Wednesday, April 14, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६

    
उरूस, 14  एप्रिल 2021 

उसंतवाणी-16

(ममता बॅनर्जी यांचे स्ट्रॅटजीस्ट प्रशांत किशोर यांच्याशी पुरोगामी पत्रकारांनी ज्या गप्पा मारल्या ती चॅट लीक झाली. हे प्रकरण खुप गाजले. त्यात त्यांनी मोदींचा प्रभाव मान्य केला. नेमकी हीच गोष्ट पुरोगाम्यांची पोटदुखी ठरत आहे.) 

प्रशांत किशोर । लीक झाल्या गप्पा ।
माथी आता ठप्पा । मोदीभक्त ॥
मोदी विरोधात । का नाही लहर?।
उगाळी जहर । रविश हा ॥
करी ममतांच्या । ‘न्हाणी’ची चौकशी ।
ऐसी साक्षी जोशी । पत्रकार ॥
कितीही पेटवा । विरोधात रान ।
मोदी भगवान । लोकांसाठी ॥
ममता विरोधी । अँटिइन्कंबन्सी ।
नाही एकजिन्सी । काही इथे ॥
ऐसे कैसे बोले । प्रशांत किशोर ।
लिब्रांडूंना घोर । लागलेला ॥
धंदेवाईक हे । स्ट्रॅटजिस्ट खोटे ।
हाणा दोन सोटे । कांत म्हणे ॥
(11 एप्रिल 2021)

उसंतवाणी-17

(पहिल्या तीनही चरणांत असम प. बंगालमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आढळून आला आहे. शिवाय केरळ आणि तामिळनाडूतही चांगले मतदान झाल्याची खबर आहे. सामान्य लोकांनी लोकशाहीवर टाकलेला हा विश्वासच आहे. पण पुरोगामी विद्वान हे मान्य करत नाहीत. लोकशाही मेली अशीच राहूल गांधींसारखी भाषा त्यांच्या तोंडात असते. )

मतदानाचा हा । वाढलाय टक्का ।
झाले हक्का बक्का । बुद्धीवंत ॥
रांगेत माणसे । टाकतात व्होट ।
मनी नाही खोट । त्यांच्या काही ॥
लोकशाही मेली । बोलतो शहाणा ।
शोधतो बहाणा । हारण्याचा ॥
सेफॉलॉजिस्टांचा । आकड्यांचा घोळ ।
जनतेची नाळ । कळेची ना ॥
मतदाने बने । माणूस अंगार ।
करितो भंगार । विद्वानांना ॥
पाच वर्षांची ही । लोकशाही वारी ।
धावे वारकरी । मतदार ॥
कांत म्हणे जाणा । सच्चा हा ची भाव ।
फुका नको आव । पांडित्याचा ॥
(12 एप्रिल 2021)

उसंतवाणी-18

(सचिन वाझेचा साथीदार रियाज काझी यालाही तुरूंगात टाकण्यात आले आहे. हरिश साळवे यांनी अर्णब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईच्या अंडर वर्ल्ड बाबत अतिशय सूचक अशी विधानं केली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारचे सर्वेसर्वा असलेल्या मोठ्या नेत्याकडे हा इशारा आहे. )

काझी पकडला । वाझे पाठोपाठ ।
भरे काठोकाठ । पापघडा ॥
छोटे छोटे मासे । लागती गळाला ।
धुंडती तळाला । यंत्रणा ही ॥
येतसे वरती । जग हे ‘अंडर’।
घोंगावे थंडर । गुन्हेगारी ॥
हरिश साळवे । कायदे पंडित ।
गाठतो खिंडित । भले भले ॥
साळवे सांगतो । दाउद गतीने ।
चालतो ‘मती’ने । राजकिय ॥
व्होरा कमिटीचा । शोधा अहवाल ।
त्याची करा चाल । कायद्याची ॥
अर्णवला देई । साळवे इशारा ।
सुरू खेळ न्यारा । कांत म्हणे ॥
(13 एप्रिल 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment