Tuesday, April 6, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २

     
उरूस, 6 एप्रिल 2021 

उसंतवाणी-3

(परमवीर सिंह यांनी आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. अपेक्षा अशी होती की गृहमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेवून ते काही कार्रवाई करतील. पण तसे काही घडले नाही. याची कल्पना असल्यानेच परमवीर सिंह सर्वौच्च न्यायालयात गेले. पुढे ते उच्च न्यायालयात गेले आणि आता तर अनिल देशखुख यांचा राजीनामाच आला आहे.) 
‘परम’ स्फोटाचा । जाहला आवाज ।
हादरला आज । महाराष्ट्र ॥
महिन्याला फक्त । शंभरच कोटी ।
बाब आहे छोटी । ‘काका’ म्हणे ॥
शंभराचे वाटे । करताना तीन ।
कोण मारी पीन । दिल्लीतून ॥
सिंहासनाखाली । लागला सुरूंग ।
दाखवी तुरूंग । देवेंद्र हा ॥
राजकारण्यांनी । सोडलीय लाज ।
दिसे मज आज । ‘कांत’ म्हणे ॥
(21 मार्च 2021)

उसंतवाणी-4

(सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची मोठी गोची झाली. अनिल देशमुख राजीनामा देणार नाही असे मोठ्या आवेशात सांगितले जात होते. पण प्रत्यक्ष काय घडले ते सर्वांच्या समोरच आहे.) 
दाण्याच्या मोहात । मुठ उघडेना ।
बाहेर निघेना । ‘हात’ कसा ॥
माकडासारखी । राजकीय स्थिती ।
गुंग बारामती । महाराष्ट्री ॥
‘परम’ गाठतो । पायरी सर्वौच्च ।
हालवतो गच्च । व्यवस्था ही ॥
राजीनामा नाही । भाषेचा हा दर्प ।
सत्ता वीष सर्प । वळवळे ॥
दास ‘कांत’ म्हणे । झाली सुरूवात ।
राजकिय वात । विझु लागे ॥
(22 मार्च 2021)


उसंतवाणी-5

(रश्मी शुक्ला या पोलिस खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी. त्यांनी बदल्यांचे रॅकेट आणि त्यासाठी होत असलेला पैशाचा व्यवहार यावर एक अहवाल तयार केला. आणि तो ऑगस्ट मध्येच मुख्यमंत्र्यांना सादर केला. पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच हालचाल केली नाही. शेवटी हा अहवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मिळवला. त्याला वाचा फोडली.)
आधीच नशिबी । देवेंद्र हा खाष्ट ।
त्यात ‘शुक्ला’ काष्ठ । मागे लागे ॥
‘रश्मी’ दोरखंड । आवळतो गळा ।
बदल्यांची ‘लीळा’ । दावी जगा ॥
एकाला झाकता । दूजे हो उघडे ।
संजू बडबडे । हकनाक ॥
बरा होता गप्प । जितेंद्र आव्हाड ।
जिभेला ना हाड । त्याच्या जरा ॥
सत्तेच्या गाडीचे । उधळले बैल ।
कासरा हो सैल । ‘कांत’ म्हणे ॥
(25 मार्च 2021)

उसंतवाणी-6

(आघाडी सरकारच्या अडचणी कमी पडल्या होत्या म्हणून की काय संजय राउत यांनी अशी बडबड केली. त्यांनी मागणी केली की युपीए च्या अध्यक्षपदी शरद पवारांना बसवा. वास्तवात पवारांचे लोकसभेत खासदार किती? शिवसेनेचाच मुळात युपीए शी काय सबंध? असे प्रश्‍न मग विचारले जावू लागले. राज्य कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी  राउतांना चांगले टोले लगावले आहे.)
संजू म्हणे करा । अध्यक्ष काकाला ।
झोंबू दे नाकाला । मिर्ची कुणा ॥
सोनिया मातेची । वाया घुसळणी ।
सत्तेचे ना लोणी । दिसे कुठे ॥
राहूल प्रियंका । झाला पोरखेळ ।
कशाना ना मेळ । पक्षामध्ये ॥
‘नॅनो’ पक्षाचे हे । पाच खासदार ।
तरी काका फार । ‘पवार’फुल ॥
काका जाणतात । सगळ्यांचा ‘भाव’ ।
म्हणून प्रभाव । पडे त्यांचा ॥
संजू नाचतोय । बेगान्या शादीत ।
नाव ना यादीत । ‘कांत’ म्हणे ॥
(27 मार्च 2021)
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment