Sunday, November 22, 2020

मूर्ती मालिका - ७


नृत्य गणेश (होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड)

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्यअंगावर उत्तरेला ही अप्रतिम अशी नृत्य गणेशाची तीन फुट उंच सुबक मूर्ती आहे. हा सहा हातांचा गणेश आहे. उजव्या बाजूला वरच्या हातात परशु आहे. उजव्या मधल्या हातात भग्नदंत आहे. डाव्या बाजूला वरच्या हातात नाग आहे. डाव्या मधल्या हातात मोदक आहेत.
खालचे दोन्ही हात सुंदर अशा नृत्यमुद्रेत आहेत. डाव्या हाताच्या या मुद्रेला "गजहस्त" असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर समर्थपणे रोवलेला आहे याच्या नेमकं उलट उजव्याचा केवळ अंगठाच कलात्मकरित्या वळवून जमिनीवर टेकवला आहे. अगदी असं वाटतं प्रत्यक्ष गणराज नाचत असताना त्याचे छायाचित्र घेतले आणि त्या छायाचित्रावरून हे शिल्प कोरले. मेखलेची मी माळ मध्यभागी खाली सुटली आहे ती बरोबर डावीकडे झुकली आहे. केवळ स्थीर उभा गणेश असता तर ही माळ ओळंबा रेषेत जमिनीच्या दिशेने सरळ दाखवली असती. माथ्यावरच्या मुकुटाच्या झिरमाळातील मध्यभागीचे पदकही जरा डावीकडे झुकलेले दाखवले आहे.
डावा पाय सरळ असल्याने ती मेखला खाली दिसते आहे तर उजवा पाय वर उचलला असल्याने मेखलेची माळ वर सरकली आहे. शिल्पकाराची खरेच कमाल आहे.
गणेशाचे वाहन मुषक खाली उजव्या बाजूला आहे.
या भागातील अशा काही कलात्मक मूर्तीतून संगीत या प्रदेशात समृद्ध असल्याचे पुरावे मिळतात.
(फोटो सौजन्य
Travel Baba
)



प्राचीन भव्य गणेश मूर्ती
दिपावली शुभचिंतन !
ही गणेशमूर्ती अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे. अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते.
वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते.
डोंगरमाथ्यावरून कोसळणार्या सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्याही आधी पितळखोरा लेणी काळातील आहे. (इ.स. पूर्व १०० वर्ष).
लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे. लेणीत महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमूर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमूर्ती दगडांत कोरलेली आहे. त्या काळातील इतकी भव्य प्राचीन दुसरी गणेशमूर्ती महाराष्ट्रात नाही ( माहित असल्यास कृपया खाली काॅमेंट करावी). उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमूर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मूर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्या पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो. मूर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो.
या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.
वरतून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते. (फोटो सौजन्य
Travel Baba
)


भोग नरसिंह आणि योग नरसिंह
डावीकडची साधी सुबक मूर्ती आहे भोग नरसिंहाची. यालाच लक्ष्मी नरसिंह असेही म्हणतात. डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मागे ९ फण्यांचा नाग आहे. मूर्तीला फार विशेष अलंकरण असं काही केलेलं नाही. ही मूर्ती बोरकीनी नावाच्या सेलू तालूक्यातील देवगाव फाट्या जवळील छोट्या गावातील आहे. प्राचीन जूनं मंदिर आता आधुनिक करण्यात आलं आहे. मंदिरा जवळ पडझड झालेली प्राचीन बारव आहे. या बारवेची दूरूस्ती डागडूजी होण्याची अत्यंत गरज आहे.
उजवीकडची मूर्ती योग नरसिंहाची आहे. ही मूर्ती आधीच्या मूर्तीपेक्षा प्राचीन आहे हे सहजच लक्षात येते. ही मूर्ती नांदेड जवळच असलेल्या शंखतीर्थ येथील मंदिरातील आहे. नरसिंहाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. योग मूद्रेतील दोन हात आहेत त्यातील उजव्या हातात अक्षमाला आहे. पायात योगपट्टा आहे. मागे प्रभावळ असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत. या मंदिराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जिर्णोद्धार झाला आहे.
शंखतीर्थ गोदावरी नदीच्या काठावर आहे. या जागेला गोदावरीचे नाभीस्थान समजले जाते. तसा गौरवपूर्ण उल्लेख दासगणु महाराजांनी आपल्या गोदा महात्म्यात केला आहे. नरसिंह मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंदिरे नेहमीच पाण्याच्या जवळ बांधली जातात. नदी नसेल तर किमान सुंदर बारव तरी मंदिरा जवळ असतेच.
ही दोन्ही मंदिरं जिर्णोद्धाराचे दोन नमुने आहेत. बोरकिनी येथे आधुनिक सिमेंटीकरणाच्या नादाला लागुन प्राचीनत्व नष्ट केल्या गेलं तर शंखतीर्थ येथे काळजीपूर्वक जिर्णोद्धार झाला जेणेकरून मंदिराचे प्राचीनत्व बर्याच प्रमाणात राखले गेले.
(फोटो सौजन्य भोग नरसिंह- मल्हारीकांत देशमुख परभणी, योग नरसिंह- डाॅ. नंदकुमार मुलमुले नांदेड)

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

No comments:

Post a Comment