Saturday, April 24, 2021

पुस्तकांचा कागदी अवतार समाप्त होणार..


    

उरूस, 24 एप्रिल 2021 

काल 23 एप्रिल. जागतिक ग्रंथ दिन. या निमित्ताने समाज माध्यमांवर विविध पोस्ट टाकल्या गेल्या. पुस्तकांच्या बाबत कितीतरी जण नॉस्टेलजिक झालेले दिसून आले. पुस्तकं म्हणजे त्यांच्या लेखी कागदावर छापलेली पुस्तके. नॉस्टेलजिक ला मराठी शब्द आहे गतकातरता. हा खरं तर एक मानसिक रोग आहे. एका मर्यादेपर्यंत जून्या आठवणीं काढत राहणं आपण समजू शकतो. ती आपल्या मनाची गरजही असते. पण त्यातच अडकून पडले की त्याचा रोग बनतो. तो एक आजार म्हणून त्याकडे मग पहावं लागतं.  

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच ग्रंथ व्यवहाराला गळती लागायला सुरवात झाली. त्याचं कारण म्हणजे समाज माध्यमं सशक्त होत चालली होती. छापील स्वरूपांतील मजकूर सर्वत्र पोचवणे दिवसेंदिवस अवघड होवू लागलं होतं. भौतिकदृष्ट्या पुस्तके एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं त्रासदायक होतं. जे प्रत्यक्ष या ग्रंथ प्रकाशन वितरण विक्री प्रदर्शन व्यवहारात काम करतात त्यांना याची अगदी स्पष्ट जाणीव होवू लागली होती. महाराष्ट्रभर गावोगाव ग्रंथ प्रदर्शन भरवणारी ढवळे ग्रंथ यात्रा बंद पडली होती आणि अक्षर धारा ने आपला पसारा आवरत आवरत केवळ पुण्यापूरता मर्यादीत करत आणला होता. मोठ्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी आपली आवृत्ती मर्यादीत संख्येची काढायला सुरवात केली होती. (मी स्वत: ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ वितरण, प्रदर्शनं, अक्षर जूळणी-डिटीपी ही कामं केलेली आहे. अजूनही करतोच आहे. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष यातला अनुभव नाही त्यांनी टीका टिप्पणी करताना जरा भान राखावे ही नम्र विनंती). टक्केवारीच्या गणितात सार्वजनिक ग्रंथालयांचा संपूर्ण व्यवहार गोत्यात अडकला होता. वर्तमानपत्रांनाही मर्यादा याच काळात पडायला सुरवात झाली.  

अशा वेळी हळू हळू छापील मजकूराची जागा डिजिटल माध्यमांतील अक्षरांनी घ्यायला सुरवात केली. 2010 नंतर समाज माध्यमं अजूनच व्यापक बनली. त्यांचा परिघ वाढला. त्यांचा वापर करणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली. यात इतर ज्या बाबी आहेत मनोरंजनाशी संबंधीत त्या आपण बाजूला ठेवू. पण याच माध्यमांत कागदावरच्या मजकुराला पर्याय म्हणून मजकुर फिरायला लागला. त्याला मोठा प्रतिसाद मिळायला लागला. जो मजकूर एरव्ही छापील पुस्तकांची सद्दी असण्याच्या काळात अगदी मोजक्या हजार पाचशे लोकांपर्यंतही पोचत नव्हता तो आता सहजच पाच दहा हजारांची संख्या पार करायला लागला. (मी गंभीर मजकुराबाबत बोलतोय. छचोर मजूकराबाबत नाही.) 

काही जणांचा गैरसमज असा होता की दीर्घ असे लिखाण जे की पुस्तकांतून समोर येत होतं, त्याच्या वाचनाने जिज्ञासा पूर्ती होत होती, ज्ञान मिळाल्याचे समाधान मिळत होते, रंजनाचेही काम शब्दांतून केले जात होते, दीर्घ असा हजार पाचशे पानांचा मजकूर वाचताना मिळणारा एक आनंद विलक्षण होता हे सर्व या नविन माध्यमांत कसे काय साध्य होणार आहे? आणि जर या नविन चवचाल उथळ माध्यमांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले तर मग दीर्घ मोठ्या पल्ल्याचा मजकूर वाचणार कोण? त्याचे होणार तरी काय आणि कसे? वैचारिक लिखाणाला नविन माध्यमांत स्थान मिळणार तरी कसे? शेवटी पुस्तकांची ती मजा डिजिटल पडद्यावर येणार तरी कशी.

हा खरं तर एक मोठा गैरसमजच आहे. किंबहुना तंत्रज्ञान समजून न घेता केली जाणारी टिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल हे एक तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. मजकूर कागदावर छापायचा मग त्याचे पुस्तक करायचे. मग ते वितरीत करायचे. मग ते दुकानात जावून कुणी खरेदी करायचे. आणि मग ते घरी सांभाळून ठेवायचे. त्यासाठी मोठी जागा अडवली जाणार. हे सगऴं साधारणत: गेली 100 वर्षे घडत आलेलं आहे. यात मोठ्या अडचणी येत आहेत हे मी अनुभवावरून सांगतो. याचा व्यवहार आतबट्ट्याचा बनत चालला आहे. भांडवली गुंतवणूक परत मिळणे कठीण होवून बसले आहे (मी स्वत: ग्रंथ व्यवहारातील देणी गेली 5 वर्षे फेडतोच आहे).

याच्या नेमके उलट नविन डिजिटल माध्यमं सोपी सुटसुटीत परवडणारी स्वस्त सहज होवून गेली आहेत. 2010 पासून मी ब्लॉग चालवतो आहे. त्याची वाचक संख्या 3 लाखाचा टप्पा ओलांडून गेली आहे. हाच मजकूर मला एरव्ही जून्या माध्यमांतून तीन लाख लोकांपर्यंत कसा पोचवता आला असता? नेमक्या वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग छापील पुस्तकांना कितीतरी अवघड राहिलेला आहे. अगदी आजही तूम्ही आठवून पहा एखादे हवे असलेले पुस्तक जून्या व्यवस्थेत मिळणे किती कठीण असायचे. आता तेच छापील पुस्तक जर कुठे उपलब्ध असेल तर याच नविन तंत्राज्ञानाने लवकर माहित होते आणि त्याची उपलब्धता आधीपेक्षा सोपी होवून गेलेली दिसून येते. 

सगळ्यांना नविन स्वरूपातील मजकूर म्हणजे फक्त समाज माध्यमांवर आलेला मजकूर इतकंच दिसते. खरं तर डिजिटल पुस्तके अजून चांगल्या स्वरूपात येतील हे लक्षातच घेतले जात नाही. खुप जूनी इंग्रजी पुस्तके आता किंडलवर उपलब्ध आहेत. ज्यांना आजही कागदावरचे पुस्तक हवे आहे त्यांच्यासाठी काही मोजक्या प्रतीत ते तसे उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. जे पुस्तक पुन्हा पुन्हा हातात घेवून वाचावे वाटते. त्याच्याशी एक धागा आपला जूळलेला असतो त्यासाठी छापील प्रतींची मागणी नोंदवावी. पण एकूणच सर्व विचार करता व्यवहारिक पातळीवर आता डिजिटल माध्यमांतूनच पुस्तक सर्वांपर्यंत पोचवणे सोपे झाले आहे. 

वयस्क पलंगावर पडून असलेल्या आजारी माणसांना जाड पुस्तक हातात धरून वाचता येत नाही. ज्येष्ठ मराठी लेखक पद्ममाकर दादेगांवकर यांच्या बाबतीत एक अनुभव माझ्या गाठीशी आहे. माझ्या ब्लॉगवरच्या एका लेखावर त्यांची प्रतिक्रिया आली आणि मी जरा शरमलो. कारण त्यांच्यासारख्या अभ्यासक समिक्षकासाठी हा मजकूर फारच प्राथमिक स्वरूपाचा होता. त्यांना शेवटच्या आजारपणात त्रास होत होता. फारसे बोलता येत नव्हते. वाचणे अवघड जायचे. मग मी उमा दादेगांवकर यांना फोन करून बोललो. त्या म्हणाल्या अरे त्यांना आता मोबाईलवरच वाचणे सोयीचे जाते. कारण अक्षरं मोठी करून वाचता येतात. पुस्तक हाती धरता येत नाही. आता जर अशा लोकांचा विचार करून त्यांच्यासाठी महत्वाची पुस्तके या स्वरूपात आली तर किती चांगले होईल.   

आज जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून याचा विचार केला पाहिजे. आकर्षक स्वरूपात चांगली मांडणी, चांगला टंक (फॉण्ट), ओळींमध्ये योग्य ते अंतर राखलेले, शीर्षकं आकर्षक पद्धतीनं दिलेली, काही रेखाटनांचा वापर केलेला हे सर्व छापील पुस्तकांसारखेच इथेही विचारात घेतले पाहिजे. अन्यथा आजकाल पीडीएफ म्हणजे अगदी गदळ असा कसाही टाईप केलेला मजकूर अतिशय अनाकर्षक स्वरूपात समोर येतो आणि डिजिटल माध्यमांची एक चुक प्रतिमा आपल्या मनात उतरते.  

किंडलवर अगदी छान मृखपृष्ठ असलेलं, समर्पक रेखाचित्र असलेलं, पुस्तकांचे पान उलटावे अशा पद्धतीनं पान उलटता येईल अशी रचना असलेलं पुस्तक का नाही दिलं जात? आणि ते मिळालं तर कुणाला नको आहे? जागा व्यापणारी भली मोठी पुस्तकं घरात ठेवण्यापेक्षा अगदी सुटसुटीत अशी हाताच्या तळव्यावर मावणार्‍या एखाद्या साधनांत पुस्तकं साठवता आली तर कुणाला नको आहे? 

छापील पुस्तकांचा आग्रह धरणारी त्यासाठी हट्टी असलेली माणसे मला जून्या गावगाड्यांत रमणार्‍या नॉस्टेलजीक म्हातार्‍यांसारखी वाटतात. त्यांचं जग अजूनही 15 पैशाच्या पोस्ट कार्डात, बैलाच्या गळ्यांतील घागरमाळांत, गायीच्या शेणांत, चुलीवरच्या रटरटणार्‍या कालवणांत, आहारावर भाजल्या जाणार्‍या टंब फुगलेल्या भाकरीतच अडकून पडले आहे. ते बाहेर यायला तयारच नाहीत. जमिनदारी संपलेली माणसे कशी जून्या पडक्या वाड्याच्या ढासळत्या कमानीत उभी राहून वर्तमानाऐवजी इतिहासाकडे डोळे लावून बसलेली असतात तशी ही माणसं मला वाटतात.
बदल हे स्विकारावेच लागतील. आज कितीही गोडवे गायले तरी कुणीही घोड्यावर बसून प्रवास करायला तयार नाही. बैलगाडीत बसून कुणी एका गावाहून दुसर्‍या गावात जात नाही. कागदावरची पुस्तके ज्यांना हवी वाटतात त्यांच्याबद्दल मला आत्मियता आहे. माझ्यापाशी सध्या वैयक्तिक हजारो पुस्तके आहेत. आजही मला हातात पुस्तक घेवून वाचायला आवडतं. पण सोबतच किंडलवर जूनी पुस्तकं त्याच सुंदर स्वरूपात मिळाली तर मला हवी आहेत. बोरकरांच्या कवितेत जरा बदल करून मला असे म्हणावे वाटते

जूने हवे सारेच परंतु  
नाविन्याचा ध्यास हवा ।
काळाच्या खळखळ धारेतून 
सळसळता उल्हास हवा ॥

माझा मराठी रसिकांवर विश्वास आहे. माध्यम बदलले म्हणून त्यांचे अक्षर वाङ्मयावरचे प्रेम अटणार नाही. ते तसेही कधी अटले नव्हते. ज्ञानेश्वरांच्या काळापासून अठराव्या शतकापर्यंत छापील पुस्तके नव्हते तरी मराठी माणसाने आपले ओवी अभंगावरचे प्रेम अटू दिले नव्हते. उलट माझा तर आरोपच आहे की नंतरच्या काळात सशक्त अशी छापील माध्यमं आली पण त्यांच्याही वाट्याला नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम यांच्या रचनांना लाभले तितके प्रेम आले नाही. नविन माध्यमांची भिती बाळगु नका. त्यावर अविश्वास दाखवू नका. सहर्ष मनाने खुल्या दिलाने त्यांचा स्विकार करा. शक्य तितकी छापील पुस्तकं मिळवा वाचा जतन करा जीव लावा. पण डिजिटल माध्यमांचा दुस्वास करू नका.  
                 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

3 comments:

  1. अगदी खरं लिहिले आहे. छापीलसाठी डिजिटल किंवा इतर तत्सम साधनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सार्वजनिक ग्रंथालयांनाही यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. केवळ छापील ग्रंथ देवघेव यातुन बाहेर पडण्याची तयारी असेल तरच त्यांना पुढे जाता येईल.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लिहीलं आहे. डिजिटल तंत्रज्ञानाची फारसी माहिती नसल्यामुळे असेल कदाचित, माझे अनेक आक्षेप गैरसमजावर आधारित होते.गैरसमजाचा तो पटल या लेखाने ब-यापैकी दूर सारला..धन्यवाद.!✍

    ReplyDelete
  3. खरय अगदी.जुन ते सोनं परंतु नवं ते हवं

    ReplyDelete