Wednesday, May 13, 2020

पुलित्झर फोटोमागचे दाहक सत्य!


उरूस, 13 मे 2020

पुलित्झर पुरस्काराचे रामायण सुरू असताना आता अजून काही बाबी स्पष्टपणे समोर येत चालल्या आहेत. जमात-ए-पुरोगामींचा हा भारत विरोधी कट आहे हे आता लपून राहिलं नाहीये. याला मानावाधिकार, कलेचे स्वातंत्र्य असे कितीही गोंडस नाव दिले तरी सत्य लपत नाही.

पार्थ परिहार या प्रिन्सटन विद्यापीठातील पीएच.डि. करणार्‍या (पॉलिटीकल इकॉनॉमी अँड गेम थिअरी) भारतीय विद्यार्थ्याने पुलित्झरचे कटू सत्य बाहेर आणायला सुरवात केली आहे. त्याने एक मोठा लेखच यावर लिहीला आहे.

लेखात वापरलेला फोटो आपण उदा. म्हणून समजून घेवू. 11 वर्षीय आतिफ मीर या मुलाच्या शवाभोवती शोक करणारे कश्मिरी यात आपल्याला दिसत आहेत. दार यासिन याच्या या फोटोतून असा संदेश जातो की बघा भारतीय सेना किती क्रुर आहे. कोवळ्या 11 वर्षीय मुलाचा बळी यांनी घेतला. यावर तारीख आहे 22 मार्च 2019. या गावाचे नाव आहे  हाजिन. श्रीनगरच्या उत्तरेला हे गांव असून हे ‘इंडियन कंट्रोल्ड कश्मिर’ मध्ये आहे. असा उल्लेख या फोटो खाली आहे.

जमात-ए-पुरोगामींचे पितळ उघड पडायला सुरवात होते ती या घटनेच्या तारखेपासून. आधी सांगितलं गेलं होतं की 370 हटवल्यानंतर कश्मिरात जनजिवन विस्कळीत झाले, सेनेने मुस्कटदाबी केली, इंटरनेट बंद केले वगैरे वगैरे. सामान्य कश्मिरी नागरिक खुप अस्वस्थ, प्रचंड ताणाखाली आहेत.

370 हटवले ती तारीख कोणती होती? 5 ऑगस्ट 2019. पण हा फोटो तर 22 मार्चचा आहे. मग या दिवशी नेमकी काय घटना घडली होती? कुणाला असे सहज वाटू शकेल की सैन्याने केलेल्या गोळीबारात हा निष्पाप मुलगा मारला गेला.

लष्कर-ए-तोयबा च्या आतंकवाद्यांनी आतिफ आणि त्याचा काका अब्दूल हमीद यांना त्यांच्याच घरात ओलिस ठेवले होते. सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करताना आतंकवाद्यांनी या घराचा आश्रय घेतला. आणि या दोघांना बांधून ठेवले. सुरक्षा दलांनी त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून या निष्पाप कश्मिरी नागरिकांना वेठीस धरले होते. कसा बसा अब्दूल हमीद या कैदेतून सुटका करून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण हा कोवळा पोरगा आतिफ मीर मात्र तसाच आतंकवाद्यांच्या ताब्यात अडकून पडला. सुरक्षा दलाच्या जवांनानी आतिफची आई आणि इतर कुटूंबियांना आणि गावकर्‍यांना विनंती केली की तूम्ही आतंकवाद्यांना आतिफला सोडून द्यायला सांगा. या गोळाबारीत निष्पाप लोकांचा बळी जायला नको. दोन दिवस सुरक्षा दलाच्या जवानांनी वाट पाहिली. आतंकवाद्यांनी आतिफला सोडण्याची तयारी दाखवली नाही. सुरक्षा दलांनी ते घर स्फोटात उडवून दिले. तीन वेळा झालेल्या गोळाबारीत 5 आतंकवाद्यांचा खात्मा झाला पण सोबतच हा कोवळा पोरगा मारला गेला.

ही सगळी कथा आपल्याला समजावून सांगितली जात नाही. केवळ वरचा फोटो दाखवून असा समज करून दिला जातो की सैन्यदल कशा प्रकारे निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत.

असा एक प्रकारे बुद्धिभेद सामान्य भारतीयांचा केला जातो आहे. असे चित्र उभे केले जात आहे की कश्मिरचा सामान्य माणूस शांततेच्या मार्गाने त्यांचे स्वातंत्र्य आंदोलन चालवत आहे. आणि त्यांच्यावर भारतीय लष्कराकडून प्रचंड अत्याचार केले जात आहेत. टुकडे टुकडे गँगचा पोस्टर बॉय कन्हैय्या कुमार याने असा आरोपच केला आहे की सैनिक कश्मिरात सामान्य जनतेवर आत्याचार करत आहेत.


आता दुसरा फोटो बघू. एक कश्मिरी नागरिक हातात दगड घेवून पोलिसांच्या गाडीवर फेकत आहे शिवाय लाथ मारत आहे. या फोटोचे वैशिष्ट्य रंगवताना जमात-ए-पुरोगामी असं सांगतात की सामान्यांना चिरडून टाकणार्‍या सुरक्षा दलांच्या वाहनांवर सामान्य नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत.

आता या फोटोखालची तारखी पहा. ती आहे 31 मे 2019. या दिवशी नेमके काय घडले होते? या दिवशी हिजबुल मुजाहिदीनच्या दोन आतंकवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलांनी केला होता. त्याच्या विरोधात भारतविरोधी भावना उचंबळून आली व लोकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. या वाहनाच्या समोरचे चाक जरा वळलेले आहे. यात चालक दिसत नाही. याचा अर्थ ही काही चालू असलेली गाडी नाही. ही बंद पडलेली किंवा एका जागी उभी असलेली गाडी आहे. शिवाय गाडीच्या पलीकडे अजून दोन पाय दिसत आहेत. म्हणजेच एकट्या दुकट्या सामान्य नागरिकांना चिरडणारी गाडी आणि तिच्यावर संतापून दगड फेकणारा सामान्य नागरिक असं हे चित्र नाही. तर हिजबुल मुजाहिदीनच्या आतंकवाद्यांचा खात्मा केला म्हणून पोलिस दलाच्या उभ्या असलेल्या बंद गाडीवर दगड फेकणारा क्रुर जमाव असे हे चित्र आहे. बागी जमाव पाठीमागे असणार हा समोर आलेला केवळ एक नागरिक आहे.

परत या तारखेकडे लक्ष द्या. 31 मे म्हणजे याचा 370 हटविल्याशी काहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्यासाठी या फोटोंचे कौतूक केले जात आहे.

पार्थ परिहार यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे. या लेखाची लिंक खाली देत आहे. तो जरूर वाचा. मी यातील केवळ 10 टक्के भागच सांगितला आहे. पुलित्झर पुरस्कारामागचे बाकी राजकारण खुप मोठे आहे.

https://medium.com/@parihar.parth/the-pulitzer-is-a-portal-b157bc0f6850
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment