उरूस, 7 एप्रिल 2021
उसंतवाणी-7
(कॉंग्रेसची मोठी गोची महाराष्ट्राच्या राजकारणात झाली आहे. एक तर महाविकास आघाडीत त्यांची आमदार संख्या सगळ्यात कमी. त्यांना सातत्याने दुय्यम वागणुक मिळत आहे अशी तक्रार ज्येष्ठ मंत्री करतात. जे घोटाळे समोर आले त्यातही आपले नाव नाही याची खंत कॉंग्रेस नेत्यांना वाटत असवी असा उपहास करत या ओळी लिहिल्या. बाळासाहेब थोरात त्यांचे महसुल मंत्री आहेत. त्यांना हाताशी धरून शरद पवारांनी सगळी बोलणी केली असं सांगितलं जातं.)
घोटाळ्यांची इथे । साजरी दिवाळी ।
आम्हाला वेगळी । वागणुक ॥
सेना राष्ट्रवादी । मलिद्याची खाती ।
करवंटी हाती । आमच्याच ॥
सोनिया मातेला । सांगतो रडून ।
घ्यावा हा काढून । पाठिंबाच ॥
राठोड मुंढेच्या । चारित्र्याची धुणी ।
आमचा ना कुणी । सापडला ॥
कॉंग्रेस निवांत । बाकीचे जोरात ।
बोलती ‘थोरात’ । काय करू ?॥
दास ‘कांत’ म्हणे । त्याला मिळे हूल ।
राशीला ‘राहूल’ । ज्यच्या ज्याच्या ॥
(21 मार्च 2021)
उसंतवाणी-8
(शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अचानक रात्री 2 वा. विमानाने अहमदाबादला गेले आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट गौतम अडानी यांच्या घरी झाली. त्यांना 45 मि. शहांनी वाट पहायला लावली. अशा बातम्या पसरल्या. याची अधिकृत कसलीच पुष्टी कोणी केली नाही. आणि नकारही दिला नाही.)
साबरमतीला । गेली बारामती ।
काय करामती? । कोण जाणे ॥
गुप्तभेटीसाठी । मध्यरात्री वेळ ।
राजकीय खेळ । रंगतसे ॥
गुजरात दौरा । संजय उवाच ।
बोलतो उगाच । मूढमती ॥
येवुनिया काका । जाती ब्रीचकँडी ।
उद्धवासी थंडी । उन्हाळ्यात ॥
परम वादाची । पडलिया चीर ।
सरकार स्थिर । प्रवक्ता म्हणे ॥
तिघांचा हा खेळ । कडी वरकडी ।
कॉंग्रेस कोरडी । ‘कांत’ म्हणे ॥
(29 मार्च 2021)
उसंतवाणी-9
(बंगाल निवडणुकांत ममता दिदींनी हिंदूंना खुश करण्यासाठी म्हणून आपणही कसे देवी कवच म्हणतो, चंडीपाठ करतो, आपले गोत्र शांडिल्य आहे असे सांगितले. बरोबर हाच मुद्दा मग भाजपने उचलला. राहूल गांधींनी तर आधीच शर्टावर जानवे घालून मंदिरांचे उंबरे झिजवालया सुरवात केली होती.)
रेड्यामुखी वेद । जूनी झाली कथा ।
ऐका नवी गाथा । बंगालात ॥
कुठे चंडी पाठ । कुठे मंत्र स्तोत्र ।
प्रकटले गोत्र । ‘दिदी’ मुखी ॥
सदर्या वरून । घाली जो जानवे ।
त्याला ना जाणवे । आत काही ॥
जामा मशिदीत । इमाम बुखारी ।
फतवे पुकारी । कधी काळी ॥
मतांसाठी ढोंगी । पढले नमाज ।
सरे त्यांचा माज । राम नामे ॥
व्यर्थ मिरवून । दावी जो ब्राह्मण्य ।
नासे त्याचे पुण्य । ‘कांत’ म्हणे ॥
(31 मार्च 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment