Tuesday, May 12, 2020

संघद्वेषी जयदेव डोळेंचा वैचारिक आंधळेपणा !


उरूस, 12 मे 2020

सराईत गुन्हेगार गुन्हा केल्या शिवाय राहूच शकत नाहीत किंवा पट्टीचा व्यसनी माणूस व्यसनाशिवाय राहू शकत नाही. तसेच प्रा. जयदेव डोळे यांचे वैचारिक पातळीवर झालेले दिसत आहे. मोदी-संघ-अमितशहा-भाजप या एम.एस.ए.बी. ला शिव्या दिल्या शिवाय यांना राहवतच नाही. एकदा का ही वैचारिक गरळ अधून मधून ओकली की यांची तबियत बहुतेक चांगली रहात असावी.

लॉकडाउन च्या गंभीर परिस्थितीत कामगारांची स्थिती फारच भयानक झाली आहे. अस्वस्थेतून हे कामगार आपल्या गावी परत जावू पहात आहेत. वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे काही पेचप्रसंग उभे रहात आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यंत्रणा, स्वयंसेवी संस्था सगळेच प्रमाणिकपणे प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी हे प्रयत्न अपुरे पडतात आणि जालन्या जवळ करमाडला घडली तशी दुर्घटना घडते. मजूरांचा रेल्वेखाली जीव जातो. हा अपघात आहे.  यात कुठला पक्ष संघटना व्यक्ती यांच्यावर टीका करण्याचे काहीच कारण नाही. पण शांत बसतील ते जयदेव डोळे कसले.

‘अक्षरनामा’ नावाच्या पोर्टलवर त्यांनी 11 मे 2020 रोजी एक लेख लिहीला. त्याचे शिर्षक आहे, ‘ते अटळ विहारी पायी पायी, हे सुखी निलाजरे भाजपाई’.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावांतील शब्दांचा वापर करत असला शाब्दिक खेळ त्यांनी केला आहे. मुळात हे कामगार जे बिचारे पायी पायी निघाले आहेत त्यांची वेदना अपार आहे. या त्यांच्या चालण्याला  डोळे ‘विहार’ कसे काय म्हणू शकतात? एम.एस.ए.बी. वर टीका करताना कामगारांच्या वेदनेचा उपहास कशासाठी?

या कामगारांचा मृत्यू झाला त्या स्थळी जालन्याचे खासदार असलेले केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे का नाही गेले असा ‘खडा’ सवाल करणारे डोळे याच जालन्याचे राज्य मंत्रीमंडळात मंत्री असलेले राजेश टोपे यांना मात्र सोयीस्करपणे विसरून जातात. म्हणजेच यांचा आंधळेपणा विशिष्ट लोकांसाठीच आहे का? बाकी यांना काही दिसतच नाही? केंद्रावर टिका करताना कुठेच राज्य सरकारचा उल्लेख नाही. जसं काही जालना जिल्हा सरळ दिल्लीला जोडला आहे. मध्ये महाराष्ट्र राज्य नावाची काही यंत्रणा अस्तित्वातच नाही. (पत्रकार मित्र सारंग टाकळकर यांनी लेख लिहील्यावर माहिती पुरवली की रावसाहेब दानवे अपघातस्थळी गेले होते. डोळे यांच्या खोटारडेपणाचा अजून एक पुरावा.)

डोळेंच्या लेखावर टीका करण्याचे तसे काही कारण नव्हते. पण  वैचारिक भ्रष्टाचाराचे पुरावे लेखात असल्याने त्याची दखल घेणे भाग पडले. सदसद्विवेक बुद्धीने विचार करणारा जो वाचक वर्ग आहे त्याच्या समोर हा भ्रष्टाचार येणे मला आवश्यक वाटते. बाकी डोळे आणि जमात-ए-पुरोगामी यांच्याशी मला काही कर्तव्य नाही.

डोळे लिहून जातात, ‘श्रमामधून संपत्ती निर्माण होते हा सिद्धांत संघ मानत नाही.’ आता मुळात डोळे हा आरोप कशाचा जोरावर करतात? डोळे यांचा हाच लेख नाही तर त्यांचे इतरही संघद्वेषी लिखाण वाचून आम्ही हा प्रश्‍न विचारतो आहोत. यात अजून एक वैचारिक भ्रष्टपणा आहे. कारखान्यात मजूरांच्या श्रमाचे शोषण होते व त्यातून नफा निर्माण होतो हा मार्क्सचा सिद्धांत मांडत असताना डोळे मुळात कारखाना कुणाच्या शोषणातून उभा राहिला? त्यासाठी शेतकर्‍यांची बचत लुटल्या गेली हे लपवून ठेवतात.

मुळात संपत्तीची निर्मिती केवळ आणि केवळ शेतीतच होते. एका दाण्याचे हजार दाणे होण्याचा चमत्कार फक्त शेतीतच होतो. बाकी ठिकाणी फक्त स्वरूप बदलते किंवा सेवा देवून त्याचे मुल्य घेतले जाते. पण मार्क्सची मर्यादा दाखवणार्‍या शेतकरी चळवळीतील या वैचारिक मांडणीकडे डोळे डोळेझाक करतात.

