उरूस, 14 एप्रिल 2021
उसंतवाणी-19
(ममता बॅनर्जी यांची केलेली भडकावू भाषणे, हिंसक होवून जमावाने सुरक्षा दलावर केलेला हमला आणि त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू पावलेले 4 मुसलमान हा प्रकार खुप भयानक आहे. याच दिवशी आनंद देवबर्मन नावाच्या एका भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. अश्विनीकुमार नावाचा पोलिस अधिकारी गुन्हेगाराच्या शोधात बिहारमधून बंगालच्या सीमावर्ती भागात आला असता त्याची जमावाने ठेचून हत्या केली. हे प्रकरणही याच काळात घडले )
मतदान चाले । शिस्तीत सरळ ।
दिली खळबळ । करू लागे ॥
घेराव घालून । जवान कोंडावे ।
कर्कश्श भांडावे । सगळ्यांशी ॥
गोळीबार होता । बळी मग जाती ।
त्यांची धर्म जाती । तपासावी ॥
धर्म पाहूनिया । ठरवावी निती ।
कुणासाठी किती । रडायाचे ॥
जमाव ठेचतो । पोलिस जवान ।
घटना लहान । संबोधावी ॥
भाषणावरती । येता मग बंदी ।
साधावी ती संधी । नौटंकीची ॥
कांत म्हणे एैसे । लोकशाही वाटे ।
पसरले काटे । दूर सारा ॥
(14 एप्रिल 2021)
उसंतवाणी-20
(राहूल गांधी यांनी बंगालातील आपल्या पहिल्याच प्रचार सभेत असे काही तारे तोडले की विचारायची सोयच नाही. शिवाय सभेला अगदी जेमतेम गर्दी. या सभेचा व्हिडिओ कॉंग्रेसनेच अधिकृत पेजवरून सोशल मिडियात टाकला. तो जरूर पहा म्हणजे परत कुणी अशी टिका करायला नको की हे जाणीवपूर्वक पुर्वग्रह दुषीत लिहितात. )
बंगाल प्रचार । आली असे आंधी ।
प्रकटले गांधी । दर्जिलिंगी ॥
भाजप तंबुत । हर्ष उडे फार ।
प्रचारक स्टार । आला आला ॥
कॉंग्रेसी लावती । कपाळाला हात ।
पनौतीने घात । केला असे ॥
सभेला ना गर्दी । चित्र स्पष्ट नीट ।
पूर्वीच्याही सीट । हारणार ॥
राहूल उवाच । मला भितो मोदी ।
लागू नका नादी । कॉंग्रेसच्या ॥
अवेशात देई । शालेय भाषण ।
सखोल ना जाण । काही दिसे ॥
नौका बुडविण्या । घेतली सुपारी ।
कॉंग्रेसची खरी । कांत म्हणे ॥
(15 एप्रिल 2021)
उसंतवाणी-21
(कोरोनामुळे परिस्थिती फारच भयानक बनली आहे. रूग्णांना बेड मिळत नाहीयेत. सामान्य रूग्णांनाही भिती दाखवून लूटले जात आहे. लॉकडाउन किती आणि कसे याची स्पष्ट काहीच माहिती दिली जात नाही. महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणा अपशयी ठरताना दिसत आहे. )
लॉकडाउन हे । लागलंय घेरू ।
बंद काय सुरू । कळेची ना ॥
रस्त्यात माणसं । हिंडती मोकाट ।
मोडती पेकाट । व्यवस्थेचे ॥
जिण्याचे हे हाल । मरणाचा वांधा ।
तिरडीला खांदा । लाभेची ना ॥
हॉस्पिटल फुल्ल । रिकामे ना बेड ।
शहाण्याला वेड । लागु पाहे ॥
उपचारा नावे । मांडिला बाजार ।
खिशाला आजार । ज्याच्या त्याच्या ॥
मनुष्य पचवी । कित्येक आपत्ती ।
झुंजार ही वृत्ती । अबाधीत ॥
न्यायचे तेवढे । उचल त्वरीत ।
सुखे उर्वरीत । कांत म्हणे ॥
(16 एप्रिल 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment