Thursday, May 7, 2020

महारेतर दलित धम्माचा स्वीकार का नाही करत?


उरूस, 7 मे 2020

वैशाखी पौर्णिमा जगभरात बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय दार्शनिक परंपरेतील शेवटचे दार्शनिक म्हणजे भगवान गौतम बुद्ध. बुद्धीप्रामाण्यवादावर आधारलेला हा धर्म असल्याने त्याला धर्म न म्हणता धम्म संबोधले जाते. बाबासाहेबांनी हेच वैशिष्ट्य जाणून या धम्माचा स्विकार करून दलित अस्मिता जागवली.

महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत ‘फुले शाहू आंबेडकरांचा’ महाराष्ट्र असे नेहमीच संबोधत असतात. आज बुद्ध जयंती निमित्त हा प्रश्‍न निर्माण होतो की मग हा जो आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणारे आहेत त्यांनी बाबासाहेबांनी दाखवलेला धम्माचा मार्ग का नाही स्विकारला?

‘फुले-शाहू-आंबेडकर’ असं म्हणत असताना अतिशय धूर्तपणे ब्राह्मण जातीत जन्माला आलेले जे पुरोगामी होते त्या लोकहितवादी, रानडे, आगरकर, गोखले यांची नावे वगळली जातात. असे का? ज्या सनातन हिंदू धर्मावर टीका केली जाते, चतुवर्ण्यातील ब्राह्मण विरूद्ध क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे सर्व एक आहेत सांगितले जाते तर या सगळ्यांनी बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने जात धम्माचा स्विकार का नाही केला?

पहिल्यांदा आपण दलितांपुरताच विचार करू. बाबासाहेब ज्या दलित जातीत जन्मले त्या पूर्वाश्रमीच्या महारांनीच केवळ धम्माचा स्विकार केला (इतर जातीतील अपवाद आहेत पण फारच थोडे). महारेतर ज्या दलित जाती होत्या त्यांनी धम्माचा स्विकार का नाही केला? आजही ही अशी ‘निळे’ दलित आणि ‘भगवे’ दलित विभागणी का आहे?

बाबासाहेबांच्या जयंतीत चार वर्षांपूर्वी पीरबाजार येथील एका मिरवणूकीत ‘अण्णा दादा लाखोंनी असतील पण बाप फक्त एकच’ अशी उद्धट घोषणा मी ऐकून चकित झालो होतो. ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरूद्धचा प्रस्थापित व्यवस्थेविरूद्धचा हा लढा दलितांतील जातींअंतर्गत वर्चस्वाचा कधीपासून बनला? बुद्ध बनलेले पूर्वाश्रमीचे महार सोडून इतर दलित म्हणजे शूद्रातले शूद्र समजायचे का? नवबौद्ध दलितांतले ब्राह्मण बनले का?

तेंव्हाचा काळ कठिण होता, सामाजिक परिस्थिती भयानक होती, स्वातंत्र्य नुकतेच मिळाले होते वगैरे वगैरे लंगडे युक्तिवाद आपण मान्य करू. पण आता स्वातंत्र्याला आणि बाबासाहेबांच्या चळवळीला इतकी वर्षे उलटली आहेत. आता परिस्थिती अनुकूल आहे. मग या धर्म परिवर्तनाला गती का नाही भेटली? हे धम्मचक्र कुठे रूतून बसले आहे?

महारेतर दलित जातींना राखीव जागांचे सर्व फायदे मिळत आहेत. पण ज्या अस्मितेचे प्रतिक म्हणजे बुद्ध धम्म आहे तो मात्र स्विकारायची तयारी नाही ही काय मानसिकता आहे? आणि त्यांनी चुकून माकून स्विकारला तरी त्यांना आपल्या बरोबरचे समजायचे नाही समता प्रस्थापित होवू द्यायची नाही अशी मानसिकता का बनत आहे?

मग पारंपरिक सनातन हिंदू जातीत या दलितांचे जे स्थान होते, देवी देवता होत्या, रूढी परंपरा होत्या त्या बद्दल प्रचंड तक्रारी केल्या जात होत्या त्या कितपत खर्‍या आहेत? आजही दलित जातींत मांगीरबाबाची जत्रा, येरमाळ्याची जत्रा, म्हसोबा, सटवाई आदी देवता पुजल्या जातात, त्यांचे मोठे उत्सव भरवले जातात त्या बद्दल हे सगळे पुरोगामी ‘फुले शाहु आंबेडकर’वाले काय भूमिका घेतात? आता तर मनुस्मृती आणि ब्राह्मणांना झोडपायची सोय नाही. कारण यांच्यापासून मुक्तीचा मार्ग बुद्ध धम्माच्या निमित्ताने बाबासाहेबांनी दाखवून दिलाच आहे. मग याचा स्विकार का केला जात नाही?

मध्यंतरी 20 वर्षांपूर्वी शिवधर्माची एक चळवळ मराठा समाजाने पुढाकार घेवून सुरू केली. तेंव्हाच खरे तर सर्वांनी हा प्रश्‍न विचारायला पाहिजे होता की बाबासाहेबांशी तूम्ही वैचारिक बांधिलकी मानता तर मग सगळे बुद्ध धम्मात प्रवेश का नाही करत? परत वेगळा शिवधर्म कशासाठी?

पण हा प्रश्‍न विचारायची कुणी हिंमत केली नाही. शिवधर्म हा जगातील एकमेव असा धर्म होता त्यात जन्माने प्राप्त झालेल्या जातीचे निमित्त करून ब्राह्मण जातीला प्रवेश निषिद्ध मानला गेला. पुढे वैचारिक दबाव आल्यावर ही चर्चा थांबली.

महारेतर दलितांनी धम्माचा स्विकार केलाच नाही शिवाय इतर मागास म्हणून ज्या जाती होत्या त्यांनीही धम्माचा स्विकार केला नाही. याचे कारण काय? भाषणं करत असताना समता परिषदेच्या व्यासपीठावर ‘नवे पर्व ओबीसी सर्व’ असे सांगितले होते. हे सर्व ओबीसी एकत्र करून त्यांनी सगळ्यांनी मिळून धम्माचा स्विकार का नाही केला? समतेचा अवलंब समता परिषदेच्या व्यासपीठावरून का नाही केला गेला?

आश्चर्य हे आहे की ज्या सनातन हिंदू धर्मावर यथेच्छ टिका ‘शाहू फुले आंबेडकर’ वाले करत होते त्या हिंदू धर्माचा त्याग करण्याची धमक पूर्वाश्रमीच्या महारांशिवाय कुणीच दाखवली नाही. ब्राह्मण वगळता इतर सर्वच शूद्र आहेत असे मनुस्मृती मानते म्हणून ओरड करणारे हे सांगत नाहीत की हे सर्व उर्वरीत ‘शूद्र’ अजूनही एक व्हायला आजही तयार नाहीत.

मराठा मोर्च्यांचे वादळ महाराष्ट्रात उठले तेंव्हा दोन विषय प्रामुख्याने समोर आले होते. कोपर्डीच्या निमित्ताने ऍट्रोसिटीचा आणि मराठा आरक्षण हे दोन गंभीर विषय होते.

आज बौद्ध जयंती निमित्त या पुरोगामी विचारवंतांनी छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगावे बहुतांश ऍट्रॉसिटी प्रकरणांत दलित विरूद्ध इतर जातीत तेढ निर्माण झाली यात किती ब्राह्मण होते? ऍट्रॉसिटी मध्ये अडकलेले बहुजन हे ब्राह्मणेतरच होते. मग हा विषय दलित विरूद्ध मराठे असा तीव्र बनला होता की नाही? भाषणं करत असातना ब्राह्मणांना शिव्याश्याप देणं, आज अस्तित्वातच नसलेल्या मनुस्तृतीच्या कायद्यावर कोरडे उठवणे सोपे आहे पण वास्तव्यात पोलिस स्टेशनवर ऍट्रॉसिटी प्रकरणांत बहुजन समाज अडकला होता तो कोण होता?

दुसरा मुद्दा होता राखीव जागांचा. या राखीव जागांसाठी मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला होता. आजही तो तसाच आहे. पण हे मान्य केले जात नाही. बोलत असताना  ‘फुले-शाहू-आंबेडकर’ म्हणायचे पण प्रत्यक्षात फुले विरूद्ध शाहू विरूद्ध आंबेडकर अशी परिस्थिती निर्माण करायची. याला काय म्हणणार?

धर्माची आज फारशी गरजच नाही तेंव्हा बुद्ध धम्म स्विकारण्याला तसा व्यवहारात फारसा अर्थच नाही अशी मांडणी काही पुरोगामी करतात. ही भूमिका स्वागतशील आहे. मग हेच पुरोगामी बाबासाहेबांना हा प्रश्‍न का नाही विचारत? तूम्ही हिंदू धर्माचा त्याग केला तेच पुरेसे होते. नविन धर्म स्विकारायची गरजच काय होती? तसेही घटनेने सर्वांना समान अधिकार दिलेलेच आहेत. धर्म हा विषय प्रत्येकाचा वैयक्तिक ठेवून संपूवन टाकू. त्याच्यावर विचार करत बसायची गरजच काय?

पण हे पुरोगामी तसं करत नाहीत. सनातन हिंदू धर्माला ब्राह्मणांना मनुस्मृतीला शिव्याश्याप देण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत असा भास नेहमीच तयार केला जातो. तसा देखावा सतत उभा केला जातो. पण प्रत्यक्षात वागायची वेळ आली की सगळे अजूनही आप आपली जातीची अस्मिता जपत राहतात.

सनातन हिंदू धर्माला शिव्या देवून हिंदू धर्मातच रहाण्याची मुभा फक्त याच धर्मात आहे. भगवान महावीराला दहावा अवतार, भगवान गौतम बुद्धांना अकरावा आणि सुफीच्या निमित्ताने मोहम्मद पैगंबरांना बारावा अवतार मनात मानून हा समाज गेली अडीच हजार वर्षे परिवर्तनं पचवत आला आहे. महाविराच्या आणि बुद्धाच्याही आधी चार्वाकासारखे प्रस्थापितांना नाकारणारे प्रखर बुद्धीवादी दर्शन आमच्याकडे अस्तित्वात होतेच. याची जाणीव या पुरोगम्यांना होत नाही.

आज बौद्ध पौर्णिमे निमित्त ‘फुले शाहू आंबेडकर’वाद्यांनी आपण धम्माचा का स्विकार करत नाही याचा जाहिर कबुलीजबाब द्यावा अन्यथा ही भंपक भाषा बंद करावी. 

("धम्मपदांचा" प्रदीप आवटे ह्यांनी "धम्मधारा" नावाने सुंदर भावानुवाद केला आहे. ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे  अजिंठा शैलीचे सुप्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी ह्यांचे एक चित्र आहे. हेच मुखपृष्ठ लेखात वापरले आहे. )

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

4 comments:

  1. पुरोगाम्यांना आरसा दाखविलास

    ReplyDelete
  2. अंजन घालणारे लेखन ! पेण पुरोगामी दांभिकांच्या कानावर हे पडेल आणि पडले तरी त्यातून ते काही बोध घेतील अशी अजिबात शक्यता नाही.

    ReplyDelete
  3. मला माहित आहे... शांत बसणे हे वेगळ्या अर्थाने ट्रोलिंगच आहे.. चालू द्या.. आपण आपले काम करावे...

    ReplyDelete
  4. आपला विचार बरोबर आहे. किमान महरेतर दलितांनी तरी बुद्ध झाले पाहिजेत मग मागे मागे ओ बी सी पण येतील तेंव्हाच परिवर्तनाला सुरुवात होइल.

    ReplyDelete