शेतीची उपेक्षा झाली म्हणून तर शेतीमधून मनुष्यबळ शहराकडे स्थलांतरीत होत गेले. आणि शेतीची ही उपेक्षा करणारे डोळेंचे लाडके समाजवादी नियोजनाचे कट्टर पुरस्कर्ते जवाहरलाल नेहरू हे होते. डोळेंना हे सगळं झाकून ठेवायचं असतं.

संघाला हे मान्य नाही हे म्हणत असताना डोळे गोळवळकर गुरूजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या एकमेव पुस्तकाचा आधार घेतात. वस्तूत: या पुस्तकांतील अप्रत्यक्ष चातुर्वर्ण्य समर्थक वाटणारा उल्लेख आम्ही अमान्य करतो आहोत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषद घेवून दिल्लीत विज्ञान भवन येथे सांगितले.  (मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून ओरडणारे सगळे जमात-ए-पुरोगामी मोहन भागवतांच्या पत्रकार परिषदांकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतात) पण डोळे मात्र त्याचाच आधार घेवून आपला बडावा बडवीचा  वैचारिक उपद्व्याप करत राहतात. अमान्य केलेल्या अथवा नाकारलेल्या विचारांचा आधार प्रतिवादासाठी घेता येत नाही हे आपल्या दार्शनिक परंपरेतील महत्त्वाचे गृहीतक डोळेंच्या गावीही नाही. यालाच वैचारिक भ्रष्टाचार म्हणतात.

डोळेंचा राग उत्तर प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांवर आहे. मुळात कामगार कायदे बदलायला केंव्हा सुरवात झाली? भारतात जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कायदे नियम बदलायला सुरवात झाली. तंत्रज्ञान क्रांतीमुळे कामगारांच्या कामाचे स्वरूप बदलत गेले. हे सगळे ज्यांच्या काळात झाले तेंव्हा पंतप्रधान पदावर कोणता निलाजरा भाजपायी होता? नरसिंहराव व त्यांचे अर्थमंत्री मनमोहनसिंग, देवेगौडा, गुजराल आणि पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यात कोण निलाजरा भाजपेयी आहे?

डोळेंचा वैचारिक भ्रष्टाचार उघड होतो तो इथे.

वैचारिक भ्रष्टाचारासोबत डोळे खोटारडेपणा करतात. डोळे बिनधास्त लिहून जातात, ‘कॉंग्रेसने रेल्वेचे भाडे चुकते करण्यापासून आरंभ केलेलाय.’ कुठेही रेल्वेची तिकीटे मजूरांसाठी ज्या गाड्या सोडल्या त्यात विकली गेली नाहीत. या तिकीटाचा 85 टक्के हिस्सा केंद्र सरकारने व 15 टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलला आहे. यात कुठल्याही पक्ष संघटना व्यक्ती यांचा संबंधच नाही. ही सगळ्यात जमात-ए-पुरोगामीची मोडस ऑपरेंडी होवून बसली आहे. आत्ताही मोठ्या उद्योगपतींचे 65 हजार करोड रूपयांचे कर्ज माफ केले असा खोटा आरोप असो की मौलाना साद बाबतीतल्या इंडियन एक्सप्रेसने छापलेल्या खोट्या बातम्या असो. यांचे पितळ काही काळातच उघडे पडले आहे.

या कामगारांचे वर्णन करताना डोळे काय लिहीतात ते बघा...

रस्त्यारस्त्यांवरून चालत निघालेल्या त्या लाखो भारतीयांना समजा एक काळी टोपी घातली. चॉकलेटी पँट आणि पांढरा शर्ट घालून तीत खोचला. काळ्या रंगाचे कातडी बूट आणि हातात एक दंडही दिला. कसे दिसतील सगळे कष्टकरी त्या गणवेशात? राष्ट्रवादी वाटतील की राष्ट्रसेवक? शिस्तीत घरांकडे निघालेले राष्ट्रवीर स्वयंसेवक की, या हिंदूराष्ट्राची उभारणी करणारे श्रमिक? पण स्वयंसेवक असा रिकामपोटी, भकास चेहऱ्याने अन हजारो किलोमीटर्सची फालतू पायपीट करणारा कसा असेल? तो तर गोबरे गाल, तकाकलेले शरीर, छोटीशी ढेरी, तेल लावून चोपलेले केस, त्या आधी सुस्नात होऊन कपाळावर गंध लावलेले आणि हिंदूराष्ट्राचे भव्य स्वप्न पुरे केल्याचे तुपकट समाधान तरळणारा चेहरा घेऊन हिंडणारा पराक्रमी पुरुष! हायवेवर काय काम त्याचे? अजून हायवे शाखा क्रमांक १०१ निघालेल्या नाहीत…

द्वेषाने आंधळे झालेल्या नजरेला हे असेच दिसणार.

विरोधाभास असा आहे की डोळेंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार्‍या घटना घडत आहेत. सरकार शिवाय लॉकडाउनच्या काळात सर्वात जास्त सेवाकार्य ‘तुपकट चेहर्‍याच्या गोबरे गालाच्या छोट्या ढेरीच्या’ संघ कार्यकर्त्यांकडूनच चालविले जात आहे.

(संवैधानिक इशारा : एम.एस.ए.बी. (मोदी-संघ-अमितशहा-भाजप) द्वेषाने पछाडलेल्या डोळेंसारख्या असहिष्णू जमात-ए-पुरोगामी लोकांनी हे वाचू नये. त्यांच्या रोगावर आमच्याकडे इलाज नाही. ट्रंपमुळे यांना आता अमेरिकेतही जायची सोय नाही. रशिया तर यांचा उरलाच नाही. चीनचा आसरा होता पण आता जा म्हटले तरी हे जाणार नाही. जमात-ए-पुरोगामींनी अंदमानवर जावून रहावं असा सल्ला दिला तर तो रोगापेक्षा भयंकर. कारण अंदमान म्हटलं की सावरकर आठवतात. आणि मग तर यांची वेदना दुप्पट वाढते. तेंव्हा जमात-ए-पुरोगामींनो माफ करा. सध्या काहीच उपाय नाही. बरं मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडणारे कुठे गेले तेही कळेना. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर  बाटलेली या देशाची भूमी मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यावर जमात-ए-पुरोगामींसाठी पावन झाली असेल तर मला कल्पना नाही.)

लॉकडाउनच्या काळात हा मूळ लेख वाचून स्वत:वर अत्याचार करून घेण्याची काडीचीही गरज नाही. ज्यांना स्वत:चा आनंद सुख समाधान धोक्यात घालायचे आहे त्यांच्यासाठी लेखाची लिंक खाली देत आहोत.

https://www.aksharnama.com/client/article_detail/4255
 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

3 comments:

  1. डोळे असूनही आंधळ्या सारखे वागणाऱ्यांना काय म्हणावे...?

    ReplyDelete
  2. याचा कुठलाही वैचारीक प्रतिवाद न करता त्यांच्या एका शिष्याने असभ्य भाषेत पोस्ट लिहीली. मला ती उडवावी लागली आणि त्याला block करावे लागले. अशा पातळीवर उतरलेत आता हे जमात-ए-पुरोगामी.

    ReplyDelete
  3. एकदम सडेतोड उत्तर.. वैचारिक भ्रष्टाचार माजवण्याचा प्रयत्न डोळे नेहमीच करत असतात.. मागच्या 17 डिसेंबर ला सुद्धा त्यांनी 'दिव्य मराठी' मध्ये स्वा. सावरकरांबद्दल एक लेख लिहिला होता.. स्वा. सावरकरांबद्दल मनात पूर्वग्रह ठेवून लिखाण केलेल्या लेखकांचे हवाले देउन स्वा. सावरकर कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला.. पण हे करताना स्वतः सावरकर यांचे काय विचार आहेत, त्यांनी स्वतः काय लिहून ठेवले आहे या कडे त्यांनी 'डोळे'झाक केली...
    स्वतःला निःपक्षपाती म्हणवून घेणाऱ्या ' दिव्य मराठी' यांनी 23 दिवसानी ह्या लेखाचा प्रतिवाद छापला.. पार्थ बावस्कर याने ह्या लेखाचं प्रतिवाद करून डोळयांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले.. त्यामुळे असा वैचारिक भ्रष्टाचाराचा त्यांचा हा पहिला प्रयत्न नाही.. आणि त्यात तोंडघाशी पडण्याची सुद्धा हि त्यांची पहिली वेळ नाही...
    तुम्ही जे उदाहरण दिले आहे रावसाहेब दानवे ह्यांचे ते डोळे हे एक प्रकारे जो अजेंडा चालवतात हे दाखवून देते.. फक्त केंद्राला जाब विचारायचा आणि राज्याला काही म्हणायचे नाही..त्यांचा अजेंडा उघडा पडतो इथे..
    बरं ज्या संघाचा त्यांना इतका तिटकारा आहे त्या संघानेच कोरोना च्या काळात सर्वात जास्त मदत केली आहे.. आणि ह्या मदतीचा काही सुद्धा गाजावाजा त्यांनी केला नाही.. निस्वार्थ पाने ते अविरत आज सुद्धा काम करत आहेत.. पण मान्य करायचे नाही म्हणल्यावर आपण काहीच करू शकत नाहीत.. कमीत कमी कोरोना काळातील संघाचे कार्य पाहून त्यांचा संघ द्वेष कमी होईल अशी आशा होती पण जसे सापा मधील विष कधीच कमी होत नाही तसे त्यांचा संघ द्वेष कधीच कमी होणार नाही...
    सर तुम्ही खूप सुंदर पणे जमात ए पुरोगामी ची पोलखोल केलीत आज.👍👍👍👌👌👌

    ReplyDelete