Monday, November 9, 2020

मूती मालिका -५


भक्ताची भव्य मूर्ती (औंढा नागनाथ, जि.हिंगोली)

देवदेवतांच्या कलात्मक आणि भव्य मूर्ती आपण पाहतो पण सामान्य भक्ताची मूर्ती आणि तिही इतकी भव्य? हे आश्चर्य औंढा नागनाथ येथील मंदिरावर आढळून येतं. मूर्तीची भव्यता लक्षात यावी म्हणून मी हा पाठभिंतीचा पूर्णच फोटो मुद्दाम दिला आहे. दोन्ही हात जोडलेले, पद्मासनात बसलेली, चेहर्यावर शांत भाव असलेली, कुठलेच अलंकरण नसलेली ही मानवी मूर्ती लक्ष वेधून घेते. औंढ्याचं मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याबद्दल सांगताना संत नामदेवांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही, मग त्यांनी आपल्या भक्तीच्या शक्तीने देवालाच बदलण्यास भाग पाडले, आणि मंदिर फिरून पश्चिमेला आले. यातला खरेखोटेपणा माहित नाही कारण ही दंतकथा आहे. पण पूर्वेला एका भक्ताची भव्य मूर्ती मंदिरावर कोरून भक्तीची महती किती याचा पुरावाच इथे आढळतो.
गर्भगृहाच्या पाठभिंतीवर ही मूर्ती पूर्वेला तोंड करून विराजमान आहे. अशाच अजून दोन मूर्ती दक्षिण आणि उत्तरेला गाभार्याच्या बाह्यांगावर आहेत. दीड मिटर बाय दीड मिटर इतक्या भव्य कोनाड्यात या मूर्ती आहेत. मुर्तीच्या बाजूला छत्रचामर धारिणी आहेत. मुर्तीच्या माथ्यावर साधी टोपी आहे. त्यावर चंद्रासारखी आकृती कोरलेली आहे.
मंदिराला प्रदक्षिणा घालून आपण मागे या मूर्तीच्या समोर दगडी पायर्यांवर बसूलो तर एक वेगळाच अनुभव येतो. भक्तीतून येणारी शांत समाधानाची भावना मनात जागी येते. आपण मूर्तीसमोर हात जोडतो पण इथे मूर्तीच आपल्या समोर हात जोडते आहे, आपल्यातले पावित्र्य देवत्व जागवते आहे असे काही विलक्षण जाणवते. देवदर्शन करून घाईघाईत निघून जाणार्या अंधभक्तांचे काही सांगता येत नाही पण खरा भक्त, रसिक, शिल्पप्रेमी या मूर्तीच्या प्रेमात पडून समोरच्या दगडी पायर्यांवर बसून राहतो हे निश्चित.
तज्ज्ञांनी यावर अजूनही सविस्तर कुठे काही लिहीलं नाही (three huge sculptures probably of devotee इतकाच उल्लेख गो.ब. देगलुरकरांच्या पुस्तकात आहे). या प्राचीन भव्य मंदिरावर सर्वात मोठ्या आकारात या मानवी मूर्ती कशासाठी कोरल्या गेल्या आहेत? का हा कुणा देवतेचाच प्रकार आहे? कुणाला याची माहिती असल्यास खुलासा करावा.
Vincent Pasmo
या फ्रेंच मित्राला या मूर्तीने फारच आकर्षीत केले. हा फोटो त्यानेच काढला आहे.

(ह्या मूर्तीबद्दल तज्ञ चर्चा करत आहेत. अजून ह्याचा खुलासा झाला नाही.)



लोलितपाद नटराज (लेणी क्र. २१, वेरूळ)
नटराजाची प्रतिमा जी आपल्या सतत डोळ्या समोर येते ती एक पाय वर उचललेली व एका पायावर शरिराचा सगळा भार तोलून धरणारी अशी असते. ही प्रतिमा तंजावरच्या मंदिरातली आहे. दहाव्या शतकातील. पण त्याच्या जवळपास ३०० वर्षे आधी नटराजाची प्रतिमा कोरल्या गेली आहे वेरूळला. २१ क्रमांकाची ही लेणी "रामेश्वर लेणी" नावाने ओळखली जाते. नटराजाचे हे सर्वात पुरातन कलात्मक आणि भव्य असे शिल्प आहे. या नटराजाला "लोलितपाद नटराज" म्हणतात. शिवाने व्याघ्रचर्म कटीस परिधान केले आहे. दोन्ही बाजूला वादक दिसून येतात. अंतराळात ब्रह्मा, विष्णु, इंद्र यांची शिल्पे आहेत. एक परिपूर्ण कलात्मक दृश्य अशी या शिल्पपटाची ओळख आहे. १४ व्या क्रमांकाच्या लेणीतही नटराज शिवाचे अप्रतिम शिल्प आहे.
गायन वादन नृत्य यांचे सगळ्यात जूने संदर्भ औरंगाबाद परिसरांतील लेण्यांत सापडतात हा पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आम्रपालीचे एक विलक्षण शिल्प औरंगाबाद लेण्यात याही पूर्वीच्या काळात कोरलेले आहे.
महाराष्ट्राची सांगितिक कलात्मक अस्मिता या शिल्पाला मानले पाहिजे कारण हे तंजावरच्या आधीचे आहे अशी आग्रही भुमिका
Mahagami Gurukul
गुरूकुलाच्या संचालिका विख्यात ओडिसी/कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता या मांडत असतात. वेरूळ लेण्यात नृत्य विषयक भरपुर मुद्रा आढळून येतात.
शार्ङगदेवाचा संगीत रत्नाकर हा ग्रंथही याच परिसरात देवगिरी किल्ल्यावर रचला गेला. तेव्हा ही भुमी कलेची भुमी आहे हे निश्चित. मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर बाह्य भागात वादन, नृत्य करणारी सुरसुंदरींची शिल्पे अधिक आहेत. होट्टल येथे नृत्य गणेश आहे. जामखेडच्या (जि. जालना) खडकेश्वर महादेव मंदिरात लहान आकारात गायन वादन नृत्य करणार्या स्त्रीयांचे स्तंभ शिल्प आहे.
नटराज शिवाच्या विविध मुद्रा मराठवाड्यातील औंढा, उमरगा, माणकेश्वर, निलंगा येथील मंदिरांवर आहेत.
(हे शिल्प नटराज शिवाचे नसून नटेश शिवाचे आहे आसे तज्ञ सांगत आहेत. शिवाय हा लोलीत पद शिव नाही. यावर अजून प्रकाश पडला पाहिजे.)

(फोटो सौजन्य
Akvin Tourism sustainable travel in India
)



विजय विठ्ठल (हंपी, कर्नाटक)
कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ आहे त्यावर ही विठ्ठल मुर्ती कोरलेली मला आढळली. विठ्ठलाचा हा एक पुरावा. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे खाली जी चाकं दिसत आहेत ती संपूर्ण फिरत होती. लोक सारखं फिरवून नुकसान करायला लागले म्हणून दगड लावून चाकांना स्थिर केले आहे. विठ्ठल भोळ्या भक्तांचा साधाभोळा देव आहे असं म्हणतात. पण इथे मंदिराचे प्रचंड मोठे आवार पाहून विठ्ठलाची "श्रीमंती" डोळ्यात भरते. मराठी माणसांनी पंढरपुर सोबत हंपीच्या विठ्ठल मंदिराची यात्रा केली पाहिजे. आपल्या विठ्ठलाचे ऐश्वर्य डोळे भरून बघितलं पाहिजे. साध्या पालखीतून आपण दिंड्या घेवून पंढरपुरला जातो पण याच आपल्या विठ्ठलाचा रथ किती राजेशाही होता हे बघितलं पाहिजे.
पंचेवीस तीस फुटीं उंच सलग असे दगडी खांब आणि तसलेच आडवे बीम वापरून जी भव्यता हंपीच्या मंदिरांना आलेली आहे ती विलक्षण आहे. अन्यथा इतक्या लांबीचे दगड कुठल्या जुन्या मंदिरामध्ये वापरलेले आढळत नाहीत. मंदिरातला गरूड खांब, हा भव्य रथ विठ्ठल विष्णुचाच अवतार समजला जातो याचा पुरावा दाखवतो. रथयात्रा ही प्रामुख्याने वैष्णव देवतांची निघते. महाराष्ट्राने पालखी हा रथाला शोधलेला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण पर्याय आहे का? याचाही शोध घेतला पाहिजे. विठ्ठल हे दैवतच मुळात सनातन धर्मातील एक क्रांती आहे असं जाणवतं. या दैवतेला वाहन नाही, हीच्या हातात शस्त्र नाही, ही दैवता कोप पावून कुणाला शाप देत नाही की वरदान देत नाही. पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर कटीवर हात ठेवून उभी आहे. त्यामुळे भजनात रमलेला तुळशी माळ घातलेल्या वारकर्याच्या भोळ्या भक्तीत बुडालेला विठ्ठलच आपल्याला जवळचा वाटतो. विजयनगरचा विजय विठ्ठल अंतराने आणि रूपानेही दूरचा भासतो. आपल्याला काळ्या पाषाणातील विठ्ठलाचे "सावळे सुंदर" रूप पहायची सवय. त्यामुळे हा विठ्ठल वेगळा वाटतो. कुठे संगमरवरी दगडांत कुणी विठ्ठलाची मुर्ती घडवली तर मला नाही वाटत ती मराठी माणसाला आपलिशी वाटेल म्हणून. बहिणाबाईंनी त्यामुळेच लिहून ठेवलंय
सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्याचा विठोबा
पाना फुलांतच राजी
रा.चिं. ढेरे सारख्या अभ्यासकाने मांडले की पुरीचा जग्गनाथ, तिरूपतीचा बालाजी आणि पंढरपुरचा विठोबा ही मुळची लोकदैवतं नंतर विष्णुचे अवतार म्हणून स्विकारली गेली. जग्गनाथ "अन्नब्रह्म", बालाजी "कांचनब्रह्म" तर विठ्ठल "नादब्रह्म" मानल्या जातो. तुळशीमाळ गळ्यात घातलेला विठ्ठल आर्तपणे आळवलेल्या भजनानेच संतुष्ट होतो.

श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

1 comment: