Thursday, May 14, 2020

मौ. सादच्या बचावासाठी ‘फेक’न्यूजचा वापर!


उरूस, 14 मे 2020

तबलिग प्रकरणी मौलाना सादला आता पुरते घेरल्या गेले आहे. तबलिगी मरकजसाठी परदेशांतून मोठ्या प्रमाणात पैसा जो तबलिगच्या खात्यांवर आला त्याचीही चौकशी सक्त वसूली संचालनालय (ई.डि.) ने सुरू केली असून हा फासही साद भोवती आवळला गेला आहे.

सुरवातीला तबलिगचे प्रवक्ते ऍड. मुजीबूर रेहमान सांगत होते की साद फरार झाला नसून कोरोनामुळे सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. क्वारंटईनचा 14 दिवसांचा काळ तर लोटलाच पण अजून दोन क्वारंटाईनचा 28 दिवसांचा काळही संपला. पण फरार साद समोर आला नाही. मग मुजीबूर रेहमान यांनी जाहिर केले की सादने कोरोना टेस्ट केली आहे. पण त्याचा अहवाल देण्यास ते तयार झाले नाहीत. मग तबलिगने जाहिर केले की मुजीबूर रेहमान आमचा प्रवक्ताच नाही. केवळ एक कार्यकर्ता आहे. आताही चॅनेलवरील चर्चेत साद तपास यंत्रणांना केंव्हा शरण येणार हे नेमके न सांगता मुजीबूर रेहमान बाकी वेळ घालविण्याच्या गोष्टी करत राहतात.

अशातच इंडियन एक्सप्रेसने मागील आठवड्यांत साद बाबत एक बातमी प्रकाशीत करून जमात-ए-पुरोगांमींना सादच्या बचावासाठी एक आधार तयार करून दिला. दिल्ली गुप्त पोलिसांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने अशी बातमी दिली की सादच्या बाबतीत ज्या ऑडिओ क्लिप सुरवातीला समोर आल्या त्या खोट्या आहेत. सोशल डिस्टसिंगचे पालन मुसलमानांनी करू नये. मस्जिदम मध्ये या. इथे मृत्यू आला तर चांगलेच आहे. असे त्या ऑडिओत सांगितले होते.

हे सगळे खोटे आहे. हा ऑडिओ तूकडे तूकडे जोडून संदर्भ तोडून तयार केलेला आहे. त्यामुळे सादवरचे सर्व आरोप खोटे ठरतात.

ही बातमी आली की जमात-ए-पुरोगामी खुश झाली. तिला पाठिंबा देणारा सर्व लष्कर-ए-मिडिया एकदम उत्साहात आला. अल्ट न्यूज, द वायर, द प्रिंट, पुरोगाम्यांचे शिरोभूषण ऍड. प्रशांत भुषण, मोहम्मद जुबेर, रविशकुमार फॅन्स क्लब या सर्वांनी आपल्या न्यूज पोर्टलवर, ट्विटरवर ही बातमी जोशात चालवली.

सोशल मिडियावर सादचे पंटर लागली तयारच होते. त्यांनीही ही पोस्ट सर्वत्र फिरवायला सुरवात केली. पण या जमात-ए-पुरोगामींना हे लक्षातच आले नाही की तंत्रज्ञानाचा वापर करून सत्य शोधणे आणि ते सर्वत्र पोचवणे आता सहज शक्य आहे. पूर्वीसारखे असत्य फार काळ लोकांवर थोपवता येत नाही.

दिल्ली पोलीसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या बातमीच्या खोटेपणाचा पुरावा लगेचच समोर आला. ही बातमी खोटी असल्याचे समोर आल्यावर प्रशांत भूषण सारख्यांनी लगेच माफी मागत ट्विट काढून टाकले. मोहम्मद जूबेरसारख्यांनी आपल्या ट्विटवरून लगेच ही बातमी उडवली. पण याचे फोटो इतरांनी घेवून ठेवले असल्याने हे सर्व आता तोंडघशी पडले आहेत.

आश्चर्य याचे वाटते की तथाकथित बुद्धीवादी विचारवंत पत्रकार हे सगळे असल्या खोट्या प्रचाराला बळी का पडतात? इंडियन एक्सप्रेसने ही बातमी चालविण्या आधी दिल्ली पोलिसांकडून याची खातरजमा करून घ्यायला हवी होती. दुसरी गोष्ट म्हणजे मौलाना सादचा बचाव कशासाठी? कोरोना पसरविण्याचा भयंकर गुन्हा त्याने केला आहे. त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण हे त्याला वाचवायला का निघाले आहेत?

तबलिगची बाजू घेणारे एक मुद्दा सारखा मांडतात की विशिष्ट समाजाला कारण नसताना टार्गेट केले जात आहे. खरं तर अगदी पहिल्या दिवसांपासून कुणीही मुसलमान असा शब्द वापरला नाही. केवळ तबलिगींवरच टिका होत आली आहे. सर्व साधारण मुसलमांनावर नाही. याच काळात कर्नाटकांत माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाच्या लग्नासाठी गर्दी जमा झाली, कर्नाटकातच एका यात्रे निमित्त लोकांनी गर्दी केली. या दोन्ही बाबींचा बहुतांश हिंदूंनी निषेध केला.

