Tuesday, November 10, 2020

‘बुडाला ट्रंपूल्या पापी’। कुबेरी बुद्धी गेली झोपी ॥

    


उरूस, 10 नोव्हेंबर 2020 

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल समोर आला. त्यावर अग्रलेख लिहीताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी भरपूर गरळ ओकले आहे. समर्थ रामदासांनी औरंगजेबाच्या मृत्यूवर ‘बुडाल्या औरंग्या पापी’ असं लिहीलं होतं. त्याची आठवण करत कुबेर असं लिहीतात ‘बुडाला ट्रंपुल्या पापी’. आता लोकशाहीच्या मार्गाने आधी निवडून आलेल्या आणि आता लोकशाहीच्याच मार्गाने पराभूत झालेल्या ट्रंप यांच्यासाठी अशी भाषा कशी काय वापरत येईल? 

‘लोकसत्तासहीत जगभरचे विवेकवादी ट्रंप यांचा तिरस्कार का करतात हे समजून घेतलं पाहिजे.’ असे एक वाक्य कुबेर यांच्या अग्रलेखात आहे. आता जर कुबेर स्वत:ला ‘विवेकवादी’ म्हणवून घेणार असतील तर ते मग कुणाचा तिरस्कार कसा काय करू शकतात? एक प्रतिष्ठित प्रस्थापित मोठी परंपरा असलेल्या वृत्तपत्राचा संपादक किंवा ते वृत्तपत्र यांनी कुणाचा तिरस्कार करून कसे काय चालेल? वैचारिक विरोध, कडाडून टिका समजू शकतो. पण तिरस्काराला वैचारिक क्षेत्रात कशी काय जागा असू शकते? 

पण इतके भान स्वत:ला विवेकवादी म्हणवून घेताना कुबेरांना शिल्लक राहिलेले दिसत नाही. हा अग्रलेख वर वर पाहता ट्रंप यांच्या विरोधात दिसू शकतो. तसा तो आहेही. पण त्या अनुषंगाने कुबेरांना भाजप आणि विशेषत: मोदी अमित शहा यांना चार लाथा घालायच्या आहेत. 

ट्रंप यांच्या भारत भेटीच्या कार्यक्रमावर ताशेरे कुबेर यांनी ओढले आहेत. समजा हिलरी क्लिंटन जर राष्ट्राध्यक्ष असल्या असत्या तर त्यांच्याही सन्मानार्थ असाच भव्य कार्यक्रम भारतात आखला गेला असता. बिल क्लिंटन आले तेंव्हा त्यांचेही स्वागत उत्साहातच झाले होते. तेंव्हा काही मोदी पंतप्रधान नव्हते. एकूणच भारतीय मानस उत्सवी आहे. मग ही टीका का? आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे नाक कापले गेले असं लिहीताना ‘चीनच्या प्रश्‍नावर आपले हसे होते.’ असे वाक्य कुबेर यांनी या अग्रलेखात लिहीले आहे. आता याला आधार काय? गलवान खोर्‍यातील चकमकीपासून भारत कसा आणि किती चढाईखोर झाला आहे याचे रडगाणे खुद्द ग्लोबल टाईम्स ही चीनी सरकारी वृत्तसंस्थासच देत आहे. आणि इथे लोकसत्ताकरांना मात्र चीनप्रश्‍नी भारताचे हसे झाल्याचे दिवस्वप्न पडत आहे. 

अमेरिकेतील बहुसंख्य ‘अविचारी’ जनतेस ट्रंप यांच्यासारखा आक्रमक नेता नेमस्तांपेक्षा जास्त आकर्षून घेतो असं  म्हणत कुबेर पुुढे लिहीतात, ‘.. अशा आगलाव्या नेत्यांचे काही काळ फावते. अशावेळी समाजातील समंजसांनी विचारींच्या मागे आपली ताकद उभी करायची असते.’ 

आता आपण याचा भारतातील संदर्भ तपासू. 2014 ला मोदींच्या आगलाव्या नेतृत्वाकडे भारत आकर्षित झाला असं कुबेरांना सुचवायचं आहे. मग हा ‘काही काळ’ जो 5 वर्षांचा होता तो संपून परत 2019 मध्ये दुसर्‍या 5 वर्षांच्या ‘काही काळा’साठी भारतियांनी या आगलाव्या नेतृत्वाला परत का निवडून दिले? आताही हा लेख लिहीताना बिहारचे निकाल येउ लागले आहेत. त्यातही भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून बिहारमध्ये पहिल्यांदाच निवडून येतो आहे. याचा अर्थ गिरीश कुबेर काय लावणार? 

मोदी-अमित शहा या आगलाव्या नेतृत्वाच्या विरोधात समंजस माणसांनी कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं? राहूल गांधींच्या? मोदींचे 2014 च्या निवडणुकी आधीपासूनचे कुठलेही भाषण, कुठलीही मुलाखत काढून तपासा त्यात त्यांची भाषा किती आगलावी आहे हे सिद्ध करून दाखवा. मोदींनी अगदी राम मंदिरासारखा मुद्दाही आपल्या भाषणात किती आणि कसा मांडला हे पहावे. आत्ता बिहारच्या निवडणुकांच्या काळात जी भाषणं झाली ती पण कशी आहेत हे तपासावे.

ट्रंप आणि त्यांचा पक्ष आणि अमेरिकेतील मतदार यांचा विचार जरा बाजूला ठेवू. कुबेर ज्या हुकूमशाही प्रवृत्तीवर एकाधिकारशाहीवर टिका करू पहात आहेत त्याला भारतीय मतदारांनी कधी थारा दिला आहे? भारतीय जनता पक्षावर कुणाला काय टिका करायची ती करावी. नेतृत्वाच्य मर्यादा दाखवून द्याव्यात. पण 1980 ला पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांनी भारतीय संविधानीक चौकटीत राजकीय पक्षांसाठी जी आचारसंहिता नेमून दिली आहे त्याचा कधी आणि कसा भंग केला ते सप्रमाण सिद्ध करावे. भाजपच्या नियमित निवडणुका झाल्या आहेत. उलट कुबेर ज्यांच्या मागे जायला सुचवत आहेत त्या कॉंग्रेसच्याच निवडणुका प्रलंबित आहेत.  2014 पासून म्हणजे मोदी अमित शहा यांच्याकडे पक्षाची सुत्रे आली तेंव्हा पासून भाजप शासित कुठल्या राज्यात निवडणुका टाळून अवैध रित्या सत्ता टिकवल्या गेली? 

अमेरिकेत मोदींनी रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यास हजर राहून ‘अगली बार ट्रंप सरकार’ ही केविलवाणी हाक दिली असं कुबेर म्हणतात. एखाद्या उत्सवी प्रसंगी असे शब्दप्रयोग कुणीही करत असतं. त्याला ‘केविलवाणी’ म्हणणारी कुबेरांची लेखणीच बापुडवाणी वाटत आहे. आता नविन अध्यक्ष यांच्यासाठी ‘आवा जो जो’ असा कार्यक्रम करावा लागेल असं कुबेर लिहीतात. खरंच कुठल्या निमित्ताने जो भारतात आले आणि तेंव्हा मोदी सरकारने भव्य कार्यक्रम आखलाच तर कुबेर काय करतील? अमेरिके सारख्या बलाढ्या राष्ट्राचा अध्यक्ष जेंव्हा कुठल्याही देशात जातो तेंव्हा त्याचे स्वागत भव्यच होत असते. मग तो कुठलाही कितीही का छोटा देश असेना. 

आताही चीनविरोधी जागतिक पातळीवर एखादे धोरण अमेरिकेच्या पुढाकाराचे ठरले आणि त्यात भारताचा सहभाग जो बायडेन यांनी मागितला तर कुबेर काय लेखनसंन्यास घेतील? अमेरिकेचा कुठलाही अध्यक्ष पहिले अमेरिकेचे हित पाहणारा असतो.  आपल्या देशात राहून चीनसारख्या देशाचे गुणगान गाण्याची प्रवृत्ती अमेरिकेत नाही. अमेरिकेतील ज्या माध्यमांना चीनमधून पैसा आला तो त्यांना जाहिर करावा लागलेला आहे. आपल्यासारखे चीनचे समर्थन करत छुपे फायदे उकळण्याची वृत्ती तिथल्या माध्यमांची नाही.    

ट्रंप तर हारले आणि 4 वर्षांत पदावरून दूर गेले पण मोदी हारले नाहीतच मात्र अजून जास्त बहुमताने जिंकले याची विलक्षण खंतच त्यांच्या शब्दांतून उमटत आहे. ‘नॉट माय प्रेसिडेंट’ सारखी चळवळ भारतात उभी राहिली नाही याचे दु:ख कुबेरांना वाटत आहे का? 

ट्रंपच्या निमित्ताने लिहीताना कुबेरांचीच विवेक बुद्धी झोपी गेल्याचे दिसून येते आहे.     


         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

5 comments:

  1. चांगला समाचार घेतला फेकसत्ताचा 😀👍

    ReplyDelete
  2. बरोबरच आहे....कुबेरांनी दिलेलं अग्रलेखाच शीर्षक त्यांच्या द्वेषमूलक वृत्तीचं द्योतक आहे.ट्रम्प हे वादग्रस्त निर्णय घेणारे असले तरी चीनचा विकृत साम्राज्यवाद,इस्लामी दहशतवाद याला आरे ला कारे वृत्तीने त्यांनी पायबंद घालण्याचा प्रयत्न केला.प्रामाणिकपणे अमेरिका या राष्ट्राच्या हिताचा सर्वप्रथम विचार करून त्याप्रमाणे धोरणं राबवली.आता ती कुबेरांसारख्यांना डाचत असली तरी ट्रम्प त्यांच्या जागी बरोबरच होते.याच कुबेरांनी फ्रान्समध्ये मॅक्राॅन सत्तेवर आल्यावर त्यांचे पुरोगामी वगैरे म्हणून गोडवे गायले होते.पण मॅक्राॅनलाही इस्लामी जिहाद्यांना षठे षाठ्यम या बाण्याने उत्तर द्यायची वेळ आणली.आणि मॅक्राॅनही फ्रान्सचा देशप्रमुख या नात्याने त्यांच्या जागी योग्यच आहे.शेवटी देशाशी बांधिलकी वगैरे ह्या डाव्या झापडबंद विचारसरणीच्या लोकांना कशाशी खातात हे माहित नसणे स्वाभाविकच आहे.

    ReplyDelete
  3. अतिशय परखड लेख!
    दिवसेंदिवस कुबेरांचे विचारधन आटत चाललेय, हेच खरे!😄

    ReplyDelete
  4. जबरदस्त झोडपले आहे

    ReplyDelete
  5. दणदणीत आणि वेधक विचार. पितळ उघडे पडले .

    ReplyDelete