Saturday, November 14, 2020

जेएनयु मधील ‘विवेक’वाद

 


 उरूस, 14 नोव्हेंबर 2020 

एक चित्र आहे 2005 मधील. मंचावर पंतप्रधान मनमोहन सिंग आहेत, राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, कॉंग्रेसचे राजकुमार राहूल गांधी आहेत. कार्यक्रम शांततेत पार पडतो आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रम आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठांत पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या अनावरण. 

आता दुसरे 15 वर्षांनंतरचे 2020 मधील चित्र बघा. त्याच जेएनयु चा परिसर आहे. मंचावर प्रत्यक्ष रूपात पंतप्रधान नाहीत तर ते व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित आहेत. उच्च शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. हा प्रसंगही पुतळा अनावरणाचाच आहे. पण इथे मात्र निदर्शने होत आहेत. कारण आता पुतळा नेहरूंचा नसून विवेकानंद यांचा आहे. 

विरोध करण्याची ही काय नेमकी मानसिकता आहे? काही दिवसांपूर्वी याच पुतळ्याच्या पायथ्याशी अभद्र भाषेत लाल रंगात घोषणा रंगवून ठेवल्या होत्या. पुतळ्याचे अनावरण बाकी असल्याने तो गुंडाळून ठेवलेला होता. विवेकानंदांवर भगव्या रंगाचा शिक्का मारून हा विचार आमच्या विद्यापीठाच्या आवारात नको असे आग्रहाने सांगत हा विरोध केला गेला होता. 

स्वत:ला वैचारिक क्षेत्रातले म्हणवून घेणारे पुरोगामी या असभ्य विरोधाचे समर्थन कसे काय करू शकतात? 

या आक्रस्ताळ्या विरोधामुळे भाजप सारख्या पक्षाला या पुतळ्यावरून राजकारण करण्याची मोठी संधी मिळाली. बिहार येथील निकाल 10 तारखेला घोषित झाले. 11 तारखेला मोदींनी दिल्लीला पक्ष कार्यकर्त्यांसमोर विजयोत्सवाचे भाषण केले. आणि 12 तारखेला विवेकानंद पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी घेत देशाला संबोधीत केले. 

पुतळा अनावरणाची ही नेमकी वेळ लक्षात घ्या. पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका आहेत. अशावेळी विवेकानंदांच्या पुतळ्याला विरोध निवडणुकीत महागात पडू शकतो. म्हणून डाव्यांचा विरोध फार तीव्र होवू शकत नाही. हे सर्व जाणून भाजपने जाणीवपूर्वक याच वेळी हा समारंभ घेण्याचे ठरवले. 

विवेकानंद यांना विरोध केवळ आत्ताच आहे असे नाही. या पुर्वीही जेएनयु च्या विद्यार्थी संसदेच्या कार्यालयात मार्क्स, माओ, चे गव्हेरा यांचे फोटो लावलेले असायचे. 1995 ला अभाविप ने निवडणुका जिंकल्या आणि त्यांनी संसद कार्यालयात विवेकानंदांची प्रतिमा लावली. त्यावरून तेंव्हाही डाव्यांनी प्रचंड गदारोळ केला. 

काळ असा पलटला की आता या पुतळ्याला विरोध करण्यातला जोर संपून गेलाय. बाकी खोटी कारणे पुढे केली जात आहेत. एक तर पुतळ्यावर खर्च कशाला? या पुतळ्याचा खर्च माजी विद्यार्थी संघटनेने केला असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. पण तरी आरडा ओरड चालू आहे. मग मुद्दा समोर आला की विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे थकले आहेत आणि अशा फालतू गोष्टींवर खर्च कशासाठी? 

यावरही जी आकडेवारी समोर आली ती चकित करणारी आहे. 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीत जेएनयु वर शासकीय खर्च झाला ती रक्कम आहे 1300 कोटी रूपये. आणि 2014 ते 2019 या पाच वर्षांत जी रक्कम अनुदान आणि इतर खर्चासाठी मिळाली तो आकडा आहे 1500 कोटी रूपये. असं असताना आरोप मात्र असा की शिष्यवृत्ती किंवा इतर कामांसाठी पैसे दिले जात नाहीत. ही माहिती अर्थातच माहितीच्या आधिकारातच बाहेर आलेली आहे. विरोध करणार्‍यांनी माहितीच्या अधिकारांत जर त्यांच्या सोयीचे आकडे मिळवून काही मुद्दे मांडले असते तर त्याचा विचार तरी करता आला असता. पण आता लक्षात असे येते आहे की यांना केवळ आणि केवळ विरोध करायचा आहे.

वारंवार सगळे पुरोगामी कॉंग्रेसच्या पदराआड लपतात. किंवा कॉंग्रेस यांच्या मदतीने असे काही विषय ऐरणीवर आणत त्यावर गदारोळ माजवते. मग यांनी याचे उत्तर द्यावे की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना याच विद्यापीठ परिसरांत याच डाव्यांच्या विद्यार्थी नेत्यांनी प्रवेश का नाकारला होता? प्रकरण इतकं गंभीर आणि टोकाचं बनलं की हे विद्यापीठ वर्षभरासाठी बंद ठेवण्याचा कठोर निर्णय इंदिरा गांधी सरकारला घ्यावा लागला. या सगळ्या प्रकरणात मोदी भाजप संघ हिंदूत्व विवेकानंद सावरकर हे काहीच मुद्दे नव्हते. 

इतरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे डोस पाजवणारे, वैचारिक स्वातंत्र्य सहिष्णुतेची भाषा बोलणारे याचे उत्तर कधी देणार की इतर विचारधारांबाबत तूमची वागणुक इतकी असहिष्णू का? 

विद्यापीठ परिसरांत एखाद्या रस्त्याला सावरकरांचे नाव दिले तर त्याला तूम्ही काळे फासता, विवेकानंदांच्या पुतळ्याचा अवमान करता, देशाच्या पंतप्रधानाला परिसरांत येण्यापासून रोकता ही नेमकी कुठली सहिष्णुता आहे. 

कोरोना आपत्तीच्या काळात हा कार्यक्रम होत आहे म्हणून पंतप्रधान प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी आभासी पद्धतीने पुतळ्याचे अनावरण केले. याचाही एक मोठा झटका निदर्शन करणार्‍यांना बसला. कारण प्रत्यक्षात पंतप्रधान त्या परिसरात उपस्थित नव्हते. तर मग विरोध करायचा कसा? शिवाय पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका होवू घातल्या आहेत.

खरं तर विवेकानंद ही व्यक्तीरेखा अशी जाती धर्माच्या चौकटीत अडकणारी नाही. सनातन हिंदू धर्म कसा विश्वव्यापक आहे हे त्यांनी सगळ्या जगाला पटवून दिले. जगातील एकेश्वरवादी एक पुस्तकी एकाच प्रेषीताला मानणारे धर्म एकीकडे आणि अनेकेश्वरवादी, विविध रंगी, व्यापक असा हिंदूधर्म दुसरीकडे. आजही जगभरचे अभ्यासक रसरशीत अशा व्यापक सनातन हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात तळ ठोकून बसतात. जून्या मंदिरांमध्ये जावून एक एक मूर्ती तपासत अभ्यासत बसतात. हिंदूंची जिवनपद्धती चालीरीती यांचा बारकाईने अभ्यास करतात. आपले संगीत, तत्त्वज्ञान, वास्तुशास्त्राचे कोडे उलगडण्याचा प्रमाणीक प्रयत्न करतात. आणि याच्या नेमके उलट व्यापक अशा हिंदूत्वाची जगाला ओळख करून देणार्‍या विवेकानंदांच्या मूर्तीला पुरोगामी याच भारतात विरोध करतात. 

पुरोगाम्यांचा हा जेएनयु मधील ‘विवेक’वाद आता हास्यास्पद बनला आहे. राजकीय पातळीवर आपल्या पक्षाला संपविण्याचे जे काम प्रमाणिकपणे ‘आंतरराष्ट्रीय पप्पू’ राहूल गांधी करत आहेत तेच काम वैचारिक क्षेत्रात पुरोगामी करू लागले आहेत. आयोध्येत राम मंदिर प्रकरणांत उत्खननात सापडलेल्या हिंदू मंदिराच्या अवशेषांनी यांची बौद्धिक लबाडी सिद्ध केली होतीच. आता विवेकानंदांच्या पुतळ्याने यांना अजून उघडे पाडले आहे. अनावरण विवेकानंदांच्या पुतळ्याचे झाले आहे पण खरे अनावरण यांच्या बौद्धिकतेचा आव आणण्याचे झाले आहे.  

 

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

1 comment:

  1. ढोंगी सेक्युलरांचे बौद्धिक अनावरण झाले आहे.
    उत्तम मांडणी 👍🙏🌹

    ReplyDelete