गांव. त्याच दाजी महाराजांच्या मठाजवळ हीचे घर आहे. गोदावरीने एक मोठे सुंदर वळण या गावाजवळ घेतले आहे.
तिच्या मोठेपणाची गंमत करत मी आवर्जून सर्वांसमोर तिच्या पाया पडतो. तिही मस्त आशीर्वाद वगैरे देते. पण तिच्यात एक अंगभूत मोठेपण खरंच आहे. तिने ज्या पद्धतीनं आपले वृद्ध आईवडिल सांभाळले, घर वर आणलं, मुलीचं करिअर घडवलं, स्वत:चा व्यवसाय चिकाटीने सांभाळला, संसार फुलवला हे पाहता तिच्या या गुणाची दखल घ्यावीच लागते.
माधुरीशी जवळीक वाटायचे कारण म्हणजे कला साहित्य संगीत चित्रं पत्रकारिता याबाबत ती मला सहप्रवासी वाटते. गोविंद देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली 13 वर्षे आम्ही कार्यक्रम करतो आहोतच पण या सोबतच शहरांतील विविध सांस्कृतिक चळवळीत ती आवर्जून सहभागी होते. होईल ती सर्व मदत करते.
सध्या लॉकडाउनच्या काळात सगळंच ठप्प झालेलं असताना माधुरी शांतपणे दुपारी गरूड च्या कार्यालयात बसून साडीवर पेंटिग करताना दिसते हे चित्र मोठे छान वाटतं. कला माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देते असं जे पुलं नी म्हटलं आहे त्याचं एक प्रात्यक्षिक मला माधुरीत आढळून येतं.
आपल्या रोजच्या विवंचनेत आपण काही आधार शोधत असतो. काही माणसं वडिलकीच्या नात्यानं हा आधार आपल्याला देतात. काही आपल्यापेक्षा अगदी वयाने लहान असलेले आपल्या एखाद्या कृतीने आपल्याला आधार देतात. पण मित्रासारखी पण जराशी मोठी असलेली अशी एक व्यक्ती जी आपल्याला सांभाळून घेते ती म्हणजे माधुरी. तिच्या अस्तित्वानेच एक मोठा मैत्रीचा आधार माझ्या सारख्याला मिळत आलेला आहे.
खुप झगमगाट आपण पाहतो. तो विझल्यावर डोळ्यांसमोर अंधारी येते. आणि मग अशावेळी तुळशी जवळच्या दिव्याची मंद वात आणि तिचा उबदार शांत प्रकाश आपल्याला खुप काही देवून जातो. कुसुमाग्रजांच्या कवितेत वर्णन केलेली शांतपणे जळणारी ही वात खुप आश्वासक असते. माधुरीचे अस्तित्व असेच आहे.
माधुरीला खुप खुप शुभेच्छा!
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
गुणवर्णनासह छान व्यक्तिरेखा उभी केलीत!
ReplyDelete