मला स्वत:ला औरंगाबादच्या मौलाना मिर्झा नदवी यांनी आवाहन केले होते की तूम्ही कोरोना काळातील हिंदूंच्या गैर वर्तनाचा निषेध करून दाखवा. मी दाखवला शिवाय त्याला बहुतांश हिंदू मित्रांचा पाठिंबाही आहे हे सोशल मिडियावर सिद्ध करून दाखवले. उलट जेंव्हा मी त्यांना आवाहन केले की तूम्ही आता सादचा आणि तबलिगींचा निषेध करून दाखवा. पण ते तयार झाले नाहीत. आताही जेंव्हा साद बाबतची ही बातमी फेक असल्याचे समोर आल्यावर कुणी ती शेअर करून आम्ही चुकल्याचे कबुल करायला तयार नाही. ही बाब आक्षेपार्ह आहे.

हिंदूंमधील गैर रूढी परंपरा त्रूटी यांसाठी टिका सुधारकांकडून होते आणि त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा हिंदू देतातही. या उलट इस्लामधील गैर परंपरा रूढी यांबाबत असं काही घडत नाही. बहुतांश मुसलमान सुधारक म्हणवून घेणारे हिंदूंची जात काढतील, त्यांच्यावर टीका करतील (एक सुधारक म्हणूवन घेणार्‍या मुसलमान मित्राने हे फेसबुकवर माझ्या बाबत केले आहे.) पण खुद्द त्यांच्याच इस्लामधील सुधारणांबाबत चकार शब्द काढणार नाहीत.

आता मौलाना साद बाबत ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत आहेत हे चित्र धोकादायक आहे. गुन्हेगार असूनही पाठिशी घातलं जातं आहे. खोटेपणाचे पुरावे समोर आले तरी ते मान्य करायचे नाहीत. उलट खोटीच का असेना पण सादला सोयीची बातमी समार आली की ती शेअर करण्यात मोठा उत्साह दाखवला जातो आहे.

कायद्याने सादर सारख्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

पुलित्झर पुरस्कारामागचे भारत विरोधी कारस्थान अभ्यासकांनी उघड करून दाखवल्यावर हे जमात-ए-पुरोगामी मौनात गेले आहेत. शाहिनबाग, तबलिग, पुलित्झर या सर्वांबाबत सत्य समोर आले की पाठ फिरवली जात आहे. म्हणजे जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या. जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणल्या गेली. दुसरी बाजू समोर येताच आता याकडे दुर्लक्ष करून नविन विषय हाती घेतले जात आहेत.

हा कट ओळखायची आणि तो हाणून पाडायची गरज आहे. यात सगळ्यात एक कलात्मक नक्षलवाद दिसून येवू लागला आहे. तो ओळखता आला पाहिजे.   
 
   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

1 comment:

  1. मुजीबीर रेहमान यांचे तर्क(धूळफेक) फारच हास्यास्पद होती.. मी सुद्धा त्यांची tv debet मधील बाजू ऐकली पण पूर्णपणे धूळफेक करायचे काम ते करत होते..
    इंडियन एक्सप्रेस ने दिलेली बातमी आपण एक वेळ खरी समजू.. इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या बातमी नुसार मौलाना साद याची ऑडिओ क्लिप खोटी आहे.. त्याने असे कोणतेच आव्हान केले नाही तर मग मौलाना साद याना घाबरण्याची काहीच गरज नाही ये.. जर त्यांनी सांगितले नसेल तर मग ताब्लिकीच्या पुढच्या कृत्याची जबाबदारी ज्यांची नाही.. त्यामुळे त्यांनी बिनधास्त पने मीडिया समोर यायला पाहिजे आणि ताब्लिकी मध्ये कोणी त्यांना तिथे असे राहायला सांगितले होते ती सांगायला हवे..
    कोणती तरी एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल जर मौलाना साद यांची ऑडिओ क्लिप खोटी असेल तर मग ते लपून का बसले आहेत?? आणि खरी असेल तर मग तो तर गुन्हा आहेच.. कारण 'चित भी मेरी और पट भी मेरी' असे होत नाही ना..
    तुम्ही जे म्हणालात ना कि हे पत्रकार अश्या खोट्या प्रचाराला बळी का पडतात?? तर तसे नाही ये हे पत्रकार निःपक्षपाती आणि निर्भीड पत्रकारिता करत नाहीत तर फक्त अजेंडा पत्रकारिता करतात.. कारण ह्या गोष्टी खोट्या आहेत इतकं त्यांना समजत नाही असे तर नक्कीच नाही..
    ताब्लिकी आणि मुसलमान हे वेगळे वेगळे आहेत हे सर्व जण आधी पासून म्हणत आहेत पण ताबळिकीचे प्रवक्तेच पुन्हा पुन्हा ह्या दोन गोष्टी एकत्र करत आहेत.. दिल्ली पोलीस नि आज पुन्हा एकदा ह्या पत्रकारांचा अजेंडा लोकांसमोर आणला आहे..
    आपल्या सर्वांना सर्व गोष्टी कडे आता चिकित्सक दृष्टीने पाहण्याची गरज आहे...
    एकदम अचूक आणि परखड विश्लेषण केले आहे..👍👍👍👍

    ReplyDelete