Monday, April 19, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८

   
उरूस, 19 एप्रिल 2021 

उसंतवाणी-22

(दहावी बारावीच्या परिक्षा रद्द करून सर्व विद्यार्थी पुढे ढकलण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला. आधीच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना तसेच पुढे ढकला असा निर्णय घेण्यात आला होताच. त्यावरची ही प्रतिक्रिया) 

ढकला पुढती । न घेता परिक्षा ।
उतराला रिक्षा । शिक्षणाची ॥
ज्ञान नी परिक्षा । बसतो ना मेळ ।
सारा पोरखेळ । ज्ञानमार्गी ॥
पदवी धारक । जे जे ‘मार्क्स’वादी ।
होई बरबादी । त्यांच्यामुळे ॥
परिक्षा ही सोय । आहे घेणार्‍यांची ।
नाही देणार्‍यांची । कदापिही ॥
दाबातून करा । विद्यार्थी मोकळा ।
ज्ञान भेटो गळा । आनंदाने ॥
जूने ते शिक्षण । बाद झाले नाणे ।
सुचो नवे गाणे । गळ्यातून ॥
ऑन लाईनचा । ऑफ कारभार ।
ब्रेक फेल कार । कांत म्हणे ॥
(17 एप्रिल 2021)

उसंतवाणी-23

(हरिद्वारला भरलेला कुंभमेळा त्वरीत रद्द करा अशी मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेली होती. खरं तर ही परवानगी द्यायलाच नको होती. पण उत्तराखंड मध्ये कोरोनाचा प्रकोप फारसा नाही हे जाणून हा निर्णय घेतल्या गेला होता. पण नंतर विदारक झालेली परिस्थिती पाहून पंतप्रधान मोदींनी सर्व साधुसंतांना आवाहन केले. त्यानुसार कुंभमेळा आवरता घेण्यात आला. साधु संतांनी कुठलाच आक्रस्ताळेपणा न करता या आवाहनाला प्रतिसाद दिला.)

मोदी विनवती । आवरा कुंभाला ।
थारा ना दंभाला । हिंदू धर्मी ॥
देवुनीया मान । आखाडे वागती ।
वेगे आवरती । कुंभमेळा ॥
धर्म हा टीकेची । देतो मोकळीक ।
वाटे जवळीक । त्यामुळेच ॥
टीकेच्या अग्नीत । निघतो तावून ।
येतो उगवून । राखेतून ॥
करिती तुलना । तब्लीगी मर्कज ।
मेंदूची उपज । तपासावी ॥
खुलेपणे साधु । देती प्रतिसाद ।
लपे कुठे साद । मौलाना हा ॥
कांत म्हणे हिंदू । नित्य हा नुतन ।
त्याचे धर्म मन । आधुनिक ॥
(18 एप्रिल 2021)

उसंतवाणी-24

(पश्चिम बंगाल मध्ये मतदानाच्या 5 फेर्‍या आटोपल्या आहेत. आणि आता तीन फेर्‍या शिल्लक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सभांवर बंधने घाला अशी मागणी केल्या गेली. निवडणुक आयोगाने नियमांचे काटेकोर पालन करा असे सांगितले. प्रचाराचा अवधी कमी केला. पण सभा होणारच आहेत. राहूल गांधींनी सभा घेणार नाही असं सांगितलं. डाव्यांनी पण सभा न घेण्याचा निर्णय जाहिर केलाय. खरं तर भाजप आणि तृणमुलनेही हा निर्णय घ्यायला हवा होता. पण अजूनही तसा निर्णय घेतला गेला नाही.  )

थांबवा आता या । प्रचाराच्या सभा ।
दैत्य दारी उभा । कोरोना हा ॥
नको वाचाळता । दिसू द्यावी कृती ।
सांभाळा प्रकृती । जनतेची ॥
कशासाठी हवी । प्रचाराची राळ ।
जनतेशी नाळ । जोडा जरा ॥
पाच वर्षे तूम्ही । रहा लोकांपुढे ।
वाजवा चौघडे । हवे तसे ॥
मतदानापूर्वी । मतदार चित्ता ।
लाभू दे शांतता । विवेकाची ॥
कोरोनामुळे हा । पडू दे पायंडा ।
सभा रॅली फंडा । बंद करा ॥
मतदान टक्का । गाठू दे शंभरी ।
कांत म्हणे खरी । लोकशाही ॥
(19 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment