Thursday, November 12, 2020

मूर्ती मालिका -६

 


रावणानुग्रह मूर्ती (औंढा, हळेबीडू)

डावीकडील शिल्प औंढ्याच्या नागनाथ मंदिरावरील आहे. या शिल्पाला "रावणानुग्रह" असे नाव डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात आढळते. कैलास पर्वतावर शिव पार्वती बसलेले आहेत. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डावा हात पार्वतीच्या कमरेवर आहे. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या उजव्या खांद्यावर आहे. हा पर्वत रावणाने उचलून धरला आहे. रावण वज्रासनात बसलेला आहे. शिव सव्यललितासनात बसलेला आहे (उजवा पाय खाली सोडलेला, डाव्याची मांडी). पार्वती वामललितासनात (डावा पाय मोकळा, उजव्या पायाची मांडी) असून शिवाच्या मांडीवर बसलेली आहे.
असेच शिल्प वेरूळला कैलास लेण्यात आणि "सीता की नहानी" नावाने ओळखल्या जाणार्या २९ क्रमांकाच्या लेण्यातही आहे.
उजवीकडचे शिल्प हळेबीडूच्या होयसळेश्वर मंदिरावरचे आहे. इथे रावणाचे पाच तोंडं दिसत आहेत. शिव पार्वती ज्या कैलास पर्वतावर बसलेले आहेत त्या पर्वताचे बारकावे तिथले प्राणी पक्षी पशु यांच्यासह दाखवले आहेत. हे थक्क करणारे आहेत. एक बाय दोन फुटाच्या या छोट्या दगडी तूकड्यात इतके बारकावे कोरणे म्हणजे किती कौशल्याचे काम.
पर्वताच्या टोकावर बसलेले शिव पार्वती जे या चराचराचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या उच्चासनावरून हे सहज सुचित होते. या मूर्तीचा अर्थ अभ्यासक वेगवेगळा लावतात. पण हळेबीडूच्या मूर्तीतून शिव पार्वती सोबतच प्रकृती आणि पुरूष असे म्हणता येईल. शिवाय रावणाने कितीही हलविण्याचा प्रयत्न केला तरी प्रकृती आणि पुरूष यांच्या मुळे हे चराचर व्यवस्थित चालू आहे असाही अर्थ लावता येतो. रावणाला पर्वत ओलांडायचा होता. पण शिव पार्वती त्यावर विलास करत होते. त्यामुळे कुणालाच तिथून जायची परवानगी नव्हती. रावणाला आपल्या शक्तीवर गर्व होता. त्याने पर्वतच हलवायला सुरवात केली. मग शिवाने त्याला जखडून ठेवले. मग रावणाने शिवाची तपस्या केली व अनुग्रह मागितला. अशी काहीशी पुराणकथा सांगितली जाते. यावर कुणाला काही माहिती असेल तर प्रकाश टाकावा.
महाराष्ट्र हा उत्तर चालूक्यांच्या अधिपत्या खाली होता. अकराव्या बाराव्या शतकांतील बर्याच मंदिरांच्या शैलीवर उत्तर चालूक्यांचा प्रभाव जाणवतो. मराठवाड्यातील बरेच प्राचीन शिलालेख कानडीतले आहेत.
मंदिरांवरचे असे शिल्पामधले बारकावे आपण पहातच नाहीत. घाईघाईने मंदिराला प्रदक्षिणा घालून निघून जातो. अशा कृतीतून आपण अप्रतिम अशा शिल्प सौंदर्यालाच "बायपास" करून निघून जातो. अनाम कलाकाराने मोठ्या मेहनतीने आयुष्य खर्च करून घडवलेली ही सौंदर्यपूर्ण शिल्पे किमान जरा वेळ देवून बघितली तरी पाहिजेत. (शिल्पाबाबत अजून काही माहिती असेल तर जरूर सांगा. चुका दाखवा. तूमच्या भागातील माहितीतील मूर्तींबाबत सांगा. त्यांचे फोटो पाठवा. मंदिर व शिल्प कोशाचा एक छोटा प्राथमिक भाग म्हणून ही मालिका सुरू केली आहे. त्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे.) (औंढ्याचा फोटो सौजन्य
Travel Baba
)



चक्रव्युह छेदणारा अभिमन्यु (होयसळेश्वर. हळेबीडू)
कर्नाटकातील होयसळेश्वर मंदिर शिल्पकलेचा अत्युच्च नमुना आहे. या मंदिरावर बाह्य भागात एक फुट उंच आणि दोन अडीच फुट रूंद असा हा सुंदर शिल्पपट आहे. महाभारतात ज्याचे वर्णन आलेले आहे तो चक्रव्युह या ठिकाणी कोरलेला आहे. रथावर अर्जूनपुत्र अभिमन्यु स्वार आहे. सहस्त्रावधी बाणांनी तो लढतो आहे. त्याला कर्णाने पूर्णत: घेरले आहे. त्याचे बाण आपल्या बाणांनी रोकले आहेत. डाव्या बाजूला भीम आणि हिडिंबेचा पुत्र घटोत्कच दाखवला आहे. त्याच्या हातात गदा आहे. इतक्या छोट्या शिल्पात राक्षस कुळातील घटोत्कच वेगळा दाखवत शिल्पकाराने कमाल केली आहे.
खरी कमाल तर चक्रव्युहात बारीक बारीक कोरलेल्या सैन्याला दाखवून केली आहे. हा फोटो मी साध्या मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलाय. मोठ्या कॅमेर्यातून फोटो काढून enlarge करून बघितल्यास बारकावे अजून नीट समजतील.
होयसळ शैलीत शिल्पकलेने कळस गाठला होता असं म्हणतात ते उगीच नाही. हळेबीडू आणि बेलूरच्या मंदिरात त्याचा प्रत्यय दर्शकांना जरूर येतो. ही मंदिरे आपल्या एखाद्या मोठ्या सहलीचा भाग म्हणून गडबडीत पाहू नका. किमान एक संपूर्ण दिवस इथे घालवला पाहिजे. तर इथलं शिल्प सौंदर्य समजू शकेल. बारकावे पहायचे तर आठवडा लागतो.


नटेश शिव (नीलकंठेश्वर मंदिर, निलंगा, जि. लातुर)
शिवाच्या विविध मनमोहक मूर्ती मराठवाड्यात आहेत. निलंग्याच्या मंदिरावर बाह्यभागावर देवकोष्टकात ही मुर्ती आहे. उजवा हात अभय मुद्रेत असून हातातअक्षयमाला आहै. वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात खट्वांग आहे. खालच्या हातात बीजपुरक (मातुलिंग) आहे. शिवाच्या उजव्या बाजूस खाली नंदी बसलेला आहे. डाव्या बाजूस गंगा आहे. डावा पाय जमिनीवर टेकवला असून उजवा पाय गुडघ्यात दूमडून वर उचलला आहे. अशा १०८ नृत्यप्रकार सांगितले जातात त्यातील ही मुद्रा भुजंगतलास म्हणून ओळखली जाते. मूर्ती तीन फूटाची आहे.
१२ व्या शतकातील हे उत्तर चालुक्य कालीन मंदिर त्रिदल पद्धतीचे आहे. मुख्य गाभार्यात शिवलिंग असून इतर दोन गाभार्यांत विष्णु व हर गौरी (शिव पार्वती एकत्र) या मूर्ती आहेत. (माया पाटील शहापुरकर यांच्या "मंदिर शिल्पे' या ग्रंथात या मंदिरावर सविस्तर लिहिले आहे. ही माहिती त्यातीलच आहे.)
शिवाच्या या नृत्य मूर्तीला नटेश असे म्हणतात. नटराज हा शब्द आपण शिवाच्या सगळ्याच नृत्य मूर्तीला वापरतो. पण तो तसा नाही. (फोटो सौजन्य डाॅ. दत्तात्रय दगडगावे, लातुर)
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद 9422878575.

No comments:

Post a Comment