महालक्ष्मी म्हणजे कोल्लापुर इतकेच आपल्याला माहित असते पण कोल्हापुरच्या मूर्ती सारखीच अप्रतिम मूर्ती नागपुरपासून उत्तरेला रामटेकच्या दिशेने पारशिवनी गावात स्थित आहे. एक मिटर उंचीची ही मूर्ती खोदकामात सापडली. मूर्तीच्या उजव्या हातात बीजपुरक आहे, वरच्या हातात गदा आहे. डाव्या वरच्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहे तर डाव्या खालच्या हातात पानपात्र आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी पण अगदी अशाच आयुधांनी युक्त आहे. हीला अंबाबाई असे पण संबोधतात. महालक्ष्मी असा शब्द आला की तीला विष्णुपत्नी असं मानण्याची प्रथा आहे. पण महालक्ष्मी ही केवळ विष्णुपत्नी नव्हे. मुक्तेश्वरांनी (एकनाथांच्या मुलीचा मुलगा) महालक्ष्मीची जी आरती लिहीली आहे त्यातील एका कडव्यात
तारा सुगतागमी शिवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीज निगमागम सारी
प्रकटे पद्ममावती जीन धर्माचारी
असे वर्णन आले आहे. म्हणजे बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची गौरी आहेस, सांख्यांसाठी तू प्रकृती आहेस, आगम पंथियांसाठी गायत्री आहे आणि जैनांसाठी पद्मावती आहेस. आरती म्हणताना आम्ही "तारा शक्ती अगम्य" अशी अगम्य भाषा करून बौद्धांचा संदर्भ उडवला. तर "नीज धर्माचारी" असा शब्द वापरून जीन धर्मियांचा म्हणजेच जैनांचा संदर्भ उडवला.
पारशिवनीची ही महालक्ष्मी अतिशय देखणी आहे. तिच्या मुकुटांत सयोनीलिंग आहे. पाठशिळेवर खाली सिंह, मग घोडा मग व्याल कोरलेले आहेत. पायाशी खाली चामरधारिणी आहेत. गळ्यात हार, कर्णभुषणे, मेखला असे अतिशय नजाकतीनै कोरलेले आहेत. पंचमहाभुतांचे प्रतिक म्हणून पाठशिळा पंचकोनात कोरलेली असते. तशी ती इथेही आहे.
(फोटो व माहिती सौजन्य प्रविण योगी, पोलीस अधिकारी हिंगोली)
चामूंडा : भयानक व बिभत्स रसाचे दर्शन
आपल्या परंपरेत मानवी भावभावनेतील सर्व रसांचा विचार केला गेला आहे. काही गोष्टी नकोशा वाटतात पण त्यांचे अस्तित्व मात्र असते. असे दोन रस भयानक आणि बिभत्स यांचे दर्शन चामुंडा मूर्तीत दाखलेले आहे. ही मूर्ती नीलकंठेश्वर मंदिर निलंगा (जि. लातुर) मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टकांतील आहे.
उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशुळ, डाव्या वरच्या हातात खट्वांग (मानवी कवटीपासून केलेले हत्यार), डावा मधला हात तोंडात असून त्याची नखं ती दाताने कुरतडत आहे, खालच्या हातात कपाल व नरमुंड आहे. एक हात खंडित आहे. ही सहा हाताची चामूंडा आहे.
पोटावर विंचू आहे. सर्प बंध आभुषण म्हणून स्तनाभोवती कमरेला दाखवलेले आहेत. जांघेत घंटा दिसून येते आहे. नरमुंडमाला पायावर लोंबत आहे.
तिचे वाहन प्रेत पायाशी आहे. उजवीकडे पिशाच्च नाच करत आहे. डाव्या बाजूला कुत्रे आहे. वर मान करून नरमुंडातील रक्त ते चाटत आहे. देवीची हाडे स्पष्ट दिसतात. हाडं आणि कातडी असे मांसरहित रूप चामुंडेचे ग्रंथात वर्णीलेले आहे. स्तन शुष्क असून खाली लोंबत आहेत. (उन्नत उभारलेले स्तन समृद्धतेचे मातृत्वाचे प्रतिक समजले जाते)
भयानक व बिभत्स रसाचे दर्शन या मूर्तीत शिल्पकाराने घडवले आहे. नउ रसांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी कविता आहे
'अद्भुत' वाटे 'भयानका'चे
'बिभत्स' दर्शन होता जगाचे
मनात 'करूणा' दाटून येते
'रौद्रा'तूनी जन्म 'वीरा'स देते
'हास्या'त 'शृंगार' शोभे विहंगम
सगळ्या रसाचा 'शांतीत' संगम
सप्तमातृकां पैकी चामुंडा एक मानली जाते. या मातृकांची संख्या आठ, नऊ पण सांगितली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सप्तमातृका आढळून येतात.
(फोटो सौजन्य दत्ता दगडगावे, लातूर. चामुंडा रूप विवरण डाॅ. माया पाटील (शहापुरकर) यांच्या ग्रंथाच्या आधाराने)
आळतं सुंदरी
प्राचीन मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्यभागावर) सुरसुंदरींची शिल्पे हे एक वैशिष्ट्य आढळून येतं. १२ व्या शतकातील प्राचीन अशा गुप्तेश्वर मंदिर (ता. गंगाखेड जि. परभणी) येथे "आळतं सुंदरी"चे हे शिल्प कोरलेलं आहे. मंदिराच्या उत्तर भागात विष्णुचे पद्मनाभ रूपातील शिल्प देवकोष्टकात आहे. त्याच्या बाजूला हे शिल्प आहे. मंगल कार्य घरात असेल तेंव्हा उखळा जात्याचा मुहूर्त केला जातो. उखळ जात्याची पूजा करून पाच स्त्रीया त्यावर ठेवलेले विडे उचलून उखाणे घेतात. यावेळी वधु, करवली, तिची आई किंवा वरमाय यांना न्हाउ घातलं जातं. व नंतर त्यांच्या पायावर ओल्या कुंकवाचे पट्टे रेखतात. स्वस्तीक काढलं जातं. याला "आळतं" म्हणतात.
या शिल्पात ही नववधु वेलीला टेकुन उभी आहे. तिच्या तळपायावर दूसरी स्री आळतं भरत आहे. हे खोड वेलीचं आहे कारण याच परिसरांत जात्यावरच्या ओव्यांत एक गोड असा संदर्भ आलेला आहे
दारी मांडव ग घाला ।
फुला सगट जाईचा ।
छंद मुलाच्या आईचा ।।
दारात वेल आहे आणि त्या फुलांचा सुगंध सर्व परिसरात भरून राहिला आहे. शिल्पाच्या वरच्या भागात वेलीचा पर्णविस्तार नक्षीच्या माध्यमातून दाखवला आहे. या शिल्पातील स्त्रीचा जो केसांचा मोठा अंबाडा दाखवला आहे त्यावर गजरा माळलेला आहे.
काही शिल्पं "सुरसुंदरी" या शब्दांत बसत नाहीत. पत्र सुंदरी, शत्रु मर्दिनी, पुत्र वल्लभा अशी शिल्पं ज्यांच्यावर याच सदरात लिहिलं आहे ती स्त्री स्वभावाचे विविध पैलू दाखवतात. ती केवळ शृंगारापुरती मर्यादीत नाही हे स्पष्ट करतात. ही आळतं सुंदरी पण अशीच वेगळी आहे. या परिसरांतील रिती रिवाज परंपरा यांचे प्रतिबिंब यात उमटले आहे. अभ्यासक डाॅ. ए.डि. शिंदे सर यांनी आळतं सुंदरी हे नाव या शिल्पाला दिलं. मला हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प वाटलं. या मंदिराला जरूर भेट द्या.
(फोटो सौजन्य अरविंद शहाणे, परभणी. swaraj infotain या u tube वाहिनीवर या मंदिवर बनवलेले दोन माहितीपट उपलब्ध आहेत त्याची link इथे देतोय https://youtu.be/CaPlMqklJmI )
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575
No comments:
Post a Comment