उरूस, 18 मे 2020
गेली काही दिवस नेटवर यु-ट्यूब आणि टिकटॉक कलाकरांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. युट्यूबचा स्टार कॅरि मिनाटी (खरे नाव अजय नागर) आणि टिकटॉक स्टार अमीर सिद्दीकी यांच्यातील हे भांडण शिवीगाळ गलिच्छ भाषेत सुरू आहे. यातील काही व्हिडिओ या समाज माध्यमांनी उडवून टाकले आहेत. पण तरी यांचे समर्थक आपसांत घाणेरड्या भाषेत वाद करतच आहेत. अगदी मुलीसुद्धा अश्लिल बिभत्स भाषा वापरत आहेत त्यावरून हा मुद्दाम केलेला बनाव आहे की काय अशी पण शंका येते. कोरानाच्या काळात सगळेच रिकामे बसून आहेत. त्यातल्या त्यात या कलाकरांचे चाहते असलेली तरूण पिढी (वय वर्षे 14 ते 30) यांना भरपूर वेळ आहे आणि हातात मोबाईल आहे. बाकी काही नसले तरी सध्या नेटवर्क चंागले उपलब्ध आहे. म्हणूनच ही शंका येते की हा वाद जाणिवपूर्वक उफाळून आणला गेला आहे की काय?
ज्यांना या विषयाचे बाकी बारकावे समजून घ्यायची उत्सूकता आहे त्यांनी नेटवर जरासा शोध घ्यावा. शेकडो व्हिडीओ उपलब्ध आहेत. सामजिक दृष्ट्या आक्षेपार्ह असे काही उल्लेख या वादांत समोर आले आणि ते माझ्या दृष्टीने घातक आहेत. तेवढ्यापुरतेच मी लिहीतो आहे.
यातला पहिला संदर्भ येतो तो इस्लामचा. टिकटॉकचे जे कलाकार आहेत जे या वादात ट्रोल होत आहेत ते मुसलमान आहेत. त्यांनी एके ठिकाणी तबरेज अन्सारीच्या झुंडबळीचा (मॉब लिंचिंगचा) उल्लेख केला. पुढे चालून त्याचा मुलगा मोठा होवून सूड उगवेल तर त्यावेळी ‘मुसलमान अतिरेकी असतात’ असं म्हणून नका असे सांगितले. शिवाय वारंवार रमझानचा महिना असल्याने शिवीगाळ आम्ही करणार नाही असं म्हणत शिव्याही देवून घेतल्या आहेत.
दुसरीकडे युट्यूबच्या कॅरिमिनाटीच्या पाठिराख्यांनी या टिकटॉक कलाकरांना रोस्टींग (हा खास इंग्रजी शब्द टर्र उडवणे मजा घेणे चिडवणे यासाठी वापरल्या जात आहे) करताना ‘गे’, ‘छक्का’, ‘मिठा’, ‘दिदी’, ‘लौंडी’ अशी विशेषणं वापरून नामोहरम करण्याचा प्रकार केला आहे.
व्यवसायासाठी या कलाकारांचा वापर करून घेतला जात आहे हे तर उघडच आहे. यांना यासाठी जे काही पैसे मिळत असतील हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. काही कलाकारांना स्वत:ला ‘रोस्ट’ करून घेण्यात रस आहे कारण आपल्याला रोस्ट करा असा आग्रहच हे कलाकार उघडपणेच करत आहेत त्यावरून लक्षात येतेच.
पण यात कारण नसताना इस्लामला कशाला ओढल्या जाते आहे? मुळातच इस्लामला प्रतिमा महिमा मंजूर नाही. कलाकाराचा चेहरा सतत लोकांसमोर येत राहतो, यातील बहुतांश टिकटॉक व्हिडीओत गाण्यांचा वापर केला जातो जेंव्हा की इस्लामला संगीतच मंजूर नाही, मग हे टिकटॉक कलाकार जे स्वत:ला स्टार मानतात ते इस्लामच्या आड का लपत आहेत? तसेही ते आधीपासूनच इस्लमाबाह्य कृत्य करत आले आहेत.
आता त्यांच्यावर टिका करणार्या यु-ट्यूब कलाकारांनी या टिकटॉक कलाकारांवर ‘गे’ असण्याचे आरोप करत गलिच्छ बिभत्स अश्लिल भाषा वारंवार वापरण्याचे काय कारण?
