Friday, May 29, 2020

जावेद अख्तर: भर्जरी प्रतिभा का पुरोगामी लक्तर ?


उरूस, 29 मे 2020

जावेद अख्तर भर्जरी प्रतिभेचे धनी आहेत. माझे आवडते कवी आहेत. ‘तरकश’ नावाचा त्यांचा कविता संग्रह 1995 ला प्रकाशीत झाला. या संग्रहात ‘फसाद से पेहले’ नावाची सुंदर कविता आहे. तिचा शेवट करताना त्यांनी लिहीलं आहे

आज ये शेहर
इक सहमे हुए बच्चे की तरह
अपनी परछाई से भी डरता है

जंत्री देखो
मुझे लगता है
आज त्यौहार कोई है शायद !
(तरकश, पृ. 78, आ. 13, जंत्री म्हणजे पंचांग)

या संग्रहात त्यांच्या भरपूर सुंदर कविता आहेत. वरची जी अवस्था जावेद यांनी रंगवली आहे त्याला कारणीभूत कोण आहे? तर दंगा करणारे. मग सगळ्या दंगा करणार्‍यांवर काय कारवाई केली पाहिजे? हिंदू असो की मुसलमान अशा जवळपास 4000 लोकांची चौकशी दिल्ली दंग्यांत पोलिसांनी केली आहे. जवळपास 1500 लोकांवर एफआयआर दाखल झाले आहेत. त्यात हिंदू मुसलमान दोघेही आहेत.

हे दंगे कशामुळे झाले? किंवा करण्यात आले? कारण सी.ए.ए. कायद्याच्या विरोधात जनमानस प्रक्षुब्ध बनले होते. या कायद्यात काय आहे? पाकिस्तान, बांग्लादेश आणि  अफगाणिस्तान येथील अल्पसंख्य ज्यांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागले त्यांनी भारतात शरणागती पत्करली. अशा 2015 पर्यंत आलेल्या लोकांना नागरिकता बहाल करण्याचे धोरण या कायद्यात आहे.

स्वत: जावेद यांनीच आपल्या याच ‘तरकश’ कविता संग्रहात एका गझलेत काय लिहीले आहे बघा

सूखी टहनी तनहा चिडिया फीका चांद
आंखो के सहरा मे एक नमी का चांद

उस माथे का चूमे कितने दिन बिते
जिस माथे की खातिर था इक टीका चांद

आओ अब हम इसके भी टूकडे कर लें
ढाका, रावलपिंडी और दिल्ली का चांद

(तरकश, पृ. ६९)

आता जावेद यांनी उत्तर द्यावे, ‘सूखी टहनी’ ही अवस्था का आली? कपाळावर कुंकू लावणार्‍यांबद्दल तूम्हाला जिव्हाळा होता मग हा जिव्हाळा नेमका अटला कसा?

ढाका, रावलपिंडी आणि दिल्ली म्हणजे बांग्लादेश, पाकिस्तान आणि भारत अशी चंद्राची वाटणी. आता जावेद यांनीच उत्तर द्यावे ही वाटणी मागितली कुणी? हे तुकडे करणारे कोण आहेत? आणि आताही जो भारत आहे त्याचे तुकडे करून मागणार्‍या तुकडे तुकडे गँगची पाठराखण तूम्ही का करत अहात?

या जादेव यांनी एक ट्विट केलं आहे. त्याचा फोटो लेखात सुरवातीला दिला आहे. सीएए च्या विरोधात आंदोलन करणार्‍यां विरूद्ध सरकार कारवाई का करत आहे? असा सवाल जावेद विचारत आहेत. जावेद साहेब तूम्ही स्वत: तूमच्या कवितेत काय लिहीलंत? ज्यांना पाकिस्तान हवा होता त्यांनी तो मिळवला पण ज्यांना अपरिहार्यपणे त्या पाकिस्तानात आणि बांग्लादेशात अडकून पडावं लागलं, त्यांच्यावर अन्याय झाला आणि तो दूर करण्यासाठी आता सीएए आलं आहे तर मग तूमचा विरोध का?

बरं या सीएए ला विरोध करणारे नेमके कोणत्या शांतीच्या मार्गाने आंदोलन करत होते? सरकारने शांतपणे धरणं देत बसलेल्या महिलांवर कारवाई केली का? भडक भाषणं देणार्‍या दंग्यांसाठी उकसवणार्‍यांवरच केली जात आहे. तसे पुरावे न्यायालयात सादर झाले आहेत. ज्या दोन विद्यार्थीनिंना अटक केली त्या कोण आहेत? त्या मुसलमान आहेत का? मग कन्हैय्या कुमार सारखे तूमच्या सूरात सूर मिसळत मुसलमानांवर अन्याय अशी ओरड का करत आहेत? नताशा नरवाल आणि देवांगना कालिता यांनी इस्लाम कबुल केला आहे का? तशी काही वेगळी गुप्त बातमी कन्हैय्या कुमार यांच्यापाशी आहे का? ‘पिंजरातोड’ संघटनेच्या या पदाधिकारी ज्यांच्यासाठी तूम्हाला काय म्हणून सहानुभूती आहे?

जावेद साहेब एकीकडे तूम्ही फाळणीचे दु:ख मांडत आहात. त्यासाठी तूमची भर्जरी प्रतिभा सुंदर भाषेतून व्यक्त होते आहे आणि दुसरीकडे तूम्ही सीएए च्या नावाखाली दंगे करणार्‍यांवर कारवाई केली तर नाराजीची भाषा वापरत अहात. ही नाराजीची पुरोगामी लक्तरे कशासाठी पांघरत अहात?

जावेद साहेब तूमच्या बेकारीत तूम्हाला ज्यानं उदार आश्रय दिला तो प्रतिभावंत शायर साहिर, तूमचा प्रतिभावंत मामा मजाज, तूमचे जन्मदाते सुप्रसिद्ध गीतकार जां निसार अख्तर, तूमचे सासरे कैफी आझमी या कुणाचीही कुठलीही ओळ तपासून पहा त्यात या देशाच्या मातीचा सुगंधच येईल. तूमचे नातेवाईक म्हणजे अस्सल वाङ्मयीन हिरे आहेत. तूमच्याही कवितेवर भारतीय रसिकांनी जान छिडकली आहे. नुसरत फते अली सारखे पाकिस्तानी कव्वालही तूमच्या शायरीच्या प्रेमात पडून ‘आफरीन आफरीन’ गात सुटले.

ज्या भारतीयांनी तूमच्या कवितेवर इतके प्रेम केले त्यांच्या विरूद्ध तूम्ही सध्या ही कसली भूमिका घेवून उभे अहात? तूमचा हा गोंधळ तूमच्याच शब्दांत मांडतो

मै खुद भी सोचता हूं ये क्या मेरा हाल है
जिसका जवाब चाहिए वो क्या सवाल है

तूम्ही बापाशी भांडून सडाफटींग घराबाहेर पडलात. तूमच्यापाशी काहीच नव्हते. साहिरने तूम्हाला आश्रय दिला.

घर से चला तो दिल के सिवा पास कुछ न था
क्या मुझसे खो गया है मुझे क्या मलाल है
(मलाल म्हणजे दु:ख)
(तरकश, पृ. १०१)


तूमचा जिगरी दोस्त मुश्ताक सिंह ज्याने तूम्हाला तूमच्या बेकारीत सर्व मदत केली तूमचा सर्व खर्च चालवला त्याची आठवण म्हणून त्याचे कडे तूम्ही हातात घालता नेहमी. त्या हातातील कड्याकडे पहा आणि मग स्वत:च उत्तर शोधा.
ज्यावर रसिकांनी जान कुर्बान केली त्या शायरीची भर्जरी वस्त्र सोडून ही कसली लक्तरे नेसून तूम्ही बसला अहात?

तूम्ही स्वत: एकदा तूमचा कवितासंग्रह ‘तरकश’ वाचा. किंवा शबाना यांना वाचायला सांगा. तूमच्या कविता तूमच्या पेक्षा अधिक प्रभावी त्या वाचतात.

(लेखाचा प्रतिवाद ज्यांना करायचा त्यांनी जावेद अख्तर यांचा ‘तरकश’ हा कविता संग्रह आणि त्याला त्यांनी लिहीलेलं मनोगत आधी वाचावं आणि काही विचारायचंच असेल तर जावेद अख्तर यांनाच विचारावे. मला नाही.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

1 comment:

  1. https://twitter.com/Adnyat1/status/1264844126278701057?s=20

    ReplyDelete