Sunday, November 29, 2020

पाच प्राचीन स्थळांवर आज दिपोत्सव...


उरूस, 29 नोव्हेंबर 2020 

 दिवाळी नंतर 15 दिवसांनी येणारी पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी मंदिरांवर नदीच्या घाटावर दिवे लावून उत्सव साजरा केला जातो. सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात सार्वजनिक मोठ्या उत्सवांवर मर्यादा आली आहे. जास्तीची गर्दी टाळली जात आहे. एकूणच निराशेचे वातावरण आहे. 

अशावेळी देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुढाकार घेवून ग्रामीण भागांतील पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाच्या गावांशी संपर्क केला आणि दिपोत्सवाची कल्पना मांडली. पाच गावांनी यासाठी तयारी दर्शविली. आज संध्याकाळी येथे दिपोत्सव साजरा होतो आहे.

पहिलं गांव आहे मंदिरांचे गाव म्हणून ओळखले जाणारे चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी). या गावात पुरातत्त्व खात्याने संरक्षीत केलेली अशी 7 मंदिरे आहेत. या शिवाय अजून काही मंदिरं आणि अवशेष जागोजागी सापडतात. या गावातील प्राचीन मानस्तंभ हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेरूळचे कैलास लेणे आणि पैठण अशा दोनच ठिकाणी असे मानस्तंभ/किर्तीस्तंभ आढळून येतात. या स्तंभाचा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी संध्याकाळी दिवे लावले जाणार आहेत. या गावाला हेरिटेज व्हिलेज म्हणून मान्यता मिळावी असा प्रस्ताव दाखल झाला असून त्यासाठी गावकरी आणि समस्त इतिहास प्रेमी पाठपुरावा करत आहेत.

दुसरं गांव आहे शेंदूरवादा (ता. गंगापुर जि. औरंगाबाद). येथे सिंदूरवदन गणेशाची प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. औरंगाबाद शहरांतून वाहणार्‍या खाम नदीचा प्रवाह वाळूजच्या पुढे डावीकडे वळतो. याच नदीच्या चंद्राकार वळणावर हे गाव वसले आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचा येथे आश्रम आहे. गणेश मंदिराच्या परिसरांत दिवे लावले जाणार असून नदीच्या पात्रातही दिवे सोडले जाणार आहेत. शिवाय नृत्य, गायन वादन असाही मोठा सांस्कृतिक कार्यक्रम मंदिराच्या ओट्यावर खुल्यात होणार आहे. 

तिसरं गांव आहे धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी). येथील गुप्तेश्वर मंदिर हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्यावरील अप्रतिम असा शिल्पाविष्कार अभ्यासकांना पर्यटकांना इतिहास प्रेमींना आचंबित करतो. या मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम पुरातत्त्व खात्या कडून सुरू होते आहे. गावकर्‍यांनी इतिहासप्रेमींना यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. मंदिराची साफसफाई गावकर्‍यांनी केली असून संध्याकाळी दिपोत्सव होतो आहे. 

चौथे गांव आहे जाम (ता.जि. परभणी). येथील प्राचीन जगदंबा मंदिर परिसरांत दिपोत्सव साजरा होतो आहे. मंदिरावरील विष्णु अवतराच्या मूर्ती, विष्णुची दुर्मिळ अशी योग नारायण मूर्ती, देखण्या सुरसुंदरींच्या मुर्ती या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गावकर्‍यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला असून या परिसरांत आज दिपोत्सव संपन्न होतो आहे.

पाचवे गांव आहे पिंगळी (ता.जि.परभणी). येथील प्राचीन बारवेच्या काठावर महादेव मंदिर आहे. त्रिदल पद्धतीचे हे मंदिर ढासळलेले आहे. मंदिरासमोरची बारव कलात्मक आणि भव्य अशी आहे. या परिसरांत आज स्वच्छता मोहीम राबवली गेली असून सायंकाळी बारवेच्या पायर्‍यांवर दिपोत्सव साजरा होतो आहे. 

एरव्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दिपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पण या पाच ठिकाणी जो दिपोत्सव साजरा होतो आहे त्याला एक वेगळे महत्त्व आहे. पुरातन वास्तू जतन करणे, त्यांची डागडुजी करणे, त्या ठिकाणी इतिहास प्रेमी कलाकार अभ्यासक पर्यटक यंाना आमंत्रित करणे. या वास्तूंचा जिर्णोद्धार, परिसरांतील अतिक्रमणे हटवणे, तेथपर्यंत रस्ते तयार करणे, परिसरांचे सुशोभन असा एक मोठा प्रकल्प देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने घेतला आहे. त्या मोहिमेचा भाग म्हणून या पाच ठिकाणी दिपोत्सव होतो आहे. या ठिकाणी पूर्वी अशी काही परंपरा नाही. जूनी ढासळलेली उद्ध्वस्त मंदिरे भंगलेल्या मूर्ती यांची पूजा होत नाही. साहजिकच या परिसराकडे दुर्लक्ष होते. कचरा साठतो. गवत वाढते. जे चांगले अवशेष आहेत तेही ढासळायला लागतात. दगडी चिरे दुसरीकडे लोक घेवून जातात आणि त्यांचा इतरच कारणांसाठी वापर व्हायला लागतो.

प्राचीन ऐतिहासिक महत्त्वाचा ठेवा असलेल्या या वास्तूंचे जतन अतिशय आवश्यक आहे. इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपल्या उदात्त संस्कृतिचा परंपरेचा हा मोलाचा ठेवा आहे. 

आम्ही हा मजकूर वाचणार्‍या सर्वांना विनम्र आवाहन करतो की आपल्या आपल्या परिसरांती प्राचीन महत्त्वाच्या वास्तूंची शिल्पांची देखभाल दुरूस्ती साफसफाई यासाठी पुढाकार घ्या. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (ग्राम पंचायत, नगर पालिका, महानगर पालिका) यांच्या दृष्टीस याचे महत्त्व आणून द्या. शासकीय पातळीवर पुरातत्त्व खात्या कडून जिथे मदत निधी शक्य असेल तिथे तो मिळवा. जिथे शासकीय यंत्रणा काम करणार नाही तिथे स्थानिकांनी पुढाकार घ्यावा. सध्या जी मोठी मंदिर संस्थाने आहेत त्यांनी आपला निधी या प्राचीन मंदिरांच्या ऐतिहासिक वास्तूंच्या दुरूस्ती देखभाल जिर्णाद्धार यासाठी देणगी म्हणून द्यावा. मोठ्या आस्थापनांनी आपल्या सीएसआर (सामाजिक कृतिज्ञता निधी) मधून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. 

सगळ्या महत्त्वाचे आहे की आपण सर्व सामान्य जनांनी आपल्या परिसरांतील अशा वास्तूंबाबत स्थळांबाबत आस्था बाळगली पाहिजे. यांच्या देखभालीसाठी दुरूस्तीसाठी जे जे शक्य होईल ते ते केले पाहिजे. त्यासाठी आपली सर्व शक्ती आपण याच्या मागे लावूया. त्रिपुरी पौर्णिमेचा हाच एक संदेश आहे. कोरोना निरोशेचा अंधकार दूर करून एक आशेची पणती आज आपण आपल्या अंतरात लावू या. 

दिवे सोडूया जळात

दिवे लावू मंदिरात

एक आशेची पणती

आज लावू अंतरात

(लेखात सुरवातीला वापरलेले छायाचित्र चारठाणा येथील मानस्तंभाचे आहे) 

      

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

 

2 comments:

  1. सर जी, आपल्या पुढाकाराने ही चळवळ सुरू झाली आता ही देशभर पसरावी व प्राचीन वारसा जतन व्हावा हेच स्वप्न आहे.

    ReplyDelete
  2. लक्ष्मीकांत सोनवटकर
    चारठाणा ता जिंतूर

    ReplyDelete