ज्या मुख्य टिकटॉक कलाकारांना टार्गेट केले जात आहेत ते आमीर सिद्दीकी, फैजल शेख, रियाज, आवेज, अदनान हे सर्वच मुसलमान आहेत. इस्लामला समलैंगिकता मंजूर नाही. तशी ती कुठल्याच धर्माला मंजूर नाही. पण इस्लामिक देश या बाबत कट्टर आहेत.
भारतीय कायद्याने नुकतेच 377 कलम शिथिल करून या संबंधांना गुन्हेगारी कलम लावले जाणार नाही असं घोषित केले आहे. मग अशा वातावरणात जेंव्हा की एल.जी.बी.टी. समुदायाने एक मोकळा श्वास नुकताच घेतला आहे. त्यांच्या हक्कासाठी काही सामाजिक संस्था, संघटना, व्यक्ती मोठ्या कष्टाने चिवटपणे चळवळ चालवित आहेत या सगळ्यांना अशा वादांमुळे किती हानी पोचत आहे याचा विचार झाला पाहिजे.
कोरोनाच्या या भयानक संकटाला तोंड देताना औरंगाबादेतील तृतियपंथी, गे, लेस्बियन यांना अन्नधान्य मिळायची मारामार झाली. गैरसमजातून एका कॉलनीतल्या लोकांनी यांच्यावर बहिष्कारच टाकला. मी स्वत: या संघटनांसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांना इतर काही सामाजिक संस्थांशी जोडून दिले. या लोकांना धान्य मिळून त्यांची उपासमार थांबली. जिल्हाधिकारी, शांतिगिरी महाराज यांनी यात लक्ष घालून आणखी काही मदत मिळवून दिली.
म्हणजे एका साध्या कृतीने समाजात या समुदायाबाबत तेढ निर्माण होते. ती दुरूस्त करायला इतरांना किती कष्ट करावे लागतात हा माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याचा ताजा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर यु-ट्यूब कलाकारांकडून ‘गे’वर गलिच्छ टिप्पणी दुखावून जाते. मजा करणे चिडवणे टर्र उडवणे वेगळे आणि किमान सभ्यतेचा पायाच उखडून टाकणे वेगळे.
सामान्य मुसलमान या संकटात होरपळून निघाला आहे. तबलिगींमुळे सगळ्यात मोठा धोका मुसलमांनानाच झाला आहे. या वातावरणात कलेच्या वादात नाहक हिंदू-मुसलमान तेढ निर्माण करून आापण किती मोठे नुकसान देशाचे करतो आहोत याचा अंदाज तरी या कलाकारांना आहे का?
अशा व्हिडिओजना डिस्लाईक करून तूम्ही त्यांची तक्रार करू शकता. त्यामुळे हा वाद वाढणार नाही. तसेही जाणकार लोकांमुळे यातील बहुतांश व्हिडिओ काढून टाकल्या गेले आहेतच.
तृतियपंथि कलाकारांना ‘किन्नर’ संबोधून आपल्या समाजाने हजारो वर्षांपासून व्यवस्थेत समाविष्ट करून घेतले आहेच. शिवाय त्यांना एक विशिष्ट स्थानही दिल्या गेले आहे. कुंभमेळ्यातही आता लक्ष्मी त्रिपाठी हिला महामंडलेश्वर बनवून ‘किन्नर’ आखाड्याला मान्यता देवून आपल्या समाजाने उदारतेचा परिचय दिला आहे. दिशा शेख सारख्या किन्नरला वंचित बहुजन आघाडीने आपला प्रवक्ता नेमून सामाजिक अभिसरणाला मोठीच मदत केली आहे.
वाद कलेच्या पातळीवरच रहावेत. समाजात हिंदू विरूद्ध मुसलमान, स्टे्रट विरूद्ध गे अशा छटा उमटू नयेत.
टिकटॉक हे चायनीज ऍप आहे. त्याचा विरोध करोनाच्या पातळीवर होतो आहे आणि तो योग्यच आहे. काही देशांत टिकटॉक बॅन झाले आहेच. आपल्याकडेही हे बॅन झाले पाहिजे. आणि आता चीनला नामोहरम करायच्या धोरणाचा भाग म्हणून तर जरूरच या प्रस्तावाचा विचार झाला पाहिजे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment