Sunday, May 17, 2020

वैशाखाच्या फांदीवरती आषाढाची गाजरपुंगी !


काव्यतरंग, 17 मे रविवार 2020 दै. दिव्यमराठी

अभ्रांच्या ये कुंद अफुने,
पानांना ह्या हिरवी गुंगी
वैशाखांतिल फांदीवरती
आषाढाची गाजर-पुुंगी

मिटून बसली पंख पाखरे
पर्युत्सुक नच पीसहि फुलते
मूक गरोदर गाईची अन्
गळ्यांतली पण घंटा झुरते

तिंबून झाली कणीक काळी
मऊ मोकळी ह्या रस्त्याची
उष्ट्या अन्नामध्ये थबकली
चोंच कोरडी बघ घरीची

ब्रेक लागला चाकांवरती
श्वासहि तुटला आगगाडीचा
ऊन उसासा धरणीच्या अन्
उरांत अडला इथे मघाचा

शिरेल तेंव्हा शिरो बिचारे
हवेत असल्या पाऊस-पाते
जगास तोंवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजल चढते !

-बा.सी. मर्ढेकर, (मर्ढेकरांची कविता, मौज प्रकाशन, आ.1 पुनर्मुद्रण 1991, पृ. 78)

हे दिवस नेमके वैशाखाचे आहेत. मर्ढेकरांनी हे जे वर्णन केलं आहे ते कविता निर्मिती प्रक्रियेबाबत आहे असं एक वेगळं महत्त्वाचं विश्लेषण विनय हर्डिकर यांनी ‘कारूण्योपनिषद्’ या मर्ढेकरांच्या कवितेवरील पुस्तकांत केले आहे. अनिलांची ‘श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला, पंखी खुपसून चोंच एक पक्षी निजलेला’ या ओळीही कविता निर्मितीची गोष्ट सांगतात. 

वैशाखा नंतर येणारा ज्येष्ठ जेंव्हा मृगाचा पाउस येतो. पण हा पाउस नियमित पडतो असे नाही. आषाढाचा पाउस मात्र हक्काचा नियमित पडणारा असा मानला जातो. कालिदासाने आपला निरोप सांगण्यासाठी ज्येष्ठाच्या ढगांवर विश्वास नाही ठेवला. आषाढाच्या पहिल्या दिवशी जो ढग दिसतो जो पाण्याने पूर्ण भरलेला आहे आणि जास्त अंतर कापू शकतो, हक्काने पाउस पाडू शकतो. त्यामुळे मर्ढेकरही वैशाखाच्या फांदीवरती ज्येष्ठाची गाजरपूंगी असं म्हणत नाहीत. आषाढाचीच म्हणतात.

हे वर्णन लॉकडाउनच्या दिवसांनाही लागू पडतं. सगळं ठप्प आहे. वैशाखातील हे जे वातावरण आहे ते सामाजिक पातळीवरही तसेच आहे. सगळा व्यवहार ठप्प होवून बसला आहे. कुणाला काहीच सुचत नाहीये. पुढे काय होणार काहीच कळत नाहीये. ‘शिरेल तेंव्हा शिरो बापडे हवेत असल्या पाउसपाते’ ही जी विलक्षण ओळ मर्ढेकरांच्या कवितेत आली आहे तशीच सगळ्यांची मानसिकता होवून बसली आहे. काही तरी बदल होवो. तो जेंव्हा होईल तेंव्हा होवो पण तोवर ‘मृगाविनाही मृगजळ चढते’ अशीच स्थिती आहे.

कवितेचा एक साधासा अर्थ आहे. जमिन तयार होवून पावसाची वाट पहाते आहे. पेरणी होण्यासाठी आधीची जी मशागत करावी लागते ती झाली आहे. ‘तिंबून झाली कणिक काळी’ यातून निर्मिती आधीच्या सगळ्या त्रासातून जातो आहे हे सुचित होते. एक विलक्षण तगमग या काळात अनुभवायला येते आहे. 

‘ब्रेक लागला चाकांवरती अन् श्वासही तुटला आगगाडीचा’ या ओळींतून आता घरंगळत काही जात नाही. सगळं थांबलं आहे. एरव्ही पुढे काहीच घडणार नाही हा निराशावाद असता तर हे थांबणं शक्य नव्हतं. या थांबण्यातूनच पुढचं काही घडण्याची शक्यता सिद्ध होते आहे. या कवितेला लागून पुढची कविता ‘आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने, प्यावा वर्षा ऋतू तरी’ ही आहे कारण निर्मिती घडून गेल्यानंतरचा जो आनंद आहे त्याची आहे असे अप्रतिम विवेचन विनय हर्डीकर यांनी केले आहे.

विविध समिक्षकांनी मर्ढेकरांची ही आणि इतर अशाच कविता खुप चांगल्या पद्धतीने उलगडून दाखवल्या आहेत. या कवितेचा एक लोभसपणा तिच्या सहज लक्षात येणार्‍या साधेपणात आहे. जो कुणाही रसिकांना एकदम आपलासा वाटतो. खुप मोठा अर्थ लक्षात येण्याआधी कुणालाही एखादं काही घडण्यापूर्वीची विलक्षण तगमग यात दिसते. काही वेळेला आपल्या हातात काहीच नसते. आपण मग शांतच बसून रहातो. ‘पर्युत्सूक नच पिसही फुलते’ अशी ती अवस्था असते. आताही कोराना काळात सगळेच अस्वस्थपणे शांत बसून आहेत. काय करावे काहीच सुचत नाही. काही करताही येत नाही. एक आशावाद तेवढा मात्र आहे की कधीतरी हा होईना पाउस यईल, उशीरा येईल पण येईल नक्की. 

मर्ढेकर सहजपणे भारतीय मानस या कवितेतून मांडत आहेत. उकिरड्याचे पण पांग फिटतात, दिवस पालटतात, दू:ख काही घर बांधून रहात नाही, आपण दू:ख दळून खाणारी माणसं आहोत असे कितीतरी दाखले आयाबायांच्या बोलण्यातून आढळून येतात. जात्यावरच्या ओव्यांतूनही हा आशावाद आपण जपलेला आहे.

कुखू राहू दे कपाळी, मान राहो आहेराला
ऊन तापता इखारी, सावली दे माहेराला

कोरोनाच्या उदास काळातही गुलमोहर फुलला आहे, पिंपळाची कोवळीलूस पानं वैशाखी पौर्णिमेला चांदण्यात चमचमत आहेत, बहाव्याच्या पिवळसर फुलझुंबरांनी डोळ्यात, मोगऱ्याच्या गंधाने  श्वासात, कोकळीच्या स्वरांनी कानांत चैतन्य निर्माण केले आहे. 

‘ब्रेक लागला चाकांवरती, श्‍वासही तुटला आगगाडीचा’ यातून एक वेगळा अर्थ या कोरोनाच्या काळात निघतो आहे. सगळं मानवनिर्मित यांत्रिक जग कोरोनासमोर ठप्प झालं आहे. एकदम ब्रेकच लागला आहे. आणि आशा दिसते आहे ती निसर्गातूनच. 
(छायाचित्र श्रीकृष्ण उमरीकर)
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

2 comments:

  1. आजच्या परिस्थितीशी संदर्भ जोडून कवितेचा अर्थ खूपच भावला.

    ReplyDelete