Monday, May 3, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १२

    
उरूस, 3 मे 2021 

उसंतवाणी-34

( आप सरकारने न्यायमुर्ती आणि त्यांचे कुटूंब व न्यायालयीन कर्मचारी यांच्यासाठी पंचतारांकित हॉटेल अशोक मध्ये 100 बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला करोनासाठी. त्यावर टाईम्स नाउने आवाज उठवला. उच्च न्यायालयाने सुमोटा दाखल करून घेवून आप सरकारला फटकारले. आम्ही अशी सोय मागितलीच न्हवती. सामान्य लोकांचे हाल होत आहेत त्याकडे लक्ष द्या असे सुनावले. )

उच्च न्यायालय । देई फटकार ।
‘आप’ सरकार । कोडगे हे ॥
औषध मिळेना । नाही ऑक्सिजन ।
फिरे वण वण । रूग्णाईत ॥
न्यायमुर्तीसाठी । हॉटेल अशोक ।
लोकांसाठी शोक । मरणाचा ॥
न्यायालय राखे । सन्मान आपला ।
आदेश रोकला । केजरूचा ॥
ऑक्सिजन प्लांट । नाही उभा कैसा? ।
खर्च केला पैसा । ‘ऍड’पायी ॥
चळवळ होती । तेव्हा होता ‘आप’ ।
आता झाला खाप । मध्ययुगी ॥
कांत सत्ता नशा । चढे लवकर ।
हिताचा विसर । जनतेच्या ॥
(29 एप्रिल 2021)

उसंतवाणी-35

(नारायणराव दाभाडकर हे 85 वर्षांचे नागपुर येथील वृद्ध गृहस्थ. त्यांनी आपला बेड नाकारला व दुसर्‍या गरजूला देण्याची विनंती केली. घरी जाणे पसंद केले. दोन दिवसांत त्यांचे कोरोनाने निधन झाले. त्यावरून एक गदारोळ पुरोगामी पत्रकार व इतरांनी उठवला. एखाद्याच्या मृत्यनंतर त्याच्या त्यागाची विटंबना करणे हे अतीच झाले. )

मृत्यूच्या नंतर । केली विटंबना ।
हाणा नारायणा । दोन यांना ॥
सारासार इथे । बुद्धी निजलेली ।
वृत्ती कुजलेली । पत्रकारी ॥
तुम्हा देती शिवी । म्हणती संघोटा ।
सुटला कासोटा । विवेकाचा ॥
कळणार कशी । त्यांना जनसेवा ।
सत्ता सुका मेवा । द्रव्यासवे ॥
आपुल्या त्यागाची । करावी प्रसिद्धी ।
साधे ऐसी सिद्धी । तोची खरा ॥
तुमच्या घरचे । सारे लोक येडे ।
नाकारती पेढे । फायद्याचे ॥
पत्रकारितेची । निघे अंत्ययात्रा ।
विकृती हा खत्रा । कांत म्हणे ॥
(30 एप्रिल 2021)


उसंतवाणी-36 

(1 मे हा महाराष्ट्र दिन. या निमित्ताने उठता बसता छ. शिवाजी महाराजांचे नाव घेणारे आजचे राज्यकर्ते ते कसं वागतात आणि महाराजांच्या काळात कसं होतं याची तुलना सांगणारी रचना. )  

गर्जा महाराष्ट्र । कसा म्हणू माझा ।
‘वाजे’ बँडबाजा । पोलिसांचा ॥
महाराष्ट्र होता । सह्याद्रीचा कडा ।
घरात कोंबडा । आज बसे ॥
सुरत लुटून । स्वराज्य मांडणी ।
‘बार’ची खंडणी । कुणासाठी ॥
अफ्जल खान । काढीला कोथळा ।
आजचा मथळा । ‘सामना’त ॥
गडासाठी तेंव्हा । सिंह गेला बळी ।
वसुलीची खेळी । आज येथे ॥
अष्टप्रधान ते । राज्य करी सुखी ।
आज ‘देशमुखी’ । हप्तेबाज ॥
कांत म्हणे आज । आहे एकसष्ठी ।
राज्यहित षष्ठी । कोण करी ॥
(1 मे 2021, महाराष्ट्र दिन)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment